फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeblogनिवडणूक आयोग आणि महाराष्ट्रातील आरोप-प्रत्यारोप

निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रातील आरोप-प्रत्यारोप

Advertisements
(भाग -४ निवडणूक आयोग विशेष)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.७ नोव्हेंबर २०२५: स्वायत्त निवडणूक आयाेग हा भारताच्या लोकशाहीच्या मूळ गाभा आहे.मात्र,या संस्थेवर महाराष्ट्राच्या विधान सभा निवडणूकीनंतर जे दाट संशयाचे धुके साठले,त्यावर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांच्या वारंवार पुराव्यानिशी सादरीकरणानंतर आणखी अविश्‍वासहर्तेचे दाट परत चढत चालल्या आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत मतदार याद्यांमध्ये झालेल्या बेरजा- वजाबाक्यांचा मुद्दा राहूल गांधी व त्यांच्या अभ्यासक सहका-यांनी ऐरणीवर आणला आहे.विधानसभेच्या दारुण पराभवानंतर विरोधकांच्या महाविकास आघाडीने पुन्हा एकदा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी(महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते)ईव्हीएमविरुद्ध जनआंदोलन पुकारण्याचा निर्धार केला.यावेळी पुन्हा एकदा मतपत्रिकांवर महाराष्ट्राच्या निवडणूका घ्यावात अशी मागणी विरोधकांनी केली.‘भारत जोडो’च्या धरतीवर महाराष्ट्रात मोठे अभियान सुरु करण्याचीही घोषणा करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांची कानउघाडणी करीत ’निवडणूकीत पराभव झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर(ईव्हीएम)प्रश्‍नचिन्ह उपस्थित करता,जिंकल्यावर मात्र शांत बसता’अशा शब्दात खडसावले होते.
स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी,विधानसभेत काँग्रेसला  ८० लाख मते मिळून त्यांचे १५ आमदार निवडून आले तर शिंदे गटाच्या शिवसेनेला ७९ लाख मते मिळून त्यांचे ५७ आमदार निवडून आले!असा प्रश्‍न उपस्थित केला.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ५८ लाख मते मिळून त्यांचे ४१ आमदार निवडून आले,त्यापेक्षा जास्त मते मिळून देखील आमच्या जागा कमी कश्‍या?मतांची ही आकडेवारी आश्‍चर्यकारक असल्याचे ते म्हणाले.मते महायुतीपेक्षाही जास्त मिळून देखील महाविकासआघाडीचा पराभव झालाच कसा?या प्रश्‍नाने इतक्या ज्येष्ठ नेत्यालाही छळले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ’निकालाचा स्वीकार करा’असा ‘लाख मोलाचा’सल्ला पवारांना दिला.पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल,तुम्ही तरी आपल्या सहका-यांना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला द्याल,अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली.
२०२४ च्या लोकसभेत भाजपला १ कोटी ४९ लाख १३ हजार ९१४ मते मिळाली पण जागा निवडून आल्या ९,काँग्रेसला ९६ लाख ४१ हजार ८५६ मते मिळाली व जागा निवडून आल्या १३,शिवसेना उबाठाला ७३ लाख ७७ हजार ६७४ मते मिळाली जागा निवडून आल्या ७,शरद पवार गटाला ५८ लाख ५१ हजार १६६ मते मिळाली व जागा निवडून आल्या ८,अशी माहिती देखील त्यांनी दिली.लोकसभेत विरोधकांना लाखो मते जी मिळाली ती मात्र अवघ्या तीनच महिन्यात त्या-त्या राजकीय पक्षापासून परावृत्त कशी झाली?याचे कोणतेही उत्तर सत्ताधारी व निवडणूक आयोगाकडे नाही…!
