


समलैंगिकतेला न्यायालीयन मान्यतेचे एक वर्ष: समाजाचे काय?
दिल्ली येथील पित्याने केली आत्महत्या!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
‘समलैंगिकता’ हा शब्द… गौरवशाली भारतीय संस्कृतीत उच्चारणे महापाप समजले जाते तिथे समलैंगिक व्यक्तिंविषयीची घृणा याची तर कल्पना ही केली जाऊ शकत नाही. समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी जगभरातच एक मोठा लढा उभारण्यात आला.प्रदीर्घ लढ्यानंतर काही राष्ट्रांनी समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता दिली असली तर जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत ज्यांनी अद्याप समलैंगिकतेमागील ‘जीवशास्त्रीय’ कारण समजून घेण्याचा प्रयत्न ही न करता २१ सा व्या शतकाच्या १९ सा व्या दशकात ही यावर कठोर बंदी घातली आहे. भारत मात्र अश्या देशाच्या यादीत समाविष्ट झाला ज्या देशाने समलैंगिक संबधांना काही अटींवर कायदेशीर मान्यता दिली. ७ सप्टेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले.
या एक वर्षाच्या काळात समलैंगिक व्यक्तिंच्या जीवनामध्ये कोणता बदल झाला याचा मागोवा घेण्यासाठी लता मंगेशकर रुग्णालयातील ‘सारथी‘ संस्थेचे प्रमुख आनंद चंद्राणी व निकुंज जोशी यांच्याशी संवाद साधला असता…समाज अजूनही घृणा व तिरस्कारच्याच मानसिकतेमध्ये जगत असल्याचे विदारक सत्य पुढ आले! नुकतेच दिल्ली येथील एका पित्याने त्यांची मुलगी समलैंगिक असल्याचे सत्य समोर आल्यामुळे आत्महत्या केली. या तरुणीचा बळजबरीने साखरपूडा करुन देण्यात आला. खरे बोलण्याचे धाडस या तरुणीने आपल्या जन्मदात्यासमोर मांडले. बाबा, लग्न म्हणजे होणाऱ्या नवऱ्याची काही मागणी राहील…ती मी पूर्ण करु शकणार नाही…बळजबरीने मग माझ्याबरोबर बलात्कारच घडेल…हे तुम्हाला मान्य होईल का? आम्ही दोघेही आनंदी राहू शकणार नाही..हे लग्न मला करायचेच नाही..त्यापेक्षा मला हवं तसं मला जगू द्या..माझी जीवशास्त्रीय असंतुलन आणि नैसर्गिक गरज ‘बाप’म्हणून तुम्ही तरी समजून घ्या..!
या बापाने लाडक्या मुलीची बाजू तर समजून घेतली मात्र..स्वत:चा जीव देऊन..आयुष्य संपवून..!आपल्या मुलीच्या सुखी जीवनापेक्ष्ा समाज,नातेवाईक,शेजारी, ओळखीचे यांचे इतके मोठे दडपण त्यांच्या मनावर आले…जीवनाची खरी लढाई सुरु करण्यापूर्वीच ती संपली…संपवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिल्यानंतरही समाज अापली मानसिकता अद्याप ही बदलायला तयार नाही. कुटुंबच समजून नाही घेणार तर कोण त्यांना समजून घेणार. जगाशी तर ते सहज लढतात…त्रास होतो तो…आपल्या माणसांच्या विरोधात लढण्याचा. त्यांचा हेतू नसतो त्यांना दू:खविण्याचा पण तरीही कुटुंबीय हादरुन जातात,वास्तव स्वीकारण्याची मानसिकताच अद्याप समाजाची तयार झाली नसल्याचे दिसून पडते..याचे शोचनीय उदाहरण म्हणजे आनंद सांगतात गेल्या सोळा वर्षात उघडपणे फक्त आठ मुली या सारथीसोबत जुळल्या…१६ वर्षात फक्त ८ मुली!
