


दक्षिण नागपुरातील सौंदर्यीकरण आणि विकासकामांचे भूमिपूजन : विविध योजनेअंतर्गत वस्तूंचे वाटप
नागपूर, दि. १० : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी स्वत: मंत्री असल्याने नागपूरच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी नागपूरच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जातं. जनतेने आमच्यावर विश्वास टाकला. कार्य करण्याची संधी दिली, त्यामुळेच हे शक्य झाले, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दक्षिण नागपुरातील विविध विकासकामांचे आणि सौंदर्यीकरण कार्याचे ई-भूमिपूजन तसेच लाभार्थी मेळाव्याचे आयोजन रेशीमबाग येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे होते. मंचावर महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर, नेहरू नगर झोन सभापती समिता चकोले, धंतोली झोन सभापती लता काडगाये, माधुरी ठाकरे, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, माजी नगरसेवक कैलास चुटे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंत अमीन अख्तर उपस्थित होते.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, नागपूर शहरातील गरीब कुटुंबातील किमान एक लाख मुलांना दररोज विविध खेळ खेळता यावे असे आपले स्वप्न होते. त्यादृष्टीने नागपुरातील क्रिडांगणे व क्रीडा संकुलं विकसित करण्याचा संकल्प केला. सुमारे १५० क्रीडा संकुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. दक्षिण नागपुरात ऑलिम्पिकच्या धर्तीवर मिनी स्टेडियम विकसित करण्याचे आपले स्वप्न होते. मागील पाच वर्षात आमदार सुधाकर कोहळे यांनी त्याचा पाठपुरावा करीत कामगार क्रीडा संकुलाच्या निर्माणातील अडचणी दूर केल्या, ही अभिनंदनीय बाब आहे. सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण ही दक्षिण नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारी बाब आहे. राजाबाक्षा हनुमान मंदिर आणि रमना मारोती मंदिर ही नागपुरातील नागरिकांची श्रद्धास्थाने आहेत. त्याचा विकास आणि सौंदर्यीकरण करून नागपूरच्या जनतेला आमदार सुधाकर कोहळे यांनी अनुपम भेट दिली आहे, त्याबद्दल नितीन गडकरी यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातून पैसे कमविणारी नागपूर महानगरपालिका देशातील एकमेव आहे. सुमारे १५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करून त्यावर मेट्रो धावतेय, हा सुद्धा पहिला प्रयोग आहे. तर आयुष्य संपलेल्या डिझेल बस सीएनजीमध्ये परावर्तीत करून त्याचे आयुष्य पुन्हा वाढविणे आणि जनतेच्या सेवेत रुजू करणे, हासुद्धा पहिला प्रयोग आहे. यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. असे नावीन्यपूर्ण प्रयोग राबविणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचे, महापौर आणि आयुक्तांचेही त्यांनी अभिनंदन करीत यापुढेही असे लोकोपयोगी प्रयोग करा आणि उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करण्याचा मंत्र त्यांनी दिला. महाल आणि सक्करदरा बाजार तसेच ऑरेंज सिटी स्ट्रीटच्या कामालाही लवकर सुरुवात होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणातून आमदार सुधाकर कोहळे यांनी दक्षिण नागपूर मतदारसंघात मागील पाच वर्षांत झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. उत्तम क्रिडांगणे, उद्याने, ई-लायब्ररी, सौंदर्यीकरण, रस्ते असे समाजातील प्रत्येक घटकाशी संबंधित विकासकामे झालीत. मागील महिनाभरात ९२ भूमिपूजन केल्याचे सांगितले. सक्करदरा तलावातून १६०० ट्रक माती काढून खोलीकरण केले. ६५० ट्रक जलपर्णी काढली. त्यामुळे यंदा उन्हाळ्यातही तलाव तुडुंब भरलेला होता. जनतेची सेवा करण्यात कुठलीही कुचराई केली नाही. यापुढेही जनतेची सेवा अविरत करीत राहू, असा विश्वास त्यांनी दिला.
महापौर नंदा जिचकार यांनी नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने सुरू असलेल्या विकासकामांची आणि त्यामाध्यमातून सुरू असलेल्या शाश्वत विकासाची माहिती दिली. नागपूर जागतिक नकाशावर नाव कोरण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या विश्वासामुळे आणि सहभागामुळेच नागपूर विकासात अग्रेसर होत असल्याचे सांगितले. आमदार प्रा. अनिल सोले आणि आमदार गिरीश व्यास यांनीही यावेळी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात दक्षिण नागपुरात झालेल्या विकासकामांवर प्रकाश टाकला.
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रिमोटची कळ दाबून सक्करदरा तलाव सौंदर्यीकरण व विकासकामांच्या पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन, कामगार क्रीडा संकुलच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे भूमिपूजन, राजबाक्षा हनुमान मंदिर देवस्थान आणि रमना मारोती देवस्थानाच्या सौंदर्यीकरण व विकासकामांचे भूमिपूजन केले.
भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या हेतूने लाभार्थी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस शेगडीचे वाटप, खेळाडूंना बुटांचे वाटप, रेशन कार्डचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संजय ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, राजेंद्र सोनकुसरे, नगरसेविका रिता मुळे, रूपाली ठाकूर, भारती बुंदे, विशाखा बांते, स्वाती आखतकर यांच्यासह दक्षिण नागपुरातील सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. दक्षिण नागपुरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
