

मुंबई: नागपूर दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढविणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे माजी सहकारी आमदार आशिष देशमुखांशी टक्कर द्यावी लागणार आहे. काँग्रेसने देशमुख यांना फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील ही लढत अटीतटीची आणि लक्ष्यवेधी ठरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसने आज रात्री उशिरा १९ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या आशिष देशमुखांना नागपूर दक्षिण-पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.
देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे चिरंजीव आहेत. आशिष देशमुखां हे विदर्भ राज्याचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. गेली पाच वर्ष त्यांनी भाजपात असतानाही प्रत्येक अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात लढत देताना देशमुख यांच्याकडून वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढली जाणार असल्याचं सांगण्यात येतं. देशमुख यांनी या निवडणुकीत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा लावून धरला तर मुख्यमंत्र्यांना अडचणीचे ठरणार आहे. देशमुख हे विदर्भातील मोठं प्रस्थ असल्याने त्यांना निवडणूक मैदानात उतरवून फडणवीस यांना त्यांच्या मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची काँग्रेसची रणनीती आहे. त्यामुळे देशमुख यांची उमेदवारी फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत ५१, दुसऱ्या यादीत ५२, तिसऱ्या यादीत २० आणि चौथ्या यादीत १९ असे एकूण १४० उमेदवार जाहीर केले आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
