Advertisements

मनपाचे दावे फोल:सहा तासांच्या पावसाने शहराला धो-धो धूतले
अवघ्या काही तासात १८० मिमी पावसाची नोंद
प्रतापनगर परिसरातील सोमलवार शाळेचे मैदान झाले तलाव:बचाव दलाने विद्यार्थ्यांना काढले
सुरक्षीतरित्या बाहेर:पालकांचा जीव भांड्यात
हवामान खात्याचा पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपूर शहर,ग्रामीण,हिंगणा व कामठीतील शाळांना उद्या सुटी जाहीर
नागपूर,ता.२८ जुलै २०२६: तब्बल दोन महिन्यांपासून हुलकावणी देणा-या पावसाने नागपूरात आज मुसळधारपणे दस्तक दिल्याने,सखल भागात पाणी साचले.आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान कोसळलेल्या पावसाने नागपूर पुन्हा एकदा जलमय झाले.अवघ्या काही तासात १८० मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली.प्रताप नगर परिसरातील साेमलवार शाळेच्या मैदानाला तलावाचे स्वरुप आले.शाळा व परिसरात पाणी साचल्याने अडकलेल्या विद्यार्थ्यांना रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सुरक्षीत बाहेर काढण्यात आले.

मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे टीप टॉप कॉन्वहेंट मधील विद्यार्थ्यांना देखील आज सुरक्षीत रेस्क्यू करण्यात आले.सूर्योदय नगर नरसाळा येथून प्रमोद गुप्ता वय ३६,श्रीमती रमावती गुप्ता वय ५०,जानकी गुप्ता वय ३२ तसेच दर्पण गुप्ता वय वर्ष ८ यांना सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आले.याच हुडकेश्वर-नरसाळा परिसराची पाहणी २१ जून रोजी महापौर नीता ठाकरे यांच्याकडून करण्यात आली होती.हूडकेश्वर-नरसाळा एसटीपी प्लांट परिसरातील नाल्यावरील पुलावरुन पावसाचे पाणी वाहून सरळ नागरिकांच्या घरामध्ये शिरत असल्याने त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना देखील केली होती,हे विशेष!त्या आश्वसनांची व प्रशासकीय व राजकीय उपाययोजनांची पोलपट्टीच आजच्या पावसाने खोलली.
पलोटी शाळेजवळील पुलावरुन पाणी वाहत असल्याने पुलातील कचरा काढण्याचे काम अगदी ‘वेळेवर’मनपातर्फे करण्यात आले!
चौकशी करुन कारवाई करु!मनपा आयुक्तांचे ‘सरकारीछाप’विधान
सोमलवार शाळेच्या दोन्ही बाजूने नाला असून अवघ्या दोन तासात ११०.८ मिमीपेक्षा अधिक पाऊस कोळलल्याने अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे मनपा आयुक्त यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना सुरक्षीत बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे.दुसरी बाब म्हणजे याच भागात जागतिक बँक अनुदानातून जे काम सुरु आहे,त्या कामांच्या विलंबाची देखील आम्ही चौकशी करुन निश्चित कारवाई करु,असे ‘सरकारीछाप‘विधान मनपा आयुक्त डॉ.विपीन इटनकर यांनी माध्यमांशी बोलताना केले.२३ सप्टेंबर २०२३ रोजी देखील कमी वेळात जास्त पावसाचे परिणाम नागपूरकरांनी भोगले असल्याची पुश्तीही त्यांनी जोडली.आम्ही सगळे व आमची मनपाची चमू नागरिकांच्या सुरक्षेसाठी ऑन फिल्ड असून, नागरिकांनी देखील जबाबदारी स्वीकारुन उद्या ऑरेंज अलर्ट असल्याने अावश्यक नसल्यास घरा बाहेर न निघण्याचे आवाहन डॉ.इटनकर यांनी केले.विमानतळ चौकात देखील पाणी साचले असून सर्व ठिकाणी पंपिंग सुरु आहे.दोन तासात साचलेले पाणी निघून जाईल,प्रशासन तत्परतेने काम करीत असल्याचे ते म्हणाले.
