
‘मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा’ २२ नोव्हेंबरपासून

पद्मश्री अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेणार सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री
पहीले बक्षीस एक लाख एकावन्न हजार रुपयांचे!
आमदार संदीप जाेशी यांच्या पुढाकारातून साकारले जात आहे आयोजन
नागपूर,ता.१८ नोव्हेंबर २०२५: नागपूरात यंदा मराठी रंगभूमीचा अनोखा मेळा रंगणार असून राज्यातील सर्वात प्रतिष्ठित व सर्वाधिक पारितोषिके असलेली ‘मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘येत्या २२ ते २६ नोव्हेंबर दरम्याम विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांच्या संकल्पनेंतर्गत भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजन समितीचे सदस्य व सुप्रसिद्ध रंगकर्मी नरेश गडेकर यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट,मोहगाव(झिल्पी) यांच्या वतीने होणा-या या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ शनिवार,दिनांक २२ नोव्हेंर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता राम गणेश गडकरी रंगमंच,व्हॉलीबॉल मैदान,लक्ष्मीनगर येथे होणार आहे.उद् घाटन सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात लोककलेचा लहेजा जपणा-या आणि संपूर्ण महाराष्ट्राला थिकरवणा-या ’द FOLK आख्यान’या भव्य लोकसंगीत व लोकनृत्य महोत्सवाचे सादरीकरण प्रथमच विदर्भात ते ही नागपूरात होत आहे.रंग,ताल व लोकपरंपरेचा उत्कृष्ट संगम नागपूरकरांना यातून बघायला मिळणार असल्याची माहिती या प्रसंगी नरेश गडेकर यांनी दिली.
याशिवाय २७ नाेव्हेंबर रोजी पार पडणा-या समारोप साेहळ्यात मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ उजळून टाकणारा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात,महाराष्ट्र भूषण,पद्मश्री अशोक सराफ यांचा सपत्निक सत्कार पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंच,व्हॉलीबॉल मैदान,आठ रस्ता चौक,लक्ष्मीनगर येथे पार पडणार असल्याची माहिती प्रफूल्ल माटेगांवकर यांनी दिली.या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या सूत्रसंचालनाखाली ‘फक्त..अशोक मामा’ही ह्द्य आणि मनमोकळी मुलाखत नागपूरकर रसिकांसाठी अनोखी पर्वणी असणार आहे,असे माटेगांवकर यांनी सांगितले.या कार्यक्रमानंतर विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत १ ऑगस्ट २०२३ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील विविध स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय पारितोषिक प्राप्त करणा-या मराठी एकांकिका सादर केल्या जाणार असून दररोज चार एकांकिकेचे सादरीकरण २३ नोव्हेंबरपासून सायंटिफिक सभागृहात होणार आहे.मराठीतील सुमारे २५ दर्जेदार एकांकिका सादर करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे नरेश गडेकर यांनी सांगितले.राज्यभरातील स्पर्धेतील सर्वोत्तम एकांकिका संघांची चढाओढ,मान्यवर परिक्षक,नामवंत कलावंत तसेच मराठी रंगभूमीचा अद्वितीय उत्सव या दरम्यान नागपूरकर रसिकांना बघण्यास मिळणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस पारितोषिके प्रदान केली जाणार असून प्रथम क्रमांकासाठी एक लाख ५१ हजार,द्वितीय पारितोषिक एक लाख रुपये तर तृतीय पारितोषिक ५० हजार रुपयांचे दिले जाणार असून ,दोन उत्तेजनार्थ तसेच दोन लक्षवेधी पारितोषिकांसाठी २५ हजार इतक्या भव्य पारितोषिकांची लयलृट केली जाणार आहे.अभिनय,दिग्दर्शन,लेखन,प्रकाशयोजना,नेपथ्य,वेशभूषा,संगीत अशा विविध विभागातील वैयक्तिक पारितोषिके देखील प्रदान केली जाणार आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
