

सध्या जगण्याचे वांदे मरण्याची भीती काय दाखवताय?
डॉ. ममता खांडेकर
( Senior Journalist)
नागपूर,१५ मार्च: करोना या विषाणूने सध्या जगभर धुमाकूळ घातला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू होण्याची शक्यता असल्यामुळेच केंद्र सरकार सोबतच महाराष्ट्र सरकारने देखील सावधगिरीची पावले उचलत मॉल,सिनेमागृह, सार्वजनिक कार्यक्रम, सरकारी उपक्रम यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांवर देखील बंदी घातली.सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत ही बंदी असावी असा नागपूरच्या कलाकारांचा कयास होता मात्र आता १५ एप्रिल पर्यंत ही बंदी लागू करण्यात आल्याची चर्चा आहे,यामुळे ज्यांचं पोट हातावर आहे असे अनेक कलाकार हे अडचणीत आले आहे, खरंच करोना हा कलाकारांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न झाला आहे. एक महिना घरी बसणार तर घेतलेले कर्ज कसे फेडणार,मुलांचे शिक्षण कसे होणार, दैनंदिन खर्च कसा भागणार असे अनेक प्रश्न नागपूरच्या वादक,गायक कलाकारांनाच नव्हे तर सांस्कृतिक उपक्रमाशी जुळलेल्या नेपथ्यकार, ध्वनि व्यवस्थापक, प्रकाश व्यवस्थापक, व्हिडिओ ग्राफर,फोटोग्राफर यांना देखील जगण्या-मरण्याच्या करोना प्रश्नाने छळले आहे. आयोजकांना आपले कार्यक्रम रद्द करावे लागले तसेच फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.काय म्हणतात नागपूरचे आयोजक याचा ‘सत्ताधीश’ ने घेतलेला हा आढावा….

शेवटी आरोग्य आणि जीवन हे अमूल्य-सना पंडित[संचालिका,सिद्धिविनायक पब्लिसिटी]
लॉस तर खूप आहे, सगळे कार्यक्रम रद्द करावे लागले. अनेक कलावंतांनाचं घर महिन्यातून दहा-बारा शो केल्यानंतर चालत होतं, ते खरंच हताश झाले आहेत मात्र शासनाचे आदेश असल्यामुळे याला इलाज नाही, शेवटी आरोग्य आणि जीवन हे अमूल्य आहे. सार्वजनिक शो करून या विषाणूची लागण झाल्यास कमावलेला पैसा आजारपणा वरच खर्च करावा लागू शकतो त्यामुळे शासनाचा हा निर्णय सारासार विवेक बुद्धी सोबतच जड अंतकरणाने देखील मान्य करावाच लागेल.तसेही आपल्याकडे आठ महिने पावसाळा लांबला, याशिवाय सध्या माणूस हा फर्टीलायझर, हायब्रीड आणि केमिकलची भेसळच खातो आहे, त्याच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती ही हवी तेवढी सक्षम नसल्यामुळे काळजी घेणे कधीही क्रमप्राप्त ठरेल,सिद्धिविनायकचा ‘वसंतोत्सव’ हा कार्यक्रम देशपांडे सभागृहात होणार होता तो रद्द करावा लागला, आता शासनाने साडेअकरा हजार रुपये भाडं आणि बावीस हजार रुपये डिपॉझिट जे घेतले आहे ते त्वरित रिलीज करावे जेणेकरून कलाकारांना त्यातील काही मोबदला आयोजक म्हणून आम्हाला देता येईल.

शासनाचा निर्णय योग्य-माधवी पांडे [संचालिका व निवेदिका, कलादालन]
एकमेकांच्या संपर्कात येऊन या विषाणूची लागण होऊ शकते मात्र दुसरीकडे कलाकारांचं नुकसान झालेले आहे हे ही मान्य करावंच लागेल. अनेक गायक, वादकांचे, ध्वनि व्यवस्थापकांचे,प्रकाश व्यवस्थापकांचे घर हे सांस्कृतिक कार्यक्रमावरच अवलंबून असल्यामुळे एक महिना त्यांना आता घरी बसावे लागेल, हातात पैसा येणार नाही. करोना विषाणूमुळे हे घडले. वर्षभर जे कलाकार आयोजकांसाठी कार्यक्रम सादर करतात आता त्यांचं घर चालावे ही जबाबदारी देखील आयोजकांची आहे परिणामी आयोजकांनी गरजू कलावंतांना,पुढाकार घेऊन, एक महिन्याचं मानधन हे आगाऊ रकमेत द्यावे आणि पुढील कार्यक्रमात थोडे-थोडे करून त्यांना ते पैसे त्यांच्या मानधना मधून कापता येईल मात्र आज गरजू कलावंतांच्या पाठीशी संयोजक, आयोजक यांनीच नव्हे तर समाजातील सामाजिक संस्था यांनी देखील उभे राहण्याची गरज आहे कारण या कलावंतांच्या भरोशावर आयोजकांचंही घर चालत असतं हे विसरता येत नाही.

