निवडणूक आयोग ही देशातील स्वायत्त संस्था असून या आयोगावर श्रद्धा,आस्था,विश्वास हा असलाच पाहिजे असे माझे मत आहे मात्र,हे दूर्देव आहे गेल्या काही वर्षांपासून याच आयोगाविषयी समाजमनात एक ‘अस्वस्थता ’जाणवते आहे.अलीकडच्या काळात निवडणूक आयोगावरील विविध वृत्तपत्रांमधील अग्रलेख असतील किवा प्रचार माध्यमातील बातम्या व समाजात घडणा-या चर्चा असतील,त्या बघता एका सशक्त लोकतंत्र देशात आयोगावर असे आरोप होणे किवा अविश्वासाचे वातावरण निर्माण होणे हे लोकशाहीसाठीच घातक असल्याचे मत, त्यांनी निवडणूक आयोगावर विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केले.
‘सामना’तील अग्रलेखात निवडणूक आयोगावर प्रहार करीत लोकशाही वाचवण्यासाठी आता निवडणूकांवरच बहिष्कार घातला पाहिजे असे प्रसिद्ध झाले आहे.यावर त्यांना प्रश्न विचारला असता,लोकांच्या मनात निवडणूक आयोगाला घेऊन अविश्वास निर्माण झाला असून मतदारांमध्ये अस्वस्थता दिसून पडतेय,हे घातक असून ‘सामना’मध्ये एक भूमिका,एक विचार मांडण्यात आला आहे.लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे त्या म्हणाल्या.
राज्याचे महसूल मंत्री व नागपूर,अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे नगरपंचायत व नगरपरिषदेच्या गडचिरोली येथील निवडणूक प्रचारात, निवडणूकीतील खर्चाचा अजिबात विचार करु नका,निवडणूक आयोगाला आम्ही हिशेब देऊ असे म्हणाले,याकडे लक्ष वेधले असता,तुमच्या प्रश्नातच याचे उत्तर दडले असल्याचे त्या म्हणाल्या.मी नागपूरला आल्यानंतर सर्वाधिक प्रश्न मला निवडणूक आयोगावरच विचारले जात आहे आणि हेच ‘चिंताजनक’असल्याचे त्या म्हणाल्या.जर समाजाच्या सर्वच घटकांना इतका अविश्वास निवडणूक आयोगाविषयी वाटत असेल तर देशाच्या लोकशाहीसाठी हे किती घातक आहे हे सिद्ध होतं.सत्तेत कोणीही असू देत असे विधान लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयुक्तांच्या एका विधानाबाबत,हे अयोग्यच असून आम्ही जरी असे वक्तव्य केले असते तरी ते अयोग्यच असते,असे त्या म्हणाल्या.लोकशाही देशात लोकशाही जगावी,टिकावी असे जर वाटत असेल तर असे विधान दूर्देवी आहे.अश्या घटना किवा लोकशाहीमध्ये जो नवीन ‘ट्रेण्ड‘ आला आहे तो अतिशय दूर्देवी आणि अशाश्वत मॉडल आहे,अापल्या पूर्वीच्या पिढ्यांनी देशाची लोकशाही सुदृढ करण्यासाठी इतका मोठा आदर्श निर्माण केला, त्याला आता देशाच्या अमृत महोत्सवी काळातच तडा जात असल्याची भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे,ही भीती आता माध्यमकर्मींच्या विविध प्रश्नावरुनही स्पष्टपणे जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.
