(रविवार विशेष)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.७ सप्टेंबर : एक कवि म्हणतो ‘सोसण्याची सवय झाली की हसण्याची सवय सुटून जाते’सध्या नागपूरातील बाजारगांव येथील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीत ज्याप्रमाणे वारंवार स्फोट होऊन निष्पाप कामगारांच्या देहाचे तुकडे सर्वदूर विखूरतात त्याचे वैषम्य, या कंपनीच्या मालकाला,व्यवस्थापकाला,राजकीय नेत्यांना आणि व्यवस्थेला वाटत नाही त्यामुळेच या कविचे शब्द आयुष्याच्या राहाटगाड्यात सार्थक वाटतात.
नागपूरच्या ४० किलोमीटर अंतरावर नागपूर-अमरावती महामार्गावर चाकडोह,बाजारगांव परिसरात सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड(एसडीएएल)ही कंपनी आहे.या कंपनीत ४ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री पुन्हा एकदा स्फोट झाला,या स्फोटात मयूर गणवीर या तरुणाचा मृत्यू झाला तर २४ जण जखमी झाले यात पाय गमावलेल्या दोघांची प्रकृति गंभीर आहे.याच कंपनीत १७ डिसेंबर २०२३ रोजी असाच स्फोट झाला होता.यात ९ कामगारांचा मृत्यू झाला होता यात सहा महिला व तीन पुरुष होते.पहाटे घरुन गेलेल्या देहांचा कोळसा झाला होता,त्यांच्या अवयवांचे तुकडे गोळा करुन २० पाकीटातून शवविच्छेदनासाठी मेडिकल रुगण्यालयात पोहोचले होते….!
त्यापूर्वी न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडून चार भाजलेल्या मृतदेहांसह इतर १३ पिशवीतील अवयवांचे नमुने डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले होते.मेडिकलच्या शवविच्छेदनगृहात इतिहासात प्रथमच स्फोटात विस्कळित झालेले मूत्रपिंड,ह्दयासह मानवी देहाचे इतर अवयव एकत्र करुन दोन दिवसात ३३ पाकिटांत आणले गेले होते.एकाच पाकिटात अनेक मृतदेहाचे अवयव मिसळले गेले होते!
सकाळी ६ वाजताची नोकरी असल्याने बरेच कामगार पहाटेच घरुन निघाले.त्या दिवशीच्या रविवारचा सूर्य त्यांच्या जीवनातील अखेरचा उगवला होता,याची त्यांना कल्पना देखील नव्हती.घड्याळ्यात सकाळचे ८ वाजून ४३ मिनिटे झाली अन्..एक प्रचंड स्फोट झाला.कामगारांच्या देहाचे तुकडे होऊन घटनास्थळी विखुरले.अंत्यसंस्कार करण्याची देखील वेळ त्यांच्यावर आली नाही.सहा महिलांसह नऊ कामगारांचे प्राण या स्फोटात स्वाहा झाले.महत्वाचे म्हणजे हे सर्व अवघे चाळीसीच्या आतील वयाचे होते.आरती सहारे ही तरुणी अवघ्या २० वर्षांची होती.तर श्वेताली मारबते आणि मोसम पटले हे अवघे २३ वर्षांचे होते.
या ही घटनेत सुरवातीला कंपनीचे व्यवस्थापक,मालक काहीच सांगायला तयार नव्हते.नंतर नातेवाईकांचा आक्रोश वाढला व मृतांच्या नावाची घोषणा करण्यात आली…!संपूर्ण वातावरण स्तब्ध होतं.कुणाचा मुलगा,कोणाचा पती,कोणाची आई,कोणाची बहीण नेहमीसारखेच पहाटेच कामावर निघाले होते.मात्र,रोजसारखे ते घरी परतलेच नाही…!त्यांचे चेहरे ही त्यांच्या कुटूंबियांना परत कधी दिसलेच नाही.सगळेच मृतक हे अत्यंत गरीब कुटूंबातील होते.अत्यंत कमी पगारावर ते जीवघेणे स्फोटक हाताळत होते.कपंनीच्या मालकाला जणू आपले आयुष्यच त्यांनी ठेक्यावर दिले होते.
