Advertisements

दीक्षाभूमी परिसरात प्राध्यापिकेच्या विनयभंगाची घटना
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ.राजेंद्र गवई यांचा इशारा
आरोपी रवि मेंढे यांचा भन्ते यांच्या नावाखाली पवित्र ठिकाणी मनमानी व भ्रष्ट कारभार: सदस्य विलास गजघाटे यांचा आरोप
दीक्षाभूमी व महाविद्यालयात रवि मेंढे व अरुण जोसेफ यांची दहशत!
वार्धक्यामुळे भन्ते यांना अध्यक्ष पद सोडण्याचे केले आवाहन
नागपूर,ता.२१ ऑगस्ट २०२५: पवित्र दीक्षाभूमी परिसरात परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील एका उच्चविद्याभूषित महिला प्राध्यापिकेला त्या कारमध्ये बसून घरी परत जात असताना तथाकथित व्यवस्थापक रवि मेंढे याने चक्क त्यांचा हात धरत,मला घरी घेऊन चल,तुझ्या घरी कोणीही नसतं,मला खुश करुन दे,तुला प्राचार्या करुन देईल’अशी मागणी केली,यावर त्या प्राध्यापिकेने त्याला मोठ्याने ओरडून समज दिली. प्राध्यापिकेने मेंढे यांच्या विरोधात बजाज नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.१२ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेची दखल नागपूर शहरातील सर्व प्रसार व डिजिटल माध्य्मांनी घेतल्यानंतर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ.राजेंद्र गवई व सदस्य विलास गजघाटे यांनी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
रवि मेंढे हा गेल्या अनेक वर्षांपासून स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जून सुरई ससाई यांचा केअरटेकर होता.त्यांच्या शरिराची व्यक्तिगत स्वच्छता यापासून त्यांची काळजी घेण्याचे काम त्याच्याकडे होते.मात्र,१२ ऑगस्ट २०२३ रोजी रवि मेंढे याची अचानक संस्थेच्या व्यवस्थापक पदी स्थायी स्वरुपाची नियुक्ती करण्यात आली.मेंढे याच्या नियुक्ती पत्रात ‘खाजगी सचिव या पदावर नियुक्तीसह अधिकार पत्र देण्याबाबत’असे नमूद करण्यात आले.मूळात स्मारक समितीमध्ये अध्यक्षासंह इतर दहा सदस्य असताना त्यांच्या कडून या नियुक्तीबाबत कोणतीही मंजूरी मिळवण्यात आली नाही.या संबंधी अध्यक्ष सुरई ससाई यांनी बैठक देखील बोलावली नाही,ना समितीच्या इतर सदस्यांशी चर्चा करण्यात आली,असे गवई यांनी सांगितले.
समितीची अतिशय महत्वाची कामे करण्यासाठी मेंढे यांची स्थायी व्यवस्थापक म्हणून केलेली नियुक्ती ही समितीच्या घटनेतील परिच्छेद १३(V)आणि (Vi)नुसार बेकायदेशीर असल्याचे गवई म्हणाले. मूळात भन्ते सुरई ससाई वार्धक्यामुळे काहीही ऐकू किवा नीट वाचू शकत नाही,ते फक्त धनादेशावर सही करीत असतात.गेल्या दोन वर्षांपासून दीक्षाभूमी व महाविद्यालयाचा संपूर्ण कारभार हा असाच समितीच्या इतर सदस्यांना व सचिवांना विश्वासात न घेता सुरु आहे.भन्ते यांच्या वार्धक्याचा फायदा मेंढे व जोसेफसारखी माणसे लाटत आहे व पवित्र दीक्षाभूमीचे नाव अपवित्र करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नियमानुसार ११ पैकी समितीचे आठ सदस्य हे बहूमताच्या आधारावर तातडीने भन्ते सुरई ससाई यांच्यावर अविश्वासाचा ठराव पारित करुन पदच्यूत करु शकतात मात्र,आंबेडकरी समाजाची प्रखर भावना लक्षात घेऊन आम्ही हे धाडस करणे नेहमीच टाळले असे गवई म्हणाले.मात्र,आता भन्ते यांच्या वार्धक्याचा फायदा इतरच कोणी लाटत असून, त्यामुळे पवित्र दीक्षाभूमी व नामांकित महाविद्यालयाच्या बदनामीत जर होत असले तर आता भन्ते यांना पदच्यूत करण्यासाठी आम्हाला न्यायालयात दाद मागणे क्रमप्राप्त असल्याचा इशारा याप्रसंगी डॉ.गवई यांनी दिला.