मारकडवाडीचे उदाहरण तर अतिशय बोलके आहे.मारकडवाडीतील ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर मतचाचणी घेण्याचे ठरवले.या चाचणीतून घोषित झालेला निकाल बदलणार नव्हता.तरी देखील पोलिस बळाचा वापर करुन मारकवाडीच्या ग्रामस्थांना मतपत्रिकेवर चाचणी घेण्यापासून रोखण्यात आले आणि हे….महाराष्ट्रात घडले …! मारकडवाडी सोलापूर जिल्ह्यातील हे गाव राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले होते. या गावातील मतदारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करुन  मतपत्रिकेवरच मतदान करण्याचे निश्‍चित केले होते.मात्र,प्रशासनाने जमावबंदी लागू करत हा प्रयोग होऊ दिला नाही.तसेच या सर्व प्रक्रियेत सहभागी असलेल्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मतदार असलेल्या ग्रामस्थांच्या शंका निरसन करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे,त्यांनी गावक-यांच्या समक्ष येऊन यांच्या शंकांचे निरसन करावे,त्यांचे म्हणने ऐकावे,असे शरद पवार म्हणाले.ईव्हीएम बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही,असा निर्धार मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी केला आहे.महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना चारही मुंड्या चित्त केले आहे,त्यामुळे त्यांनी ईव्हीएमचे रडगाणे न गाता विकासाचे गाणे गायला पाहिजे,असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाणला.पटोले स्वत: २०० मतांनी तर रोहित पवार ११०० मतांनी जिंकले,मग काय म्हणायचं?असा सवाल शिंदे यांनी केला मात्र,टपाल मते नसती तर माझा परावभव ईव्हीएममुळे अटल होता,असा दावा निकालानंतर नाना यांनी केला.टपाल मतांमध्ये कोणतीही हेराफेरी अद्याप तरी शक्य झाली नाही,हेच लोकशाहीचे यश म्हणावे लागेल.
देशात विरोधी पक्ष प्रभावशाली होऊ नये याची दक्षता घेतली जात असून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये या निकालानंतर प्रचंड अस्वस्था दिसून येत असल्याचे शरद पवार म्हणाले.शरद पवारांच्या विजयी आमदारांची मुंबईत बैठक पार पडली,यात विजयी आमदारांनी देखील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली!आपल्या मतदारसंघातील अनेक गावांमधून लोकसभा सारखी मते मिळाली नसल्या बाबत आश्‍चर्य व्यक्त केले. पराभूत उमेदवारांनी देखील ९० टक्के टपाली मते पक्षाला मिळूनसुद्धा ईव्हीएममध्ये उलटे निकाल लागण्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले.पक्षाने उभ्या केलेल्या ८६ जागांपैकी फक्त १० आमदार निवडून आले.
या निकालानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक्सवर ’अनाकलनीय’अशी पोस्ट केली.लोकांनी मनसेला मते दिली आहेत मात्र,ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही ,आपल्याला झालेले मतदान मध्येच गायब झाले आहेत त्यामुळे या निकालावर विश्‍वास ठेऊ नका,असा सरळ आरोप राज ठाकरे यांनी केला.अश्‍या प्रकारच्या निवडणूका होत असतील तर त्या न लढलेल्याच ब-या,अशी बोचरी टिका देखील केली.अजित पवारांचे ४-५ आमदार देखील निवडून आले नसते असे वातावरण महाराष्ट्रा त होते मात्र,त्यांचे ४२ आमदार निवडून आले,यावर कोणाचा तरी विश्‍वास बसेल का?असा सरळ प्रश्‍न त्यांनी केला.ज्यांच्या भरवश्‍यावर इतकी दशके राजकारण केले त्या शरद पवारांना फक्त १० जागा!हे अनाकलनीय असल्याचे राज ठाकरे म्हणाले.लोकसभेत ज्यात काँग्रेसचे महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार निवडून आले त्यांचे फक्त १५ आमदार!लोकसभेत ज्या अजित पवारांच्या पक्षाला फक्त १ खासदार निवडून आणता आला,त्यांचे ४२ आमदार निवडून येतात!हा संशोधानाचा विषय असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या प्रश्‍नांना अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी उत्तर देत,विधानसभेत १२८ जागा लढवून एक ही जागा न मिळालेल्या मनसेवर पक्ष चिन्ह वाचवण्याची नामुष्कि ओढवली असल्याची टिका केली.दीड टक्के मते मिळविणा-या राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४२  जागा कश्‍या मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष,नेते,कार्यकर्ते कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका स्वीकारेल का यावर आत्मचिंतन करावे,असा सल्ला दिला.