तो काळ डिसेंबर महिन्यात नागपूरातील हिवाळी अधिवशेनाचा होता.परिणामी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली तर सायंकाळी ७ वा.च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी पोहोचले.‘मतदकार्य वेगाने पूर्ण करा’असा नेहमीचाच जुमलारुपी आदेश जिल्हाधिका-यांना देण्यात आला तसेच मृतांच्या कुटूंबियांना ५ लाखांची मदतराशि घोषित झाली.मात्र,स्फोटासाठी कारणीभूत असणारे,गरीब कामागारांच्या जीवावर उदार झालेले व्यवस्थापक,मालक यांच्यावर निष्काळजीपणातून ९ कामगारांच्या मनुष्यवधासाठी,कोणत्याही कारवाईचे आश्वासन या तिन्ही महानुभवांकडून त्यावेळी देखील मिळालेच नाही….!
अतिशय अल्प पगारात कसाबसा कुटूंबाचा गाडा खेचणारे त्यांच्या जीवाचे माेल ते काय असणार?मालकाच्या ‘राजकीय वजनापेक्षा’निश्चितच कमी…!२० वर्षीय आरती सहारेने तर घरी कोणी कमावतं नसल्याने लग्नसुद्धा केले नव्हते…!तिच्या वडीलांना पक्षाघात झाल्याने ते अंथरुणावरच खिळले होते.आई वनिता या मुक्या होत्या,बोलू शकत नव्हत्या.लहान बहीणीच्या लग्नाची चिंता आरतीला होती.बारावीपर्यंत शिक्षण झालेली आरती चार वर्षांपूर्वी या मृत्यू देणा-या कंपनीत नोकरीवर लागली होती.पैसे जमा करुन लहान बहीणीचे हात तिने पिवळे केले….!
पाचगाव येथे राहणारा २३ वर्षीय मोसम पटले.वयाच्या दहाव्या वर्षीच वडिलांचे निधन झाले.दोन्ही भावंडे पितृछायेला पोरकी झाली मात्र,आईच्या कष्टाची जणीव ठेवीत त्याने आपले पोलिटेक्नीकचे शिक्षण पूर्ण केले.काही काळ संभाजीनगरमध्ये नोकरी केली,नंतर बाजारागावातील मृत्यूच्या कंपनीत चार महिन्यांपूर्वीच रुजू झाला होता..लहान भाऊ सावन व आई शीला पटले यांच्या समोर आता मोसम कुठेही नाही,आहे ती कंपनीने दिलेले वीस लाख व शासनाने दिलेले ५ लाख अशी २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई….!
याच स्फोटात कारंजा घाडगे(जि.वर्धा)येथील तीन तरुणींचा देखील मृत्यू झाला.कारंजा येथे आपल्या भावाच्या घरी,तिच्या दोन मुलांचा सांभाळ करीत पुष्पा श्रीरामजी मानापूरे(वय ३८ वर्ष)या सोलार कंपनीत कामावर होत्या.रविवारी पहाटेच आपल्या मुलांचा लाड करीत त्या कामावर गेल्या होत्या….!त्या मुलांच्या जन्मदात्रीच्या मृत्यूची किंमत पंचवीस लाख रुपये आता त्यांच्या नातेवाईकांना मिळाली असावी…!कन्नमवार गांवातील २० वर्षीय स्वेताली दामोदर मारबते ही तीन वर्षांपूर्वी साेलार कंपनीत रुजू झाली.घरची परिस्थिती अतिशय हलाकीची.आई-वडील दोघेही रोजमजुरीची कामे करणारी.त्यांना तिन्ही मुलीच होत्या.स्वेताली हीच त्यांचा मूलगा होऊन सोलार कंपनीजवळील कोंढाळी येथे खोली भाड्याने घेऊन नोकरी करीत होती.कंपनीच्या गाडीने ती कामावर जाणे-येणे करीत होती मात्र,त्या रविवारी कंपनीत तिचे जाणे तर झाले…येण मात्र अवयवांच्या रुपात मेडीकलमध्ये झाले…!