सलील देशमुख यांनी केलेला शरद पवार पक्षाचा त्याग यावर प्रश्न केला असता,‘कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना’अशी मिश्किली त्यांनी केली.अशा गोष्टी होत राहतात.अनेकदा तर ज्या गोष्टी घडतच नाही त्याची देखील चर्चा आमच्या कानावर येते.जी चर्चा आमच्या बाजूने असते ती आम्हाला आवडते,विरोधात असली तरी त्याची आम्हाला गंमत वाटते.जोपर्यंत आपल्यावर त्या चर्चेचा परिणाम होत नाही,त्या गॉसिप असू देत,चर्चा असू देत,आम्हाला फरक पडत नाही.गॉसिप्स होत राहतात मात्र,मी अतिशय जवाबदारीने सांगू इच्छिते ,काल मुंबईत सलील देशमुखसोबत एका कौटूंबिक सोहळ्यात भेट झाली.अनिल देशमुखांच्या घरात काय झाले हे विचारण्याचा आम्हाला अधिकाराच नाही कारण आम्ही लोकसेवेत अाहोत.अनिल बाबूंनी गेली पाच ते सहा दशकं महाराष्ट्राची सेवा केली आहे तसेच सलीलचे देखील खूप मोठे योगदान आहे.अनेक वर्ष युवक नेता म्हणून सलीलने खूप काम केलं आहे.नुकतीच त्यांनी विधान सभा लढली.लोकसेवा करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न त्याने केला आहे. त्यामुळे त्याच्या पक्ष त्याग या निर्णयात काही फार तथ्य आहे असे मला वाटत नाही.गॉसिप्स तर चालतात,उसका मजा भी सबने लेना चाहीये,असे सांगून खूबीने त्यांनी प्रश्न टाळला.भावनेपेक्षा लोकसेवा महत्वाची असून भावनिक होण्याचा आम्हाला अधिकारच नसल्याचे त्या म्हणाल्या.
सलीलवर झालेले त्याच्या कुटूंबाचे संस्कार आहेत त्यातून त्याच्या मनात एक गोष्ट मात्र नक्की आहे सर्वात आधी आपला देश,मग राज्य,मग पक्ष यानंतरच कुटूंब,त्यामुळे पक्ष त्याग वगैरे काहीही नसून लवकरच सलील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रचारात दिसेल,असा दावा त्यांनी केला.या मुद्दापेक्षा महाराष्ट्रा समोरील आव्हाने व देशाचा विकास हे म्हत्वाचे असून, महाराष्ट्रात तर दर तीन तासात एक आत्महत्या घडतेय,हा माझा अहवाल नसून महाराष्ट्र सरकारचे मंत्री मकरंद आबा पाटील यांचे शासकीय विधान आहे,याशिवाय महाराष्ट्राची जी आर्थिक प्रगती आहे ज्याला एफआरपीएम एक्ट म्हणतात(स्कील डेफिशियन्सी मॅनेजमेंट) त्याच्यामधील अंतर वाढलं आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे, हे माझे विधान नसून केंद्र व राज्य सरकारचा अहवाल सांगत असल्याचे त्या म्हणाल्या.
त्यामुळे अशी अनेक मोठी आव्हाने आज महाराष्ट्रा समोर असताना, अनिल देशमुख हे ज्येष्ठ आहेतच मात्र सलीलकडून राज्याला खूप अपेक्षा आहेत,त्यामुळे हे सगळं गॉसिप्स तुम्ही ही सोडून द्या आणि कामाला लागा,असा अनाहूत सल्ला याप्रसंगी सुप्रिया सुळे यांनी दिला.
