

महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर सोशल मिडीयात पोस्ट्सचा महापूर
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर: तीन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडले ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी,मतदारांसाठी फक्त अकल्पितच नव्हतं तर अविश्वसनीय होतं. आज देखील महाराष्ट्राच्या जनतेला यावर विश्वासच बसत नाही की राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ताच येत नाही आहे किवा महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागली आहे किवा येत्या काही महिन्यात ‘न भूतो न भविष्यती’अश्या महाशिवआघाडीचे सरकार या पुढे महाराष्ट्राची राजवट चालवणार आहेत, तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात जे काही घडले ते नवीन पिढीसाठी मार्मिक असले तरी खूपच गमतीदार होते आणि याचे पडसाद तरुणाईने त्यांच्या हक्काच्या भींतीवर म्हणजे फेसबूक,ट्वीटर,इंस्टाग्रामवर जोरदार आणि तेवढेच गमतीशीर रंगवले.

मराठीत ‘कुटुंब रंगलय काव्यात’ ही जशी पु.लं.ची रचना प्रसिद्ध आहेत त्याच धर्तीवर गेले तीन दिवस सोशल मिडीया हा अवघा राजकारणातच रंगला होता हे वेगळे सांगयला नको.सामान्य मतदार यांच्या खिजगणतीतही नाही,एवढा मोठ भ्रमनिरास झाल्यावर हक्काच्या भींतींवर काय-काय नसेल रंगवल्या गेलं,कविता,म्हणी, टोमणे, उपहास, मार्मिक प्रश्ने संगळच काही या भींतींवर उमटलं. महाराष्ट्रातील तमाम मतदारांना झूलवित ठेवणाऱ्याआणि सत्तेसाठी सगळ्या विधिनिषेधांना तिलांजली देऊन महाराष्ट्रालाच लाज आणणाऱ्या या प्रकाराला प्रामाणिकपणे मतदान करणारे मतदार कंटाळले, प्रक्षोभित झाले आणि हक्काच्या भिंतीवरच त्यांनी आपल्या भावना,विचारांचे मजेदार शब्दात प्रकटीकरण केले.
एका हळव्या मनाच्या कविने तर व्यथित होऊन
‘ज्या वाटेवर आम्ही चाललो
त्या वाटेवर बगळे होते
परी तयांना आम्ही समजलो
राजहंस ते सगळे होते…
तुमच्या अमुच्या सुखदु:खावर
टोच्या मारित बसले होते
तरी तयांना रोज सकाळी
दैनिकातले मथळे होते’
अशी कविता पोस्ट केली आणि जनादेशाची थट्टा होते तेव्हा आपणच मतदार म्हणून आपली फजिती टाळण्यासाठी निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा सल्ला ही ते देऊन टाकतात.
‘महाराष्ट्रात जनमताचा अपमान…जवळपास ६० टक्के मतदार आणि राष्ट्रपती राजवट..सत्तेचे कू-चेहरे’या पोस्टवर सत्तेचा हव्यास इतका वाढला की जनतेला वेठीस धरुन राष्ट्रपती राजवट लागू करण्यास भाग पाडल्यामुळे तुमची मगरुरी आता जनताच काढणार असल्याचा सूतोवाच एका पोस्टमध्ये केला गेला.
एकाने तर ‘किती रहस्यमय! किती नाट््यपूर्ण!केवढे उत्कंठावर्धक कथानक!‘सिंहासन’चित्रपटाची दूसरी नवी आवृत्ती काढवी म्हणतोय’अशी पोस्ट केली.

‘खंजीर रिर्टन्स’सूत्रधार कोण?
‘राष्ट्रवादीच्या घड्याळ्यात शिवसेनेचे १२ वाजले’
‘आता महाराष्ट्र सोसणार हायकमांडच्या कळा,उद्ववा अजब तुझे सरकार!’
‘महाराष्ट्रात आता नापासांची शाळा…सारे नापास हाेणार एकत्र गोळा’
‘नजरकैद्येत असलेले ५६ वाघ..अज्ञातवासात हलवले आणि..जंगलातल्या वाघांना पिंजऱ्यात ठेवले’
‘शिवसेनेचे ‘उत’आलेले राव भारतीय जनता पक्षाला लेखी प्रस्ताव मागत होते आता हे उतराव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५ वर्ष सरकार चालवू देतील असे शपथपत्र मागणार का?
‘मी परत येईन…मी परत येईन..मी परत येईन..तुम्ही पुन्हा नको’
‘सिंहासनाने वाघाला लोळवले…गुहेत परत!’
‘आज…सोनियाचा दिनु’
‘विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीची आठवण…’
‘बुद्धीबळात घोडा नेटाने अडीच घरे चालतो पण…भाजप-शिवसेनेने केवळ अडीच वर्षांसाठी ३० वर्षे जमवलेला सगळा डावच उधळून लावला’
‘मी काय म्हणतोय..मुख्यमंत्र्यांची खूर्चीच काढून टाका ना..सतरंजी टाका आणि सगळेच बसा!’
(एका नेटकरीने तर या सत्तानाट्यावर मजेदार नाट््यच लिहले ’शरु व सोनीला अभिवादन करुन…शिवसेना सादर करीत आहे दूसरे नाट््य अंक-
नाटकाचे नाव ‘आम्ही खूर्चीसाठी हपापलेलेा’
लेखक-बारामतीचा चंद्र
दिग्दर्शक– सिल्वर ओकचे मालक पवार
सूत्रधार-इटलींची मोतोश्री सोनिया
संकल्पना-संज्या)