कायदेतज्ज्ञ ॲड.असीम सरोदे यांनी तर महाराष्ट्राची निवडणूक जिंकण्यासाठी अधिका-यांचा ईस्त्रायल दौरा झाल्या असल्याचा खळबळजनक आरोप २९ एप्रिल २०२५ रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला.कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याचे कारण पुढे करुन २०१९ मध्ये फडणवीस सरकारचा कार्यकाळ संपत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही अधिका-यांना इस्त्रायलला पाठविले.निवडणुकांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन निवडणूका कशा जिंकायच्या,याचा अभ्यास करण्यासाठी हे उच्च पदस्थ अधिकारी इस्त्रायलला गेल्याची बाब उघडकीस आल्याचा आरोप ॲड.सरोदे यांनी केला.नियमांचे पालन न करता हा दौरा आयाेजित करण्यात आला होता.याबाबत उच्च न्यायालयात २०२१ मध्येच याचिका दाखल करण्यात आली होती मात्र,अद्याप ही याचिका प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली.न्यायालयाचे लक्ष पुन्हा याचिकेकडे वेधण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती मात्र,त्यांच्यावर १०० कोटींच्या लाचेचा आरोप करुन त्यांच्या मागे ईडीसह सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्यात आला,असा आरोप ॲड.सरोदे यांनी केला.महत्वाचे म्हणजे अशा परदेश दौ-यासाठी मुख्यमंत्री,अर्थमंत्री किवा मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांची स्वाक्षरी असणे आवश्‍यक आहे,मात्र,कोणाचीही स्वाक्षरी नसताना या दौ-यासाठी पैसे मंजूर करण्यात आल्याची कागदपत्रे त्यांनी सादर केली.या दौ-याबाबत फडणवीस माहिती लपवित असल्याचा आरोप याप्रसंगी ॲड.सरोदे यांनी केला.
राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगावर कर्नाटकालील अलंद मतदारसंघासह महाराष्ट्रातील राजु-यात ६ हजार ८८१ अवैध मतदान व मतचोरीचे आरोप केले.यानंतर राजु-यात मतचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.यावर प्रशासनाने स्वत:हून व वेळेवर केलेल्या कारवाईमुळे ही बनावट नोंदणी रोखली असल्याची पाठ थोपटून घेतली.निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे म्हटले.महत्वाचे म्हणजे या प्रकरणातील ७ हजार ५९२ अर्जांपैकी ६ हजार ८६१ अर्ज रद्द ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.(कर्नाटक सरकारने गठीत केलेल्या एसआयटीने अलंद मतदारसंघात एका मतदाराचे नाव वगळण्यासाठी ८० रुपये डेटा सेंटर ऑपरेटरने घेतले असल्याचे चौकशीत पुढे आणले.असे ४.८ लाख रुपये डेटा सेंटर ऑपरेटर्सना देण्यात आले.एसआयटीने भाजप नेते सुभाष गुत्तेदार यांच्या मालमत्तेवर छापे टाकून त्यांचा मुलगा हर्षनंदा,संतोष व सीए मल्लिकार्जुन यांच्या घराची झडती घेत ७ लॅपटॉप,मोबाईल जप्त केले.मतदार यादीतील बदल करण्यासाठी ७५ मोबाईल्सचा वापर करण्यात आला होता.हे मोबाईल क्रमांक पोल्ट्री फॉर्म कामगार ते चक्क पोलिसांच्या नातेवाईकांचे असल्याचे एसआयटीच्या चौकशीत समोर आले!)