जेव्हा राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट ‘झाले’असा प्रश्न करताच ‘झाले नाही केले’असे प्रतिउत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.सलील हे गंभीर आजारी होऊन रुग्णालयात भर्ती होते त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते,त्यामुळे सलील हे अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे,यात कितपत तथ्य असल्याचा प्रश्न केला असता,जायचा प्रश्नच येत नसल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.कौटूंबिक संबंध म्हणाल तर मी स्वत: अनेकदा छगन भुजबळ यांना बघण्यासाठी रुग्णालयात गेले आहे.भूजबळ आणि माझे संबंध फक्त रुग्णालयापुरती नसून काँग्रेस पक्षात होते त्या काळापासून आहे.जेव्हा आमच्या पक्षाचे ‘अयोग्यपणे’दोन तुकडे केल्या गेले,त्या वेळी ही आमचे कौटूंबिक संबंध तसेच राहीले.दूर्देवाने आम्हाला अजून सर्वोच्च न्यालयाकडून न्याय मिळाला नाही फक्त तारीख पे तारीख मिळतेय.महाराष्ट्राचं राजकारण तर या स्तरावर गेले की एकीकडे आम्ही राजकारणात लोकांच्या आयुष्यात चांगला बदल घडवून आणण्यासाठी आणि चांगली धोरणे आखण्यासाठी नव्हे, तर कोर्टाची पायरी चढण्यासाठी आमचा लोकसेवेचा वेळ खर्ची पडत आहे.जो वेळ लोकसेवेसाठी खर्ची पडायला हवा तो वेळ आम्ही कोर्टात न्यायासाठी घालवतोय,हे दूर्देव आहे आमचं,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भाजपच्या सत्तेसाठीच्या ‘इन्सटन्ट थेअरी’वर अलीकडे समाज माध्यमांवर प्रखर टिका होत असून १६ एप्रिल २०२२ रोजी पालघरमध्ये दोन साधूंची निघृण हत्या झाली होती. त्या घटनेतील मुख्य आरोपी काशीनाथ चौधरी यांनी शक्तीप्रदर्शनासह तीन हजार समर्थकांसोबत भाजपमध्ये प्रवेश घेतला,मात्र माध्यमात टिका झाल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अवघ्या चोवीस तासात चौधरी यांचा पक्ष प्रवेश रद्द केला,याशिवाय नाशिकमध्ये दाऊदच्या साथीदारासोबत जे सुधाकर बडगुजर नाचताना दिसतात, त्यांनाच भाजपने स्थानिक आमदाराचा विरोध डावलून पक्षात घेतले,‘सत्तेसाठी काहीही’भाजपच्या या धोरणाकडे तुम्ही कसे बघता?असा प्रश्न केला असता,माझे भाजपसोबत राजकीय मतभेद आहे,मनभेद नाही असे त्या म्हणाल्या.याचे कारण मी भाजपला अतिशय सुसंस्कृत पक्ष म्हणून अनेक वर्ष दिल्लीत पाहिले आहे.अटलजींपासून मी भाजपला पहात आले आहे.अडवाणी असतील किंवा ज्यांना मी गुरुस्थानी मानते त्या सुषमा स्वराज असतील,त्या अतिशय उत्तम संसदपटू म्हणून ख्यात आहेत.आपल्या भाषणात विरोधकांवर टिका करताना कुठली सीमा ओलांडायची नाही,याचे त्यांना उत्तम ज्ञान होते.ही गोष्ट आम्ही सुषमा स्वराज यांच्याकडून शिकलो.अरुण जेटली यांचे भाषण ऐकण्यासाठी आम्ही तर संसदेची गॅलरी गाठायचो.प्रकाश जावडेकर हे उत्तम प्रवक्ते होते.आज सत्ता जरी भाजपकडे असली तरी भाजपचा ‘सुसंस्कृत सुवर्ण काळ’ आज नष्ट पावला आहे,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.त्याकाळी भाजपमधील विरोधक आमच्यावर प्रखर टिका करीत होते तरी देखील आम्हाला त्यांनी बोलत राहावे,असे वाटत होते.आमच्या सरकारमध्ये नेमकी काय-काय कमतरता आहे हे ऐकू तर दे,अशी आमची वृत्ती होती.मर्यादा,सुसंस्कृतपणा हीच ख-या भाजपची ओळख होती.तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलं आहे असे सांगून,गंमत अशी आहे ज्यांच्यामुळे आम्हाला काँग्रेसमुक्त भारत असं करायचं झालं तर आज भाजपचेच दोन तृतीयांश काँग्रेसीकरण झाले असल्याचे त्या म्हणाल्या.
