

आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी
पुणे दि.१६: नगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार सुरूच आहेत, त्यात सुपा येथे दि.१४ ऑगस्ट, २०२० रोजी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च २०२० मधील बलात्काराची केस मागे घेण्यासाठी महिलेला धमकाविण्यात आले असून यातील आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाशी व उपचार करणाऱ्या डॉक्टरशी बोलून सविस्तर विचारपूस केली. सदर प्रकरणातील पोलीस अधिकारी यांच्याशीही चर्चा केली. या घटनेच्या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना आ.नीलम गो-हे यांनी निवेदन दिले आहे.
‘बलात्काराची केस मागे घे’, असे म्हणत एका महिलेच्या दहा वर्षाच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न झाला यात मुलगी १५ टक्के भाजली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून राजाराम गणपत तरटे व अमोल राजाराम तरटे (दोघे रा.पळवे, ता.पारनेर) यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आले असून एक आरोपी फरार आहे.
कोव्हिडं-१९ मुळे तुरुंगातील आरोपींना सोडण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या व इतर घटनेत अटकेत असलेल्या आरोपींना कोव्हिडं-१९ मुळे जामीन मिळत आहे. जामीन मिळाला असला तरी देखील त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत परंतु याची अंमलबजावणी होताना दिसत नाही असे ही आ.डॉ.गोऱ्हे यांनी गृहमंत्री देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. तसेच पीडित महिलेला व तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे,अशी मागणी त्यांनी केली.
सदरील घटनेतील अटकेत असलेल्या आरोपींना कोव्हिडं-१९ मुळे जामीन देण्याच्या निर्णय घेतला आहे. यामुळे पीडितेच्या जीवास धोका निर्माण झाला असल्याने जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयाला विनंती करावी. बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या व इतर घटनेतील आरोपींना जामीन किंवा पेरॉलवर सोडताना विविध निर्बंध न्यायालयाकडून घालून देण्यात येत आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. न्यायालयाकडून घालून देण्यात आलेल्या निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी व कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनास देण्यात यावेत. या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून आ.डॉ.गोऱ्हे यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केल्या आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