रुमीला विलास उईके ही तालुक्यातील जंगल क्षेत्रात असलेल्या ढगा या गावची रहीवासी.उईके कुटूंबाची परिस्थितीही अतिशय बेताची.गावावरुन दररोज जाणे-येणे शक्य नसल्याने ती पण कोंढाळीत खोली भाड्याने घेऊन राहत होती.तिच्या मृत्यूची बातमी गावात येऊन धडकताच तिच्या कुटूंबियांनी एकच हंबरडा फोडला.तिच्या मृत्यूच्या दु:खापेक्षा ती ज्या पद्धतीने जग सोडून गेली,ते भयंकर वदेनादायी ठरले होते…!यूनिट मधील १२ कामगारांपेैकी ज्या ९ कामगारांचा मृत्यू झाला त्यापैकी एक दूर्देवी मृत्यू रुमीलाचासुद्धा होता…!
भूजच्या २३ वर्षीय भाग्यश्री लोणारेची शाेकांतिकाही नि:शब्द होती.चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीपासून सुमारे ३० किमी अंतरावरील भूज़ हे तिचे छोटेसे गांव.कुटूंबात सर्वात लहान. पुढच्या वर्षी तिचा विवाह करण्यासाठी स्थळ पाहणे सुरु होते.तिचे वडील अल्पभूधारक शेतकरी तर तीन मोठ्या बहीणींचे लग्न झाले होते.तिने नर्सिंगचे शिक्षण घेतले होते.मात्र,घरची हलाकीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता तिने सोलार कंपनीमध्ये जोखिमेची नोकरी स्वीकारली.नेहमीसारखी भाग्यश्री सकाळच्या पाळीत कंपनीमध्ये दाखल झाली,ती चिंधड्या होऊनच त्या रविवारी बाहेर पडली..!
मिता प्रमोद उईके हिचा २०१४ साली विवाह झाला मात्र,दोन वर्षातच पतीपासून वेगळे व्हावे लागले.आई माया व वडील अर्जून यांनी नातवासह तिचा सांभाळ केला.मिताला ९ वर्षाची मुलगी आहे.ती अंबाडा येथे तिस-या वर्गात शिकते.आई ऐवजी आता तिच्या नशीबात आले पंचवीस लाख रुपये…!कुठल्याही स्फोटांचा आघात दीर्घकाळ असतो,त्याची भरपाई पंचवीस लाख रुपये कधीही करु शकत नाही,हे मायबाप सरकार व कंपनीच्या मालकाला माहिती नाही का?
निव्वळ व्यवसायिक लाभातून माणूसकीप्रती आज मालकाच्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत की अश्या स्फोटानंतर सोलर कंपनीला दरवेळी छावणीचे स्वरुप प्राप्त होतं.गरीबांचं आंक्रदन त्या उधवस्त भिंतीपर्यंत पोहोचू नये यासाठी जागोजागी कंपनीचे खासगी सुरक्षाबळासोबतच पोलिसांची चमू तिथे पहारा देते.निर्दोष कामगारांचे जीव जाऊ नये यासाठी सरकारकडे तर कोणतेही प्रभावी धोरणच नाही.या कंपनीत अकुशल असलेले हजारो कामगारांचा जीव धोक्यात आहे.या कपंनीत सुरक्षा नियमांचे कोणतेही पालन केले जात नाही.२०१८ मध्ये या कंपनीत अशीच घटना घडली होती तेव्हा मृतांच्या कुटूंबियांना २५ लाख रुपये देण्यात आले होते.स्फोटके तयार करणा-या कंपनीत अकुशल कामगार ठेवणे हे कायद्याला धरुन आहे का?कामगारांचे शोषण करणा-या कंपनीच्या मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी विधान सभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.आमदार अनिल देशमुख यांनी देखील सरकारला जाब विचारला होता,यानंतर याच मुद्दावर विरोधकांनी अगदी सभात्याग देखील केला मात्र,या नंतर सर्वस्तरावर ‘सोयीस्कर’ श्मशान शांतता पसरली अन्…४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री पुन्हा अनेकांच्या पायांचे लचके तोडणारा त्याच कंपनीत त्याच युनिटमध्ये स्फोट झाला….!
