फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकहां तक ये मन को अंधेरे छलेंगे....

कहां तक ये मन को अंधेरे छलेंगे….

Advertisements

कहां तक ये मन को अंधेरे छलेंगे….

मुंबईतून नागपूरात आलेल्या तरुणाला रहीवाश्‍यांचा त्रास:जागरुक राहणे म्हणजे माणूसकी सोडणे नव्हे!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,दि. २२ मे: तीन महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर लॉक डाऊनच्या चौथ्या टप्प्यात मायबाप सरकारने सामान्य नागरिकांना अशंत: शिथिलता देऊन खाजगी वाहनांना परवानगी देताच नागपूरातील दिघोरी भागात राहणारा एक तरुण हा खाजगी वाहनाने नागपूरात आपल्या घरी आला. मात्र जणू मुंबईत तो अनेकांचे खून करुन आला किंवा फार मोठा गुन्हेगार असून आता नागपूरात घरात दडून बसला आहे,अश्‍या अर्हिभावात त्याच्या घराजवळील शेजारीच नव्हे तर संपूर्ण मोहल्लाच एकजूट होऊन त्याच्या कुटुंबियांना पराकोटीचा मानसिक त्रास देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे!

मुंबईतील स्टेट बँकेत नोकरीला असणारा हा तरुण गेल्या तीन महिन्यापासून मुंबईत अडकला आहे. नागपूरात मोठा भाऊ व आई-वडील त्याच्या काळजीने दररोज काळीज पोखरुन घेत होते.मात्र रेल्वे बंद,विमानसेवा बंद,खाजगी वाहने बंद,बससेवा बंद….सगळंच जगणं ठप्प असल्यामुळे तो ही मुंबईत अडकून पडला.मात्र मुंबईतील कोणत्याही ‘हॉट स्पॉट’क्ष्ेत्राशी त्याचा संबंध आला नाही. येथे मात्र आईचं काळीज मुंबईतील दररोज वाढणारी रुग्ण संख्या आणि मृतांची आकडेवाडी बघून काळवंडून जात होतं.
जगातला कोणताही कायदा किवा कोणताही विषाणू हा, आईजवळ आपल्या मुलाला येऊ देण्याचे बंधन घालू शकत नाही मात्र ‘कोरोना आणि भारत सरकारने’ही किमया अलगद साधली.या माऊलीने एकही दिवस आपल्या मुलाच्या काळजीने सुखाचा घास खालला नाही. ठाकरे सरकारचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बससेवा सुरु करण्याची भीमादेवी थाटात घोषणा केली आणि या माऊलीच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र,लगेच दूस-या दिवशी अनिल परब यांनी घोषणा मागे घेतली. परिणामी या तरुणाला नागपूरात यायला चौथ्या लॉक डाऊनमधील अशंत:शिथिलतेची वाट बघावी लागली.

मुंबईहून खाजगी वाहनाने नागपूरातील दिघोरी येथे पोहोचताच या तरुणाच्या मोठ्या भावाने त्याला शासकीय अारोग्य केंद्रावर तपासणीसाठी नेले. शरिरात कोरोनाची कोणतीही लक्ष् णे दिसत नसल्यामुळे त्याच्या हातावर ’होम क्वारंटाईन’चा शिक्का मारुन तेथील आरोग्य अधिका-याने त्याला घरातच १४ दिवस विलगीकरणात राहण्याची सूचना केली.यानंतर या तरुणाला घेऊन त्याचा भाऊ हूडकेश्‍वर पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण कागदपत्रे व आरोग्य अधिका-याचा अहवाल जमा करुन आला.यानंतर या तरुणाच्या भावाने रितसर तेथील ग्राम पंचायतमध्ये देखील कागदे जमा करुन ‘भाऊ मुंबईवरुन आला असल्याची माहिती’ सरपंचाला दिली.

