पदवीधर निवडणूक
क-हाळे मास्तरांनी केला विजयाचा दावा!
नागपूर,ता.५ ऑक्टोबर २०२६: अपक्ष उमेदवार म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशात हातात संविधानाची प्रत घेऊन,उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ‘खदखद फेम ’वर्धाचे प्रा.नीतेश कराळे मास्तर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की,जे विचार मी आतापर्यंत लोकांमध्ये पेरण्याचं काम केलं त्या विचारधारेला अनुसरुन मी आज ही वेशभूषा केली आहे,याशिवाय सावित्रीबाई फूले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शहीद भगतसिंग,बिरसा मुंडा यांच्या देखील वेशभूषेत माझे समर्थक माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले असल्याचे ते म्हणाले.
बेरोजगारीच्या प्रश्नावर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,मी आमदार झालो तरी मी काही खूप मोठा तीर मारणार नाही,कारण एक आमदार खूप काही करु शकत नाही.सत्तेत असल्यास व मंत्री पद भेटल्यास त्या विभागाचा कायापलट करता येतो.माझं काम हेच राहील की मी पदवीधर आमदार झाल्यानंतर पदवीधरांची बेरोजगारी,पेपरफूटीचे विषय असो किंवा ऑनलाईन परिक्षेचा मुद्दा सभागृहात पोटतिडकीने मांडील.नीटपासून तर संगणक परिचालकांचा असो किंवा आरोग्य संगणक पेपरफूटीचे मुद्दे, मी सभागृहात मांडेल.याशिवाय कॅप राऊंडमध्ये ज्यांची निवड झाली त्यांची शिष्यवृत्तीच या सरकारने बंद करुन टाकली.ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.एसटी-एससी विद्यार्थ्यांचे आधार-स्वाधार योजनेचा मुद्दाही अद्याप सुटलेला नाही.पदवीधर आमदार म्हणून मी हे प्रश्न सभागृहात विचारेल आणि मंत्र्यांना याचे उत्तर द्यावे लागेल.
आंदोलन जर केलं तर सोटे ही खावे लागते,जेलमध्येही जावे लागते आणि एकच प्रश्न सुटतो.सभागृहात जर गेलो तर पॉवर राहते,राजमुद्रा राहते,लेटरहेड राहते,एक तक्रार दिली तर त्याच्यावर काही ना काही निर्णय घ्यावा लागतो आणि सगळ्या लोकांचे पाठबळ त्या आमदाराला असते,असे ते म्हणाले.
तरुण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरत आहेत,याविषयी छेडले असता,तरुण आता त्यांच्या मनातला आक्रोश बाहेर काढत असल्याचे ते म्हणाले.सत्ताधा-यांनी या देशाची लोकशाही विकून खालली आहे, आणि हे लोकांना दिसून पडत आहे.अगदी निवडणूक आयोगापासून तर सगळ्या संवैधानिक संस्थांचा जो धिंगाणा सत्ताधा-यांनी करुन ठेवला आहे,त्या विरोधात लोकं आता रस्त्यावर उतरत आहेत.आदिवासी सुद्धा आंदोलन करत आहेत कारण इतक्या पिढ्यांपासून ज्यांनी जंगले राखली,त्यांनाच तिथून हुसकावून,त्यांच्या जमीनी व जंगले ‘अदानीला’ देत आहेत,त्यामुळे बदल आता घडला पाहिजे यासाठी जेन-झी असो किंवा आदिवासी, मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत असल्याचे ते म्हणाले.
त्यांना गडचिरोली पासून तर गडचांदूरपर्यंतच्या पदवीधर मतदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला.माझ्यासाठी गाड्या भरुन भरुन आले,मला कोणाला पैसे देऊन बोलवावे लागले नाही.ते स्वखर्चाने आले आहेत.सिरोंचा,अहेरीवरुन लोक पहाटे चार वाजता माझ्यासाठी आले आहेत.
