
[शुक्रवार स्तंभ- ‘कहानी पुरी फिल्मी है’]

रेवती जोशी-अंधारे
झक्क लाईट्स, महागड्या कार, फॅशनेबल कपडे, मेकअप – हेअरडूजच्या त-हा आणि भरीस भर म्हणजे ग्लॅमर ! अभिनयाच्या बळावर नेम-फेम मिळतंय आणि तरुण पिढी उठता-बसता या कलाकारांना फॉलो करतेय. तेच आदर्श झालेत म्हणा नं! पण, हे फॉलोर्इंग स्टाईलबाजीपर्यंत मर्यादीत होतं, तिथपर्यंत ठीकच होतं. आता मात्र त्यांचे भलतेच कलागुण समोर येऊ लागलेत आणि कल्ला सुरू झाला. सुशांत सिंग राजपूतची हत्या की आत्महत्या हा राष्ट्रीय प्रश्न झाला असतानाच, त्या निमित्ताने पुढे येत असलेल्या ड्रग्ज रॅकेटने हातपाय किती पसरले आहेत? हे तर सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट दिसते आहे. अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा अभिनित ”छोटीसी बात’‘ या १९७६ मध्ये आलेल्या चित्रपटात, अशोक कुमार भोळसट अमोल पालेकरला स्टायलिश राहण्याचं प्रशिक्षण देतात. यात, सिगारेट शिलगावून झोकात झुरका घेण्याचीही एक स्टाईल असते. अशा अनेक स्टाईल्स कळत-नकळत या चित्रपटांनी आपल्या पिढ्यान्पिढ्यांना एकेक स्टाईल शिकवली.
पण, सगळं इतकं छान-छान चालत रहायला हे जग म्हणजे काय राजश्रीचा चित्रपट आहे की यशराजची प्रेमकथा ? नशेडी, गंजेडी म्हणजे समाजात कोणत्या तरी कोप-यात, दुर्लक्षित, भटके हिप्पी असे असतात, ही आमच्यासारख्या मध्यमवर्गीय सामान्यजनांची कल्पना ! सगळ्यात आधी अभिनेता (?) संजय दत्तने या कल्पनेला तडा दिला आणि तोपर्यंत “चोरी चोरी” चालणा-या या सगळ्या गोष्टी ढळढळीत उघड्या पडल्या. इतक्या की, कंगना राणावतने, बॉलीवूडमधील ९९ टक्के लोक ड्रग अॅडीक्ट असल्याचे सांगितले आणि भडकाच उडाला. बहुतांश सगळ्यांना कशाचं तरी व्यसन असतं विशेषत: कलाकारांना ! मदिरेचे घोट घेतल्याशिवाय कॅमे-यासमोर उभं राहणंही शक्य होत नसे अनेक कलाकारांना, हे सर्वश्रुत आहे. दारू-तंबाखूपासून सुरू झालेला हा प्रवास व्हाया चरस, गांजा असा होत आता आयडीयु , मेरीजुआना आणि डुबीजपर्यंत येऊन पोहचला आहे. त्यांचं हे अध:पतन आम्हा सामान्यांसाठी समजण्यापलिकडे आहे. ड्रग्जमुळे सुजलेले डोळे, खंगलेले गाल आणि खपाटीला गेलेलं पोट लपवायला त्यांच्याजवळ मेकअपचा भक्कम आधार असतो आणि आम्ही मात्र त्यांचं बघत , दम मारो दम करणार.
संजय दत्तसोबतच रणबीर कपूर, फरदीन खान, पूजा भट्ट, मनिषा कोईराला, गौरी खान, सुझॅन रोशन, हनी सिंग, कपिल शर्मा, राहुल महाजन या नावाजलेल्या कलाकारांनी कोवळ्या वयातच व्यसनांचा आधार घेतला. काहींनी या घाणेरड्या सवयीतून स्वत:ची सुटका करून घेतली. तर काही अडकले त्यातच! गीतांजली नागपाल या सौंदर्यवतीच नाव कदाचित तुम्हाला माहितीही नसेल. पण, तिने एक काळ सुश्मिता सेनसोबत रॅम्पवॉक केला होता. सध्या ती दिल्लीच्या रस्त्यांवर भीक मागत भटकते आणि मंदीरात-धर्मशाळेत रात्री आसरा घेते. याचं क्रेडीट फक्त ड्रग अॅडीक्शनला! कंगना राणावतच्या फॅशन चित्रपटात स्पर्धा, ड्रग्ज, यशाची धुंद आणि दाणकन् जमिनीवर आपटण्याचा प्रवास बराच खुलेपणानं दाखवला होता. त्वचा तरुण दिसण्यासाठी काही कलाकार ठराविक मर्यादेत व्यसनांचा आधार घेतात पण, ही संख्या फारच कमी असेल.
अप्रतिम सौंदर्य, कसदार अभिनय आणि धारदार लेखणी असं काँबिनेशन म्हणजे मीनाकुमारी! तिचे चित्रपट जितके गाजले कदाचित त्यापेक्षाही जास्त तिच्या नशेच्या कहाण्या गाजल्या. वयाच्या ४० व्या वर्षीच व्यसनानं तिचा जीव घेतला. लागोपाठ मिळालेलं यश पचविण्यासाठी दारूच्या आहारी गेलेला राजेश खन्ना असो की धर्मेंद्र, दोघांनीही आपापल्या करीयरचा एक मोठा काळ या व्यसनांत गमावला. प्रेमभंगाच्या दु:खातून सावरण्यासाठी एलसीडीचा आधार घेत, स्वत:च्या करीयरचं वाट्टोळं करणारी अभिनेत्री परवीन बाबी! एका देखण्या-गुणी अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत झाला. वयाच्या १९ व्या वर्षीच अट्टल दारूडी झालेली दिव्या भारती इमारतीच्या सहाव्या माळ्यावरून पडून गेली. या अपघाताच्या वेळी ती प्रचंड नशेत होती.
रिया चक्रवर्ती आणि ड्रग पेडलर्सच्या व्हॉट्स अप चॅटमधून जे खुुलासे झालेत ना, ते आपलेच डोळे उघडणारे आहेत. मोठमोठे ग्लॅमरस सेलिब्रिटी एंटरटेनर (कलाकार म्हणायला मन धजावत नाही) ज्यांच्या हाती पैसा खुळखुळत असतो, त्यांना हे महागडे शौक करणे म्हणजे स्टेटस वाटतं. पण, त्यांच्या पडद्यावरच्या रूपाला भुलून, या सगळ्या ख-या गोष्टींकडे न बघणारा सामान्य युवा, या हिडीस देवघेवीचा अप्रत्यक्ष बळी ठरतो. मित्रांनो, आपले खरे हिरो-हिरोईन ओळखा. कर्तृत्त्वाचा दम भरा. छातीचा भाता करत, असा फालतू दम मारण्यात काहीच दम नाही.




आमचे चॅनल subscribe करा
