Advertisements

आमदार प्रवीण दटके यांनी मीटर धारक ग्राहकांना केले आवाहन
मनपा आयुक्तांना दिले निवेदन
नागपूर,ता.२ डिसेंबर २०२५: नागपूर शहरातील नागरिकांना ऑरेंज सिटी वॉटर्स (O.C.W) मार्फत येणारी पाण्याची बिले मनमानेल त्या प्रमाणे पाठवली जात असून, सर्वसामान्य नागरिकांवर याचा मोठा आर्थिक भार पडत आहे. करारानुसार या कंपनीने दर महिन्याला पाण्याची देयके ग्राहकांना पाठवणे गरजेचे असताना गेल्या १३ वर्षांपासून पाणी वापर ग्राहकांना तीन-तीन महिन्यांनंतर देयके पाठविली जात राहीली.आता अचानक या कंपनीला उपरती झाली व ग्राहकांना दर महिन्याची देयके ते पाठवित आहे मात्र,एका महिन्यातच ते तीन महिन्यांएवढी देयके आता ग्राहकांना पाठवित आहे.ही या कंपनीची बदमाशी असून नागरिकांनी त्यांची देयके सुधारल्याशिवाय पाणी बिलच भरु नये,असे आवाहन मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केली.या संबंधी त्यांनी आज मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांना निवेदन सादर केले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,की नागपूरात अवैध नळ जोडणी व पाण्याचा अवैध वापर शोधून काढून ज्याला एनआरडब्ल्यू म्हणतात तो कमी करण्यासाठी ओसीडब्ल्यूसोबत मनपाचा करार झाला होता.नुकताच तो एनआरडब्ल्यू कमी झाला आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन फसवे आकडे सादर केले मात्र,त्याचा संपूर्ण भुर्दंड ओसीडबल्यू आता ग्राहकांकडून वसूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.त्यामुळे सर्व मीटर धारकांनी पाण्याची देयकेच भरु नये,असे आवाहन त्यांनी केले.
आयुक्तांनी देखील हे मान्य केले की या कंपनीने पाच पट देयके चुकीच्या पद्धतीने वाढवले आहे.जी चुकीची देयके ग्राहकांना पाठविण्यात आली ती मागे घेण्यात येईल,जिथे मीटर चोरीला गेले त्या ग्राहकांना देखील मीटर न लावताच सरसकट देयके पाठविली गेली आहेत.मीटर हे घरा बाहेर बसविण्यात आली असून यात सर्वसामान्य नागरिकांची काहीही चूक नाही मात्र,घरा बाहेर असल्याने अनेकांचे मीटर चोरीला गेले,त्यांची ही देयके पाच-पाच,दहा-दहा पट आली आहेत.मनपा आयुक्तांनी हे मान्य केले असून ही देयके परत घेण्यात येईल असे आश्वासन दिले असले तरी,आयुक्तांचा त्यांच्या प्रशासनावर कितपत नियंत्रण आहे,प्रभाव आहे यात संशय असून, नागपूरकर ग्राहकांनीच आता चुकीची देयके भरु नये,असे आवाहन आमदार दटके यांनी केले.
ज्यांची पाण्याची देयके चुकीची आली आहे त्यांनी त्या-त्या झोनमधील संबंधित कंपनीच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवावी किवा मनपा मुख्यालयात कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी बसतात त्यांच्याकडे जावे मात्र,चुकीची देयके भरु नये,असे आवाहन नागपूर शहरातील सर्व मीटरधारक ग्राहकांना केली.यावेळी वाढीव बिलांबाबत तात्काळ दुरुस्ती करावी, तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करावी, या मागण्यांसाठी आज नागपूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात खालील प्रमुख मुद्दे मांडण्यात आले-
* पाणी अनियमित आणि वाढीव पाण्याचे बिले तात्काळ रद्द किंवा दुरुस्त करावीत.
* मीटर रीडिंग घेताना पारदर्शकता राखावी .
* ज्या भागात पाणीपुरवठा नियमित नाही, त्या भागांत बिल आकारणी बाबत पुनर्विचार करावा किंवा तक्रारींच्या नोंदी व निवारणासाठी वेगळा हेल्पडेस्क सुरू करावा.
या मागण्यांसह नागपूर महानगरपालिका आयुक्तांकडे नागरिकांचे प्रत्यक्ष प्रश्न आणि तक्रारी मांडण्यात आल्या असून , आयुक्तांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती आ.दटके यांनी दिली.
(बातमीशी संबधित व्हिडीयो Sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)
…………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