लष्काराला लागणारे‘ट्रायनाट्रोटॉल्विन‘रसायन डबाबंद करताना १७ डिसेंबर २०२३ रोजी तो स्फोट झाला होता.नऊ श्रमिकांच्या अक्षरश:चिंधड्या उडाल्या.एवढी मोठी दुर्घटना झाल्यावर देखील नेहमीसारखीच सुरक्षा व गोपनयीतेच्या नावाखाली मृतकांच्या कुटूंबियांना,नातेवाईकांना,प्रचार-प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कंपनीत प्रवेश नाकारण्यात आला.मूळात जिवंत माणसांच्या इतक्या सहज चिंधड्या उडविणारा हा उद्दामपणा अंगात कोणाच्या बळावर येतो?या प्रश्नाची उकल अद्याप होऊ शकली नाही….!

(छायाचित्र : ४ सप्टेंबर २०२५ च्या स्फोटात आपले दोन्ही पाय गमावलेला व वेदनेने विव्हळत असलेला कामगार!)
महत्वाचे म्हणजे याच कंपनीला भारतीय लष्करासाठी नऊ हजार ‘पिनाका‘रॉकेट बनविण्याचे कंत्राट याच सोलर कंपनीच्या उपकंपनीला मिळाले असल्याची माहिती एका केंद्रीय मंत्र्यांच्या पुढाकारातून नागपूरकर जनतेला मिळाली.त्या मंचावर कंपनीचे मालक देखील उपस्थित होते.देशाच्या संरक्षणासाठी ४८ हजार कोटी रुपयांच्या अत्याधूनिक सामग्रीचे उत्पादन महाराष्ट्रात होणार असल्याचा आनंदही त्या मंचावरुन व्यक्त झाला होता.मात्र,हा आनंद नऊ कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अकाली कानठाल्यात लगेचच विरुन गेला….!
सत्यनारायण नंदलाल नुवाल यांनी १९९५ मध्ये सोलर ग्रुप्सची स्थापना केली असून सध्या ही कंपनी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त औद्योगिक स्फोटके उत्पादनासाठी ओळखली जाते.३ लाख मेट्रिक टन स्फोटकांचे वार्षिक उत्पादन पार करणारी सोलर ग्रूप ही देशातील पहिली कंपनी आहे.२०१८ मध्ये या कंपनीत स्फोट झाला होता त्यावेळी एका कामगाराचा मृत्यू झाला होता.तो देखील अवघ्या २३ वर्षाचा तरुण होता.सायंकाळी साडे सहाच्या सुमारास बारुद भरलेल्या पाईपची स्वच्छता करताना भीषण घर्षण होऊन अचानक स्फोट झाला.यात तुषार प्रभाकर मडावी याचा जागीच मृत्यू झाला तर तीन कामगार गंभीर जखमी झाले.यानंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी नऊ कष्टकरी कामगारांचा सहज जीव घेणारा स्फोट झाला.सकाळी ८.४३ वाजता सीबीएच-२ यूनिटमध्ये टीएनटी(ट्राय-नायट्रो)पॅकेजिंगदरम्यान प्रचंड मोठा स्फोट झाला.सहा महिला व तीन पुरुष यांच्या अवयवांचाही कोळसा झाला.
