Advertisements

‘महादेवीची’वनतारावर अवकृपा:चौकशीसाठी एसआयटी गठीत!
माजी न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर समितीचे अध्यक्ष
प्राण्यांची विक्री-खरेदी व्यवहराची होणार चौकशी
नागपूर/गुजरात: रिलायंस फाऊंडेशनच्या वाईल्डलाईफ रेस्क्यू,रिहैबिलिटेशन सेंटर(वनतारा)च्या चौकशीसाठी आज सर्वोच्च न्यायालयााने चार सदस्यीस विशेष तपास पथक(एसआयटी)गठित केली आहे. वनतारा हे केंद्र रिलायंस फाऊंडेशनतर्फे संचालित होतं.सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले, की एसआयटी वनतारामध्ये भारत आणि परदेशातून प्राण्यांना पाठविताना वन्यजीव संरक्षण कायदा तसेच आंतरराष्ट्रीय कराराचे पालन झाले आहे किवा नाही,याची चौकशी करेल.
एसआयटीला १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत आपला अहवाल सादर करायचा आहे.महत्वाचे म्हणजे एसआयटी प्राणी कल्याण,आयात-निर्यात कायदा,वाइल्डलाईफ तस्करी,पाणी आणि कार्बन क्रेडिटचा दुरुपयोग यासारख्या बाबींचा देखील तपास करणार आहे.एसआयटीची अध्यक्षता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे.चेलमेश्वर करणार असून उत्तराखंड व तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराले व कस्टम अधिकारी अनिश गुप्ता यांचा या एसआटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी या हत्तीणीला गुजरातच्या वनतारा येथे न्यायालयाच्याच आदेशाने हलविण्यात आले होते.मात्र,तीन दशकांहून अधिक काळ संपूर्ण पंचक्रोशित महादेवी हत्तीणीचा लळा लागेलेले हजारो ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरले.पोलिसांच्या कारवाईची पर्वा न करता,हत्तीणीला नेऊ देणार नाही,असा पवित्रा घेतला.गुन्हे अंगावर झेलले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोलिस बंदोबस्तात ज्यावेळी महादेवीची गुजरातकडे मिरवणूकीने पाठवणी केली त्यावेळी हजारो जणांना अश्रू अनावर झाले.नांदणी हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील गाव.या गावात जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीचे मठ संस्थान आहे.तब्बल ७४३ गावांशी या मठाचा संपर्क आहे.या मठाकडे तब्बल १२०० वर्षांपासून हत्ती बाळगण्याची परंपरा आहे.
याचाच एक भाग म्हणून गेल्या ३३ वर्षापासून माधुरी उर्फ महादेवी नावाची हत्तीण मठात होती.एवढ्या वर्षात जिल्ह्यातच नव्हे तर,सीमा भागातील सगळ्यांनाच तिचा लळा लागला होता.आपल्या घरातीलच कोणी असलयासारखं तिच्यावर सर्वांचं अतोनात प्रेम होतं.पण अचानक तिला घेऊन जाण्यासाठी एक पथक आलं,आणि संपूर्ण गाव त्यांना विरोध करण्यासाठी एकजूट झाले.थेट दगडफेक पोलिसांवर करण्यात आली.परिणामी शंभरावर नागरिकांवर गुन्हा दाखल झाला.
सर्व धर्मियांच्या धार्मिक उत्सवात महादेवीचा सहभाग असायचा.मोठी स्पर्धा जिंकली की,विजेत्याची हत्तीणीवरुन विजयी मिरवणूक निघत असे.धार्मिक कार्यक्रमासाठी महादेवीची नेहमीच मागणी राहत असे.१९९२मध्ये कर्नाटकच्या जगंलातून महादेवी ही मठात दाखल झाली होती.तेव्ह ती अवघे सहा वर्षांची होती.महादेवीला खाऊ घालणं,तिचं दर्शन घेणं,तिच्याकडून आपल्या डोक्यावर सोंड ठेऊन घेऊन तिचे आर्शिवाद घेणं,हे नित्यनियमाचेच होते.तिच्या तंदुरुस्तीसाठी दररोज तिला दहा किलोमीटर फिरवलं जायचं.दर तीन महिन्यांनी तिची वैद्यकीय तपासणी होत असे.तिच्या चारा-पाण्यावर मोठा खर्च केला जात असे.

