

सुशांतसिंह राजपूत याची धक्कादायक एक्झीट
नागपूर,ता. १४ जून: हल्ली कोणतं वादळ कसा आघात करुन जाईल काही सांगता येत नाही..मनमोहक,लोभसवाणं,आकर्षक दिसणा-या प्रसिद्ध आयुष्याचं भेदरवून टाकणारं रुप आताच एका अभिनेत्याच्या आत्महत्येनं समोर आलंय..!
असंच आणि असंच बरंच काही…आज दिवसभर सोशल मिडीयावर वाचायला मिळालं.
सुशांतसिंह राजूपत…आज आपल्यात नाही…हे आणि हेच वास्तव आज स्वीकारावं लागत आहे. का केली आत्महत्या?काय दू:ख होतं? अवघे ३४ वर्ष हे काय जाण्याचं वय होतं का?दू:खं कोणाला नाही या जगात? संत तुकाराम महराज सांगून गेलेत..‘सुख पहाता जवापडे..दू:खं डोंगरा एवढे…’मग जगणं म्हटलं की दू:खं डोंगरा एवढे असतात तरी मानवाचा दुलर्भ जन्म मिळाला ना…मग या दुलर्भ आयुष्याला असा मातीमोल करायचा?
आज दिवसभर माध्यमात,सोशल मिडीयावर फक्त सुशांत सिंह राजपूरत याच्या आत्महत्येचीच चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ही बातमी धक्कादायक असल्याचे ट्वीट केले. या गुणी अभिनेत्याचे जाणे अनेकांना चटका लावून गेले. बॉलिवूड विश्व देखील खाेलवर हादरले.
आज ना उद्या सुशांतसिंह राजपूरत यांच्या मृत्यूचे कोडं सुटेल ही मात्र त्यामुळे आहे त्या परिस्थितीत काय फरक पडणार आहे?गेलेला माणूस परत येणार आहे का? अनेकांनी त्याच्या नैराश्याची चर्चा केली, एकटेपणाची चर्चा केली मात्र शेवटच्या क्ष् णी काही ‘मित्र’हे त्याच्या घरीच अगदी त्याच्यासोबत असताना कसला ‘भौतिक’ एकटेपणा होता?
तीनच दिवसांपूर्वी त्याच्या महिला स्वीय सहायकाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली अन्….सुशांतसिंह राजपूत याला हा धक्काच सहन झाला नाही! तिच्या आत्महत्येवर राजपूत याने फार भावनिक पोस्ट लिहली होती,तिच्या जाण्याचे दु:ख तो पचवू शकला नाही,त्याच्या आजच्या या आत्मघाताने यावर शिक्कामोतर्बच नाही केले का?
’माणूस आत्महत्या करतो जेव्हा त्याच्याकडे गमावण्यासारखे बरेच काही असते किवा कमावण्यासारखे काहीच नसते’असे तज्ज्ञ सांगतात,मग सुशांतसिंह राजपूत यांच्याकडे कमावलेले तर भरपूर होते,मग गमावण्यासारखे असे काय होते?ज्या भितीतून त्यानी हे असे आत्मघातकी पाऊल उचलले! याचे देखील बरेच चर्वितचर्वण आज सोशल मिडीयावर झाले.
यशस्वी तोच गणल्या जातो ज्याला त्याचे यश पचवता येतं. सुशांतसिंह राजपूत याला यशाचं हे गणित साधता आले नाही का?एका मराठमोळ्या भूतकाळातील प्रेयसीसोबत त्याने जे केले ते योग्य होते का?असा ही प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्या तरुणीला या ब्रेकअपमधून बाहेर पडण्यास किती काळांचा अवधी लागला?हे संपूर्ण जगाला माहिती आहे.
नातं जोडणं फार सोपं असतं मात्र ते निभावणं हे प्रत्येकाला जमतच असं नाही. मृत्यूनंतर कोणाच्याही खासगी आयुष्याची चर्चा करणे हे मूल्यांना धरुन नसले तरी,ज्या प्रकारे आज राजपूत यांनी गळयात हिरव्या रंगाचे कापड बांधून पंख्याला लटकून आत्महत्या केली,त्याचा संबंध आज अनेकांनी शेवटी त्याच्या खाजगी आयुष्याशीच जोडलाच ना!
अनेकांचे मत आहे चित्रपटसृष्टितील घाणेरड्या राजकारणाला सुशांतसिंह राजपूत हा बळी पडला,अनेकांनी सोशल मिडीयावर त्यावर प्रखर टिका देखील केली मात्र याच चित्रनगरीने त्याला नाव दिले,पैसा दिला,यश दिले,प्रतिष्ठा दिली तसाच ’धोखा’ही दिला त्यासाठी ‘जीवच’द्यायचा?
एम.एस.धोनीचा संघर्ष जेव्हा सुशांतने पडद्यावर साकारला तेव्हा अनेकांच्या गळ्यातील तो ताईत बनला. नुकतेच ‘छिछोरे’चित्रपट येऊन गेला यात खोलवर नैराश्यात असणा-याल तरुणाला त्याचे मित्र कश्याप्रकारे त्या नैराश्यातून बाहेर काढतात याचे कथानक त्याने रंगवले होते मात्र ख-या आयुष्यात या कथानकामधील एक अंशही अनुकरण केले असते तर….?
कारणे काहीही असोत..घटना घडून गेली,एक उमदा,तडफदार अभिनेता आपल्यातून निघून गेला कायमचा, हे सत्य पचवायला जरी जड असले तरी ते सहन करुनच त्याच्या फॅन्सला त्याच्या कुटुंबियांना आता हे दु:ख संपवावे लागेल.
सुशांतसिंह राजूपत यानी एकच चूक केली,‘खरे मित्र’ जिवनात कमावलेच नाही,मृत्यू क्ष् णी जी सोबत होती ते ’खरे‘ मित्र होते का?याचा ही शोध पोलीसांना घ्यावा लागेल.सुशांतने जगाचा निरोप घेताना एखादी चिठ्ठी..एखादा संदेश तर आपल्या फॅन्ससाठी आपल्या कुटुंबियांसाठी ठेवायला हवा होता,याची देखील ‘हळहळ’ प्रामुख्याने व्यक्त होत होती. तो मनातच घेऊन गेला सगळी गुपिते..जाताना सांगून ही नाही गेला म्हणूनच त्याचे जाणे….हे जास्त टोकदार होते…जास्त भळभळून टाकणारे होते..!
‘चिठ्ठी ना कोई संदेश..जाने वो कौनसा देश..जहां तूम चले गये’म्हणूनच आज जगजितसिंह यांनी गायलेली ही गजल अशीच ओठांवर रेंगाळली.सुशांत…बरं नाही केलंस रे…!तूझं अतिशय संवेदनशील मन कायम तुझ्या बोलक्या डोळ्यातून डोकावत असायचं. तूझ सुहास्य, मरगळलेल्या मनालाही सुखावून जायचं. किती चित्रपट केले,किती नाव कमावले, किती पैसा कमावला,याच्याशी एक फॅन म्हणून जगाला काहीही देणे-घेणे नाही मात्र आमचं मन तू ‘चोरलं ’होतंस,‘जिंकलं’होतस..एवढ मात्र खरं होतं!अगदी खरं!
(९२२६७९४०९१)




आमचे चॅनल subscribe करा
