

अपक्ष् म्हणून भरणार उमेदवारी अर्ज:काँग्रेसतर्फे नाव अद्याप ‘गुलदस्त्यात’
डॉ.ममता खांडेकर
नागपूर: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांची घोषणा झाली. उद्या शुक्रवार दि.४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या दक्षिण-पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्याच मतदार संघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे अद्याप ‘अधिकृत’उमेदवार घोषित झाला नसून दक्षिण-पश्चिम आणि कामठी अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.परिणामी काँग्रेसच्या तिकीटाची आस लावून बसलेले ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार हे उद्या शुक्रवारी अपक्ष् म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
या मतदार संघातून काँग्रेसतर्फे त्यांना तिकीट मिळण्याची आशा होती.यासाठी त्यांच्या अनेक दिल्ली वाऱ्या देखील झाल्या. पक्ष् श्रेष्ठींकडून त्यांना आश्वासनही देण्यात आले होते मात्र काँग्रेसतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या दुसऱ्याही यादीत त्यांचे नाव नव्हते. लोकसभेत नाना पटोले यांच्या उमेदवारीमुळे ते काँग्रेसच्या जवळ आले होते. आपले कार्यालय त्यांनी पटोले यांना प्रचारासाठी उपलब्ध करुन दिले होते. मात्र काँग्रेसचे सभासद नसल्यामुळे त्यांचे नाव ‘होल्ड’वर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. आता मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ आल्याने प्रशांत पवार यांनी अपक्ष् म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी ही त्यांनी बहूजन समाज पक्षातर्फे पश्चिममधून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.तेव्हा दक्षिण-पश्चिमची निर्मिती झाली नव्हती.२०१४ मध्ये त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली,यावेळी मात्र त्यांना काँग्रेसकडून बरीच आशा होती. प्रशांत पवार यांना मुंबईत बोलावून काँग्रेसच्या नेत्यांनीच विचारणा केली होती यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे पक्ष् श्रेष्ठींना कळवले ही होते. गेल्या निवडणूकीत ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांना या मतदार संघात पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व विदर्भाचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक हे देखील नागपूरात गटा-तटात विखुरलेल्या काँग्रेसला कंटाळून वेगळा उमेदवार देण्याच्या मानसिकतेत पोहोचले होते मात्र ’दिल्लीत ठरतं आणि गल्लीत बदलतं’ या परंपरेप्रमाणे अद्याप प्रशांत पवार यांचे नाव घोषित झाले नाही.
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात मागे ‘सरप्राईज’ उमेदवाराचीही चर्चा रंगली होती.तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्हाला सरप्राईज उमेदवार नको म्हणून शहर अध्यक्ष् विकास ठाकरे,नितीन राऊत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी यांनी दंड थोपटले होते. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी घटिका जवळ आली असताना ‘राष्ट्रीय’ काँग्रेस पक्ष्ाला मुख्यमंत्र्याच्या विरोधात अद्याप उमेदवारच मिळू नये यावर शहरात बरीच चर्चा रंगली आहे.
प्रशांत पवार पुढे जाऊन डोईजड होण्याची भिती-
सुरवातीला प्रशांत पवार यांच्या नावाला शहरातील दिग्गज नेते अनुकुल होते मात्र पुढे जाऊन पक्षातील हा नेता आपल्यालाच डोईजड होईल अशी शंका आल्याने ‘गल्लीतूनच’ प्रशांत पवार यांच्या नावाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा अशी शंका घेतली जात आहे. तशीही नागपूर काँग्रेस पक्षात स्वत:चा प्रतिस्पर्धी निर्माणच होऊ नये किंवा निर्माण झाल्यास गटा-तटाच्या राजकारणात त्याचा निभावच लागू नये,याची यादी फार लांब आहे.याच कारणामुळे पवार यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा आहे. बहूजन समाजपपक्षातर्फे प्रशांत पवार यांना २००४ साली २८ हजार मते मिळाली होती मात्र खरी लढत ही काँग्रेसचे रणजित देशमुख व भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यातच रंगली होती. प्रशांत पवार हे काँग्रेसची मते घेणारे ’ज्वॉईंट किलर’ठरले होते. यंदा त्यांनी काँग्रेसतर्फेच उमेदवारी मिळवण्याचा भरकस प्रयास केला.यात त्यांना शेवटपर्यंत आश्वासनावर ठेवण्यात आले. मात्र शुक्रवारी उमेदावरी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी अपक्ष् उमेदवार म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभे राहण्याचा निर्धार पक्का केला. काँग्रेसने शुक्रवारी त्यांच्या ‘सरप्राईज’उमेदवार उभा केल्यास या मतदार संघातून तिहेरी लढत रंगणार आहे हे मात्र निश्चित.
मुख्यमंत्र्यांना ‘रेड कारपेट’ मिळू देणार नाही-प्रशांत पवार
अपक्ष् म्हणून लढलो तरी ही देशाच्या व राज्याच्या काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे त्यांनी पक्ष् संघटनेची संपूर्ण ताकद माझ्या मागे उभी करावी आणि मुख्यमंत्र्यांचा विजय सहज आणि सोपा करु नये. लाेकशाही टिकवून ठेवायची असेल तर सत्ताधारी पक्षाप्रमाणेच प्रबळ विरोधी पक्ष् आणि ताकतवान विरोधक असणे गरजेचे आहे. अन्यथा निरंकूश सत्तेकडे वाटचाल होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने मला दिलेल्या अधिकारासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा निर्धार पक्का केला आहे. हे धाडस खरे तर माझे नाव घोषित करुन देशातील सर्वात जुना पक्ष् काँग्रेसने दाखवायला हवे होते.
इतर कोणत्याही पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दंड थोपटण्यास सक्ष् म असणाऱ्या उमेदवाराची घोषणा अद्याप झाली नाही हे विशेष. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सर्व विरोधी पक्ष् मिळून नागपूरात ‘रेड कारपेट’ देत असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवारच उभा नाही करणे किवा दुबळा उमेदवार देणे हे एक प्रकारे निवडणूकी आधीच पराभूत मानसिकता असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