विद्यार्थी नक्कीच निराश झाले -भाग्यश्री बारस्कर[संचालिका व ज्येष्ठ गायिका,स्वर शिल्प-]
करोना विषाणू मुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले यामुळे विद्यार्थी नक्कीच निराश झाले मात्र आरोग्य हे देखील महत्त्वाचं आहे. शासनाने सरसकट एक महिन्याची बंदी घालण्यापेक्षा दहा दिवसांत पुरती सुरवातीला बंदी घालायला हवी होती. या विषाणूंचा प्रादुर्भाव याचा अदमास घ्यायला हवा होता. ३१ मार्चपर्यंत बर्यापैकी कंट्रोल झालं असतं मात्र जर गुढीपाडवा सोबतच राम नवमी देखील साजरी करायला मिळणार नसेल तर हे नक्कीच खूप निराशाजनक ठरणार आहे. गुढीपाडवा नाही किमान रामनवमी तरी साजरी व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे.

कुदरत ने ही कलाकारो को आज घर पे बिठाया है- कादर भाई [सुप्रसिद्ध गायक व संचालक, कादर ऑर्केस्ट्रा]
सरकारने हे मुद्दामून किंवा जाणून बुजून निर्णय घेतलेला नाही. जगात हजारो लोक या विषाणूमुळे मृत्युमुखी पडले आहे. भारतात, महाराष्ट्रात आणि नागपुरात देखील भारतीय नागरिक यांना या विषाणूची लागण होऊ नये यासाठीच सरकारने हा योग्य निर्णय घेतला आहे. अनेक लोक एका जागी जमा झाल्यास या विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने होऊ शकतो अशी शक्यता असल्यामुळेच सरकार समोर दुसरा इलाज नव्हता. एक महिना घरी बसावं लागेल. कादर ऑर्केस्ट्राचे देखील दोन कार्यक्रम रद्द झाले मात्र संगीत क्लास साठी विद्यार्थी हे अद्याप ही आग्रही आहे त्यांना एक महिना संगीत बंद करायचं नाही. आजचा तरुण विद्यार्थी कोणाला घाबरत नाही तर ‘संगीत के सामने हर बिमारी दुर हो जाती है’ असं या विद्यार्थ्यांचे मत आहे. ही बिमारी कुदरत ने दिली आहे कुदरत ने ही कलाकारो को आज घर पे बिठाया है, सिनेमा थेटर बंद झाले,मॉल बंद झाले ,ऑटोरिक्षा चालत नाही बाजारपेठा ठप्प झाल्या, सिर्फ नागपूर नही ये तो पूरी दुनिया पर कहर बरपा है!

खरंच खूप नुकसान झालंय- सुरभी ढोमणे( संचालिका व ज्येष्ठ गायिका,सुर संगम)
केवळ कलाकारांचं नाही तर बॅकस्टेज कलाकारांचं देखील अतिशय नुकसान झालेले आहे. सभागृह बंद, मॉल बंद, सिनेमागृह बंद, मार्केट बंद, शाळा बंद काय चालले आहे काही कळतच नाही! चिनी वस्तू विकत घेता घेता चायना मधून ‘विषाणू‘ कधी भारताने घेतला हा उलगडा होत नाही! गमतीचा भाग सोडला तरी ‘घेणं नाही देणं नाही’ पण ‘करोना’ होण्याच्या भीतीने आता ‘जगणे ही’ नाही अशी परिस्थिती झाली आहे! गुढीपाडव्यापासून लागोपाठ ४५ शो होते, राजस्थान सरकार तर्फे कवी प्रदीप यांच्यावरील ३३ कार्यक्रम ही रद्द होण्याच्या वाटेवर आहे त्यामुळे सगळे कलाकार चिंतातुर आहेत! वणीच्या साई मंदिरात तसेच आठ तारखेला बुटीबोरीमध्ये हनुमान मंदिराचा कार्यक्रम देखील रद्द झाला, ज्येष्ठ मित्र मंडळाचा कार्यक्रम देखील रद्द झाल्यामुळे ज्येष्ठानही प्रश्न पडला आहे आता काय करावं? आता तर धारा १४४ लागू करण्यात आली, लग्नसराई बंद, बँडवाले यांनाही काम नाही, सामान्य माणूस आणि कलाकार हा खरंच भरडला जात आहे. सरकारने आठ दिवसापुरती बंदी घातली असती तरी ‘कोरोनाची’ एकंदरीत वाटचाल बघता टेस्टला १४ दिवस लागतात, त्यानंतर काळजीचे दिवस वेगळे असं करता करता एक महिन्याची बंदी सरकारने घातली! लोकं साधं शिंकले तरी सांशक नजरेने बघू लागले आहेत. आता आई सरस्वतीला एवढीच प्रार्थना करते सुटका कर गं या ”करोना’पासून आणि आमच्या जीवनात पुन्हा सूरसंगीत भरु दे,आमच्या गायक-वादक, बॅकस्टेज कलावंतांच्या घरी लक्ष्मी नांदू दे…!

