फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजराहूल देशमुखांमुळे सलील देशमुखांची पक्षातून एक्झीट!

राहूल देशमुखांमुळे सलील देशमुखांची पक्षातून एक्झीट!

Advertisements

पत्रकार परिषदेत केली पक्ष सोडण्याची घोषणा
सदस्य पदाचा देखील केला त्याग
पक्षबदल विषयी प्रश्‍नाला दिली बगल
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२० नोव्हेंबर २०२५: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी पक्षाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला असून, राजीनाम्याची घोषणा त्यांनी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन केली.महत्वाचे म्हणजे या प्रसंगी ते एकटे होते.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोणतेही पदाधिकारी त्यांच्यासोबत नव्हते.पक्षाच्या पदाधिका-यांवर कोणतेही आरोपांचे आराखडे ओढल्या जाऊ नये म्हणून अगदी एकटच आलो असल्याचा उल्लेख त्यांनी स्वत: पत्रकार परिषदेत केला.काटोलच्या राजकीय परिक्षेत्रात सातत्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व सलील देशमुख यांच्या विरोधात दोन दशकांपासून शड्डू ठाेकणारे शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप)नेते राहूल देशमुख यांच्या पत्नीला अर्चना राहूल देशमुखांना महाविकास आघाडीत घेऊन त्यांनाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने सलील देशमुख नाराज झाल्याची चर्चा आहे.
पक्ष त्याग करण्याचा निर्णय अनिल देशमुखांना विचारुन किवा सांगून घेतला आहे का?या निर्णयाविषयी अनिल देशमुखांची काय प्रतिक्रिया आहे?अशी विचारणा केली असता,मी पंचेचाळीस वर्ष वयाचा असून माझे राजकीय निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचे उत्तर सलील यांनी दिले.याशिवाय अनिल देशमुखांनाच त्यांची प्रतिक्रिया विचारावी अशी पुश्‍ती देखील त्यांनी जोडली.
आपल्या राजीनाम्याचे कारण त्यांनी आजारपणाला दिले असले तरी राहूल देशमुखांच्या पत्नीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरुन सलील देशमुखांनी शरद पवार पक्ष तसेच पक्षाचे प्राथमिक सदस्यपद देखील सोडण्याचा हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंात अनिल देशमुख विरुद्ध शेकापचे वीरेंद्र देशमुख यांच्यात विधानसभेच्या निवडणूकीत अटीतटीचा सामना रंगत असे.वीरेंद्र देशमुखांच्या निधनानंतर त्यांचेच सुपुत्र राहूल देशमुखांनी देखील अनिल देशमुखांविरुद्ध आघाडी उघडली होती.नुकतेच पार पडलेल्या नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभेच्या निवडणूकीत सलील देशमुखांविरुद्ध भाजपचे चरणसिंग ठाकूर यांच्याशिवाय शेकापचे राहूल देशमुख हे देखील रिंगणात होते.भाजपनेच राहूल देशमुखांना ’डमी उमेदवार म्हणून उभे केल्याचा आरोप देखील झाला होता.
त्या निवडणूकीत भाजपचे चरणसिंग ठाकूर यांनी १ लाख चार हजार ३३८ मते मिळवून विजय मिळवला तर सलील देशमुख यांना ६५ हजार ५२२ मते मिळाली होती.काँग्रेसचे बंडखोर उमेदवार याज्ञवलक्य जिचकार यांना १३ हजार ९२२ तर राहूल देशमुख यांना ६ हजार,१८२ मते मिळाली होती.माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची प्रतिष्ठाच या निवडणूकीत पणाला लागली होती.पक्षाने आधी अनिल देशमुखांनाच उमेदवारी बहाल केली होती मात्र,पुत्रप्रेमाने त्यांनी पक्षाकडून सलील यांच्यासाठी उमेदवारी खेचून अाणली. याच निवडणूकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या वाहनावर दगडफेकीची घटना देखील घडली होती यात त्यांच्या कपाळाला जखम झाली होती.काटोलमध्ये सलील देशमुख यांनी चुरशीची लढत दिली होती मात्र,भाजपच्या रणनितीसमोर त्यांचा पराभव झाला.
काटोल नगरपालिकेचे अध्यक्ष पद महिलेसाठी राखीव झाल्याने राहूल देशमुखांची पत्नी अर्चना देशमुख यांनी आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला असून, भाजपकडून कल्पना समीर उमप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. समीर उमप हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते,नगरसेवक होते.पूर्वी ते शेकापमध्ये होते,त्याही पूर्वी ते अनिल दशेमुखांसोबतच होते.परिणामी,अनिल देशमुखांचेच एकेकाळचे जुने सहक़ारी उमप यांच्यासोबत अनिल देशमुखांचेच कट्टर राजकीय विरोधक राहीलेले राहूल देशमुखांसोबत झालेल्या आघाडीत, काटोलचे मतदार कोणाच्या विजयासाठी ‘व्हीव्हीपॅट’नसलेले ईव्हीएमचे बटन दाबतात,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(छायाचित्र : काटोल नगरपरिषदेतील महाविकासआघाडीच्या उमेदवार अर्चना राहूल देशमुख व त्यांचे पती राहूल देशमुख)

