
नागपूर,ता.५ ऑगस्ट २०२६: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बीडच्या पत्रकार परिषद घटनेनंतर काढलेले ‘गुंगी गुडीया’उद् गार आता त्यांच्याच अंगलगट आले असून, संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व कार्यकर्ते यांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.नागपूरात व्हेरायटी चौकात आज बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आलेल्या नारे निदर्शनात पक्षाचे प्रवक्ते व सरचिटणीस प्रशांत पवार यांनी सपकाळाचे तोंड काळे करणा-याला एक लाख रुपये बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले आहे.
नागपूरमध्ये संतप्त आंदोलकांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला चपलांनी बडवले असून त्यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला.प्रशांत पवार यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हर्षवर्धन सपकाळ यांचे तोंड काळे करणा-याला एक लाख रुपये तर त्यांचे कपडे फाडणा-याला ५० हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली.या घोषणेमुळे राजकीय वर्तुळातील वादात आणखी भर पडली.
खास ‘सत्ताधीश’सोबत बाेलताना प्रशांत पवार म्हणाले की,बीडमधील पत्रकार परिषदेत जे घडले त्यावर सपकाळ हे संयत प्रतिक्रिया व्यक्त करु शकले असते.किंबहूना ते ज्या जबाबदार पदावर आहेत त्यामुळे त्यांच्याकडून त्यांच्या पक्षाला व महाराष्ट्राच्या जनतेला संयतपणाचीच अपेक्षा आहे मात्र,इतके मोठे पद मिळताच त्यांचे ताळतंत्र सुटले असून,राज्याच्या महिला उपमुख्यमंत्र्यांसाठी त्यांनी शेलकी शेरेबाजी केली,जी कदापि सहनीय नाही.
अजित दादा पवार यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार या राज्याची धुरा सांभाळण्यासाठी व पक्षाला संजीवनी देण्यासाठी आपले वैयक्तिक दु:ख बाजूला सारुन राजकारणात आल्या.त्या मूर्तीमंत सहनशील असल्याने सपकाळ यांनी सुनेत्रा पवारांनी ‘दूर्गा‘चे रुप दाखवावे इत्यादी सारखी वल्गना करणे म्हणजे सपकाळांच्याच अयोग्यतेचा कळस आहे.
सपकाळ हे माझे जीवलग मित्र अाहेत मात्र,राजकारण असो कि सामन्य जीवन, महिलांचा अवमान करणा-याला क्षमा नसते.सपकाळ यांना बीड पत्रकार परिषदेतील मुद्दा पटला नसल्यास योग्य शब्दात ते आपला मुद्दा महाराष्ट्राच्या जनते समोर मांडू शकले असते मात्र,उथळ विधान करुन सवंग लोकप्रियता मिळविण्याचा नादात त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणा-या नेत्रीचा अवमान केला,आता तर लोक ‘नाना पटोले’प्रदेशाध्यक्ष म्हणून बरे होते असे म्हणू लागले आहेत.
बोलघेवडे सपकाळ हे काँग्रेस पक्षात जबाबदार पदाची धुरा सांभाळण्यासाठी सर्वात वाईट चॉईस आहेत,हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.त्यामुळेच सपकाळ यांना निदान नागपूरात तरी उजळ माथ्याने फिरु देणार नसल्याचा निश्चय आम्ही केला आहे.त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव व्हावी यासाठीच मी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे,असे प्रशांत पवार म्हणाले.
थोडक्यात,ज्या काँग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आणि स्वतंत्र मिळून तब्बल ४० वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केले तेच एकमेकांचे विरोधक झाल्याचे आढळून येतात.महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळचे मित्र पक्ष असणारे हे दोन्ही पक्ष, पुढील काळात काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
…………………………………………