आंबेडकरी समाजाप्रमाणेच आमच्यासाठी देखील भन्ते हे आदरणीय आहेत,ते धर्मगुरु आहेत,त्यांचे स्थान फार मोठे आहे मात्र,त्यांच्या वार्धक्याचा फायदा घेऊन पवित्र दीक्षाभूमी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अनागोंदी कारभार सुरु आहे जो समाजभावनेच्या नावाखाली किवा भीतीखाली आता सहन होऊ शकणार नाही,असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेे.
मेंढे यांची मजल इथपर्यंत गेली की भन्ते यांच्या नावाचा वापर करुन पिडीत प्राध्यापिकेलाच प्राचार्याच्या माध्यमातून नोटीस देण्यात आली! भन्ते यांनी पिडीतेची बाजू समितीचे अध्यक्ष म्हणून ऐकून घ्यायाला हवी होती मात्र,असे न घडल्याने आंबेडकरी समाजामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे डॉ.गवई म्हणाले.भन्ते हे कधीही गव्हर्निंग बॉडीची बैठक घेत नाही,स्मारक समितीच्या संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय परस्पर घेतले जातात,असा आरोप त्यांनी केला.
दोन वर्षांपूर्वी देखील महाविद्यालयात एका प्राध्यापिकेने अरुण जोसेफबद्दल एफआयआर नोंदवली होती.त्या प्रकरणात देखील समितीचे सदस्य,भन्ते यांच्या विराेधात आंबेडकरी समाज भावना लक्षात घेऊन पिडीतेला न्याय देऊ शकले नाही,अशी कबुली त्यांनी दिली.परिणामी,अरुण जोसेफ व रवि मेंढे हे आणखी जास्त र्निढावले.हा वाद समितीचे अध्यक्ष, सचिव व इतर सदस्य यांच्यातील नसून पवित्र दीक्षाभूमी परिसर व नामांकित महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा असल्याचे ते म्हणाले.
आंबेडकरी समाज भावनेला समितीचे सचिव व सदस्य हेच जर घाबरत असतील व त्यामुळे भन्ते यांच्या नावाखाली दीक्षाभूमी परिसर व महाविद्यालयात अशाच घटना केव्हापर्यंत घडत राहतील?असा सवाल केला असता,रवि मेंढे याला दीक्षाभूमी परिसर तसेच महाविद्यालयाच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकारी नाही,त्याने इंदाेरा येथील भन्ते यांच्या बौद्ध विहाराचे काम बघावे,मेंढे याला समितीचे आठही सदस्य महाविद्यालयात प्रवेश ही करु देऊ इच्छित नाही,त्यामुळेच मेंढे याला दिलेले बेकायदेशीर नियुक्ती पत्र त्वरित मागे घेण्यासाठी आम्ही अध्यक्षांना पत्र दिले असल्याचे डॉ.गवई यांनी सांगितले.असे न घडल्यास सह.आयुक्त धर्मादाय,नागपूर यांच्याकडे तक्रार करण्यात येईल.अशी माहिती त्यांनी दिली.
पिडीतेने रवि मेंढे व अरुण जोसेफ यांच्या विरुद्ध बजाज नगर पोलिस ठाण्यात २०२३ च्या भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत कलम ७४,३५१(२)३५२(५)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.या घटनेची माहिती मिळताच भन्ते यांनी तातडीने समितीच्या सदस्यांना सूचित करुन बैठक घ्यायला हवी होती.पिडीत प्राध्यापिकेला बोलावून त्यांची बाजू समजून घ्यायला हवी होती.आरोपी रवि मेंढे व अरुण जोसेफ यांना महाविद्यालय परिसरात येण्याची बंदी घालायला हवी होती मात्र,अशी जवाबदार भूमिका न घेता पिडीत प्राध्यापिकेला प्राचार्याच्या ई-मेल वरुन स्वत:च्या सहीनिशी रवि मेंढेविरुद्ध तक्रार का केली, अशी ’कारण दाखवा’ची नोटीस पाठवली.
नोटीसमध्ये प्राध्यापिकेला धमकावण्यात आले तुम्हाला निलंबित का करण्यात येऊ नये!आपण धर्मगुरु असताना आपल्याच महाविद्यालयात एका उच्चविद्याभूषित मागासवर्गीय प्राध्यापिकेवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न झाला मात्र,समितीचे अध्यक्ष म्हणून भन्ते यांनी पिडीते ऐवजी आरोपींचा साथ दिल्याने, स्मारक समितीच्या सदस्यांची मंजुरी न घेता व समितीच्या बैठकीत प्रस्ताव न ठेवता तुमचा हा निर्णय गैरकायदेशीर आहे, १३ ऑगस्ट २०२५ रोजी पिडीतेला पाठवलेली नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी समितीची बैठक बोलवावी,यासाठी भन्ते यांना असे पत्र पाठवले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत गवई यांनी दिली.