महत्वाचे म्हणजे,काटोलमध्ये अनिल देशमुखांना शेकापसोबत युती करण्याशिवाय पर्याय नव्हता असे तेथील सूत्र सांगतात.काटोलमध्ये १२ वार्ड असून पक्षांचे पंचवीस उमेदवार निवडणूक लढवित असून एक अध्यक्ष असे २० उमेदवारांचे पॅनल निवडणूक लढत आहेत. अनिल देशमुखांकडे या संपूर्ण वार्डात उभे करण्यासाठी उमेदवार नसल्याने त्यांनी शेकापसोबत युती केली अर्थात बळशाली भाजपविरुद्ध युतीचा प्रस्ताव शेकापकडूनच अनिल देशमुखांना देण्यात आला होता. भाजपच्या कल्पना समीर उमप तसेच अर्चना राहूल देशमुख यांच्यात सध्यातरी ‘वन टू वन’लढत होत असल्याचे बोलले जात आहे.

काटोलमधील राजकारणाचा पूर्व इतिहास बघता नगर परिषदेत गेल्या  २५ वर्षांपासून शेकाप वर्सेस चरणसिंग ठाकूर अशीच लढत होत आली आहे.ठाकूर यांच्या ‘विदर्भ माझा’पक्षातर्फे ही लढत रंगत होती.मात्र,२०२४ साली तेच चरणसिंग ठाकूर भाजपचे उमेदवार होते व पुढे विधानसभेत आमदार झाले.काटोल मध्ये राष्ट्रवादीचा गड नगरपरिषदेत नाही.त्यामुळे आता शेकापच्या राहूल देशमुख वर्सेस आमदार असलेले चरणसिंग ठाकूर अशी थेट लढत होत असून ,आता ‘गटाचं’ राजकारण राहीले नसून थेट‘पक्षांचे’राजकारण काटोलमध्ये रंगत आहे.
मंत्री पदाचे व अनेक दशकांच्या राजकीय अनुभवातून अनिल देशमुखांनी एकेकाळचे राजकीय विरोधक राहूल देशमुखांसोबत केवळ भाजपला काटोलमध्ये रोखण्यासाठी युती केली मात्र,त्यांच्या या राजकीय निर्णयावर सलील देशमुखांनी नाराज होऊन पक्षच सोडला असल्याचे कारण पुढे आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेले सलील देशमुखांची मागे भेट घेतली होती त्यामुळे नाराज सलील देशमुख हे शरद पवार पक्षाचा त्याग करुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेला देखील पेव फूटले आहे.
(बातमीसंबंधी सर्व व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
……………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या