फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज'न' ... नेपोटीझमचा !

‘न’ … नेपोटीझमचा !

Advertisements

बॉलीवूड तर फक्त एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी है, मेरे दोस्त!

[रेवती जोशी-अंधारे]

अ लॉट कॅन हॅपन ओव्हर अ कप ऑफ कॉफी … ही टॅगलाईन बॉलीवूडमध्ये खरंच खूप काही घडवून जाईल, असा विचार कोणीच केला नसेल. चकचकीत चित्रपट बनविणा-या करण जोहरचा गुळगुळीत कार्यक्रम म्हणजे ‘कॉफी विथ करण!‘ हिरो-हिरोईन्सना त्याने लाजत-मुरडत आधी ठरवलेले प्रश्न विचारायचे (मुख्य भर खासगी आयुष्य, गाजलेली प्रेमप्रकरणांवरच) मग कलाकारांनी बेधडक (न जमणारा ओएमजी अभिनय करत) उत्तरं द्यायची, असा प्रकार होता. या कार्यक्रमाचे दोन-तीन सेशन्स झाले. वर्ष २०१७ ! नाजूक देहयष्टीची कंगना राणौत या कार्यक्रमात आली. या पहाडी ब्युटीने अनपेक्षित फटकेबाजी करीत, करण जोहरच्या टॉक शोचे तीन तेरा तर वाजविलेच वर पुन्हा त्याला एक पदवी देऊन मोकळी झाली. ‘करण जोहर हा नेपोटिझमचा झेंडा घेऊन अग्रक्रमावर असलेला चित्रपट दिग्दर्शक आहे,असं तिने त्याच्याच तोंडावर सांगितलं. आणि, त्याच वेळी बॉलीवूड चाहत्यांच्या शब्दसंग्रहात ‘नेपोटीझम् ‘ या नव्या शब्दाची भर पडली.

गूगलवर नेपोटीझम् हा सर्वाधिक सर्च होणारा शब्द झाला. पण, यानंतरही कंगनाने तिची उपसलेली तलवार म्यान केली नाहीच. मनकर्णिकाचं शूट सुरू झालं होतं ना तेव्हा ! गमतीचा विषय अलाहिदा ! ‘फिल्म इंडस्ट्रीत नव्याने आलेल्या कलाकारांसोबत करण जोहर आणि त्याच्या कंपूची वागणूक असहनीय आणि तुच्छता दाखविणारी असते,’ हा वार तिने एका चॅट शोमध्ये केला. तिच्या या आरोपांनंतर भाई-भतीजावाद, कंपूशाही, कम्फर्ट झोन, कास्टींग काऊच आणि इतर अनेक विषय चघळले जाऊ लागले. म्हणजे मूळ चित्रपट, कथा, अभिनय, कॅमेरावर्क, सिनेमॅटोग्राफी हे अस्सल चर्चेचे विषय खड्ड्यात जाऊन पडले आणि भलत्याच विषयावर सखोल मंथन वगैरे होऊ लागले. मग, कंगनाच्या सोबतीने हुमा कुरैशी, तापसी पन्नू यांनीही कंगनाची बाजू उचलून धरली आणि आपणही कधीकाळी या घाणेरड्या प्रकारातून गेलो असल्याचे सांगितले. खुनाला वाचा फुटावी तसे वेगवेगळे कलाकार, गायक अशा सर्वांनीच ‘होयबा हो‘ची री ओढली.

स्टारकिड्सही आपल्या बचावासाठी पुढे सरसावले. रणबीर कपूर, करीना कपूर आणि आलिया भट्टने स्पष्ट शब्दात सांगितले की, सिनेसृष्टीचा बॅकग्राऊंड असल्यामुळे पहिला चित्रपट मिळण्यास कदाचित (?) मदत होते पण, नंतर सातत्यपूर्ण काम मिळत राहण्यासाठी स्वत:मध्ये अभिनय कौशल्य असलेलीच मंडळी या क्षेत्रात टिकू शकतात. सोनम कपूरने तर प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांची उदाहरणे देत, त्या कशा स्वत:च्या मेहनतीने यशस्वी झाल्या वगैरे सांगितलं. पण, स्वत:च्या कामगिरीविषयी तिने मौन साधण्याची हुशारी दाखवली. आपल्या आईवडीलांच्या पुण्याईवर आणि अंगी सामान्य कलागुण असूनही, चांगल्या बॅनरचे चित्रपट खिशात असणारी खूप मोठी जंत्री आहे. तो किंवा ती अमक्याचा तमक्या, असं म्हणून प्रेक्षकांनीही ते तद्दन रद्दड चित्रपट पाहिले. त्यांचे चित्रपट येत राहीले… आपण पाहत राहिलो. चंदेरी दुनियेत नव्याने येणारा, या कंपूशाहीत स्वत:ला अ‍ॅडजेस्ट करण्याचा प्रयत्न करीत राहीला. नेपोटीझम् च्या फुललेल्या निखा-यांवर राख जमत गेली. जूनमध्ये सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या किंवा हत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा नेपोटीझम्चा विषय ऐरणीवर आला आहे.

आपल्या कुटूंबातील, नातेवाईकांपैकी, मित्र-मैत्रिणींना प्राधान्याने काम मिळवून देणे किंवा त्यांच्यासाठी काम तयार करणे इथपर्यंत ठीकच आहे. पण, त्यासाठी या परीघाबाहेरून येणा-यांना दुय्यम वागणूक देणं, त्यांचे मानसिक खच्चीकरण, अपमान करणं हे या आधुनिक गंधर्वमंडळींना अजिबात शोभणारं नाही. नाही म्हणता नेपोटीझम् आपल्या जीवनाचा अलिकडेच नाही तर पिढ्या न पिढ्या चालत असलेला एक अविभाज्य भाग आहे. त्याशिवायच का, ‘आपला तो बाब्या न् दुस-याचं दे कारटं’ ही म्हण प्रचलित आहे? बॉलीवूडच्या ग्लॅमरस दुनियेचं हे कटू वास्तव आहे आणि कधीतरी पृथ्वीराज कपूर यांच्या खानदानासोबत रुजलेली त्याची मुळं आता अक्राळविक्राळ झाली आहेत.

आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी या नेपोटीझम् ला बळी पडलोच आहोत. आपल्या शालेय जीवनापासून करीयरपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात हा ‘भाई-भतिजा’ भेटला आहेच. म्हणूनच बॉलीवूड तर फक्त एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी है, मेरे दोस्त!

[प्रतिक्रिया कळवा- ९८५०३३९२४०]

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या