या स्फोटाची सर्व विभागांमार्फत चौकशी सुरु आहे,अशी माहितीही तत्कालीन कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत दिली होती.नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेची मागणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह सत्तापक्षातील भाजपचे आमदार प्रवीण दटके,सचिन अहीर,शशिकांत शिंदे यांनी केली होती.त्या चौकशीचे पुढे काय झाले?कोणावर ठपका ठेवण्यात आला?कोणाला शिक्षा झाली?९ कामगारांचा जीव घेणा-यांना तुरुंगात जाण्यापासून कोणी वाचवले?याची उत्तरे वेळीच मिळवली असती तर ४ सप्टेंबरच्या स्फोटात अतिशय तरुण मुलगा मयूर गणवीर याचा कदाचित जीव वाचला असता,२४ कामगार जखमी झाले नसते,त्यातील दोन कामगारंानी कायमचे आपले पाय गमावले नसते..!त्या पायांचे माेल कंपनीचे मालक आणि मायबाप सरकार किती देणार आहे?२५ लाख…५० लाख ?सरकारी नोक-याच बंद असल्याने कष्टकरी गोर गरीबांसाठी नोकरीचा मार्गच मृत्यूचा मार्ग बनला आहे.कुठे आहेत कामगार कायदे?राज्य आणि केंद्र सरकारची कामगारांसाठीची धोरणे?फक्त निवडणूकीच्या काळात कामगारांना किट वाटणे एवढेच महत्व त्यांच्या लेखी उरले आहे…!

(छायाचित्र : सोलार कंपनीत ४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या स्फोटात या कामगाराचा पाय निखळून पडला!)
आसपासचे गावकरी सांगतात जीवघेणी स्फोटके हाताळणा-यांना फक्त दहा हजार रुपये पगार मिळतो…ओव्हर टाईम करण्याची देखील सक्ती असते.यामुळे अगदी थोडीशी चूक…क्षणार्धात आयुष्याच्याच चिंधड्या उडवते.याच परिसरात चामुंडी एक्सप्लोसिव(धामणा)केलटेक एक्सप्लोझिव्ह(गरमसूर)सोलर इंडस्ट्रीज(चाकडोह)इकॉनॉमिक्स एक्सप्लोझिव्ह(सावंगा)डिफेन्स(सावंगा)फटका गोदाम(सावंगा)ओरिएंटेड एक्सप्लोझिव्ह(खापरी रिठी)आमिन एक्सप्लोझिव्ह(ढगा)एसबीएल एक्सप्लोझिव्ह(राऊळगाव)सोलर एक्सप्लोझिव्ह(राऊळगाव)एशियन फायर वर्क(कोतवालबर्डी)स्फोटक कंपन्या आहेत.मूळात स्फोटक कंपन्यांना ग्रामपंचायतीने परवानगी देऊन चुकीचे केले असल्याचा गावक-यांचा आरोप आहे.स्फोटक कंपन्या या गावाबाहेरच पाहिजे,अशी मागणी करुन ते दमले आहेत.
१३ जून २०२४ राेची चामुंडा एक्सप्लोझिव्हमध्ये झालेला स्फोट-
या स्फोटात देखील ९ कामगारांचा मृत्यू झाला होता.धामणा येथील चामुंडी एक्सप्लोझिव्ह कंपनीतील स्फोटाने संपूर्ण गाव भीतीच्या सावटाखाली आले.सहा तास जखमी किंचाळत होते,पाणी द्या म्हणून विव्हळत होते परंतू त्यांना पाणी द्यायलाही कोणी समोर आला नाही.कंपनीचा मालक दडून बसला असल्याचा संताप गावक-यांनी व्यक्त केला होता.गावक-यांनीच एका एकाला रुग्णवाहिकेमध्ये टाकून रुग्णालयात पोहोचवले.त्या स्फोटात जी तरुणी मृत्यू पावली तिच्या घरापर्यंत एक ही नेता पाेहोचलाच नाही.