काशीनाथ भाऊंना माध्यमात गुन्हेगार समजत असले तरी मी त्यांना काल,आज आणि उद्या कधीही गुन्हेगार समजणार नाही,अशी पुश्ती त्यांनी जोडली.याचं कारण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पालघरमधील घटना घडली त्यावेळी याच काशीनाथ चौधरींवर याच भाजपने प्रचंड आरोपांची राळ उठवली होती.त्यांना अटक करा म्हणून केवढी मोठी आंदोलने केली.त्याच माणसाला भाजप प्रवेश देतो?नवाब मलिकांबद्दल ही भाजपचे हेच धोरण असून त्यांच्या सोयीप्रमाणे भाजपला नवाब भाई चालतात.नवाब भाईंवर मुंबईच्या स्थानिक निवडणूकांची जवाबदरी टाकल्याबरोबर भाजपला नवाब भाई चालत नाही,हे कुठले धोरण आहे?नवाब भाई सही करायला सरकारला चालतात,पण प्रचाराला चालत नाही!हा कुठला न्याय.नवाब भाईंवर आरोप भाजपने केले परंतू भाजपचा डेटा काढून बघा भाजपने ज्यांच्या-ज्यांच्यावर आरोप केले पुढे जाऊन त्यांनाच पक्षात घेतले.सोयीस्करपणे त्यांची ‘वॉशिंग मशीन’ चालते.त्यातही भाजप वर्गीकरण करतं.जेव्हा निवडणूका येतात त्यावेळी पुन्हा त्यांच्या धोरणात बदल होतात.हे दूर्देवी आहे की जरी विरोधक असले तरी लोशकाही टिकवायची असेल तर ‘दिलदार’विरोधक असायला हवा.जशी त्यांना बोलायची ताकद आहे तशी ऐकण्याची ताकद देखील त्यांची असायला हवी ना?यालाच तर लोकशाही म्हणतात.दूर्देव आहे दहा-अकरा वर्षांपूर्वी ज्यांच्या ज्यांच्यावर टिकेचे रान उठवून त्यांच्यापासून भाजप महाराष्ट्र मुक्त करणार होता,त्यांनाच सोबत घेऊन महाराष्ट्रातच नव्हे तर काश्मीर ते कन्याकुमारी सर्वदूर भाजप सत्तेत आहे.
येत्या हिवाळी अधिवेशनात माध्यमकर्मींनी गॅलरीतून आकलन करावे भाजपमधील कोण-कोण,कोणकोणत्या पक्षातून आले आहेत,असा अनाहूत सल्ला देखील त्यांनी याप्रसंगी दिला.दोन तृतीयांश भाजपवाले हे ओरिजनल काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातील दिसतील.या मागे देखील खूप कारणे आहेत.असे नाही की पक्ष बदलणा-यांच्या विचारधारेत बदल झाला आहे,असा टोला त्यांनी हाणला.
आमच्या पुण्यामध्ये एवढी गुन्हेगारी कधीच नव्हती.आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब होत अाहे.आजच्या डिजिटल युगात तर महाराष्ट्रातील बातमी ही काश्मीरपर्यंतच नव्हे तर जगभरात पोहोचते.नागपूरला मुख्यमंत्री काही बोलले तर क्षणार्धात ते संपूर्ण देशात कळतं.आज डिजिटल माध्यमांमुळे माहितीचे स्त्रोत पूर्णपणे बदलले असून पूर्वीचा काळ आता राहीला नाही.याच्यात महाराष्ट्राचं नुकसान आहे,डेटा हा कधीच खोटा बोलत नाही.किती ही सत्ताधा-यांनी दावे केले महाराष्ट्रात लाखो कोटींची गुंतवणूक होत आहे म्हणून,तरी महाराष्ट्राची आर्थिक,सामाजिक परिस्थिती,शेतक-यांची परिस्थिती विकट असल्याचे त्या म्हणाल्या.