नरेंद्र नगर,मनीष नगरचे भुयारी मार्ग पुन्हा बेपत्ता-
नरेंद्र नगरचा भुयारी मार्ग हा नरेंद्र नगर आणि मनीष नगरला जोडणारा महत्वाचा भुयारी मार्ग आहे.मात्र,गेल्या अनेक दशकांपासून या भुयारी मार्गाखाली दर पावसाळ्यात पाणी साचण्याच्या ‘जीवघेण्या’ समस्येला येथील वाहनधारक सामोरे जात असतात.नुकतेच मनपातील भाजप सत्ताधारी व मनपा प्रशासनाकडून यंदा ही समस्या सोडविण्यासाठी विशेष पंप-संच आणि पाण्याचा निचरा करणारी आधुनिक यंत्रणा बसवली असल्याचा दावा करीत,सर्वत्र वृत्त प्रसिद्ध केले.
मात्र,आज दुपारी कोसळलेल्या पावसाने मनपा सत्ताधारी व मनपा प्रशासनाचा हा दावा‘नेहमीसारखाच’किती फोल होता,हे सिद्ध केले.मुसळधार पावसात पाण्याचा निचरा करण्यासाठी हाय-कॅपॅसिटी पाईपलाईन आणि स्वयंचलित पंप बसवले असतानासुध्धा, संपूर्ण कार नरेंद्र नगर भुयारी मार्गातील पाण्यात बुडाल्याचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला.या शिवाय एका नागरिकाची दुचाकीच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.जीव वाचला मात्र,महत्वाची कागदपत्रे हरवल्याची निराशा त्यांनी माध्यमांकडे बोलून दाखवली.
पावसाने मनीष नगर भुयारी मार्गाची देखील चांगलीच पोलखोल केली.मनीष नगर भुयारी मार्ग देखील संपूर्णपणे पाण्यात गेल्याने नागरिकांनी याचे मजेदार मीम्स बनवून व्हायरल केले.
नागपूरकरांनी कोणतीही मागणी न करता,शहरातील नेते व विविध विभागातील प्रशासनाने आता टेकडी गणपती( मानस चौक) ते नागपूर विद्यापीठापर्यंत महामेट्रोकडून बनविण्यात येणा-या भुयारी मार्गावरही मीम्स बनवून व्हायरल केले.नागपूरातील विविध भुयारी मार्ग दर पावसाळ्यात नागरिकांसाठी जलसमाधीचे स्त्रोत बनले असताना,अशास्त्रीयरित्या तसेच नेत्यांच्या व कंत्राटदारांच्या मनमर्जीप्रमाणे सदोष भुयारी मार्गांची निर्मिती म्हणजे केवळ नागरिकांच्या पैशांचा चुराडा नव्हे तर नागपूरकर नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचा संताप देखील आज समाज माध्यमांमध्ये चांगलाच उमटला.
अर्धवट सिमेंट रस्त्यांची भर-
संपूर्ण शहरात ठिकठिकाणी अर्धवट सिमेंट रस्ते तसेच अमृत योजनेतंर्गत चांगले सिमेंट रस्ते पुन्हा खोदून पाईप लाईन टाकण्याची कामे सुरु असल्याने संपूर्ण शहरच खोदून ठेवण्यात आले आहे.प्रशासनाच्या या उद्दाम कार्यभारामुळे नागपूर शहर हे ‘अपघाती शहर’म्हणून जगाच्या नकाशात प्रसिद्ध पावले आहे.किमान भर पावसाळ्यात तरी रस्त्यांचे खोदकाम बंद ठेवावे,इतके ही भान शासन,प्रशासन व कंत्राटदारांना नसल्याने,जलमय नागपूर शहरातील नागरिकांचा जीव आज किती धोक्यात आला आहे,याची प्रचिती नागपूरकरांनी अनुभवली.
