
नागपूर,ता २४ नोव्हेंबर २०२५: गेल्या दोन दिवसांपासून मला अनेक फोनकॉल्स आले.तेलंगखेडी येथील सी पी ॲण्ड बेरार शाळेत आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांकडून दूसरी-तिसरीच्या विद्यार्थ्यांना बाथरुममध्ये नेऊन लैंगिक गैरवर्तनाची बातमी काही डिजिटल माध्यमांनी प्रसिद्ध केली त्यात प्रहार सैनिकी शिक्षण संस्थांचा त्यांनी उल्लेख केला मात्र,या शाळेसोबत प्रहार समाज जागृती संस्थेचा करार २०२२ मध्येच संपुष्टात आला होता,फक्त प्रहार संस्थेचे फलक अद्यापही त्या शाळेवर असल्याने पालकांचा व माध्यमकर्मींचा गैरसमज झाला,असा खुलासा प्रहार संस्थेच्या अध्यक्षा फ्लाईट लेफ्टनेंट (माजी)शिवाली देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.याप्रसंगी वरिष्ठ पत्रकार वर्षा बासू व कर्नल उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना शिवाली म्हणाल्या की,सीपी ॲण्ड बेरार संस्थेने प्रहार संस्थेचे नाव फलक तात्काळ बदलावे यासाठी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहोत.आम्ही अनेकवेळा वृत्तपत्रात या संस्थेसोबत प्रहारचा कोणताही संबध नसल्याची जाहीरात प्रसिद्ध केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रहार समाज जागृती संस्था ही समाजात सैनिकी मानसिकतेचा प्रसार करणारी व त्यादृष्टीने कार्यरत असलेली नागपुरातील एक प्रतिष्ठित संस्था आहे. तीस वर्षापूर्वी ही संस्था लेफ्ट. कर्नल सुनिल देशपांडे VSM यांनी सुरु केली होती. सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘प्रहार’ या चित्रपटाचे लष्करी सल्लागार त्यांचे वडील लेफ्ट. कर्नल सुनिल देशपांडे हे होते,असे त्यांनी सांगितले.
प्रहार समाज जागृति संस्था व सी.पी.एन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी यांनी मिळून रविनगर येथे प्रहार विद्यालय ही शाळा २००३ साली सुरु केली. पुढे प्रहार विद्यालय शाळेत सैनिकी शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात येऊन या शाळेचे नाव प्रहार मिलिटरी स्कूल असे करण्यात आले. या शाळेच्या संस्थापकांनीच या शाळेत शिक्षणासोबतच सैनिकी शिक्षण देखील विद्यार्थ्यांना दिले जावे,असे नमूद केले होते.परिणामी कर्नल देशपांडे यांनी याच शाळेसोबत करार केला. २०२२ पर्यंत या शाळेचे कार्य सुरु होते. पुढे सी.पी.एन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी व प्रहार समाज जागृति संस्था हे आपल्या एग्रीमेंट मधून परस्पर सामंजस्याने वेगळे झाले. त्यावेळी या शाळेला प्रहार समाज जागृती संस्थेने संमत्तीने दिलेले ‘प्रहार’ हे नाव बदलावे व दुसरे नाव द्यावे अशी विनंती सी.पी.एन्ड बेरार एज्युकेशन सोसायटीला केली. मात्र, या संस्थेने हे नाव बदलले नाही,असे शिवाली यांनी याप्रसंगी सांगितले.
या शाळेत अलीकडे झालेला एका अक्षम्य लैंगिक गैरप्रकारामुळे प्रहार समाज जागृती संस्थेला मनस्ताप भोगावा लागत आहे. पालकांच्या तक्रारीवर अंबाझरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.या पत्रकार परिषदेत आम्ही स्पष्ट सांगतो कि, प्रहार समाज जागृती संस्था, ही मूळ व एकमेव संस्था आहे ज्याचा सी.पी.एन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी व सी.पी.एन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूल यांसोबत काहीही संबंध नाही. या संस्थेने शाळेचे नाव तत्काळ बदलावे यासाठी आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहोत. माझी सर्व पालकांना व नागरिकांना विनंती आहे कि त्यांनी प्रहार समाज जागृति संस्थेची शाळा ‘प्रहार वासुदेवलीला मिलिटरी स्कूल’ ही उमरेड रोडवरील प्रहारगढ येथे आहे याची नोंद घ्यावी. या व्यतिरिक्त प्रहार संस्थेचे पांडे लेआऊट येथे ‘प्रहार वासुदेवलीला विद्याकुंज’ व ‘प्रहार डिफेंस अकॅडेमी’ हे उपक्रम सुद्धा आहेत,अशी माहिती त्यांनी दिली.
प्रहार समाज जागृति संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शमा देशपांडे असून संस्थेच्या सचिव फ्लाईट लेफ्ट. शिवाली देशपांडे या आहेत. प्रहार समाज जागृति संस्थेच्या अध्यक्षा व सचिव यांचा ‘प्रहार वासुदेवलीला मिलिटरी स्कूल’, ‘प्रहार वासुदेवलीला विद्याकुंज’ व ‘प्रहार डिफेंस अकॅडेमी’ या व्यतिरिक्त कुठल्याही शाळेची संबंध नाही याची नोंद घेण्याची विनंती त्यांनी माध्यमकर्मींना केली.
(या बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयोज Sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत)