Advertisements

दीक्षाभूमी महिला प्राध्यापिका विनयभंगाची घटना
पिडीतेच्या मागे ‘संविधान बचाओ आंदोलन ‘संघटना ठामपणे उभी राहणार
भन्ते सुरई ससाई यांनी त्वरित राजीनामा देत फक्त धम्माचे कार्य करावे
ॲड.मिलिंद खोब्रागडे यांची पत्रकार परिषदेत मागणी
नागपूर,ता.२२ ऑगस्ट २०२५: गेल्या काही दिवसांपासून अनेक दैनिकांमध्ये व डिजिटल माध्यमांमध्ये पवित्र दीक्षाभूमी परिसरातील परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील उच्च विद्याभूषित महिला प्राध्यापकासोबत घडलेल्या दूर्देवी व धक्कादायक घटनेच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे.ते वाचून त्याच महाविद्यालयात १९९५-१९९६ या काळात शिकलेल्या आमच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला.त्या महाविद्यालयाशी आमचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत,त्यामुळे त्या महाविद्यालयाच्या नावलौकिकाला आम्ही गालबोट लागू देणार नाही,परिणामी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी -प्राध्यापक संघटना तसेच ‘संविधान बचाओ आंदोलन’ संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आम्ही पिडीत प्राध्यापिकेच्या न्यायासाठी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ॲड.मिलिंद खोब्रागडे यांनी आज पत्रकार भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.त्या प्राध्यापिकेसोबत फक्त विनयभंगाची घटना घडली नाही तर या पूर्वी देखील त्यांचा हात पकडून बळजबरीचा प्रयत्न झाला आहे,असा धक्कादायक आरोप ॲड.खोब्रागडे यांनी केला.त्यांना ही माहिती पिडीतेकडून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मी डॉ.आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी संघटनेकडून अध्यक्ष पदावर देखील निवडून आलो होतो,अशी माहिती ॲड.खोब्रागडे यांनी दिली.पवित्र दीक्षाभूमीची पवित्रता व डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या पावित्र्य व प्रतिमेला धक्का लागू नये यासाठी आमच्या पिढीने अथक परिश्रम घेतले आहे.यासाठी विद्यार्थी जीवनात पराकोटीचा संषर्घ ही केला.आमच्या काळात महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकाच नव्हे तर विद्यार्थिनींकडे देखील डोळे वर करुन बघण्याची कोणाची ताब नव्हती.मात्र,याच महाविद्यालयात एका महिला प्राध्यापिकेसोबत जी विनयभंगाची घटना घडली,ती धक्कादायक असून त्या विरोधात आम्ही जनक्षोभ पेटवून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
आरोपी अरुण जोसेफ हा अकाऊंटट पदावरुन निवृत्त झाल्यानंतर देखील त्यालाच पदावर कायम ठेवणे या मागे निश्चितच आर्थिक व्यवहाराचे काळेबेरे असल्याचा आरोप त्यांनी केला.त्याला मरेपर्यंत पदावर ठेऊन समितीच्या पदाधिका-यांना नेमके काय झाकून ठेवायचे आहे?असा प्रश्न त्यांनी केला.रवि मेंढे हा आरोपी याने तर दुष्कृत्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या,स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते सुरई ससाई यांनी रवि मेंढेला स्वत:जवळ पूर्वीसारखेच स्वत:च्या सेवेसाठी ठेवावे,दीक्षाभूमी तसेच डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात देखील रवि मेंेढेचा अवैध वावर हा नियमाला धरुन नाही.स्मारक समितीचे पदाधिकारी रवि मेंढे व अरुण जोसेफ यांच्या दूष्यकृत्याला पाठींबा देत आहेत,त्यांच्या भ्रष्टाचाराला व अनाचाराला खतपाणी देत आहेत.सुधीर फुलझेले यांचा यात प्रमुख वाटा असल्याचा आरोप याप्रसंगी त्यांनी केला.
पिडीत प्राध्यापिका यांच्या तक्रारीवर रवि मेंढे व सेवानिवृत्त रोखपाल अरुण
जोसेफ यांच्या विरुद्ध विनयभंगाचा फौजदारी गुन्हा बजाज नगर पाेलिसांनी नोंदवला. या तक्रारीत सत्य आढळल्यानेच पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.आरोपींना जरी अटक पूर्व जामीन मिळाला असला तरी ज्या कलमा या गुन्ह्यात लागल्या आहेत ते बघता येत्या २५ ऑगस्ट रोजीच्या सुनावणीत आरोपींना अटक देखील होऊ शकते.पोलिसांनी या दोन्ही अारोपींवर आणखी गंभीर कलम लावणे गरजेचे आहेत कारण रवि शेंडेने फक्त त्याच दिवशी प्राध्यापिकेकडे शरीर सुखाची मागणी केली नव्हती तर त्या पूर्वी देखील वाईट उद्देशाने त्यांचा हात पकडला होता,व बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता,असा आरोप ॲड.खोब्रागडे यांनी केला. महाविद्यालयातील इतर विभाग सोडून या प्राध्यापिकेच्याच झूलॉजी विभागात त्यांना त्रास देण्याच्या उद्देशानेच सीसीटीव्ही लावण्यात आल्याची पुश्ती त्यांनी जोडली.
