फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज.. खाने की थाली में छेद !

.. खाने की थाली में छेद !

Advertisements

[शुक्रवार स्तंभ-‘कहानि पुरी फिल्मी है’]

रेवती जोशी-अंधारे

सध्या या म्हणीला खुपच चांगले दिवस आलेत. तशा बोली भाषेतील म्हणी-मुहावरे अलीकडे फारसे वापरले जात नाहीत म्हणा! पण असो, त्याविषयी नंतर कधीतरी ! आज तर जेवणाच्या ताटाचा विषय ऐरणीवर आहे. ‘रोटी’ आपल्यासाठी कशी आणि किती आवश्यक आहे, हे डॉक्टरांपेक्षा बॉलीवूडनेच आपल्याला जास्त पटवून दिलंय. तिथूनच विषय जेवणाच्या ताटावर येतो. कधीच, कुठेच आणि कोणत्याच मुद्यावर न बोलणारी व्यक्ती जेव्हा अचानक देशाच्या सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मवर एखादा विषय मांडते तेव्हा साहजिकच त्यावर खूप चर्चा होतेच.एरवी कधी क्वचितच संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहणा-या, उपस्थित असूनही बोलणा-या आणि बोलण्यातही खासदार म्हणून काही महत्त्वाचा विषय मांडणा-या जया भादुरी-बच्चन यांनी यंदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अक्षरश: ‘आग लावली.

सुशांतच्या मृत्यूने सगळंच कसं ढवळून निघालंय. नार्कोटीक्स नियंत्रण विभाग, अंमलबजावणी संचालनालय, मुंबई पोलिस आणि सीबीआय यांच्या बरोबरीने सक्रीय असलेला मिडीया आणि हे सगळं कमी म्हणून की काय, पण एका भाषणाने चक्क देशाची संसदच या प्रकरणात ओढली गेली. बॉलीवूडमधील ९० टक्के कलाकार अंमली पदार्थांच्या आहारी गेले असल्याच्या विधानावरून जया बच्चन खवळल्या. हे विधान त्यांना बॉलीवूडचा अपमान वाटले आणि हे विधान करणारी व्यक्ती म्हणजे खासदार रवीकिशन यांनी जिस थाली में खाते हो, उसमें छेद करते हो ! असा शेरा पास केला. खरे तर बॉलीवूड आणि अंमली पदार्थांची व्यसनं ही काही लपून राहिलेली गोष्ट नाहीच आहे.

या लेखमालेच्या पहिल्याच भागात आपण त्यावर बोललो होतोच. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हणजे प्रत्येक भारतीयाची आन-बान-शान असायचे. आपल्या आवडत्या कलाकाराची खडानखडा माहिती ठेवायची, त्यांचे पेपरात आलेले फोटो कापून ठेवायचे, मुलाखतींचे कात्रणे ठेवायची आणि कहर म्हणजे त्यांच्यासारखं दिसणं-बोलण्याचा प्रयत्न करायचा. तो काळ आता इतिहासजमा झाला असला तरी सोशल मिडीयामुळे आपल्याला आवडणा-या सेलिब्रिटीच्या थेट संपर्कात राहणं आता शक्य झालं आणि म्हणूनच, ताटाला कोण आणि कसे छेद करतोय? हे वेगळ्याने सांगण्याची गरजच उरलेली नाहीये. लोकांची नजर तुमच्यावर सतत असतेच, याचा विसर या सेलिब्रिटींना कसा पडतो?

माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओजमध्ये तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले दीपीका पदुकोण, अर्जुन कपूर, शाहीद कपूर, विक्की कौशल, वरुण धवन यांच्यासारखे युवा कलाकार दिसतायत. ड्रग्ज पार्टीचे आयोजन करणारा करण जोहर ! गुडी-गुडी गर्भश्रीमंत कुटुंबाची भावपूर्ण कहाणी, मैत्री-प्रेमाचा गोंधळ आणि अपेक्षित सुखान्त असा सगळा जांगळगुत्ता म्हणजे करण जोहरचे चित्रपट ! गोंधळ किंवा कन्फ्युजन हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात (!) जसा महत्त्वाचा प्रश्न आहे तसाच तो त्याच्या चित्रपटांमध्येही असतो.

आम्ही मेहनतीचे हजार-पाचशे खर्च करून, टॉकीजमध्ये पिक्चर बघायला जायचं आणि गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर यायचं. पिक्चर हिट झाला म्हणून त्यांनी पार्ट्या करायच्या आणि देशाच्या कायद्याकडे दुर्लक्ष करून, दम मारो दम करीत झिंगायचं. कानून के हाथ कितीही लांब असले तरी यांच्यापर्यंत ते पोचत नाहीत. आपल्या सामान्य आणि साचेबद्ध जीवनात सिनेमातल्या परीकथेची वेडपटासारखी वाट बघत, आम्ही झुरत रहायचं आणि त्या स्वप्नांच्या पुंगळ्या करून यांनी गांजा-चरसाचे झुरके घ्यायचे. झगमगाटाच्या मागचं हे घाणेरडं वास्तव बटबटीतपणे समोर आलंय आणि आमच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घातल्या गेलंय. यासाठी, सुशांतचे आभारच मानायला हवेत.

चाहत्यांना मुर्ख समजू नका. डोक्यावर घेणारे प्रेक्षकच तुमचे खरे मायबाप आहेत आणि त्यांनी ठरवलं तर हे वलय मिळालं तसं उडूनही जाईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

नेपोटीझम असो की कास्टिंग काऊच, अंडरवल्र्डशी संबंध असोत की उपचारांसाठी परदेशात घेतलेली धाव, यापैकी प्रत्येक वेळी ढिम्म राहून अवाक्षरही न काढणा-या बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांना ९० टक्के बॉलीवूड ‘नशेडी’ असल्याचं म्हटलं तर किती मिरच्या झोंबल्या.

छेदलेल्या ताटाची गोष्ट सांगणा-या त्याच संसदेत, आज आपल्यासमोर भरलं ताटं आणणा-या शेतक-यांसाठी नवं विधेयक आलं. त्यावर मात्र, बॉलीवूडकरांनी तोंडात मीठाची गुळणी धरलीय. १९५३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दो बिघा जमीन’ असो की १९५७ मध्ये आलेला ‘मदर इंडिया’, ‘उपकार’ असो की अगदी अलिकडच्या काळातील म्हणावा असा ‘लगान’, बॉलीवूडने सावकार-शेतकरी अशा समस्या दाखवून पैसा कमावलाही खूप!

शेतक-यांच्या आत्महत्या आणि समस्यांना तोंड देताना, स्वत:चे तोंड रंगवून मटकणा-या या कलाकारांना, आपण करीत असलेलं दुर्लक्ष म्हणजे त्या शेतक-याने दिलेल्या, खाने की थाली में छेद वाटला नाही, हे खरे दु:ख आहे. मनोरंजनापेक्षा पोटाची भूक आणि जीवंत राहण्याची धडपड मोठी असते. खरे नायक-नायिका म्हणून जवान-किसान आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात ध्रुवपदावर आहेत, याचा विसर पडू नये म्हणजे झालं !
……………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या