विदर्भ आणि नागपूर:-
वर्धामध्ये देखील १६ हजार मतदारांची नावे दोनदा यादीत असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी केला.वर्धा जिल्ह्यातील वीस टक्के मतदार याद्यांची छाननी केली असता साडेचार हजार मतदारांची नावे दोनदा आढळली.सुमारे १६ हजारांवर मतदारांची नावे यादीत दोनवेळा आढळली,असा दावा अग्रवाल यांनी केला.केवळ वीस टक्के याद्या तपासल्यानंतर एवढी बोगस मतदारांची संख्या आढळते.शंभर टक्के याद्यांची तपासणी केल्यानंतर महाराष्ट्रातील हे सरकार मतचोरीतून आलेलेच सरकार असल्याचे सिद्ध होईल,असा दावा करण्यात आला.
नागपूर खंडपीठात २७ पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केल्या.यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफूल्ल गुडधे पटील यांची देखील याचिका होती.निवडणूकीचे निकाल लागल्यावर ४५ दिवसांच्या आत निवडणूक याचिका दाखल करता येतात.७ जानेवरी २०२५ ही शेवटची तारीख होती.विधानसभा निवडणूकीचा निकाल हा अनेकांसाठी धक्कादायक तर काहींच्या जिव्हारी लागणारा होता.विदर्भातील अनेक दिग्गज पराभूत झाले होते.
काँग्रेसचे फक्त १६,उबाठाचे २१ तर शरद पवार गटाचे १० आमदार निवडून आले. या तिन्ही पक्षाच्या पराभूत नेत्यांनी ईव्हीएमवर खापर फोडून,ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नसल्याचा आरोप याचिकेद्वारे केला.निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशन आयोगाने काढली नाही.निकालानंतर पराभूत उमेदवारांना सीसीटीव्ही फूटेज,फॉर्म नंबर १७ दिले जात नाहीत,व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही,माहिती अधिकारी काद्यांतर्गत माहिती देणे बंधनकारक असतानाही आमचे हक्क डावलण्यात आले,असे याचिकेत नमूद केले.संपूर्ण महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे ७० पराभूत उमेदवारांनी न्यायालयाचे दार ठाेठावले.
मुख्यमंत्र्याच्या विरोधात नागपूर दक्षिण-पश्‍चिम मधून लढलेले काँग्रेसचे प्रफूल्ल गुडधे पाटील,दक्षिण मतदारसंघातून लढलेले काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव,अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर,माजी मंत्री राजेंद्र शिंगणे,सुभाष धोटे,तुमसर तालुक्यातील आमदार राजू कारेमोरे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे (शरद पवार गट)चरण वाघमारे,काटोलमधून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र सलील देशमुख,हिंगणा मतदारसंघातून रमेश बंग,अकोल्यातील अकोट मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार ॲड.महेश गणणगे यांची नावे उल्लेखनीय आहे.मतदार यादीतील फेरफार आदी मुद्दांवर शरद पवार गटाच्या ४०,काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रत्येक १५ याचिका दाखल केल्या…!
या सर्व दिग्गज समजल्या जाणा-या पराभूत उमेदवारांनी निवडणूकीशी निगडित काही माहिती मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले होते.यात मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेजचाही समावेश होता.मतदानासाठी ईव्हीएम,बॅलेट युनिट,कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट प्रिंटर गोदामातून बाहेर काढण्यापासून तर मतदानानंतर पुन्हा गोदामात आणण्यापर्यंत माहिती समाविष्ट होती.मात्र,आयोगाने हे फूटेज न दिल्याने अखेर पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.यावर न्यायालयाने भारत निवडणूक आयोग,राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांना स्पष्टकरण सादर करण्याचे आदेश दिले.
मात्र,तांत्रिक कारणावरुन मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील प्रफूल्ल गुडधे पाटील यांची याचिका ४ जुलै २०२५ रोजी न्यायालयाने फेटाळली.यासोबतच माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पाच आमदारांविरुद्ध दाखल याचिका देखील न्यायालयाने फेटाळल्या.याचिका दाखल करताना याचिकाकर्ते असलेले काँग्रेसचे उमेदवार न्यायालयात उपस्थित नव्हते,या तांत्रिक कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध याचिकेसह इतर याचिका फेटाळण्यात आल्या…!