दोन वर्षांपूर्वी अशीच एक दूर्देवी घटना आरोपी अरुण जोसेफकडून झाली असल्याने पिडीत प्राध्यापिकेने देखील बजाज नगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली होती मात्र,त्या वेळी पिडीतेच्या पाठीशी कोणीही उभे न राहील्याने त्यांनी हे महाविद्यालयाच सोडले.यामुळे आरोपींचे धाडस आणखी वाढले व त्यांनी बाबासाहेबांची चरणधुळी ज्या पवित्र दीक्षाभूमीला लागली त्याच पावन भूमीला गालबोट लावण्याचे अशलाघ्य काम केले,असा संताप त्यांनी व्यक्त केला.
महत्वाचे म्हणजे डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या या एक महिला असून देखील त्यांनी पिडीत प्राध्यापिकेची साथ देण्या ऐवजी आरोपींच्या बाजूने उभे राहील्या.या विरोधात देखील जनआंदोलन उभारले जाईल,आमचे महाविद्यालय,आमचे अभिमानस्त्रोत हे समितीच्या पदाधिका-यांच्या हातचे बाहूले बनून काम करणा-यांसाठी कदापि नाही.त्यामुळेच या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष या नात्याने मी सर्व माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला,यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ.पूरणचंद्र मेश्राम, शरद बोरकर,बबन सरदारे,ॲड.मिलिंद गाणार,अनिल लोहकरे,राजेश गायकवाड,सुरेश गाणार आदी यांनी तातडीची बैठक बोलावून पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यास समंती दिली असल्याचे ॲड.खोब्रागडे म्हणाले.
समितीतील पदाधिका-यांच्या आपापसातील हेवेदावे,राजकारण यामुळे अश्या घटना घडल्या का?असा प्रश्न केला असता,आम्हाला समितीच्या अंतर्गत गटातटाशी काही एक घेणेदेणे नसल्याचे खोब्रागडे म्हणाले मात्र,यात तथ्य आहे की समितीच्या पदाधिका-यांच्या गुटबाजीमुळेच दीक्षाभूमी व एका नामांकित महाविद्यालयाची बदनामी होणा-या घटना घडत असल्याचे खोब्रागडे म्हणाले.
भन्ते सुरई ससाई यांना अधिकार असून देखील अध्यक्ष पदावरुन पदच्यूत करण्याचे धाडस जनभावना लक्षात घेऊन आमच्याच नाही,असे काल पत्रकार परिषद घेऊन स्मारक समितीचे सचिव डॉ.राजेंद्र गवई यांनी कबूल केले,याकडे लक्ष वेधले असता,आम्ही आंबेडकरी जनतेमध्ये जाऊन सत्य सांगू,जनभावना निर्माण करु,आम्ही खैरलांजीसाठी लढणारे लढवैय्ये आहोत,दिल्लीपर्यंत आम्ही आमच्या मागणीसाठी थेट धडक दिली,त्यामुळे पिडीत प्राध्यापिकेवर झालेल्या अन्यायाला आंबेडकरी जनतेमध्ये वाचा फोडली जाईल,भन्ते यांनी आता फक्त धम्मकार्य करावे,दीक्षाभूमी व डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या कारभारापासून दूर राहवे,ही जनताच या पुढे मागणी करणार आहे,असा दावा त्यांनी केला.
मूळात,स्मारक समिती ही आंबेडकरी जनतेतून निवडून आली नाही तर वारसा हक्कातून निवडण्यात आली असल्याची बोचरी टिका याप्रसंगी डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राजेश गायकवाड यांनी केली.सुधीर फुलझेले हे सचिव पदासाठी पात्र आहेत का?सचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतही स्मारक समितीच्या व महाविद्यालयाच्या कामात कशी ढवलाढवल करतात?असा सवाल त्यांनी केला.डॉ.राजेंद्र गवई तसेच इतर काही सदस्य वारसा हक्काने समितीवर दिसून पडतात.बाबासाहेबांना वारसा हक्क नव्हे तर कतृत्व अपेक्षीत होतं.त्यामुळे ही स्मारक समितीच बर्खास्त करुन नव्याने आंबेडकरी जनतेतून समिती सदस्यांची निवड झाली पाहिजे,अशी मागणी गायकवाड यांनी केली.
पत्रकार परिषदेला ॲड.विवेक इंगळे,नामदेव निकोसे.सुखदेव मेश्राम,नलीनी भगत,प्रेमा खोब्रागडे,बाळासाहेब शंभरकर,प्रशांत बनसोड लोकेश भूरे,संजय पाटील आदी उपस्थित होते.
Advertisements

Advertisements

Advertisements
