

नागपूर, ता.१६: “दक्षिण नागपुरातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपवून या भागात चोवीस बाय सात पाणी उपलब्ध व्हावे आणि दक्षिण नागपूर टँकर मुक्त करावे हा दृढनिश्चय आहे” असे प्रतिपादन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार मोहन मते यांनी आज केले.
दक्षिण नागपुरातील तुकडोजी पुतळा पासून प्रारंभ झालेल्या प्रचार रॅलीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, दक्षिण नागपुरात राहणाऱ्या तळागाळातील माणसाला अत्यावश्यक सुविधा प्राप्त व्हाव्यात या भागातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी उद्यानांमध्ये विरंगुळा केंद्र आणि हेल्पिंग सेंटर उभारण्याचा मानस आहे. मतदारसंघातील रस्ते विकास प्राधान्याने करून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबाराच्या माध्यमातून थेट संवाद साधण्याचे आश्वासनही मोहन मते यांनी आज दिले.

ही प्रचार यात्रा रघुजी नगर, सोमवारी क्वार्टर, क्रीडा चौक, चंदन नगर, रामबाग, हनुमान नगर, मेडिकल चौक, वंजारी नगर परिसरातून जात असताना ठिकठिकाणी मोहन मते यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. यांच्यासोबत शिवसेनेचे नेते शेखर सावरबांधे, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, नगरसेविका उषा पायलट, नगरसेविका कामडी, भाजपाचे जनसंपर्क प्रमुख देवेन दस्तुरे, अध्यक्ष संजय ठाकरे, महामंत्री विलास करांगळे, मंगलाताई म्हस्के, प्रशांत कामडी, सुनील मानेकर, नानाभाऊ आदेवार यांच्यासह भाजपाचे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
