

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली संपकरी कर्मचा-यांची भेट
मुंबई, दि. २४ ऑगस्ट २०१९: सरकारच्या जवळच्या काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने दारूगोळा कारखान्यांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. खासगीकरणामुळे हजारो कर्मचा-यांच्या भवितव्याचा तसेच देशाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात दारूगोळा कारखान्यातील कर्मचा-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून या लढ्यात काँग्रेस पक्ष कर्मचा-यांसोबत आहे, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी संपकरी कर्मचा-यांना दिला.
दारूगोळा कारखान्यांच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी आज सकाळी पुण्याच्या खडकी येथे दारूगोळा कारखान्यातील संपकरी कर्मचा-यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी, नगरसेवक आबा बागुल आदी उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना आ. थोरात म्हणाले की, राज्यामध्ये १० दारूगोळा कारखाने असून यामध्ये ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. सरकारच्या निगमीकरणाच्या निर्णयामुळे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हे दारूगोळा कारखान्याच्या खासगीकरणासाठी सरकारने टाकलेले पहिले पाऊल आहे. या कारखान्यांचे खासगीकरण करून आपल्या जवळच्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. भाजपचा खरा चेहरा आता समोर येऊ लागला असून मोजक्या उद्योगपतींच्या हितासाठी सरकार काम करत आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्ष कर्मचा-यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे. या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगून सरकारने निगमीकरणाचा हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.




आमचे चॅनल subscribe करा