टेलियम ॲण्ड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन(पेसो)ने या स्फोटाची चौकशी करुन आपला अहवाल जिल्हा दंडाधिकारी व पोलिस आयुक्तांकडे सोपवला.यात या कंपनीचा परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती.पेसोने कंपनीला परवाना रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.स्फोटाच्या वेळी खोलीत क्षमतेपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते.ही सुरक्षेतील फार मोठी चूक होती.त्या खोलीत इन्वहर्टर ठेवल्याचे तपासात आढळून आले.ज्या ठिकाणी गनपावडर असते किंवा बंदुकीशी सबंधित काम केले जाते तेथे इन्वहर्टर सुरक्षेच्या दृष्टिने धोकादायक मानले जाते.या घटनेनंतर डझनभर शासकीय विभाग स्टॅडर्ड ऑपरेशन प्रोसेस(एसओपी)तयार करण्यात व्यस्त झाली होती.यात पोलिस,पीईएसओ,कामगार विभाग,एमपीसीबी,महसूल विभाग,महावितरण,अग्निशमन इत्यादी यांचा समावेश होता.भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर एसओपी काम करीत होती,पण…..!
२४ जानेवरी २०२५ रोजी ऑर्डनन्स फॅक्टरीमधील स्फोट-
भंडारा येथील जवाहरनगर आयुध निर्माणातील कमी तापमानाच्या प्लास्टिक स्फोटक विभागात सकाळी १० वा.च्या सुमारास भीषण स्फोट झाला.यात ८ कामगारांचा मृत्यू झाला.५ गंभीर जखमी झाले.हा स्फोट इतका भीषण होता की,त्यामुळे मोठा खड्डाच पडला,त्यात संपूर्ण इमारतच कोसळली.सुमारे १५ किलोमीटरच्या परिसरात स्फोटाचे हादरे बसले.या कंपनीत संरक्षण विभागाकरिता आरडीएक्स ही विस्फोटके तयार केली जात होती.कंपनीतील ‘टी-२३ एलटीपी’विभागाच्या इमारतीत सकाळच्या पाळीत १३ कर्मचारी काम करीत होते.दहा वाजताच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला.इमारत कोसळल्याने संपूर्ण कामगार मलब्याखाली दबले.या घटनेच्या चौकशीसाठी देखील एसआयटी गठीत करण्यात आली होती…..!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला….!
या स्फोटात अंकित बारई हा २० वर्षाचा तरुण तसेच सुनील यादव या २४ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला.इतर कामगारांमध्ये ५५,५१,३८,३५,३२ आणि ४२ वर्षीय कामगार होते.याच कंपनीत २००५ साली एनआर विभागात झालेल्या स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू झाला होता.२००८ साली बीटी विभागात झालेल्या स्फोटात ५ कर्मचा-यांचा मृत्यू झाला होता.२७ जानेवरी २०२४ रोजी स्फोटात एका कर्मचा-याचा मृत्यू झाला तर २४ जानेवरी २०२५ रोजी आठ कामगार हकनाक मृत्यू पावले.या ही स्फोटांनंतर अकुशल कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
त्या पूर्वीही १९९६-१९९७ मध्ये देखील असाच स्फोट याच आयुध निर्माण कंपनीत झाला होता.त्यावेळी देखील आसपासची गावे हादरली होती.त्यावेळी देखील ग्रामस्थांची भिती दूर करण्यासाठी या कंपनीच्या व्यवस्थापक व मालकाने कोणताही पुढाकार घेतला नाही.त्याबाबत प्रसारमाध्यमांनी संताप व्यक्त केल्याने भारतीय सेनेच्या नागपूर येथील तत्कालीन जनसंपर्क अधिका-यांनी हस्तक्षेप करुन एक स्वतंत्र दौरा त्या स्फोटाच्या काही दिवसांनंतर आयोजित केला होता.कंपनीच्या वतीने रात्री सव्वा नऊ वाजता अधिकृत पत्रक काढून घटनेसंबंधी फक्त माहिती देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
६ फेब्रुवरी २०२५ एशियन फायर वर्क मध्ये झालेला स्फोट-
काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथे असलेल्या एशियन फायर वर्क या बारुद कंपनीत रविवारी दीड वाजताच्या सुमारास शक्तीशाली स्फोट झाला,यात दोन कामगारांचा भाजून कोळसा झाला!तर तीन कामगार गंभीर जखमी झाले होते.भुरा लक्ष्मण रजत वय वर्ष २५ व मुनीम मडावी वय वर्ष २९ दोघेही राहणार शिवनी(मध्यप्रदेश)अशी मृतकांची नावे आहेत.या कंपनीत गन पावडर व वातीची निर्मिती केली जाते.सोहेल आमिन असे या कंपनीच्या मालकाचे नाव आहे.नियमापेक्षा अधिक साठा या इमारतीमध्ये केल्यामुळे स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती.या ही कंपनीत कामगारांसाठी सुरक्षेचे कोणतेही उपाय नव्हते.