या प्रकरणावर न्या.प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली.फडणवीस व इतरांनी या निवडणूक याचिकांना दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या निकालामधील नियम ११ अंतर्गत विरोध केला आहे.या निवडणूक याचिका लोकप्रतिनिधत्व कायद्यातील कलमानुसार निकष पूर्ण करीत नाही.त्यानुसार,निवडणूक याचिका दाखल करताना उमेदवाराची स्वत:ची उपस्थिती आवश्‍यक आहे.त्यामुळे या याचिका सुरवातीच्या टप्प्यातच फेटाळून लावा,असे फडणवीस व इतरांनी संबधित अर्जात म्हटले होते.तर याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला होता की,गुडधे यांनी ४ जानेवरी २०२५ रोजी स्वत: याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयात उपस्थिती नोंदवली होती,त्यांनी संबंधित लिपिक आणि रजिस्ट्रार यांच्यासमोर स्वाक्षरी केली होती.तसेच काही कारणांमुळे औपचारिकता पूर्ण होण्यास वेळ लागला.दुस-या दिवशी ५ जानेवरी २०२५ हा रविवार होता.६ जानेवरी रोजी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील महत्वाच्या बैठकीसाठी गुडधे यांना जावे लागले,त्यामुळे ६ जानेवरीला त्यांच्या वकीलाने ही याचिका दाखल केली मात्र,न्यायालयाने हा युक्तिवाद नाकारला.न्यायालयाने या याचिका केवळ तांत्रिक कारणावरुन फेटाळल्या आहेत,परंतु आरोपांबाबत कोणताही उल्लेख केला नाही त्यामुळे याच आरोपांसह सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
हिंगणा मतदारसंघाच्या मतदारसंघातील मतदार यादीत १९ हजारांच्या वर बोगस मतदार असल्याचा दावा करीत माजी आमदार विजय घोडमोरे यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.तर मतदारांच्या मर्जीशिवाय मतदारांची नावे वगळू नये असे निवेदन भाजप पदाधिका-यांनी जिल्हाधिका-यांना दिले.या मतदारसंघातून भाजपचे सागर मेघे पुन्हा एकदा निवडून आले.काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली,या प्रकरणात भारतीय निवडणूक अायोगाने प्रतिवादी म्हणून वगळण्यासाठी अर्ज दाखल केला जो न्यायालयाने मंजूर केला.
महायुतीमधील विदर्भातील प्रताप अडसड,संजय कुटे व संजय गायकवाड यांच्या विजयाला देखील नागपूर खंडपीठात आव्हान  देण्यात आले होते.प्रताप अडसड यांच्या विरुद्ध अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील काँग्रेसचे विरेंद्र जगताप,आ.संजय गायकवाड विरुद्ध उबाठाच्या जयश्री शेळके(बुलढाणा)तसेच संजय कुटेविरुद्ध काँग्रेसच्या स्वाती वाकेकर(जळगाव जामोद)यांनी या याचिका दाखल केल्या.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री व नागपूर,अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या विरोधात कामठीतील काँग्रेसेचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले.निवडणूकीच्या आधी एकूण ३५ हजार मतांमध्ये नोंदणीच्या अखेरच्या तीन दिवसात तब्बल बारा हजार मते वाढल्याचा आरोप भोयर यांनी केला.यावर निवडणूक आयोगाने निवडणूकी पूर्वी चार बैठका घेतल्या,यास काँग्रेससह सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते,त्या बैठकीत आक्षेप का घेण्यात आला नाही?असा सवाल भाजप पदाधिका-यांनी केला.