रवि भवनची अर्धवट कामे,कंत्राटदारांची थकित बिले,या बातम्या माध्यमकर्मींनीच प्रसिद्ध केल्या आहेत,यातून राज्याच्या हलाकीच्या आर्थिक परिस्थितीचा पुरावा मिळतो.जलजीवन मिशन,हे देखील त्याचे उत्तम उदाहरण आहे.ही एक चांगली योजना होती.आम्ही चांगल्याला चांगले म्हणणारे विरोधक आहोत,असा टोला हाणून,प्रत्येक सरकार काही गोष्टी चांगल्या देखील करतात,अशी पुश्ती त्यांनी जोडली.सी.आर.पाटील जरी भाजपचे असले तरी जलजीवन उपक्रम हा त्यांचा चांगला उपक्रम होता.मात्र,महाराष्ट्रात या इतक्या चांगल्या उपक्रमाचा भ्रष्टाचारातून बोजवारा उडाला.या योजनेत ५० टक्के निधी केंद्राने दिला आहे त्यामुळे आम्ही हा मुद्दा संसदेत देखील उचलला.यावर सी.आर.पाटील यांनी महाराष्ट्रात ’हर घर जल’योजनेचा बोजवारा वाजल्याची कबुलीच त्यांनी दिली.याची जवाबदारी कोण घेणार?या योजनेतील भ्रष्टाचाराचे ऑडिट केलं का?असा सवाल त्यांनी केला.या सरकारला फक्त ‘इन्फ्रास्ट्रक्चार’ प्रकल्पांमध्येच रस असल्याची टिका त्यांनी केली.शिक्षण,आरोग्य,वाढती गुन्हेगारी,गुंतवणूक कोण घेणार या सगळ्यांची जवाबदारी?शेतकरीच नव्हे तर राज्यातील शिक्षक हा देखील आत्महत्या करतोय.जलजिवन मिशनमध्ये काम करणा-या कंत्राटदारांचे पैसे मिळत नाही आहेत,याचे आत्मचिंतन सरकार करणार आहे की नाही?असा सवाल त्यांनी केला.का नाही अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वेळेवर मिळत आहेत?दहा वर्षांपूर्वीच भाजपचं सरकार राज्यात सगळीकडे शौचालय बांधणार होती,किती झाली?ऐकायला खूप बरं वाटतं मात्र,जमीनीस्तरावरील हकीकत खूप वेगळी असते,असे मत त्यांनी व्यक्त केले.
शरद पवार गट हा फक्त साडे तीन जिल्ह्यांपुरते मर्यादित पक्ष असल्याची टिका विरोधक करतात याकडे लक्ष वेधून, विदर्भातील महत्वाचे दहा प्रश्न यात वाघांची शिकार,वन्यजीव-मानव संघर्ष,संत्री,कापूस इत्यादी महत्वाचे प्रश्न शरद पवार गटाचे नेते उचलताना दिसत नाही,असा सवाल केला असता,वर्धाचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे हे संसदेत विदर्भातील प्रश्ने सातत्याने मांडत असल्याचे सुळे यांनी सांगितले.संसदेत पक्ष वेगळा असला तरी महाराष्ट्रातील खासदार हे महाराष्ट्राच्या प्रश्नांवर अनेकदा एकजूट होतात,असे त्या म्हणाल्या.विदर्भाचे ते कोणते महत्वाची दहा प्रश्ने आहे हे मला कळवा,ते देखील संसदेच्या डिसेंबर तसेच अर्थसंकल्प अधिवेशनात मांडण्याचा मी प्रयत्न करते,किमान त्या -त्या मंत्रालयातून त्याचा फोलोॲप घेते,असे आश्वासन याप्रसंगी सुळे यांनी दिले.
राहीला प्रश्न आमचा पक्ष किती मोठा किंवा लहान आहे तर ताकद ही येत जाते आणि जात जाते.गंमत अशी आहे की,आमच्या पक्षाविषयी पत्रकारांना प्रश्न विचारण्याची ईच्छा होते याचा अर्थच साडे तीन असलो तरीआमचे नाणे खणखणीत असून मार्केटमध्ये चालत आहे,हे सिद्ध होतं.असे उत्तर त्यांनी दिले.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणूक प्रचारात दिलेली धमकी या विषयी छेडले असता,हे संविधानाच्या विरोधात असल्याचे त्या म्हणाल्या.शाळेचा मुख्याध्यापक यांनी याचे उत्तर द्यावे कारण ते त्यांचे सहकारी आहेत,या शब्दात सुळे यांनी फडणवीसांना टोला हाणला.मुश्रीफ यांचे विधान हे लोकशाहीच्या विरोधात असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्याही विरोधात आहे.त्यामुळे यांना संविधान मान्य नाही का?म्हणून अशा धमक्या देत आहेत का?याचे उत्तर त्यांनी द्यावे.