कंपनीच्या एका युनिटमध्ये वाती बनविण्याचे काम सुरु असतानाच दूपारी जेवणाची वेळ झाली.त्यामुळे काही श्रमिक वगळता सात महिला, श्रमिकांसह यूनिटच्या बाहेर जेवणासाठी आले.झाडाखाली बसून त्यांनी डबे उघडले.एक घास घेत नाही तोच भयंकर स्फोट झाला.भीषण आग लागली.श्रमिकांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र,दोन तरुण कामगारांचा कोळसा झाला होता.या दृष्याने अन्य कामगारांच्या मनाचा थरकाप उडाला होता.या कंपनीत सकाळी ६ ते दुपारी ४ वाजतापर्यंत १५ महिलांसह ३१ श्रमिक काम करीत होते.घटनेच्या वेळी यूनिट व कंपनी परिसरात ७ कामगार होते उर्वरित जेवणासाठी बाहेर पडले होते.तीन वेळा झालेल्या स्फोटात तीन जण जखमी तर दोघांचा मृत्यू झाला.कंपनीच्या आगीची झळ परिसरातील जंगलालाही बसली.जंगलातील झाडे जळून राख झाली.
जखमींच्या उपचारात हयगय नको,जखमींना आवश्यक ते उपचार उपलब्ध करुन द्या,असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले…!स्फोटात मृत्यू पावलेल्या तरुणांच्या कुटूंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचेही ते म्हणाले.शरदचंद्र पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी कंपनीच्या मालकाने सुरक्षेबाबत कोण्यातही उपाययोजना केल्या नाहीत,या प्रकरणात मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा ही त्यांनी दिला…..!
थोडक्यात,या सर्व स्फोटांची कीवंदती एवढीच आहे,सरकारी यंत्रणेचे हात ओले गेले,नियम,कायदे पायदळी तुडवून सुरक्षा यंत्रणेला टांगणीला टांगून जीवघेण्या स्फोटकांची निर्मिती केली ,राजकीय कद्दावर नेत्यांच्या सोबच मंच शेअर केला,हजारो कोटींची सरकारी कंत्राटे मिळवली,टक्केवारी सांभाळली की अशा घटनांना काहीही महत्व नसतं. काही काळानंतर आपोआप अश्या घटना जनतेच्या स्मरणातून विस्मरणात जातात.दूर्घटनेनंतरची लक्तरे पांघरण्यासाठी कोणाकडेही उसंत नाही.वीस-पंचवीस लाखांचा मोबदला दिला की जीवाची किंमत उरत नाही.आतापर्यंत स्फोटात मृत्यू पावलेल्या एका ही कुटूंबियाने न्यायालयाचे दार ठोठावले नाही,‘सोसण्याची सवय झाली की…!
………………………………………….