फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजबादशहाचं ‘गेंदा फूल'

बादशहाचं ‘गेंदा फूल’

Advertisements

स्तंभ-‘कहानी पूरी फिल्मी है’
[रेवती जोशी-अंधारे]

आजकाल कानावर येणा-या सगळ्याच कहाण्या खूपच फिल्मी आहेत. जुन्या काळी नवाब-बादशहा वगैरे मंडळी हातात गुलाबाचे फूल घेऊन ते हुंगत बसलेले असायचे. आपल्या सध्याच्या काळातील बादशहाने हाती ‘गेंदा फूल’ घेतले आणि त्याचाच झेंडू झाला. रॅप या गायनप्रकाराच्या नावाखाली जुन्या-नव्या गाण्यांना बडबडीची फोडणी द्यायची, नाचणा-या मंडळींचा ताफा उभा केला की झालंच ! वर पुन्हा लोकांनी ही फालतू गाणी ऐकावी आणि लाईक करावीत यासाठी, हेच पुन्हा लाखो रुपये खर्च करणार. सृजनशीलता आणि रसिकता या शब्दांना डब्बाबंद करून बडविण्याचीच वेळ आली आहे म्हणायची !

आधी ‘गेंदा फूल‘ या गाण्यासाठी एका साध्या बंगाली गीतकाराकडून पाच लाख रुपयात त्याच्या रचना विकत घेऊन वादात आलेल्या बादशहाने, ७५ लाख रुपयांना लाईक्सच्या रूपात रसिकांची पसंती विकत घेतल्याचं स्पष्ट झालंय. युट्यूबवर प्रदर्शित त्याच्या ‘पागल है…’ या गाण्याला पहिल्या २४ तासात सर्वाधिक लाईक्स मिळून अगदी वल्र्ड रेकॉर्ड बनावा, अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. लाईक्स मिळवायचे असतील तर तश दर्जेदार रचना असायला हवी, एवढी सोपी नैतिकता त्याला कुठे समजायला? एवीतेवी हाती पैसा खेळतोच आहे तर द्या आणि घ्या विकत लाईक्स …असा हा प्रकार आहे. हॅपनिंग आणि मॉडर्नच्या नावाखाली शब्दश: काहीही प्रेक्षक-श्रोत्यांच्या माथी मारणारी ही मंडळी ! त्याचा हा व्हिडीओ ७५ मिलियन्सने पहिल्या २४ तासात पाहिल्याचा दावा त्याने केला. सुरुवातीला आपण असं काहीही केलेलं नाही, असा कंठशोष करणा-या बादशहाने नंतर मात्र मुंबई पोलिसांपुढे शरणागती पत्करली. अचानकच त्याच्या फॉलोअर्सच्या संख्येत प्रचंड घट झाली.

बादशहाच्या निमित्ताने, एका प्रचंड मोठ्या ‘फेक फॉलोअर्स’ घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. सोशल मिडीयाच्या सगळ्या नकली, बनावट, खोटारड्या आणि नाटकी जगात वावरताना, त्याच्या किती आहारी जायचं? याला काही बंधनं आहेत. ती ज्याची त्याने ठरवायची असतात. अभिषेक दावडे नावाच्या एका माणसाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. हा २१ वर्षांचा मुलगा ‘सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून व्यवसाय करतो. अशा प्रकारच्या सर्व्हिसेस देण्यासाठी वेगवेगळ्या नावांचे १७० पेक्षा जास्त अकाऊंट्स हाताळत होता. पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स त्याने जोडले होते ते देखील अर्थातच बनावट ! देशविदेशातील अनेक डोकी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं हळूहळू उघडकीस येततंय. फॉलोअर्सचा रेट वेगळा आणि लाईकचाही ! स्वत:ला सोशल मिडीया मार्केटींग एजन्सी असे गोंडस नाव देऊन, रग्गड कमाई करायची, हा उद्योग !

गायिका भूमी त्रिवेदीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांच्या शोधकार्यात हा घोटाळा उघडकीस आला. तिच्या नावाने कोणीतरी इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडला होता. तिचे फोटोज् आणि इतर माहिती असलेल्या या अकाऊंटवरून इतरांना फसविण्याचे उद्योग सुरू होते. तो कुठून उघडला गेला ? याचा शोध घेत असताना पोलिस दवडेपर्यंत पोहचले. दरम्यानच्या काळात अभिनेत्री कोयना मित्रा हिनेही अशीच तक्रार दाखल केली. कोट्यवधी बनावट प्रोफाईल्स, फॉलाअर्स, व्ह्यूज, कमेंटस् आणि लाईक्सचा आंतरराष्ट्रीय कारभार चालविणा-या एका वेबसाईटसाठी तो काम करत असल्याचं उघड झालं आहे. त्याला जामीनही मिळाल्याचं वृत्त आहे. आजघडीला देशात अशा १०० वेबसाईट्स कार्यरत आहेत , असं पोलिस म्हणतायत.

या सगळ्या पाश्र्वभूमीवर कलाक्षेत्राची असंवेदनशीलता चव्हाट्यावर आली आहे. अशा प्रकरणांमध्ये शिक्षेची तरतूद आपल्या कायद्यात आहे का? मुळात, लाईक्स-फॉलोअर्सची खरेदी-विक्री अवैध आहे का? आपल्याला काय आवडावं किंवा आवडू नये, हे ठरविण्याचा अधिकार सव्र्हिस प्रोव्हायडर्सना आहे का ? बदलत्या काळाची गरज म्हणून आपण हेदेखील निमूटपणे स्विकारून, पुढ्यात येईल त्या व्हिडीओ-गाण्यांना आवडून घ्यायचं आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहीलेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या