केवळ निवडणूकी नंतरच नव्हे तर निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर देखील विरोधकांनी अनेक तक्रारी नोंदवल्या.पूर्व नागपूरचे भाजपचे तीन टर्मचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्या उमेदवारी अर्जात अनेक त्रुटी असल्याचे सांगून त्यांचा अर्ज खारीज करण्यात यावा अशी मागणी अपक्ष उमेदवार आभा पांडे यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे केली.आभा पांडे यांनी लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० अंतर्गत खोपडे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनेक त्रुटी असल्याचे नमूद केले.अर्जात देण्यात आलेली माहिती पारदर्शक नाही.खोपडे यांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती दिलेली नाही.तसेच संपत्तीचे नेमके मूल्य व शासकीय कंत्राटांमध्ये त्यांचा सहभाग याची माहिती दिलेली नसल्याचे नमूद केले मात्र, खोपडे यांच्या उमेदवारी अर्जात कोणताही लक्षणीय दोष नसल्याचे कारण देत, निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भस्के यांनी आभा पांडे यांची मागणी फेटाळून लावली…..!
नोव्हेंबर २०२४ मध्ये निवडणूका पार पडल्यानंतर एकीकडे ईव्हीएम विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत होती(ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव) तर दूसरीकडे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच मतदान केंद्रावरील मतमोजणीनंतर ‘ईव्हीएम’मधील मतांची संख्या आणि ‘व्हीव्हीपॅट’मधील पावत्यांची संख्या यात कोणतीही तफावत आढळून आलेली नाही,असा अहवाल राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील जिल्हा निवडणूक अधिका-यांनी निवडणूक आयोगाला दिला….!
कालच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन काटोल-नरखेड विधानसभेमध्ये ३५ हजार ५३५ मतांची चोरी झाली असल्याचा आरोप पुराव्यानिशी पत्रकार परिषदेत केला!राहूल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांचा मागोवा घेत राज्यातील सर्व विराेधी पक्षांनी १ मार्च रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत ‘सत्याचा मोर्चा‘काढला.या मोर्चाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.येत्या निवडणूकीत मतचोरी करुन दूबार-तिबार मतदार करणारे दिसलेच तर त्यांना मनसे स्टाईलने फटकवा,असे उघड- उघड आवाहन राज ठाकरे यांनी केले.तर ठिणगीचा वणवा भडकेल असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला.राज्यात साडे नऊ लाख ४१ हजार ७५० दुबार मतदारांची नोंद झाल्याचा दावा राज ठाकरे यांनी ‘सत्याचा मोर्चा’ दरम्यान केला.
यावर राज्यातील ३१ विधानसभा मतदारसंघात २ लाख २५ हजार ७९१ मुस्लिम आणि ख्रिस्त्ी दुबार मतदार असल्याचा आरोप सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केला.महाराष्ट्राच्या सर्व २८८ मतदारसंघात ही संख्या १६ लाख ८४ हजार २५६ असेल,असा अंदाज त्यांनी वर्तवला.यावर मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचे स्वत:सरकारमधील मंत्री मान्य करीत आहेत,आम्ही अमूक मतांमध्ये सुधारणा करा अशी मागणीच केली नसल्याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले.सदोष मतदार याद्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूका झाल्यास ही निवडणूक आयोगाची ‘करप्ट प्रॅक्टीस’असेल अशी टिकाही ठाकरेंनी केली.
थोडक्यात,महाराष्ट्रासह देशात ‘मत चोरी व चोरीचे सरकार’यावर रण पेटले असून बिहार मध्ये दोन टप्प्याचे मतदान पार पडले आहे,या निवडणूकीत सर्वच वयोगटातील मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले असल्याचे दृष्य संपूर्ण देशाने बघितले.राहूल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरील गंभीर आरोपानंतर बिहारची पहीली निवडणूक पार पडतेय.याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपा व विरोधी पक्ष नेता राहूल गांधी यांच्यातील वैचारिक युद्ध म्हणून या निवडणूकीकडे बघितले जात आहे.(तेजस्वी यादवचा राजद हा प्रादेशिक पक्ष आहे)बिहारमधील निकाल देशातील लोकशाही,निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा आणि राजकीय पक्षांचे अस्तित्व निर्धारित करणार आहेत,यात दूमत नाही.
(अंतिम भाग -५ मध्ये वाचा निवडणूक आयोग आणि टी.एन. शेषण)
……………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या