

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पदयात्रेला राजश्री नगर, अभय नगर आणि रामटेके नगरवासीयांचे समर्थन
नागपूर ११ ऑक्टोबर: राजश्री नगर, अभय नगर आणि रामटेके नगर या वस्त्यांंमधून निघालेल्या भाजपच्या या प्रचार पदयात्रेचे नागरिकांनी जागोजागी पुष्पवर्षावाने स्वागत केले. विधानसभा निवडणूक जसजसी जवळ येत आहे तसतसा भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा वेगही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्रातून पुन्हा एकदा भाजपच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारार्थ मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी आणि भाजप नेते मुन्ना यादव यांच्या नेतृत्वात शुक्रवारी प्रचार पदयात्रा काढण्यात आली होती.
दरम्यान भगिनींनी जोशी आणि मुन्ना यादव यांची आरती ओवाळून भाजपला निवडणुकीत विजयी होण्याकरिता शुभेच्छा दिल्या. यानंतर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी प्रभाग क्र. ३४ मधील राजश्री नगर, टोली, रेणुका विहार, महाराणा कॉलोनी, अभय नगर, साई नगर, जयवंत नगर, शताब्दी नगर, महात्मा फुले कर्मचारी वसाहत भागाचा दौरा करून तेथील तरुणांंची भेट घेतली. तसेच त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे जोशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या भागातील ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी यांची भेट घेऊन फडणवीस यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील ५ वर्षांत केलेल्या विकास कार्यांमुळे नागरिक आनंदी असल्याचे जाणवत होते. मागील ५ वर्षांत या भागातील वस्त्यांमध्ये मजबूत रस्ते, स्वच्छता, उद्याननिर्मिती यासारखी अनेक विकास कामे करण्यात आली आहेत.

पदयात्रेदरम्यान संदीप जोशी म्हणाले, भाजपला स्थानिक भागांमध्ये नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. मुख्यमंत्र्यांच्या विकास कामांमुळे जनता आनंदी आहे. यावेळेस फडणवीस १ लाख अतिरिक्त मतांनी जिंकून येतील असा दावा त्यांनी केला. नागरिकांचे आशीर्वाद आणि भाजप कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे फडणवीस यांच्यापुढे कुठल्याही विरोधी पक्षाचे आव्हान नाही. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नॉन क्रीमिलेयरची मर्यादा साडेचार लाखांहून वाढवत ६ लाख रुपये केली आहे. काँग्रेसच्या मागील ६० वर्षांच्या कार्यकाळात जी कामे झाली नाहीत ती कामे फडणवीस यांच्या कार्यकाळात मार्गी लागली आहेत. यामध्ये झोपडपट्टीवासियांना जमिनी पट्ट्यांचे वाटप, मेट्रो रेल्वे, मिहानमध्ये नोकऱ्यांची संधी, एचसीएल- पतंजली यासारख्या कंपन्यांचे मिहानमध्ये आगमन याप्रमाणे इतरही कामे फडणवीस यांनी केली असल्याचे जोशी म्हणाले.
भाजपच्या आजच्या पदयात्रेत दक्षिण पश्चिम चे अध्यक्ष रमेश भंडारी, नगरसेवक नागेश मानकर, सतीश शाहू, युवा मोर्चाचे अध्यक्ष शशांक बागड़े, प्रभाग अध्यक्ष मंजूषा भूरे, महिला अध्यक्ष श्यामला इंगळे, प्रभाग क्र. ३४ चे महामंत्री दिलीप रहांगडाले, नरेश ननावरे, सचिन पाटील, रजनी सहारे, ममता श्रीवास्तव यांसह हजारोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते




आमचे चॅनल subscribe करा
