Advertisements

नागपूर,ता.२० ऑगस्ट २०२६: महानगरपालिकेच्या आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत आज ‘न भूतो ना भविष्यती’असा प्रचंड गदारोळ ‘भाषे‘मुळे सत्ताधारी भाजप व विरोधकांमध्ये झाला.हा वाद मराठी किंवा हिंदी भाषेत विषय मांडण्यावर उद् भवला होता,महापौर नीता ठाकरे यांनी वारंवार सभागृहाला शांत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र,सत्ता पक्ष व विराेधक आमने-सामने ठाकल्याने महापौरांनी चिडून सभा दहा मिनिटांसाठी स्थगित केली व त्या आपल्या कक्षात निघून गेल्या.
नगरसेवक ॲड.शैलेंद्र डोरले यांनी १८ जुलै २०२६ रोजी मनपाच्या शिक्षण विभागाकडून आयोजित केलेल्या ’आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत मनपा विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी उपक्रम कोणत्या नियम किंवा आदेशानुसार राबविण्यात आला,हा प्रश्न सभेत उपस्थित केला होता.याला प्रशासनाकडून उत्तर देत असतानाच ,शिक्षण समिती सभापती संतोषी नड्डा यांनी ‘राईट फॉर इन्फॉरमेशन’चा आधार घेत स्वत: यावरर प्रदीर्घ उत्तर दिले.त्यांनी संपूर्ण दहा ते पंधरा मिनिटांचे स्पष्टीकरण हिंदीमध्ये मांडले.
यावर आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र केतन ठाकरे जे मनपात काँग्रेसचे स्वीकृत सदस्य आहेत,त्यांनी शिक्षण समिती सभापतींनी मराठीत त्या उपक्रमाचा खुलासा करायला हवा होता,नेमके कोणत्या भाषेत सभागृहाचे कामकाज चालेल,या नियमा विषयी विचारणा केली.निदान महाराष्ट्र राज्याच्या उपराजधनीतील मनपा सभागृहाचे कामकाज मराठीत चालले पाहिजे,अशी अपेक्षा केतन यांनी व्यक्त केली.मात्र,महापौरांनी केतन ठाकरेंच्या सूचनेकडे दूर्लक्ष करीत पुढील प्रश्न पुकारला.
मात्र,विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकार यांनी हा मुद्दा रेटून धरत,या विषयी काही नियम आहेत का?प्रशासनाने याचा खुलासा करण्याची मागणी केली.ज्या सभासदांना मराठी येत नसेल त्यांना दुस-या भाषेत बोलता येईल का?सभेच्या कामकाजाची नियमावली काय सांगते?अशी विचारणा केली.यावर भाजप नगरसेविका व समिती सभापती अश्विनी जिचकार यांनी हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्याची पुश्ती जोडली.भाजपचे ज्येष्ठ नेते बंटी कुकडे यांनी देखील हिंदी आपली राष्ट्रभाषा असून मराठी आपली मातृभाषा आहे,असे सांगत आपण दोन्ही भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.मात्र,इंग्रजी भाषा सभागृहात नको,असे ठामपणे सांगितले.
यानंतर महापौरांच्या सूचनेनुसार मनपा आयुक्त डॉ.विपीन इटनकर यांनी नियम १(ई)अनव्ये सभागृहाचे सर्व कामकाज मराठीत चालले पाहिजे असे सांगितले.मात्र,पीठासीन अधिका-यांची खात्री पटल्यास ते इंग्रजी,हिंदीमध्येही सभासदाला बोलण्याची मुभा देऊ शकतात,असा नियम सांगितला.
यानंतर काँग्रेसचे नगरसेवक वसीम खान यांनी केंद्र शासन पृरस्कृत राष्ट्रीय वनश्री योजनेविषयी प्रश्न विचारला.तत्पूर्वी त्यांनी, त्यांना त्यांचा विषय हिंदीमध्ये मांडण्याची परवानगी द्यावी,अशी विनंती त्यांनी महापौरांना केली.
हाच धागा पकडत सत्ता पक्षाच्या नगरसेवकांनी प्रचंड गदारोळ केला व सभागृहात मराठी-हिंदीचा चांगलाच वाद पेटला.दोन्ही पक्ष एकमेकांसमोर ठाकले.जवळपास अर्धा तास त्यांचा गदारोळ चालला.कोणीही आपापल्या आसनावर बसण्यास तयार नव्हते.एकमेकांवर दोषारोपण सुरु होते.कोण,काय बाेलतोय,काय आरोप करतोय,काहीही ऐकू येत नव्हते.मात्र,संपूर्ण सभागृहात एकमेकांवर आरोप करणा-यांचा आवाज हा चढा होता.
महापौरांनी अनेकदा सभागृहाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र,विरोधकच नव्हे तर चक्क सत्ता पक्षातील पदाधिकारी व नगरसेवकांनीही महापौरांची सूचना पाळली नाही.हा गदारोळ शांत होत नसल्याचे बघून महापौर ताडकन आपल्या आसनावरुन उठल्या व दहा मिनिटांसाठी सभा तहकुब करीत असल्याचे सांगत आपल्या कक्षात निघून गेल्या.
महापौरांनी सभा स्थगिती केली की त्या तशाच चिडून निघून गेल्या याचाही आवाज कोणापर्यंत पाेहचलाच नाही.हे विशेष.
बराच काळानंतर सत्ता पक्षातील वरिष्ठ नेते यांनी आपल्या बाजूकडील नगरसेवकांना विशेषत:नगरसेविकांना शांत केले.यानंतर त्यांनी विरोधकांशीही हस्तांदोलन करीत तनाव निवळण्यास हातभार लावला.
यानंतर विरोधकांनी खास पाणी वाटप करणा-यांकडून पाणी मागवून आपला ओरडून-ओरडून आपला बसलेला गळा तृप्त केला.
थोडक्यात,राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी सध्या राज्यातील ऑटो चालकांना मराठी भाषा सक्तीची केल्याच्या पार्श्वभूमीवर, मनपा सभेतही विषय जरी दूसरा असला तरी मराठी-हिंदी भाषेचे चांगलेच पडसाद उमटले.
……………………………