

एस.कुमार ऑकस्ट्राचे संचालक शेखर घटाटे यांचा करोनाने मृत्यू
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २ ऑगस्ट: ऑकेस्ट्राचा एक सुवर्ण काळ या शहराने सत्तर व ऐंशीच्या दशकात बधितला.याच दशकात शहरात कादर ऑकेस्ट्रा,योगेश ठक्कर ऑकेस्ट्रा व ओ.पी.सिंह यांचा मेलोडी मेकर्स हे तीनच ऑकेस्ट्रा सर्वाधिक लोकप्रिय होते. या तीन ऑकेस्ट्रामध्ये गायनाची,वादनाची संधी मिळावी म्हणून त्या काळातील तरुण कलावंत तासनतास यांच्या ऑफिस बाहेर ताटकळत त्यांची प्रेक्टीस ऐकत उभी असायची. एस.कुमार म्हणजे शेखर घटाटे या सारख्या कलाकाराला देखील ओ.पी.सिंह ऑकेस्ट्रा संचात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांना जणू आकाश ठेंगणे झाले.
सुरवातीला त्यांनी मेलोडी मेकर्स संचामध्ये मॅनेजरचे पद सांभाळले. हिशोबात ते कायम चोख असत. अनेकदा ते परिघाबाहेर जाऊन कलावंतांना मदत करीत असत. तर अनेकदा त्यांचे कलावंतांसोबत वैचारिक मतभेद देखील व्हायचे. मात्र तो काळ कलेप्रति समर्पित असणा-या कलावंतांचा होता त्यामुळे ‘ मतभेद असले तरी मनभेद’नव्हतेच. एका-एका गाण्याच्या प्रॅक्टीससाठी अहो रात्र गायक व वादक सराव करीत असे. अख्खी रात्र जागून गाणी आणि गाण्याचा प्रत्येक पीस बस यावरच चर्चा घडत असत.
कलावंतांचे आवडते ठिकाण म्हणजे बर्डीतील जगत हॉटेल. सराव करुन मेंदू शिणला की हे सगळे कलावंत नाश्ता आणि चहासाठी जगत हॉटेलमध्ये जमायचे. पहाटे पुन्हा सरावाला सुरवात. अश्या या समर्पित संगीताच्या काळातच एस.कुमार यांचा उदय झाला.कलाकारांच्या नाश्ता-चहाचा हिशेब सांभाळता सांभाळता त्यांच्यातील उपजत कलावंताला ओ.पी.सिंग यांनी मंचावरही संधी दिली. त्यांच्याकडे निवेदनाची जवाबदारी सोपविण्यात आली. एस.कुमार हे अतिशय चांगले निवेदनकार होते. समां बांधणे ज्याला म्हणतात तसे ते आपल्या ओवघत्या शैलीने श्रोत्यांना आपल्या रसाळ निवेदनाने बांधून ठेवीत असत.
मुकेश हे त्यांचे आवडते गायक आणि ‘मेरा जूता है जपानी’हे त्यांचे आवडते गाणे. या गाण्याला नेहमी ते वन्स मोर घेत असत. व्यवसायकि दृष्टिकोणही एस.कुमार यांचा खूप प्रगत होता. पुढे त्यांनी स्वत:चा ‘एस.कुमार एंटरटेनर्स ग्रूप’हा १९९० साली सुरु केला आणि बघता बघता त्यांनी आपल्या प्रगल्भ कल्पकतेने एक लोकप्रिय मुकाम हासिल केला. यात त्यांच्या पत्नीचा नंदिनी घटाटे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. नंदीनी या स्वत: या शहरातील एक नामांकित सुरेल गायिका आहेत. त्यांना एक २० वर्षीय मुलगा अनुज आहे जो तृतीय वर्षाचे शिक्ष् ण घेत आहे.
करोनामुळे कलावंत जगताला अंत्यदर्शनही घेता नाही आले-
शेखर घटाटे हे ५९ वर्षीय होते. त्यांना मधुमेह होता. २९ जुलै रोजी त्यांना करोनाच्या संसर्गामुळे मेयाे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात भरती असताना त्यांना न्युमोनिया झाला व काल मध्यरात्री दि. १ ऑगस्ट रोजी २.१५ मिनिटांनी त्यांचे दू:खद निधन झाले.
गेल्या ४० वर्षांपासून संगीताची अविरत साधना करणारे शेखर घटाटे हे आता आपल्यात नाही हे कलावंत जगतासाठी अतिशय धक्कादायक होते. आज सकाळी जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी सोशल मिडीयावर वा-यासारखी पसरली जेव्हा कलावंत जग हा दृढमूढ होऊन थक्क झाला. कोणाचाही या बातमीवर विश्वासच बसत नव्हता.आज दिवसभर कलावंत जगतातील कलाकारांचे फोन हे आपापसात बोलायला खणाणले. दिवंगत शेखर घटाटे यांचे अंतिम दर्शन नाही घेता आले,याचीच हळहळ व्यक्त होत होती. करोनामुळे होणा-या मृत्यूविषयी शासनाचे नियम ठरले असले तरी गेल्या ४० वर्षांपासून आपल्या निकटचा,आपल्या अत्यंतिक जवळचा मित्र,सहकारी, एक सरळ व स्पष्ट स्वभावाचे एक हसरे व्यक्तिमत्व कायमचे निघून गेेले आणि…त्यांना शेवटचे मनभरुन पाहता आले नाही…अंत्य दर्शनही घेता आले नाही..या विषयी पराकोटीची हळहळ व्यक्त करीत कलाकार जगत आज करोना व चीनच्या नावाने बोटे मोडत होता.
करोनाच्या काळात मृत्यू येऊच नये असेच हे कलावंतांचे जग आज चिंतित होते. यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराच्या शेवटच्या दर्शनालाही मुकावे लागत असल्याचे हे दू:ख होते.एरवी कलाकरांचे जग हे सर्वच लहान-मोठे कलावंत,बॅक स्टेज आर्टिस्ट,ध्वनि व्यवस्थापक,प्रकाश व्यवस्थापक यांच्याही सुख-दु:खात धाव घेत असतात आज मात्र एवढ्या प्रदीर्घ काळातील सहकारी व त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात त्यांना सहभागी होता आले नसल्याचीच निराशा पदोपदी व्यक्त होत होती.
शेखर यांच्या पत्नीला फोन केला असता त्या अद्यापही शोकमध्ये आहेत. त्यांच्या कातर स्वरातून काळजाला जणू घाव पडला. अद्यापही त्या शेखर आता या जगात नाही,हे दू:ख स्वीकारायला तयार नाहीत. आयुष्याचा प्रत्येक यशदायी तसेच खडतर काळ एकमेकांच्या सोबतीने ते जगलेत.काल मध्यरात्री शेखर यांनी आपल्या आयुष्याच्या सहचारिणीला मात्र काहीही न सांगता जगातून एक्झीट घेतली,हे नंदिनीसाठी सर्वाधिक वेदनादायी होते.
निरोप तर घेतला नाहीच मात्र शेखर यांचे पार्थिव देखील नंदीनीला बघावयास मिळाले नाही. करोनाने जणू माणसाला ‘असंवेदनशीलेचा ’कळसच दाखवला. ज्या जोडीदारासोबत उमेदीचा काळ कंठला,ताे जग सोडून गेल्यानंतर त्याचे पार्थिव ही डोळ्यांना दिसू नये हे…..जिवंत माणसासाठी मरणयातनाच म्हणावी लागेल…अशी जीवघेणी वेळ कोणावरही येऊ नये…!