एका प्रश्नाच्या उत्तरात ,आमच्या पक्षाने कधीही ’बॅक रुम मॅनेजमेंट’ केली नसल्याचा टोला त्यांनी हाणला.आम्ही साधेपणाने निवडणूका लढणारा पक्ष आहोत.यश आणि अपयश आम्ही दोन्ही बघितलं आहे.सत्तेत असताना देखील आम्ही असली विधाने केली नाहीत.आम्ही साधेपणाने लोकांची सेवा करायचो.आम्ही सरळपणे निवडणूका लढणारी माणसे आहोत.त्यामुळे त्यांची बॅक रुम मॅनेजमेंट आणि त्या मागील ’अदृष्य शक्तीची जी यंत्रणा’आहे ती आमच्याकडे कधी नव्हती आणि हीच अदृष्य शक्ती लोकशाही नष्ट करते.असे त्या म्हणाल्या.
सत्ताधारी विरोधकांना नामांकन अर्ज भरु नये यासाठी धमक्या देत असल्याच्या घटना,याकडे लक्ष वेधले असता, आमचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनाच हा अनुभव आला असल्याचे सुळे यांनी सांगितले.हे लोकशाहीसाठी घातक आहे.इतके लोक बिनविरोध आणि सत्ताधारी शंभरी पार करीत आहेत.मग ही लोकशाही यांना संपवून टाकायची आहे का?हा प्रश्न निर्माण होतो.निवडणूकाच यांना संपवून टाकायच्या आहेत का?बिनविरोधचा सत्ताधा-यांना इतका आनंद होतो तरी कसा?तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला ५१ टक्के मिळणारच आहे,तुमचा पेपर आधीच फूटलेला आहे मग बिनविरोध कशाला पाहिजे?कॉपी करके पास होने मे क्या मजा है?असा उपरोधिक टोला त्यांनी हाणला.
विदर्भाचा अनुशेष,याविषयी विचारले असता,मला काही आश्चर्यच वाटत नाही असे त्या म्हणाल्या.राज्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी मी सातत्याने वेगवेगळ्या व्यासपीठावर बोलत आहे.उदाहरण द्यायचे असेल तर पोहरा देवीच्या विकासाचे आश्वासन देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी तिथे भाषणात दिले.पोहरा देवी धार्मिकस्थळाच्या विकासाठी साढे तीनशे कोटींची घोषणा त्यांनी केली.त्यासाठी दीडशे कोटींचा पहिला हप्ताही महाराष्ट्र सराकर देणार होते मात्र,आजतागत एक छदामही पोहरा देवीच्या धार्मिक संस्थेला मिळाला नाही.रवि भवनाच्या कामासारखेच कंत्राटदारांनी तिथे ही काम बंद केले आहे.पंतप्रधानांचा शब्दही महाराष्ट्राचे सरकार पाळत नसेल तर काय म्हणावे?मी दिल्लीला गेल्यानंतर पंतप्रधानांना या विषयीचे पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाच्या पत्नीने आत्महत्या केली मात्र,ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला जात आहे,याकडे लक्ष वेधले असता, याबद्दल मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच योग्य उत्तर देऊ शकतील असे त्या म्हणाल्या.या घटनेची चौकशी झाली पाहिजे,त्या चौकशीतून सत्य बाहेर आले पाहिजे,अशी पुश्ती त्यांनी जोडली.