नागपूर शहरात फक्त आठच मुली या समुदायाच्या आहेत का? कुटुंबियांचा,समाज,नातेवाईकांचा विचार करुन घरातल्या चार भिंतीत समलैंगिक मुलींचे आयुष्य घुसमटत आहे. ‘बेटी बचाओ’ मग हा नारा कोणासाठी? समलैंगिक बेटी विषयी सरकार तरी कधी बोलणार आहे?कधी धोरणे ठरवणार आहे? या समाजात,चोर,दरोडेखाेर, बलात्कारी,खूनी सर्वांना प्रतिष्ठा आहे मात्र समलैंगिककांना नाही,समलैंगिक हा तर कधीही समाजाचे नुकसान करीत नाही,स्वस्थ समाजाला हानि पोहोचवत नाही, समाजाचा एक भाग म्हणून म्हातारपणी तुमचा सांभाळ कोण करेल?असा कुत्सीत प्रश्न ही त्यांना विचारला जातो,मी जर लग्न केले पण माझी बायको माझ्या आधी जग सोडून गेली तर?या प्रश्नावर मात्र समाज गप्प का होतो?आनंद छांगाणी हा प्रश्न आज समाजाला विचारत आहेत.
नुकतेच सारथीतर्फे समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळाली याला एक वर्ष झाले या निमित्त सदर येथील एका हॉटेलमध्ये वैचारिक मंथनाचा कार्यक्रम पार पडला यात समाजातील नामवंत डॉक्टर्स, विचारवंत, मानसोपचारतज्ज्ञ,वकील,समाजसेवी इ.नी सहभाग नोंदवला. या चर्चासत्रात एकच महत्वाचा मुद्दा पुढे आला…आम्ही समलैंगिक समुदायासोबत ठामपणे उभे आहोत..समाजात जिथे जिथे आमचा वावर आहे त्या सर्व लोकांचे, समलैंगिकतेप्रती विचार बदलण्याचा नक्की प्रयत्न करु मात्र…प्रश्न उरतो…मानव समाजाचा एक मोठा भाग असलेल्या समलैंगिक समुदायाच्या पाठीशी फक्त उच्च शिक्ष्ति मोजक्या लोकांनीच उभे राहायचे का?
माणूस म्हणून जगण्याच्या त्यांच्या या चळवळीमध्ये नागपूरची तीस लाख लोकसंख्या ही कोणत्या शतकात उभी राहणार आहे?
समलैंगिकता हे जैविक असंतुलन,विकृती नाही-
आईच्या गर्भात असताना चौथ्या-पाचव्या महिन्यात गर्भातील बाळामध्ये जेव्हा सेक्स हॉरमोन्स तयार होतात त्यावेळी जैविक असंतुलन घडल्यास समलैंगिकतेचे गुणसूत्र तयार होतात. बाळ जेव्हा १३-१४ व्या वर्षी वयात येतो तेव्हा हळूहळू त्याला त्याचा कल कळतो,विरुद्ध लिंगी आकर्षण ही सामान्य बाब असली तरी समलैंगिकतेचे आकर्षण ही देखील निसर्ग:त सामान्यच बाब असल्याचे देशातील तज्ज्ञ डॉक्टर्स सांगतात. पुराणकाळात देखील समलैंगिकतेचे उदाहरण सापडतात. त्रेतायु,सतयुग,द्वापरयुग अश्या प्रत्येक युगात समलैंगिक हे समाजाचाच एक भाग होते, मात्र कलियुगात समलैंगिक असणे म्हणजे ‘विकृत लैंगिकता’ ठरविण्यात आली इतकेच नव्हे तर हा विचार धर्मग्रंथाचाच आधार घेऊन समाजाच्या नसानसात पिढी तर पिढी भिनवण्यात आला..
आज समलैंगिकतेचे वास्तव समाजाने शास्त्रीय दृष्टिने समजून न घेतल्यास समाजात एड्स-एचआयव्हीचा धोका कायम राहणार आहे जो स्वस्थ समाजालाच आजारी पाडणार आहे. समाजाच्या भीतीने आपली लैंगिक गरज असुरक्ष्तिपणे भागविली जात आहे. त्यापेक्ष्ा उघडपणे समलैंगिकांना स्वीकारल्यास यात समाजाजेच भले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