तिला लागणा-या चा-यासाठी तब्बल १७ एकर जमिनीवर मका,गवत,ऊस असा चारा पिकवला जात असे.तिचा वाढदिवस दरवर्षी धुमधडाक्यात साजरा केला जात असे.सांस्कृतिक समारंभ असो किंवा पंचकल्याण महोत्सव,महादेवी हत्तीणीशिवाय कोणताही कार्यक्रम पार पडला जात नव्हता.महादेवी हत्तीणीची उपस्थिती म्हणजे कार्यक्रमाची शोभा राहत होती.सगळ्यांचीच तिच्याशी भावनिक व अध्यात्मिक नाते घट्ट झाले होते.ती मठात मस्तच रमली होती.कुणालाही तिची काही अडचण नव्हती.गावात फेरफेटका मारताना पाहून ग्रामस्थांना तिचा अभिमान वाटत होता.लहान मुलांशी तिची चांगली गट्टी जमली होती.
तब्बल ३३ वर्ष सगळं काही सुरळीत सुरु असताना एक दिवस ‘पेटा’ या संस्थेने या हत्तीणीची नीट काळजी घेत नसल्याची तक्रार केली आणि न्यायालयीन लढ्याचा श्रीगणेशा झाला.‘पेटा’च्या तक्रारीमुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली.या समितीने महादेवीला गुजरात येथील ‘वनतारा’या वन्यजीव संवर्धन प्रक्लपात पाठविण्याची शिफारस केली.अशी शिफारस झाल्याने मठाचे पदाधिकारी हळहळले.त्यांनी या निर्णयाच्या विरोधात गेल्या वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयापर्यंत गेले.उच्चाधिकार समितीने आपली बाजू न ऐकताच निर्णय दिल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यांनी नाेंदवला.न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा समितीकडे पाठवले व मठाची बाजू ऐकून घेण्याचे निर्देश दिले.
न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा नव्याने प्रक्रिया सुरु झाली.आणखी एक उपसमिती नेमण्यात आली.या समितीने मठाला अनेक सूचना केल्या.ही सारी प्रक्रिया सुरु असतानाच या हत्तीणीचा ताबा वनताराकडे देण्याचा आदेश गेल्या वर्षी देण्यात आला…!या विरोधात मठाने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली.प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं पण,शेवटी हत्तीणीचे वय व आरोग्य या गोष्टी पहाता महादेवीला वनतारामध्ये हलविणं गरजेचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले,व महादेवीची रवानगी वनतारामध्ये झाली.
महादेवीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात कायद्याची लढाई पुन्हा सुरु झाली.१४ ऑगस्ट रोजी यावर पहिली सुनावणी पार पडली त्यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील सी.आर.जया सुकीन यांनी वनतारावर अनेक गंभीर आरोप केले.यावर न्यायमूर्ती पंकज मित्तल व पी.बी.वराळे यांनी वनताराला प्रतिवादी बनवण्याची सूचना केली व याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले.आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी यावर सुनावणी पार पडली व न्यायालयाने आज माजी न्यायमूर्ती जे.चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेत वनताराची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत केली.या पूर्वी ११ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महादेवीला वनतारामध्ये हलविण्यासंबंधी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास संमती दिली होती.
