पदवीधर निवडणूक
कोहळेंवर दाव,निशाण्यावर बावणकुळेंचे नाव:खासगीत चर्चा
डॉ.ममता खांडेकर
मुख्य संपादक ‘सत्ताधीश’
नागपूर,ता.६ ऑक्टोबर २०२६: ‘‘राजकारण’ नावाच्या बेभरवश्याच्या सारीपाटावर पुन्हा एकदा २०२० सालचा ‘पदवीधर रिर्टन्स निकाल’खेळ रंगला असून, विधान परिषदेचे पदवीधरचे माजी आमदार प्रा.अनिल सोले यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात बंडखोरी करीत आपल्या समर्थकांसोबत येऊन उमेदवारी अर्ज भरुन या खेळाची ओपनिंग केली.भाजपमधील अनेक आजी-माजी आमदार व खासदारांचा सोले यांना छूपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.२०२० मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पदवीधरचे तत्कालीन सिटींग आमदार अनिल सोले यांना निवडणूकीच्या सहा महिन्यां पूर्वीच ‘कामाला लागा,यंदाही पदवीधरचे तिकीट तुम्हालाच’असे आश्वासन दिले होते,गडकरी यांचे आदेश शिरोधार्ह्य मानून सोले कामाला लागले मात्र ,राज्यातील सर्वोच्च स्तरावरुन चक्र फिरले व सोलें ऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहीलेले देवेंद्र फडणवीस (२०२० मध्ये ते मुख्यमंत्री नव्हते,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते)यांच्या अतिशय निकटचे समजले जाणारे माजी महापौर संदीप जोशी यांना पदवीधरची उमेदवारी घोषित झाली.
त्यावेळी अपमान,हताशा व वेदनेचा घोट गपगुमान पिऊन गप्प बसणारे अनिल सोले आज मात्र,अतिशय आत्मविश्वासात वावरताना दिसले.त्यांचा आत्मविश्वास इतका जास्त दुणावला आहे की चक्क भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना त्यांच्या भेटीसाठी घाम गाळावा लागत आहे.रात्रीच्या सुमारास चव्हाण हे सोले यांच्या घरी वाट बघत होते तर सोले एका हॉटेलमधील बैठकीत रणनीती ठरविण्यात व्यग्र होते.गडकरींचे हे खंदे समर्थक यंदा पदवीधरची निवडणूक बंडखोरीतून गांर्भीयाने लढण्यास सज्ज झालेले आढळतात.त्यांच्या मागे भाजपचे आजी-माजी आमदार,खासदारच नव्हे तर संघाचा देखील छूपा पाठींबा असल्याची चर्चा आहे!
सोले यांच्यासाठी शिक्षक मतदारसंघाचे सर्व माजी आमदार व कार्यकर्ते कामाला लागले आहेत आणि ही भाजपचे घोषित उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे.कोहळे यांचे नाव एक वर्षा पूर्वी पासून पुढे आणण्या मागे भाजपचे तिस-या क्रमांकाचे बाहुबली मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचा पुढाकार वादग्रस्त ठरु पाहत आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकूणच कार्यशैली बघता ते काेणताही निर्णय आपल्या अंगी चिकटवूण घेत नाहीत.२०२० मध्येही संदीप जोशींना उमेदवारी देऊन भाजपने ‘एक तीर से दो शिकार’साधले अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.संदीप जोशी यांना नागपूर जिल्ह्याशिवाय इतर पाच महत्वाच्या जिल्ह्यातीत पदवीधर मतदार ओळखतही नव्हते तरी देखील फडणवीसांनी खेळलेला हा डाव,नेमका कोणावर उलटला?यावर आज ही बरीच खलबते होत असतात.दक्षिण-पश्चिम या फडणवीसांच्या मतदारसंघातून जोशी यांचे महत्वच त्या पराभवातून संपुष्टात आले.
दक्षिण-पश्चिम या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपचा कोणताही नेता मोठा होता कामा नये,अशी रणनीती असल्याचे बोलले जाते.२००० पासून फडणवीस पश्चिम नागपूरमधून आमदार आहेत हे याचे महत्वाचे उदाहरण.आता मुख्यमंत्र्यांचा दक्षिण-पश्चिम हा नवा मतदारसंघ झाला असला तरी पश्चिम नागपूरमधून काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊन विकास ठाकरे आमदार होणे या मागेही ‘रणनीती’च असल्याचे ठामपणे नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगते.
ती निवडणूक ‘ब्राम्हण विरुद्ध ओबीसी’अशीच रंगली होती किंबहूना रंगविण्यात आली होती.गडकरी व त्यानंतर अनिल सोले नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असे पर्यंत कधीही असा ‘जातीयवाद’पदवीधर निवडणूकीत रंगला नाही,हे विशेष.२०२० च्या पदवीधर निवडणूकीत मात्र ओबीसी लढ्याचा नारा देत काँग्रेसच्या सर्व आमदार व नेत्यांनी गटातटाचे राजकारण विसरुन ॲड.अभिजित वंजारी यांच्या मागे आपले बळ उभे केले होते.सहा ही जिल्ह्यातील ओबीसींच्या विविध संघटना यांचे ही समर्थन वंजारी यांच्या मागे उभे झाले व त्याचा परिणाम वंजारी हे १८ हजार ९१० मताधिक्यानी विजयी झाले.वंजारी यांना ६१ हजार ७०१ मते तर संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते मिळाली होती.