तरीही येथील एका स्थानिक काँग्रेस पक्ष्ाच्या कार्यकर्त्याच्या अंगी ‘नेतृत्व गूण’संचारला आणि त्याने तेथील सर्व कार्यकर्त्यांना गोळा केले. येथील रहीवाश्‍यांची ‘जंगी’सभा बोलावली.रात्रीच्या १२ पर्यंत या तरुणाच्या घरासमोर ही सभा सुरु असताना तरुणाच्या भावाने हूडकेश्‍वर पोलीस ठाण्यात फोन करुन याची सूचना दिली. पोलीसांनी त्याला काही मदत हवी आहे का?अशी विचारणा केली मात्र या तरुणाच्या भावाने सांगितले पूर्वी ४० लोकं होते आता ४ उरलेत,थोडी भीती कमी झाली आहे.तरीही काही अघटित घडले तर तुम्हाला कळवतो.

नेतृत्व गूण संचारलेल्या त्या काँग्रेसी तरुणाच्या मनातली खूमखूमी काही केल्याने कमी झाली नसल्याने त्याने सकाळीच ग्रामपंचायतीचे कार्यालय गाठले.शेवटी त्याच्या दडपणाखाली तेथील सरपंच हा तरुणाच्या घरी आला. तरुणाची खोली,शाैचालय,न्हाणीघर सगळे वेगळे असून तो खोलीतच बंद राहत असल्याचे डोळ्याने बघितले व सरपंच साहेब निघून गेले. तरीही अद्याप त्या तरुणाच्या घरासमोर दररोज सभा भरत आहे. या कुटुंबाला ‘संपूर्ण माणूसकी सोडून’येथील रहीवाश्‍यांनी ‘अस्पृश्‍य जमातीत’टाकले आहे. मुंबईला नोकरी करणे हा गुन्हा आहे का?आपल्याच कुटुंबात आपल्याच आईच्या कुशीत परत येणे हा गुन्हा आहे का?प्रशासनाने केलेल्या सर्व सूचना तंतोतंत पाळल्यावरही,आपलेच शेजारी असे वै-यासारखे वागत असल्याने या कुटुंबाला जो ‘आत्मक्लेष’भाेगावा लागत आहे तो अवर्णातीत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने भारतातील नागरिकांना जो आत्मसन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे,त्याची ‘कोराेनाच्या नावाखाली’कशी पायमल्ली होत आहे हे सध्या संपूर्ण देश बघत आहे.

या कुटुंबाचा आत्मसन्मान येथील नागरिकांनी अक्ष् रश: पायदळी तुडवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे कुटुंब या भागात स्वत:चं घर बांधून राहायला आले होते. गणपती असो किवा कोणतेही सार्वजनिक उत्सव,हे दोघेही भाऊ हिरिरीने त्यात सहभाग नोंदवत होते.मात्र….आमच्या कुटुंबावर अशी वेळ आली तेव्हा…एकही मित्र..एकही शेजारी यांनी आमच्या बाजूने आवाज उठवला नाही…अशी पराकोटीची खंत या तरुणाचा भाऊ आता व्यक्त करतोय.एवढंच नव्हे तर ‘मोदींवरचा’भरवसाही निघून गेला मॅडम….कोरोनाने मोदींचेही खरे रुप दाखवून दिले….’असा तीव्र संताप ही तरुणाई आता व्यक्त करीत आहे.

शेवटी आत्मसन्माला लागणारी ठेच ही खोलवर जिव्हारी लागते हेच खरे.काय शासन,काय प्रशासन,काय शेजारी,काय मित्र…कोरोनाने सगळ्यांचे खरे रुप उघडे पाडले आणि आपली जिविताची लढाई,आपली स्वाभिमानाची लढाई शेवटी आपल्याला एकट्यालाच लढायची असते,ही ‘उपरती’या तरुण भावंडांना करुन दिली.शेजा-यांनी विश्‍वास गमावाला मॅडम…आता पुन्हा कधीच येणारर नाही…!कळले कोण खरे कैवारी आहेत,कोरोनाने दाखवून दिले,त्या तरुणाईचे हे व्याकूळ शब्द अस्वस्थ करणारेच होते…!
नुकतेच त्या तरुणाच्या भावाने पुन्हा हूडकेश्‍वर पोलीस ठाण्यात फोन केला आणि..घरात दळण आणायचे आहे,वडीलांचे औषध आणायचे आहे..किराणा भरायचा आहे…मी बाहेर पडू शकतो का?असे विचारले.त्यावर पोलीसांकडून उत्तर मिळाले…मास्क लावा,सेनिटायझर वापरा व घराबाहेर पडून जिवनाश्‍यक सामान आणू शकता!तुमचा भाऊ विलगीकरणात आहेत तुम्ही नाही…. आणि हा भाऊ कुटुंबियांप्रति कर्तव्य निभावण्यास घरा बाहेर पडला,पण?