मनसेला आघाडीत स्थान मिळणार का?या प्रश्नावर बोलताना,बिहारमध्ये भाजपने मत विभाजन होऊ नये यासाठी अनेक पक्षांसोबत आघाडी केल्याचे त्या म्हणाल्या.पुढे काय प्रस्ताव येतील हे आठ-दहा दिवसात स्पष्ट होईल.काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केले ,की येत्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात ओबीसीच्या प्रश्नावर निकाल न आल्यास जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणूका पुढे जाण्याची शक्यता आहे,याचा अर्थ सत्ताधारीच निवडणूका वेळेवर होतील याविषयी शाश्वत नाहीत,अजून स्पष्टताच येत नाही आहे तर मनसे व आघाडीविषयी बोलणे वेळेपूर्वीचे होईल असे त्या म्हणाल्या.
‘घराणेशाही’विषयी छेडले असता,घराणेशाहीचा सर्वात मोठा आरोप गेल्या अनेक दशकांपासून आमच्यावरच होत असल्याचे त्या म्हणाल्या.आता तर याची आई,त्याची वैणी,त्याची बायको याची यादी जी माध्यमकर्मींनी दाखवली ती सर्व भाजपची असून,दहा वर्षांपूर्वी भाजप जे आरोप आमच्यावर करीत होती तिथेच आज भाजप उभा आहे.आज भाजपचे प्रवक्ते काय नाही बोलत?मलाच धक्का बसतो.तो पक्ष एक सुसंस्कृत पक्ष होता,भाजपचे नेतृत्व मी अतिशय जवळून पाहीले आहे.मी निर्मला,नवीन कोहली,अनुरागला चर्चासत्रात(वृत्त वाहीन्यांवरील डिबेटमध्ये) ऐकले आहे,ही त्यांची संस्कृतीच नव्हती.आताचे प्रवक्ते यांची तर नावे सुद्धा माध्यमकर्मींना लक्षात राहत नाही.प्रकाश जावडेकर यांना चर्चासत्रात ऐकणे ही सुद्धा एक पर्वणी असायची.मला अमित शहा यांचे शब्द आठवतात,दिल्लीत ते म्हणाले की एक बोट दुस-यांकडे दाखवताना तीन बोटे स्वत:कडे असतात हे विसरु नये,दूर्देवाने हीच बाब आज भाजपला लागू होते.आमच्याकडे बोट दाखवताना त्यांचीच तीन बोटे त्यांच्याकडे आहेत हे ते सोयीस्करपणे विसरतात.
(बातमीशी संबंधित सर्व व्हीडीयोज Sattadheesh Official युट्युब चॅनलवर उपलब्ध)
……………………………….
तळटीप:-
सोलापुरात बाळे भागात बालू तांबे नावाच्या गुंडाला भाजपने नुकतेच थेट पक्ष प्रवेश दिला.विशेष म्हणजे या गुंडाने श्रीकांत मोरे या स्थानिक स्वयंसेवकाला बेदम मारहाण केली होती.बाळे येथे संघाच्या एका प्रकल्पावर कार्यरत या संघ स्वयंसेवकाला मारहाण करणा-या बालू तांबे या गुंडाला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामधून तडीपार करण्यात आले होते.तरी देखील या गुंडाला प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला.बालू या गुंडाचे भाजपात प्रवेशानंतर ’बाळासाहेब’असे नामांतर झाले.तेथील माध्यमकर्मींनी हे प्रकरण चव्हाट्यावर अाणले.श्रीकांत मोरे यांनी तेथील पालकमंत्र्यांकडे आपली कैफियत मांडली मात्र,मंत्र्यांकडून कोणतीही हालचाल झालीच नाही.ही बाब सुप्रिया सुळेंना आज माध्यमकर्मींनी ’ऑफ द रेकॉर्ड ’सांगित्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.एकीकडे भाजपचीच वैचारिक संघटना विश्व हिंदू परिषद नशामुक्त देशासाठी अभियान चालवित आहे.दूसरीकडे अम्ली पदार्थाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या बालू तांबेसारख्या गुन्हेगाराला भाजप केवळ सत्तेसाठी पदरात पाडून पवित्र करीत आहे….!
………………………..