


‘जातीवादी’ नव्हे समाज हिताचं तेच साहित्य
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नुकतेच एक साहित्य संमेलन नागपूरात आटोपले. विशेष म्हणजे हे साहित्य संमेलन एका विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त करण्यात आले होते. त्यात जाती बाहेरच्या लेखिका,लेखक यांना आमंत्रित करण्यात आले नाही. साहित्यालाही ‘जातीवादी’करण्याचा या उपक्रमातून त्यांच्या जातीतील श्रोत्यांना तरी काय बौद्धिक मिळाले हे श्रोतेच सांगू शकतील. मात्र दोन दिवसीय या ‘राष्ट्रीय’ सहित्य संमेलनातून समाजाला दिशा देणारे विचारवंत साहित्यिकच साहित्याला ज्याप्रकारे ‘जातीत’ बांधु पाहत होते त्यावरुन साहित्याचा महामेरु ’कालिदास’यांची जात कोणती? हा प्रश्न घेऊनच बाहेर पडावे लागले.
हे खरे आहे या जातीयवादी साहित्य संमेलनात ‘अस्सल साहित्याचे’ काहीच गवसले नाही. महाराष्ट्र ही साधु संतांची, भगवान गौतम बुद्ध यांच्यासारख्या प्रेषितांची, समाजसुधारकांची भूमी,समाजसुधारणा करताना त्यांनी संपूर्ण समाजाचं हित लक्षात घेऊन प्रबोधन केलं. जातीवादी साहित्य संमेलनातील मात्र जाती-जातीमध्ये मत्सर,द्वेष आणि उद्वेग पेरणाऱ्या शब्दांनाच साहित्य म्हणायचे का?‘आपली जात इतरांपेक्षा श्रेष्ठ कशी’‘आपल्या जातीमधील साहित्य इतर जातीच्या साहित्यिकांपेक्षा चांगले कसे?आपल्या जातीतील माणसांसाठी,महिलांसाठी कोणते,कसे साहित्य रचले जावे?हा पायंडा साहित्याला कुठे,कोणत्या दिेशेला नेणार आहे?
साहित्याचे ‘राजकारण’आजवर ऐकीव होते मात्र ‘जातीचे साहित्य संमेलन’हे पेव फोफावले तर ते साहित्यालाच मारक ठरणार हे मात्र निश्चित.सगळ्यांना अापापली जात श्रेष्ठ वाटते यात काही वावगं नाही,जातीचा ‘अभिमान’असावा मात्र जातीचा ’दुराभिमान’हा शेवटी जातीसाठीच मारक ठरतो हे समाजातील जर अश्या प्रज्ञावंतांनाच कळणार नसेल तर पुढच्या पिढीला ते काय बौद्धिक देणार? आजची डिजिटल पिढी ही आधीच कोणत्याही साहित्यापासून दूरावलेली आढळते तश्यात पुन्हा अमुक ’जातीचे’संमेलन भरवण्याचा घाट म्हणजे या पिढीला आणखी भ्रमिष्ट करण्यासारखे नाही का?एकीकडे समाजवादी समाजरचनेच्या गप्पा करायच्या दूसरीकडे जातीवर आधारित साहित्य संमेलन घ्यायचे हे कूपमंडूक प्रवृत्तीचे निदर्शक नाही का? साहित्याला कोणत्याही परिघातात बंदिस्त न करताही संमेलन घेता आले असते..मुक्त,परखड, वास्तव, निखळ,सत्य मांडणारे,जाती-पातीच्या पलीकडचे साहित्य संमेलन जातीत बंदिस्त न करताही भरवता आले असते मात्र ‘साहित्याच्या पडद्याआड राजकारणच’करण्याचे ध्येय ठेऊन संमेलनाचा घाट घातल्यास त्याला कसे थांबवता येणार?जातीच्या नावावर भरविण्यात आलेल्या या संमेलनात विचारवंत साहित्याचे विचार हे कोते नव्हते असे ठामपणे कसे सांगता येणार?मूळात कलाकार,लेखक,साहित्यिक याला खरे तर जातच नसते. त्याचं लिखाण,त्याची कृती,त्याची कला ही संपूर्ण समाजासाठी,प्रत्येक वर्गासाठी,स्त्री आणि पुरुष दोघांसाठी असते. जातीच्या बंधनात अडकून विचारच खूंटले जातात. ‘रामजी की निकली सवारी,रामजी की लीला है प्यारी’गाणारे मोहम्मद रफी हे कोणत्या धर्माचे,कोणत्या जातीचे होते? मुस्लिम असून रामाची स्तुती करणाऱ्या या गाण्यावर कोणत्या अमूक जातीच्या श्रोत्यांचा हक्क आहे? गीत आणि संगीत यांना जातीचं बंधन नाही मग साहित्याला जातीमध्ये बंदिस्त करण्याचं धाडस करण्यामागे कोणाला आपलं हित साधायचं होतं?हा प्रश्न आता विचारला जात आहे.
