Advertisements

डॉक्टर्स यांचा ‘बी-सिविक’उपक्रम
न्यू हेल्थ सिटी मदर ॲण्ड चाईल्ड रुग्णालयाचा पुढाकार
नागपूर,ता.५ सप्टेंबर २०२५: शहरात गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून ‘शिस्तप्रिय‘नागरिक घडवण्यासाठी न्यू हेल्थ सिटी मदर ॲण्ड चाईल्ड रुग्णालयातर्फे ‘बी-सिविक’हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व मेडीकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अविनाश गांवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी न्यू हेल्थ सिटी मदर ॲण्ड चाईल्ड रुग्णालयाचे संचालक डॉ.संजय पाखमोडे व डॉ.योगेश टेंभेकर उपस्थित हाेते.
आज अगदी लहान वयातील मुले ही मोबाईलसारखे डिवाईस हमखास हाताळताना घरोघरी दिसून पडतात.मात्र,यामुळे ना त्यांचा बौद्धिक विकास होत ना ते चांगले नागरिक म्हणून घडू शकतात.त्यामुळेच अगदी लहान वयापासूनच त्यांच्यावर चांगल्या सवयींचे संस्कार होणे गरजेचे अाहे,असे डॉ.गावंडे सांगतात.यासाठी पालकांनी आपल्या घरात शू-रॅक प्रमाणेच ‘मोबाईल रॅक’ ठेवणे गरजेचे आहे जेणेकरुन उपयोग करुन झाल्यावर ,पालकांना आपला मोबाईल रॅकमध्ये ठेवताना घरातील लहान मुले बघतील तर आपोआप त्यांच्यावर याचा परिणाम होईल.इतकंच नव्हे तर पालकांनी वेगळी ‘ नो मोबाईल रुम’बनवणे गरजेचे आहे,यामुळे मुलांवर याचा सखोल परिणाम होईल की या खोलीत काही तरी विशेष आहे जिथे आपले पालक मोबाईल वापरत नाही.यामुळे मोबाईल वापराच्या अतिरेकी सवयीपासून आपोआप बालकांची सुटका होईल,असे डॉ.गावंडे यांनी सांगितले.
यासोबतच वाहतूकीचे नियम पाळणे,अासपासच्या परिसरात स्वच्छता ठेवणे,पर्यावरणाचे संरक्षण,झाडे लावणे,सार्वजनिक उद्यान,मैदाने यांचा योग्य सन्मान करने,महत्वाचे म्हणजे कुठेही न थूंकणे,ओला कचरा,सुका कचरा विषयी जनजागृती इत्यादी यासारखा जनजागृतीपर उपक्रम नागपूरातील शाळा,महाविद्यालये,मॉल,सिनेमा हॉल,रेल्वे स्टेशन,विमानतळ,बस स्थानक ,मेट्रो स्थानक,मंदिरे इत्यादी ठिकाणी राबविले जाणार असल्याचे डॉ.संजय पाखमोडे यांनी सांगितले.
गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसून सामाजिक जवाबदारी निभवण्याचा सण असल्याचे डॉ.योगेश टेंभेकर यांनी सांगितले.प्रत्येक नागरिकाने जर सिविक सेंसचे अवलंब केले तर आपण आपल्या नागपूर शहराला आणखी चांगले बनवू शकतो.‘बी-सिविक‘ हा उपक्रम आम्ही फक्त विविध सार्वजनिक ठिकाणी राबवणार नसून डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने सर्वाधिक लोकांपर्यंत हा संदेश देणार असल्याचे ते म्हणाले.
यासाठी आम्ही नुक्कड नाटकाद्वारे सादरीकरण,नि:शुल्क आरोग्य शिबिरे,शहरातील प्रमुख इन्फ्लुएंसर्ससोबत संवाद इत्यादी उपक्रम राबविणार असल्याचे डॉ.गावंडे यांनी सांगितले.हे उपक्रम कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी होणार आहे?असा प्रश्न केला असता,वेळोवेळी आमची चमू हे निर्धारित करुन जनतेपर्यंत हा संदेश पोहाचविणार असल्याचे डॉ.गावंडे यांनी सांगितले.