वनतारासाठी गडचिरोलीतील तीन हत्तीचे ‘अपहरण’-
नांदणीच्या महादेवीला स्पर्श करण्यापूर्वीच २०२२ च्या दरम्यान वनतारा प्रकल्पासाठी वनविभागाच्या अहेरी तालुक्यातील ‘पातानील’ हत्ती कॅम्पमधील जगदीश,जयलक्ष्मी व विजय या तिनही हत्तींना मध्यरात्रीच नेण्यात आले होते!हे हत्तींचे एकप्रकारे सरकार नियोजित अपहरणच होतं.या तिन्ही हत्तींची वनतारामध्ये पाठवणी नियमानुसार किवा कोणत्याही न्यायलयाच्या आदेशानुसार झाले असते तर नांदणीत निघाली तशी वाजत-गाजत मिरवणूक काढून इथल्या नागरिकांनी देखील त्यांना लळा लागलेया या तिनही हत्तींची पाठवणी केली असती,मात्र,असे घडले नाही.महादेवीसारखे भाग्य जगदीश,जयलक्ष्मी व विजयच्या वाट्याला आले नाही किंबहूना कोल्हापूरसारखा लढा गडचिरोलीला साधता आला नाही.
खरं तर वनतारा प्रकल्पाचा खरा डोळा हा पातानील पासून जवळच असलेल्या ‘कमलापूर’ कॅम्पसच्या हत्तींवर होता आणि अजूनही आहेच!फक्त इथून हत्ती गायब करताना स्थानिकांचा विरोध किती होतो याची लिटमस टेस्ट घ्यायला पातानीलचा प्रयोग करण्यात आला,असे आता बोलले जात आहे.गडचिरोलीकरांनी कडवा विरोध करुन कमलापूरपर्यंत पोहोचणारे वनताराचे हात रोखून धरले.सध्या जिल्हावासी त्यातच समाधानी आहेत.आता पातानीलचे तिनही हत्ती परत आणण्यासाठी कोण पुढे येणार?याची त्यांना वाट आहे.महत्वाचे म्हणजे कोल्हापूरची एक हत्तीणी वनतारामध्ये पळविली तर देशात गजहब झाला.पण गडचिरोलीती तीन हत्ती नेले तरी ना हाक ना बोंब झाली!
कमलापूरचं संकट तूर्तास टळलं,असं समाधान गडचिरोलीतील ग्रामस्थांनी मानून घेतले असून पराकोटीची समाधानी वृत्ती हे गडचिरोली जिल्ह्याचं व्यवछेदक लक्षण आहे.वर्षानुवर्षे अन्याय हीच या जिल्ह्याची ओळख आहे.
‘पेटा’ने केलेल्या तक्रारीत महादेवी हत्तीणीला तासनतास उभे ठेवल्या जात होते,तिला मिरवणूकीत सहभागी केल्या जात होतं,साखळदंडातून बांधून ठेवण्यात येत होतं.तिला मुक्त राहू दिल्या जात नव्हतं,अशी कारणे पुढे केली होती.मात्र,पातानीलचे हत्ती तर रात्रंदिवस साखळ दंडोने बांधले जात नव्हते.पातानील व कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींच्या पायाला साखळदंड नक्कीच असतात मात्र,ते हत्ती जंगलात मुक्त संचार करतात तेव्हा त्यांचा मागोवा घेणे,त्यांना परत आणण्यात सोयीचे जावे या आवाजासाठी ते बांधले गेले होते.या हत्तींवर माहूत कधीही स्वार झाले नव्हते.त्यांना कोणत्याही मिरवणूकीत मिरवले जात नव्हते.वनविभागाकडून त्यांची वेळोवेळी काळजी घेतली जात होती.आरोग्याचीही काळजी घेतली जात होती.
असं सगळं असताना, पातानीलच्या हत्तींना मध्यरात्री लपून छपून सरकारी सहाय्याने वनतारामध्ये पळवून नेण्यात आले!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत.महादेवीसाठी कोल्हापूरवासियांच्या भावना बघता त्यांनी महादेवीला परत आणण्यासाठी अनंत अंबानींसोबत संवाद साधला,प्रसंगी न्यायालयात जाण्याचा मार्ग देखील स्वीकारण्याची तयारी दर्शवली.असे असताना आता त्यांच्याच गडचिरोलीतून एक नव्हे तर तीन हत्ती वनताराने पळवले,यासाठी ते कोणती भूमिका घेतात?याकडे आता गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे.
…………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
