

नागपूर,ता.३ नोव्हेंबर २०२५: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी नागपुरातील १६ रंगकर्मींचा ‘शुभपथ चिंतन’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. शंकर नगर येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मराठी रंगभूमी दिनाच्या पुरस्कार सोहळ्याला विधान परिषद सदस्य संदीप जोशी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. झाडीपट्टी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रभाषा प्रचार समितीचे सचिव सुरेशबाबू अग्रवाल, नाट्य परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष नरेश गडेकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील, नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान नियामक मंडळ सदस्य प्रफुल्ल फरकसे आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजय रहाटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जुन्या – जाणत्या रंगकर्मींच्या कार्याचे स्मरण व्हावे व युवा रंगकर्मींनी त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून यशोशिखर काबीज करावे. या उद्देशाने शुभपथ चिंतन हा पुरस्कार सध्याच्या आघाडीच्या रंगकर्मींना देण्यात येणार आहे.
यामध्ये पुरुष व महिला रंगकर्मींना पुरस्कृत करण्यात येईल. असे नागपूर शाखेचे अध्यक्षअजय पाटील यांनी कळवले आहे. सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयाने कै. विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ ला सांगली येथे सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग सादर केला. त्याच दिवसाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अावाहन अजय पाटील यांनी केले आहे.
हे आहेत सत्कारमूर्ती-
सत्कारमूर्ती म्हणून ( स्व. वैशाली सराफ स्मरणार्थ ) ऐश्वर्या शिंदे ( स्व. रागिणी बेडेकर स्मरणार्थ ) रसिका गोंधळे ( स्व. पुष्पा काणे स्मरणार्थ ) श्रद्धा गुंडे ( स्व. पुष्पा धुळधुळे स्मरणार्थ ) रोशनी सेलोकर ( स्व. पौर्णिमा काळे स्मरणार्थ ) शरयू मते ( स्व. नागेश देशमुख स्मरणार्थ ) प्रज्वल भोयर ( स्व. सोमेश्वर बालपांडे स्मरणार्थ ) तन्मय गंधे ( स्व. श्याम मोहरील स्मरणार्थ ) विजय पवार ( स्व. बाळ बक्षी स्मरणार्थ ) निशांत अजबेले ( स्व. मनोहर पोलकमवार स्मरणार्थ ) चिन्मय देशकर ( स्व. मदन गडकरी स्मरणार्थ ) चैतन्य डुबे ( स्व. सुभाष चांदुरकर स्मरणार्थ ) मंथन वीणा ( स्व. बाळ मंगरूळकर स्मरणार्थ ) रोहित घांगरेकर ( स्व. रमेश अंभईकर स्मरणार्थ ) मनीष चौधरी ( स्व. मनोज जाधव स्मरणार्थ ) प्रथमेश वलिवकर ( स्व. भास्कर पांडे स्मरणार्थ ) आकाश पौनिकर यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.
…………………………..




आमचे चॅनल subscribe करा