हवामान खात्याचा इशारा-
हवामान खात्याने २८ व २९ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करीत ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता.अंदाजानुसार आज मंगळवार दिनांक २८ रोजी तो बरसलाच.सायंकाळी ५.३० पासून जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी शहरावर जो कहर बरपवायचा होता तो बरपवलाच.महत्वाचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षीण-पश्चिम भागातील वस्त्यांना पावसाने ‘विशेष’फटका दिला,जणू पावसाला मुख्यमंत्र्यांनाच काही संदेश द्यायचा होता!येथील शेकडो वस्त्या,रस्ते,भुयारी मार्ग,शाळा जलमय झाल्या.सुरेंद्रनगर,तात्या टोपे नगर,खामला,जयताळा,नरेंद्र नगर,मनीष नगर ते बेसा,बेलतरोडी,पिपळापर्यंत वस्त्या या पाण्याखाली होत्या.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार ओरिसा व पश्चिम बंगालकडे गंगेच्या खो-यात तयार झालेली प्रणाली, झारखंड ते छत्तीसगडपर्यंत प्रवाही झाल्याने विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे.अंदाजानुसार पुढचे दोन दिवस,२९ व ३० जुलैपर्यंत नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.वेधशाळेने येत्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिला असून नागरिक व प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
२९ जुलै रोजी शाळांना सुटी-
हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज व ऑरेंज अलर्ट लक्षात घेता जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेच्या दृष्टिने मनपा हद्दीतील सर्व शाळा-महाविद्यालयांना बुधवारी २९ जुलै रोजी सुटी जाहीर केली आहे.
सीओसी द्वारे परिस्थितीवर नजर–
मनपाच्या मुख्यालयात असलेल्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी) २४ तास कार्यान्वित आहे. येथून शहरातील सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. तसेच बचाव पथकाला निर्देश दिले जात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते यांनी दिली. पाण्याची पातळी वाढल्यास किंवा आकस्मिक स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षातील 88560-23322 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले आहे. नागपूर मनपाने प्रत्येक झोन कार्यालयामध्ये सुद्धा आकस्मिक सेवा देण्याची व्यवस्था केलेली आहे.
प्रत्येक झोनमधील मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष – 70309-72200
पोलीस नियंत्रण कक्ष – 0712-2561222
महावितरण – 1912
प्रमुख क्रमांक :
घनकचरा व्यवस्थापन विभाग : उपायुक्त श्री. राजेश भगत : 8275036200
मुख्य अग्निशमन अधिकारी : श्री. तुषार बाराहाते : 9594942171
मुख्य स्वच्छता अधिकारी : डॉ. गजेंद्र महल्ले: 7264822212
उद्यान विभाग : वृक्ष संवर्धक : अमोल चौरपगार : 9823391762
सहाय्यक आयुक्तांचे नाव व मोबाईल क्रमांक :
लक्ष्मीनगर झोन क्र.१ : श्री. धनंजय जाधव : 9823388333
धरमपेठ झोन क्र. २ : श्री. राजकुमार मेश्राम : 9923009462
हनुमान नगर झोन क्र. ३: नरेंद्र बावनकर : 9325543941
धंतोली झोन क्र. ४ : प्रमोद वानखेडे : 9850796978
नेहरु नगर झोन क्र. ५ : विकास रायबोले : 9850379410
गांधी महाल झोन क्र.६ : घनश्याम पंधरे : 8600363750
सतरंजीपुरा झोन क्र. ७ : हरीश राऊत : 9765559842
लकडगंज झोन क्र. ८ : विजय थुल : 9923797753
आशी नगर झोन क्र. ९ : गणेश राठोड : 9823128275
मंगळवारी झोन क्र. १० : अशोक गराटे : 9422301743
………………………………………
(बातमीशी संबधित सर्व व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनल वर उपलब्ध)