तसेही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही बेरोजगारीशी निगडीत असून भारत सरकारने २०१७ पासून बेरोजगारीची आकडेवारीच प्रसिद्ध करण्याचे बंद केले.सरकारी नोकरीचा अभ्यास करतात तर पेपरफूटी होते.एमपीएससीसारख्या परिक्षेचा पेपर फूटतोय,नीट सारख्या परिक्षेचे पेपर फूटतात.दिल्लीत विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले,त्या विद्यार्थ्यांवरही भाजप सरकार पोलिसांना लाठ्याकाठ्या मारण्याचे आदेश देते,त्यांना अटक होते,त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात.
पदवीधरमध्ये भाजपचा आमदार निवडून जरी आला तरी तो काही कामाचा नाही.सहा वर्षे काँग्रेसचे आमदार आहेत मात्र त्यांच्या स्वत:च्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहेत,त्यांनी आता मेडीकल कॉलेजही सुरु केल.त्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था वाचवायच्या आहेत त्यामुळे ते भाजप विरोधात काहीच बोलत नाही,त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही आणि एकाही आंदोलनाला भेट दिली नाही,असा आरोप करीत,त्यामुळेच पदवीधरची निवडणूक गेल्या वर्षी सारखीच पुन्हा लढण्याचा आग्रह मला झाला,असे ते म्हणाले.
माझी उमेदवारी ‘गेम चेंजर’होऊ शकते,असा दावा ही त्यांनी केला.पहील्या पसंदीचे क्रमांक एकचे मत मलाच मिळणार आहे,असा दावा ही त्यांनी केला.मी आमदार जरी झालो तरी माझा आंदोलनांचा पवित्रा असाच राहणार आहे.
मी आठ दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आलो असल्याचे ते म्हणाले.सत्ताधारी असे आहेत जे बेरोजगारांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडले किंवा त्यांच्या विरोधात आंदोलन केले तर खोटे गुन्हे नोंदवतात आणि तुरुंगात टाकतात.मात्र,विधान परिषदेत पोहोचलो तर मंत्र्यांना सगळ्याच प्रश्नांचे उत्तर द्यावी लागेल.आंदोलनातून एखाद्याच मुद्दा सोडवता येऊ शकतो,आंदोलनातून जास्त प्रश्न सोडवता येऊ शकत नाही त्यामुळेच सभागृहात जाणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.त्यामुळेच मी निर्णय घेतला,वर्धा हा माझा मतदारसंघ आहे.गेल्यावेळी देखील मी पदवीधरची निवडणूक लढलो व मी चौथ्या क्रमांकावर होतो.यंदा माझे सगळे पदवीधर समर्थक मलाच निवडून देणार असल्याचा दावा कराळे मास्तर यांनी केला.
पंधरा दिवस खूप झाले प्रचारासाठी,असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.पोट्टे इनस्टाग्राम,फेसबुक पार हँग करुन टाकण,शटर वरती ही येणार नाही खालती ही येणार नाही.पोट्टे पार पंधरा दिवसात ऑन लाईन धिंगाणा करुन टाकतील.विरोधक पिसाळून जातील क-हाळे मास्तराने हे काय लावलं आहे,अशी मिश्किली त्यांनी केली.
बंडखोरीविषयी छेडले असता,मी बंडखाेरी केली नाही.पदवीधर मतदारसंघाच्या बॅलेटपेपरवर पक्षाचे चिन्ह नसते म्हणून ही बंडखोरी नाही,असे ठाम उत्तर कराळे यांनी दिले.
‘प्रस्थापितांची मक्तेदारी आता क-हाळे गुरुजींची बारी’,नुसतं बोलायचं नाही प्रश्नांशी भिडायचं,नीतेश क-हाळे सरांसोबत हक्कासाठी उभं राहायचं’,‘प्रस्थापितांनो सोडा खूर्ची,आले आमचे कराळे गुरुजी’,‘आम्ही पदवीधर भविष्याचे शिल्पकार,नीतेश कराळे गुरुजीच आमचे उमेदवार’अशी फलके घेऊन गुरुजींचे पदवीधर समर्थक विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यास आले होते.’हमारा नेता कैसा हो,कराळे गुरुजी जैसा हो’ना-यांनी त्यांनी परिसर दुमदुमन टाकला.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनरवर उपलब्ध)