ही वेळची बाब असल्याने आम्हाला एकत्र उभे राहिले पाहिजे-दत्ता हरकरे[संचालक व ज्येष्ठ गायक, कनक सूर मंदिर]
आत्ता जेव्हा कोरोना विषाणू बर्याच वेगाने पसरत आहे आणि जागतिक साथीचा रोग म्हणून जाहीर केले गेले आहे, कलाकारांसह सर्व मानवजातींनी संगीत मैफिली किंवा अशा कोणत्याही मेळाव्यापासून दूर रहाणे अत्यावश्यक आहे, जबाबदार व्यक्ती म्हणून आपण हेच करू शकतो. व्यवसायावर परिणाम होत आहे, परंतु ही परिस्थिती जगभरात आहे आणि ही वेळची बाब असल्याने आम्हाला एकत्र उभे राहिले पाहिजे. हा रोग पसरण्यापासून रोखण्यासाठी सरकारने प्रत्येक उपाययोजना करावी अशी आम्ही विनंती करतो.ही राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे नागरिक म्हणून कलावंत म्हणून आम्ही सरकारला संपूर्ण सहकार्य करायला हवे ही आपत्ती टळून जाईपर्यंत कलाकारांनी देखील सहकार्य करावे असं माझं मत आहे

चायना मेड गोष्टीने कधी कोणाला सुखी केले? रचना खांडेकर पाठक (संचालिका व युवा गायिका,
नुपूर संगीत क्लासेस)
करोना विषाणू ही चीनची देण आहे, तसेही चायना मेड कोणती गोष्ट चांगली असते? या विषाणूमुळे सर्वाधिक नुकसान कलाकारांचं झालं, २५ मार्च रोजी गुढीपाडवा हा मराठी माणसांचा नूतन वर्ष प्रारंभ होतो, या दिवशी पहाट पाडव्याचे आयोजन देखील रद्द झाले, आता मराठी माणसाने नूतन वर्षाचे स्वागत संगीत शिवाय कसे करावे? घरोघरी गुढी तर उभारल्या जातील मात्र नववर्षाची पहाट ही सुनी सुनी असणार आहे. आमची पूर्ण तयारी झाली होती, सुयोग नगर उद्यानात पहाट पाडव्याचा कार्यक्रम सकाळी ७ वाजता सादर होणार होता, या प्रभागातील नगरसेविका यांनी पूर्ण सहकार्य केले मात्र शासनाच्या निर्णयासमोर आता त्या देखील हतबल झाल्या! हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि विद्यार्थिनी या खरोखरच निराश झाल्या. एवढेच नाही तर २९ मार्च रोजी मधुरम हॉलमध्ये देखील संगीत रजनीचा आयोजित कार्यक्रम रद्द करावा लागला, यामुळे वादक, साऊंड सिस्टम लाईट,निवेदक,गायक, वादक सर्वांचे नुकसान झाले, एप्रिल महिन्यात अनेकांना पुन्हा कार्यक्रमासाठी वेळ देता येणार नाही, तसेही शासनाने कार्यक्रमांवर १५ एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे एवढेच नव्हे तर आता हॉलवाले सांगतात तुमच्या रिस्क वर कार्यक्रम करा, ऑडियन्स येईल की नाही याची शक्यता नाही सोबतच शासनाने नियमांचे भंग केले तर पाच हजार रुपयांचा दंड आयोजकांवर ठोठावला आहे अशी माहिती आम्हाला हॉलवाले देत आहे, त्यामुळे खरोखरच नागपूरचे सांस्कृतिक क्षेत्र हे उदास आहे. विद्यार्थ्यावर घेतलेली मेहनत, पाडवा पहाटची गाणी, गीत रामायणाची गाणी कष्टाने बसवली होती,आता मात्र कार्यक्रमच रद्द झाले त्यामुळे क्लासमध्ये की सर्व उदास असतात.
युट्युब वर सध्या एका तरुणाच्या गाण्याने धूम मचवली आहे, ‘करोना’वर त्यानी गायलेले हे मार्मिक गीत जणू नागपूरच्या कलावंतांचची परिस्थिती सांगत आहे, ना हात मिलाना. .ना बाहर जाना…घर मे ही पडे है .. बंद पैसा आना… रोते दिल की यही है दास्ता . करोना..करोना..ओ करोना..इतना भी परेशान मत करोना….




आमचे चॅनल subscribe करा