सोशल मिडीयावर या ‘जातीवादी’साहित्य संमेलनावर बऱ्याच कमेंट्स अाल्या. ‘काही दिवसांनी ७/८ जणींचा एक ग्रुप बनत जाईल आणि ते साहित्य संमेलन करत जातील,तो दिवस जवळच आहे,असं वाटायला लागलं’अशी एक कमेंट होती तर ‘समजाप्रबोधनाचा यांचा ढोंगीपणा बघितला की कुठलेच आणि कोणाचेच साहित्य आता वाचायला घेताना आधी लेखकाची ‘जात’बघावीशी वाटते’अशी मार्मिक टिका ही होती.नागपूरातच नव्हे तर राज्यात आणि देशातही अश्या जातीच्या आधारांवर भरवण्यात येणारे साहित्य संमेलनांवर श्रोत्यांनीच बहिष्कार घालण्याच्या सूचनाही त्यात होत्या. पुरोगामी महाराष्ट्रात तर असा जातीवादी सहित्य संमेलनाचा पायंडा पडणे मुळीच हितकारक नसल्याची टिका ही होती. हिंदीमध्ये असे जातीवादी साहित्य संमेलन भरत नाहीत हे देखील तेवढेच खरे आहे. विदर्भात तर याचे जास्तच पीक अाले असल्याची बोचरी टिका ही वाचण्यात आली.सर्वांसाठी खुली असणारी संमेलनेच जातीचेही खरे प्रतिनिधित्व करीत नाही का?
अश्या जातीवादी साहित्य संमेलनातून खरे तर काय संदेश गेला?जातीयवाद पाळा हा धडा देण्यासाठी संमेलन भरवण्यात आले का?असा सवाल ही नागपूरातील अनेक साहित्यिकांनी उपस्थित केला. मनुस्मृती ही ज्या काळात लिहली गेली त्या काळातील सामाजिक परिस्थिती ही वेगळी होती आज भारत हा सार्वभौम देश संविधानानुसार चालतो. मनुस्मृतीनुसार नाही, तरी ही ‘साहित्याचे’नाव घेऊन मनुस्मृती जाळण्याचे औचित्य काय?इतर धर्मांच्या धार्मिक ग्रंथांमध्येही काही गोष्टी या काळऔघात न पटण्यासारख्या आहेत मग त्याचे दहन करण्याचे धाडस का केल्या जात नाही? ती धर्म ग्रंथे साहित्य नाही का?असा सवाल ही नाव न छापण्याच्या अटी वर एका नामवंत लेखिकेने केला.
मराठी भाषेचे,मराठी साहित्याचे संगोपण, संवर्धन, जातीवादी संमेलनाने होणार आहे का? असा सूर नागपूरातील अनेक लोखिका व साहित्यिकांनी आवळला मात्र पुढे येऊन ,सत्याची बाजू घेऊन,ठाम भूमिका घ्यायला कोणीही धजावले नाही. या जातीवादी साहित्य संमेलनातील महत्वाचे पद भूषविणाऱ्या लेखिकेने तर समाज प्रबाेधनाचा त्यांचा कार्यक्रम चक्क पैसे घेऊन सर्वदूर सादर केल्याची टिका ही झाली. एकीकडे ‘समाज प्रबोधन‘ करीत असल्याची प्रसिद्धी लृटायची दूसरीकडे आयोजकांकडून पैसा ही उकळायचा अश्या दुहेरी वागणूकीला ही नावेबोटे ठेवण्यात आली मात्र तोंडावर विरोध कोणीही नोंदवला नाही.फक्त त्याच जातीतील स्त्रिया या शोषणाखाली भरडल्या जात आहेत का?समाजातील तिचे स्थान,तिच्या व्यथा,तिच्या वेदनांचाच विचार साहित्यात होणार आहे का?असे जातीनिहाय साहित्य संमेलने घेऊन कोणता पायंडा पाडला जातोय? दलित स्त्री,सवर्ण स्त्री,ओबीसी स्त्री,मुस्लिम स्त्री…स्त्रीच्या संषर्घाला जातीच्या भेदभावात बंदिस्त करुन साहित्यात मांडता येणार आहे का?
या देशातील संत महात्मे यांनीही साहित्याचा असाच विचार केला असता तर….?




आमचे चॅनल subscribe करा
