Advertisements

(मनपा सभा विशेष बातमी क्र.२)
महापौरांचे ‘पत्र’ अन् मनपा शाळेतील आनंद यात्रा शैक्षणिक दिंडी वाद
आधी शिक्षक द्या:काँग्रेस नगरसेवक ॲड.शैलेंद्र डोरले यांची मनपा सभेत मागणी
नागपूर,ता.२० ऑगस्ट २०२६: मनपाच्या शिक्षण विभागाअंतर्गत १८ जुलै २०२६ रोजी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘आनंददायी शनिवार’या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक वारकरी दिंडी आयोजित केली होती.या उपक्रमावर काँग्रेस नगरसेवक ॲड.शैलेंद्र डोरले यांनी आज मनपा सभेत प्रश्न उपस्थित केला.या उपक्रमासाठी कोणत्या सक्षम प्राधिका-याची प्रशासकीय मंजूरी घेतली होती?असा प्रश्न केला असता,यावर प्रशासनाने महापौरांचे पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती सभागृहात दिली.
डोरले यांनी या उपक्रमाच्या मंजुरीचे आदेश प्रत देण्याची मागणी केली.या उपक्रमामध्ये मनपाच्या किती शाळा व किती विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच शाळानिहाय विद्यार्थ्यांची संख्या देण्याची मागणी करीत, दिंडीमध्ये सहभागी करण्यापूर्वी पालकांची लेखी संमती घेण्यात आली होती का?असे प्रश्न प्रशासनाला विचारले.मूळात शासनाने या उपक्रमाबाबत जे परिपत्रक काढले होते त्यात कुठेही वारक-यांची दिंडी घ्यावी असा उल्लेख नाही तरी देखील मनपा आयुक्त किंवा शिक्षण विभागाला हा अधिकार कोणी दिला?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.महापौरांनी जर यासाठी पत्र दिले असेल तर त्या पत्राची तारीख काय?महापौरांचे ते पत्र सभागृहासमोर येईल का?असे त्यांनी विचारले.
मात्र,प्रशासन यावर उत्तर देत असतानाच मनपाच्या शिक्षण समिती सभापती संतोषी नड्डा यांनी ‘राईट फॉर इन्फॉरमेशन’चा अाधार घेत,‘वारी में आत्मा होती है,वारी ये पदयात्रा नहीं,वारी मे संत ज्ञानेश्वर,तुकाराम इनकी पालखी होती है.ताल,मृदंग,अभंग के नाद मे ना कोई छोटा होता है ना बडा,ना कोई गरीब होता है ना अमीर,वारी में मानवता का संदेश होता है,कोई पाणी पिलाता है कोई वारकरीयो को खाना खिलाता है,नूतन भारत महाविद्यालय सें आमंत्रण आया था,हमारे मनपा के बच्चे इस उपक्रम से अनुशासन सिखेंगे,ज्ञान सिखेंगे’असे शिक्षण सभापतींनी वारकरी दिंडी यात्रेचे समर्थन केले.
एकीकडे मनपातर्फे १३ ऑगस्ट रोजी सामुहिक देशभक्ती गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,त्यात मनपासोबतच अनेक खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता,याची आठवण नड्डा यांनी करुन दिली.अश्या उपक्रमांतून मनपाचे विद्यार्थी हे देशभक्ती शिकतात,महाराष्ट्राची संस्कृती शिकतात.‘जो राम को रोक नही पाये वो वारी को क्या रोक पायेंगे’अश्या शब्दात त्यांनी ॲड.शैलेंद्र डोरले यांच्या प्रश्नांचा समाचार घेतला.
यावर विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर यांनी,आमचा रामाला किंवा संताना विरोध नाही,अशी पुश्ती जोडली तर ॲड,शैलेंद्र नड्डा यांनी मी देखील धर्मविराेधी नाही तर माझ्या नावातच श्रीराम जोडले असल्याचे सांगितले.मात्र,माझ्या प्रभागातील जयताळा,एकात्मता नगर शाळेत ११ वर्ग भरत असून फक्त दोन शिक्षक आहेत.२० जून पासून मी मनपा आयुक्तांना व शिक्षण अधिका-यांना या शाळेतील शिक्षकांची संख्या वाढवण्यासाठी पत्र दिले आहे मात्र,अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही.शिक्षणाच्या अधिकारांतर्गत प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे.मूळात आपण फक्त ‘शनिवारी आनंदी राहायचे का?सोमवार ते शुक्रवार मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकां अभावी दु:खी राहायचे का?’असा खोचक सवाल त्यांनी केला.शिक्षक द्या नाही तर मी या अांनददायी शनिवार उपक्रमाचा विरोध करेल,असा इशारा देखील त्यांनी दिला.
प्रभाग ३८(अ)मधील शाळेंतील शिक्षकांचा कोटा पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.हा मुद्दा धर्माचा नसून शिक्षणाचा असल्याचे त्यांनी सांगितले.माझा आनंददायी शनिवार या उपक्रमाला विरोध नाही मात्र,एकात्मता नगर,जयताळा ही फक्त उदाहरणे आहेत,अनेक मनपा शाळेत शिक्षकच नसल्याचे ते म्हणाले.यावर एका नगरसेवकाने उत्तर नागपूरमधील बेझनबाग शाळेत देखील शिक्षक नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
यावर महापौरांनी ’माझं पत्र’हा विषय नसून विद्यार्थ्यांची सामाजिक,सांस्कृतिक प्रगती व्हावी हा उद्देश्य असल्याचे सांगितले तर महापौरांच्या सूचनेनंतर मनपा आयुक्त डॉ.विपीन इटनकर यांनी मनपा शाळेत शिक्षकांची भर्ती होत आहे,शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे बिंदूनामावलीत ४० शिक्षक देणार आहोत तोपर्यंत तातडीची आवश्यकता म्हणून तात्पुरती शिक्षक भर्ती देखील करता येईल असे सांगितले.
यावर डोरले यांनी या प्रक्रियेत तर संपूर्ण शैक्षणिक वर्षच संपून जाईल,असा टोला हाणला.यावर मनपा आयुक्तांनी कोअर मॅनेजमेंटला अधिकार दिले असून त्यांनी शिक्षकांची भर्ती करुन घ्यावी,असे उत्तर दिले.
माझ्या प्रभागातील शाळेची टाकी देखील फूटली असल्याकडे प्रशासनाचे लक्ष डोरले यांनी वेधले.महापौरांनी टाकीच्या दुरुस्तीसह शिक्षकांच्या भर्तीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची सूचना केली.
थोडक्यात,शिक्षणासारखा मूलभूत प्रश्न मनपा सभागृहात, धर्माच्या अंगाने सत्ताधारी पक्षाकडून कसा नेला जातो,याची प्रचिती आज उपस्थितांना आली.
……………………………………