यंदा काँग्रेसनी पुन्हा वंजारी यांना रिंगणात उतरवले असून भाजपने कुणबी असलेले सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यंदाची निवडणूक ही ओबीसींमध्येच रंगणार असून यात ‘तेली विरुद्ध कुणबी’हा फॅक्टर ही महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळेच बंडखोर अनिल सोले यांना मोठ्या प्रमाणात दुस-या क्रमांकाची पसंदीची मते मिळणार असल्याचा कयास लावला जात असून, यंदा देखील वंजारी हे बाजी मारणार असल्याचे बोलले जात आहे.वंजारी यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, आमदार विजय वडेट्टीवार,माजी आमदार सुनील केदार,खासदार बर्वे,शहराध्यक्ष प्रफूल्ल गुडधे,अतुल लोंढे,बंटी शेळके,अशोक धवड,राजेंद्र मुळक आदी विविध गटातटाचे नेते वंजारी यांच्यासोबत पुन्हा एकदा २०२० प्रमाणेच दिसून पडले.
ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसून बॅलेट पेपरवर होत असल्याने अतिशय चुरशीची ठरते.पहील्या क्रमांकाच्या पसंदीची ठराविक मते मिळताच,इतर उमेदवार बाद होतात.त्यामुळे कोहळे किंवा वंजारी यांच्याकडून किती लाख नवे मतदार नोंदणीकृत केले याचा महत्व नसून पहिल्या क्रमांकाच्या पसंदीची मते घेणारा सहज विजयी होतो.आता मध्य नागपूर,पूर्व नागपूर,दक्षिण नागपूर,भाजपप्रणित शिक्षक मंच असो किंवा नुकतेच विधान परिषदेवर गेलेले दोन्ही आमदार,चंद्रपूर,गडचिरोलीतील भाजपचे कद्दावर नेते,आमदार,माजी खासदार तसेच नगरसेवक, कोहळे यांच्या मागे पक्षादेश मानून किती जोर लावतात हे २७ ऑक्टाेबर रोजी होणा-या मतमोजणीतून दिसून पडेलच.मात्र,‘सोलेंसाठी भाजप लागली कामाला’ही चर्चा आताच ऐकू येत आहे.मतमोजणीत कोहळे हे चौथ्या क्रमांकावर राहतील असा दावा देखील केला जात आहे.वर्धाचे खदखद फेम प्रा.नीतेश कराळे मास्तर हे तिस-या क्रमांकाची मते खेचतील असा अंदाज आहे.आज कराळे मास्तरांसोबत उमेदवारी अर्ज भरताना पदवीधर असलेले सर्वाधिक समर्थक दिसून पडले.
दुसरीकडे माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रा.सोले यांनी मुख्यमंत्री असो,बावणकुळे असो किंवा इतर कोणीही असो,कोणाच्याही आवाहनावर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही,असे ठामपणे सांगितले.उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भरला नसल्याचे ते म्हणाले.पदवीधरांचा आमदार असताना पर्यावरणापासून तर शिक्षक,पदवीधरांसाठी केलेली कामे याचा पाढाच त्यांनी वाचला.समर्थकांचा मोठा जल्लोष त्यांच्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात उमटला.गगनभेदी नारे व घोषणा सोले यांच्या आत्मविश्वासाची व त्यांच्या मागे उभ्या असलेल्या भक्कम राजकीय पाठिंब्याची साक्ष देत होते.
दुसरीकडे कोहळे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरताना बावणकुळे व रामटेकचे आमदार आशिष जयसवाल व ‘सोबत’ करणारे आमदार प्रवीण दटके यांच्याशिवाय कोणीही उपस्थित नव्हते. राज्यात दुष्काळाचे तांडव व तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रॅली न काढता कार्यकर्त्यांना स्वागत लॉन्सवरील निवडणूक सभे नंतर परत पाठविण्यात आल्याचे बावणकुळे यांनी सांगितले.मात्र,त्यांच्या रॅलीत किती पदवीधर नगरसेवक किंवा ग्रामपंचायत,नगरपरिषद सदस्य होते?असा सवाल देखील परिसरात उमटला.स्वागत लॉन्समध्ये सर्वाधिक उपस्थिती बावणकुळेंच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची होती,हे विशेष.
थोडक्यात,नागपूर पदवीधरची ही निवडणूक ‘काँग्रेस विरुद्ध भाजप’न राहता पुन्हा एकदा ‘भाजप विरुद्ध भाजप’झाल्याची दिसून पडतेय.यात ही ‘जुने निष्ठावान विरुद्ध नवीन भाजपवाले’अशी ती रंगणार आहे.बॅलेट पेपरवर होणा-या या निवडणूकीत भाजप निष्ठावानांचे तसेच कोहळेंच्या विरोधकांचे मत सोले यांच्या नावा पुढे नोंदवले जाणार असल्याची चर्चा आहे.ही निवडणूक बावणकुळे यांच्या ही पुढील ‘महत्वाकांक्षी’ राजकीय वाटचालीची दिशा ठरविणार असल्याची चर्चा आहे.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………………….