आपापला अतिशय व्यस्त असा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून हा सामाजिक जनजागृतीपर उपक्रम राबविणार कसा?असा प्रश्न केला असता,या पूर्वी देखील नागपूर महानगरपालिकेसोबत जुळून अनेक सामाजिक उपक्रम राबविले असल्याचे डॉ.गावंडे म्हणाले.नागपूरचे पोलिस अायुक्त जो ‘मुक्ती‘अभियान राबवित आहे त्यानुसार शहरातील भिक्षेकरी यांना मेडीकलमध्ये आधी उपचारासाठी आणल्या जातं,मेडीकलमध्ये त्यांच्यावर नि:शुल्क उपचार केले जातात.हा उपक्रम देखील आम्ही जिल्हाधिकारी,मनपा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाच्या सहाय्याने राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ.टेंभेकर म्हणाले.
लहान मुले हे मनाने खूप खरे असतात.लहान वयच शिकण्याचं व अनुकरणाचं वय असतं.आपल्या शहरात दररोज अपघात घडत आहेत.अगदी सकाळी पहाटेच्या वॉकसाठी निघणारे हे अपघाताला बळी पडताना दिसत आहेत.अगदी लहान वयातच त्यांना वाहतूकीचे नियम,वेगेची मर्यादा आणि त्याचे महत्व शिकविल्यास त्याचा दूरगामी प्रभाव आयुष्यभर राहत असतो.त्यामुळेच वय वर्ष ६ ते ११ आणि ११ वर्षानंतरची मुले अश्या वयोगटासाठी आम्ही हा उपक्रम राबविणार असल्याचे डॉ.गावंडे यांनी सांगितले.लहान वयातच मुलांमध्ये सिविक सेंस जागृत होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.आम्ही मुलांना परिक्षेच्या तानतनावापासून दूर राहण्यासाठी देखील जागृत करणार आहोत,अशी माहिती त्यांनी दिली.याशिवाय हायजीन,न्यूट्रिशन इत्यादीविषयी देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या पर्यावरण असंतुलनाचा आणि प्रदुषणाचा खूप गंभीर प्रश्न नागपूरात निर्माण झाला असून, लहान मुले सर्वात जास्त प्रभावित होत आहे.त्यांच्यात रोग प्रतिरोध क्षमता कमी असल्याने सध्या नागपूरातील बहूतांश बालरोगतज्ज्ञांच्या रुग्णालयात कफ,सर्दी,अस्थमा तसेच श्वसनाच्या सबंधित रोगाने आजारी लहान मुलांचीच गर्दी दिसत आहे.परिणामी तुमच्या या जनजागृतीपर उपक्रमात लहान मुलांना प्रदुषणविरहीत वातवारण मिळावे यासाठी राजकीय व प्रशासकीयस्तरावर देखील हा उपक्रम राबवणार का?असा प्रश्न केला असता.आमचा विषयच लहान मुले असल्याचे डॉ .गावंडे म्हणाले.लहान मुलांना हवे तसे मोल्ड करता येतं.लहान मुलांना पर्यावरणाविषयी जितकी माहिती देता येईल ती देण्याचा प्रयत्न करु असे ते म्हणाले.याशिवाय रहीवाशी इमारती,सोसायटीमध्ये देखील जनजागृती करण्यात येईल.राजकीय व प्रशासकीयस्तरावर उच्चस्तरावरील जनजागृतीचे काय?असा प्रश्न केला असता,तुम्ही लक्षात आणून दिल्यास त्या ठिकाणी देखील जनजागृती करण्याचा प्रयत्न करु,असे डॉ.गावंडे म्हणाले.
ही तर सुरवात आहे.आधी आम्ही लहान मुलांना जागरुक करु,यानंतर आपला समाज,आपला प्रभाग,आपले शहर सुधारत जाईल,हा एक साखळीबद्ध उपक्रम असणार असल्याचे डॉ.पाखमोडे यांनी सांगितले.
जनजागृतीचे महत्व विशद करताना,मागच्या वर्षी नागपूर शहरात ऑगस्ट महिन्यात डेंग्यू आणि चिकन गुनियाचा कहर बरपला होता,यंदा मात्र त्याचे प्रमाण अल्प आहे,याचे कारण मनपाद्वारा जनजागृती व स्वच्छतेला प्राधान्य देणे असल्याचे डॉ.गावंडे म्हणाले.आमचे स्लोगनच ‘काय तुम्ही आमचा साथ देणार?’हे असून समस्त नागपूरकरांनी आपल्या शहराच्या प्रगतीसाठी आमच्या या उपक्रमासोबत जुळण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official वर उपलब्ध)
…………………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