याच तरुणाच्या सात घरे सोडून एक ३५ वर्षीय नागरिक ज्याला एक लहानशी मुलगी आहे,इंदोरवरुन आपल्या घरी आला. त्याला देखील दिघोरी येथील नागरिकांनी असेच छळले.कोरोना आहे म्हणून माणसाने आपल्या छकूलीकडे यावेच नाही का?आपल्या आईच्या कुशीत शिरावेच नाही का? आपल्याच कुटुंबात,आपल्याच हक्काच्या घरात परत येण्यासाठी जेव्हा या देशाचा संविधान नागरिकांना अडवित नाही तर,हे शेजारी आणि मोहल्ल्यातील रहीवाशी कोण होतात?

मुंढे यांच्यावरही राग!
आपलं नागपूर हे ऑरेंज झोनमध्ये येणार होते मॅडम पण…!फक्त ८० रुग्ण आहेत नागपूरात.ते ही बरे होतील. ऑरेंज झोन झाले असते तर..बस सेवा,रेल्वे सेवा,विमान सेवा सगळं सुरु झालं असतं…रेड झोनमध्ये या सर्व सेवांना बंदी आहे. सगळंच सुरु झालं असतं तर अनेक जण आपाल्या घरी पोहोचले असते,तेव्हा कदाचित कोरोनाची लागण होण्याची भीती माझ्या मोहल्ल्यातील रहीशवाश्‍यांच्या मनातही राहीली नसती… तेव्हा कदचित अशी अवहेलना,अशी भीती,असा अपमान हा माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या वाटेला आला नसता….!अशी खंत ही तरुणाई बोलून दाखवत आहे.

दिल्ली ते गल्ली….एकच मानसिकता!
नोएडा येथील एक बातमी प्रचार माध्यमांवर आज दाखवली जात होती. एका कार्यालयातील व्यक्तिला कोरोनाची लक्ष् णे दिसल्यामुळे तो परस्पर कार्यालयातूनच रुग्णालयात भरती झाला मात्र त्याची पेस्ट,साबण,ब्रश,कपडे,सेनिटायझर इतर गरजेच्या वस्तू या सर्व घरुन मागवणे गरजेचे होते. तो रुग्णालयात भरती झाल्याचे ऐकताच तेथील सोसायटीच्या लोकांच्या अंगातूनही लगेच ‘माणूसपण’हरवले आणि त्यांनी त्याच्या घरच्या मंडळीला सोसायटीबाहेर पडू दिले नाही.कोणीही त्याचे सामान रुग्णालयात घेऊन जाण्यास तयार झाले नाही.शेवटी रुग्णालयातून एंबूलेस आली.ही एंबूलेस रुग्ण घेऊन आली नव्हती तर रुग्णाचे कपडे सोसायटीमधून घ्यायला दाराजवळ पोहोचली होती! रुग्णाच्या घरासमोरील दारात ठेवलेल्या कपड्यांची बॅग एंबूलेस चालकाने स्वत: उचलली आणि निघून गेला!

राजधानी दिल्ली असो किवा महाराष्ट्राच्या उपराजधनीतील उमरेड रोडवरील दिघाेरीतील एक मोहल्ला असो….मानसिकता तीच….!जागरुक राहणे म्हणजे माणूसकी सोडणे….एवढेच जणू या कोरोनाने आज मानवाला शिकवले आहे.

म्हणूनच  ‘कहा तक ये मन को अंधेरे छलेंगे…उदासी भरे दिन कभी तो ढलेंग...’या गाण्याचे शब्द ओठांवर अलगद रेंगाळून गेले….!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या