ऑकस्ट्रा फनकारचे संस्थापक मो.अफजलभाई हे देखील करोनाने कालवश!
काल रात्री कलावंत जगतातील आणखी एक कलाकार व ऑकेस्ट्रा फनकारचे संस्थापक मो.अफजलभाईचे यांचे देखील करोनामुळे निधन झाल्याची धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली. अफजल हे देखील एक चांगले गायक होते. संगीत हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. एक दिवस तीन मित्रांसोबत कॉटन मार्केट जवळील आपल्या कार्यालयात बसले असताना अचानक मित्रांमध्ये चर्चा झाली की आपला स्वत:चा एक ऑकेस्ट्रा ग्रूप असावा,आणि अफजल यांनी तातडीने दुस-याच दिवशी या तिन्ही मित्रांना घेऊन कोलकता गाठले व ऑकेस्ट्रा संचाचे संपूर्ण वाद्य,ध्वनि व्यवस्था यांची खरेदी केली.
बघता बघता नव्वदच्या दशकात निर्मित झालेल्या या ऑकेस्ट्रा फनकार ने आपला एक वेगळा श्राेता वर्ग निर्माण केला. आजतागत हा ऑकेस्ट्रा संच संगीत जगतात कार्यक्रम करीत आहे.२००० सालापासून या संचांचे संचालक म्हणून ज्येष्ठ की-बोर्ड वाादक अब्दूल जहीर कार्यभार पाहत आहेत.
कुटुंबाचा करोनामुळे मृत्यू झाल्याचा इंकार-.
मो.अफजल यांना ह्दयविकाराचा त्रास होता. मध्यंतरी त्यांची ओपन हार्ट सर्जरी देखील झाली होती मात्र त्यांना इतर कोणताही त्रास नव्हता. त्यांना देखील मेयोमध्ये भरती केले असता त्यांना करोना झाला असल्याचे सांगण्यात आले. करोनामुळे त्यांचे निधन झाल्याची नोंद झाली असली तरी त्यांचे कुटुंबिय मृत्यूचे हे कारण स्वीकारण्यास अद्यापही तयार नाहीत. करोनामुळे मृत्यूची नोंद झाल्याने या कलवंताचे पार्थिव हे देखील कुटुंबियांना पाहता आले नाही,एकंदरित आजचा दिवस हा नागपूरकर कलावंत जगताला सर्वस्वी शोकसागरमध्ये डूबणारा होता.
’सत्ताधीश’तर्फे या दोन्ही महान कलावंतांना मन:पूर्वक श्रद्धांजली.




आमचे चॅनल subscribe करा
