नागपूर : ऊर्जा बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने तत्कालिन महापौर आमदार प्रा. अनिल सोले व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी सुरू केलेला ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रम आता नागपुरात चळवळीचे रूप घेत आहे. पोर्णिमा दिवसाचे आवाहन होताच ज्या परिसरात स्वयंसेवक जातात त्या परिसरातील व्यापारी आणि नागरिक स्वत: रात्री ८ ते ९ दरम्यान अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करतात. असाच काहीसा अनुभव बुधवारी (ता. २०) पोर्णिमा दिवसाच्या निमित्ताने आला.
नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक २० फेब्रुवारी रोजी धरमपेठ परिसरातील महर्षी वाल्मिकी चौक (जुना कॉफी हाऊस चौक) येथे पूर्वी केलेल्या आवाहनाप्रमाणे रात्री ८ वाजता पोहचले. नेहमीप्रमाणे जनजागृतीसाठी आणि पोर्णिमा दिवस उपक्रम तसेच ऊर्जा बचतीचे सांगण्यासाठी जेव्हा ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक व्यापारी प्रतिष्ठानात जाऊ लागले तेव्हा त्यांनी या उपक्रमाविषयी कल्पना असल्याचे सांगितले. आम्ही स्वयंप्रेरणेने अनावश्यक वीज उपकरणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक पोर्णिमा दिवसाला आम्ही किमान एक तास वीज उपकरणे बंद ठेवू, असे आश्वासन स्वयंसेवकांना दिले.
विशेष म्हणजे, यावेळी पोर्णिमा दिवसाला नागपूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने परिसरातील पथदिवेही एक तासाकरिता बंद केले होते. यावेळी मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल, उपअभियंता एम.एम. बेग, कनिष्ठ अभियंता जी. एम. तारापुरे, सुनील नवघरे उपस्थित होते.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णूदेव यादव, कार्तिकी कावळे, विकास यादव, सौरभ अंबादे, दादाराव मोहोड आदींनी ऊर्जाबचतीविषयी जनजागृती करीत पोर्णिमा दिवस उपक्रमाविषयी माहिती परिसरातील नागरिकांना दिली.