‘बोक्या व मांजरीच्या जाळ्यात वाघ अलगद अडकला…पवार यांच्या कात्रजच्या घाटाचे बनले शिकार’
‘गुडघ्याला बाशिंग बांधून तयार..नवरी नाही मंडपात’
‘राष्ट्रवादीला राज्यापालांचे निमत्रंण..मराठी माणसा जागा रहा’
नेटकरींनी तर आजारी असणारे संजय राऊत यांनाही नाही सोडले त्यांच्यावरही ते मनापासून बरसले..
संजय राऊत यांच्या दोन वाहीन्यांमध्ये ब्लॉकेज..कसं भयंकर आहे रे राजकारण..एकाचे नाव काँग्रेस दुसरे राष्ट्रवादी निघाले’
नेटकरींनी महनीय राज्यपाल यांच्यावरही पोस्ट टाकून आपल्या कल्पक बुद्धिला चालना देत ‘मला असं वाटतंय..आता या सगळ्यांना कंटाळून राज्यपालांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींना नाही दिला तर मिळवलं’अशी पोस्ट केली तर दुसऱ्या नेटकरीनी याहून पुढे जात ‘राज्यपालांच्या घरची कामवाली देणार राजीनामा..सततच्या चहा-पाण्याला कंटाळली_सूत्र’अशी कोटी केली.
‘पंजाने हाताला घड्याळ बांधून..धनुष्य बाणाने सत्तेचा साधला नेम’
किनाऱ्यावर जशी लाट येऊन धडकावी तशी मुख्यमंत्री यांच्याविषयी भावनिक होऊन त्यांना समर्थन देणाऱ्या सर्वाधिक पोस्टही सोशल मिडीयावर झळकल्य….यात सर्वाधिक शायरींचा आधार घेण्यात आला होता..

‘मेरा उतरता पानी देख किनारे पे घर मत बना लेना..मैं समुंदर हूं…लौट के फिर आऊंगा’
‘बहोत मुश्किल है ऊस शख्स को गिराना…जिसको चलना ठोकरो ने सिखाया’
‘उन्होने मुझे मिट्टी मे दबाने की बहोत कोशिश की..लेकीन उन्हे मालून नही था मैं..बीज हूं…’
शिवसेना ही राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायलयात गेली,याला नेटकरींचा आक्षेप नव्हता मात्र त्यांनी ज्या कपिल सिब्बलचा यासाठी आधार घेतला ते मात्र ‘स्वाभिमानी’ नेटकरी यांना रुचलेच नाही. ज्या कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात श्रीरामाचे अस्तित्वच नाकारले, राम सेतू काल्पनिक असल्याचे सांगितले त्याच कपिल सिब्बलचा आधार केवळ सत्तेसाठी शिवसेनेसारख्या रामभक्तांनी घ्यावा हे नेटकरांना रुचले नसल्याने यावर देखील त्यांनी असे मार्मिक भाष्य केले ‘कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र!’
(गमतीचा भाग सोडला तरी शेवटी महाराष्ट्राच्या जनतेने भाजप,शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपापल्या विचारसरणीनुसार मते दिली,त्यांच्या जागा निवडून आणल्या. २१ नोव्हेंबर रोजी मतदान करताना पक्ष्ासमोरचे बटन दाबताना या मतदारांनी विचार ही केला नव्हता पुढील पंधरा दिवसात लोकशाहीच्या पवित्र यज्ञात त्यांनी दिलेली मतांची समिधा ही.अशी उपयोगात येईल. आजही महाराष्ट्राचा मतदार शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनैसर्गिक गठबंधनाला घेऊन साशंक आहे, चिंतित आहे,अश्या प्रकारची सत्ता स्थापना करण्या ऐवजी पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपापली भूमिका घेऊन जा,असा आक्रांत ते सोशल मिडीयावर, बेंबीच्या देठापासून व्यक्त होताना सांगतात आहेत हे विशेष!)




आमचे चॅनल subscribe करा