कायद्यानुसार ज्या ठिकाणी आठ महिला काम करीत असतात त्या खासगी नोकरीच्या ठिकाणीही ‘विशाखा समिती’ असणे बंधनकारक आहे मात्र,एवढ्या नामांकित महाविद्यालयात विशाखा समितीच नाही,प्राध्यापिकेसोबत ही घटना घडल्यानंतर मागील तारखेत विशाखा समिती गठीत करण्यात आली,याकडे लक्ष वेधले असता,या सर्व बाबी घडत असल्यानेच आम्ही व्यथित असल्याचे ते म्हणाले.समिती ही पालक आहे,आम्ही निश्चितच वेळ प्रसंग आल्यास कठोर भूमिका घेऊ,असे उत्तर त्यांनी दिले.
एफआयआर दाखल झाल्यानंतर ही न्यायालयात बजाज नगर पाेलिस उपस्थित राहीले नाही किंवा त्यांच्या वतीने केस डायरी देखील सबमिट झाली नाही,बजाज नगर पोलिसांवर कोणाचा दबाव आहे?असा सवाल केला असता ,याचाच आम्ही शोध घेत असल्याचे गवई म्हणाले.समितीच्या आठ सदस्यांनी सह्या केल्या आहेत या अन्यायाच्या विरोधात ,तर स्वत:भन्ते व दोन्ही फूलझले हे आरोपींच्या बाजूने असलेले दिसून पडतात.फूलझले हे सचिव होते आज देखील ते सचिव पदावर आहेत,मीच सचिव पदाचा राजीनामा देण्यासाठी तयार आहे,दीक्षाभूमी परिसरात जी क्रीडा अकादमी होती,त्या अकादमीचा आर्थिक ताळेबंद आम्ही मागितला असता त्यांना ते रुचले नाही व त्यांनी सचिव पदाचा राजीनामा दिला.दीक्षाभूमीसारख्या ठिकाणी पारदर्शिकतेला वाव नसावा का?असा सवाल त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणात निर्झर कुलकर्णी व प्राचार्य दिपा पानहेकर हे आराेपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप पिडीतेद्वारे केला जात आहे,याविषयी प्रश्न केला असता,ही बाब आमच्याही समोर आली असून हे चुकीचे असल्याचे गवई म्हणाले.मात्र,निर्झर कुलकर्णी यांच्याशी माझी भेट होऊ शकली नाही तर भन्ते यांचे बैठकीविषयी पत्र नसल्याने प्राचार्य यांनी आम्ही घेतलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यास नकार दिला,त्या अद्याप मला समितीचा सचिव मानत नसल्याचे गवई यांनी सांगितले.
भन्ते सुरई ससाई हे पवित्र दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तसेच धर्मगुरु आहेत मात्र,त्यांच्या नावाखाली संपूर्ण एकाधिकारशाही माजली आहे.दीक्षाभूमी व महाविद्यालयाची बदनामी समाजात होऊ नये म्हणून गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली असल्याचे विलास गजघाटे म्हणाले.भन्ते यांनी एकाधिकारशाहीने समिती सदस्यांचे अधिकार डावलून अनेक आर्थिक व्यवहारांशी निगडीत धनादेशांवर सह्या केल्या आहेत जेव्हा की त्यांना लिहता ,वाचताही येत नाही.इतकंच नव्हे तर आपल्याच आंबेडकरी समाजाच्या २० कर्मचा-यांना कोणतीही कारणे न देता कामावरुन काढण्यात आले.यातील अनेकांची सेवा ही २० ते २२ वर्षांपासून अधिक झाली होती.आपल्याच आंबेडकरी समाजाच्या कर्मचा-यांवर झालेला हा अन्याय आम्हाला मुकाट्याने बघावा लागला.रवि मेंढे यांनी ताबडतोब त्यांना बोलावून ‘कल से यहा आओ मत,भन्ते जी नही बोला’अश्या शब्दात त्यांची हकालपट्टी केली!प्राचार्याने रवि मेंढे याचे ऐकून अनेक बहूजन समाजाच्या कर्मचा-यांची देखील कोणतेही कारण न सांगता,कायदेशीर नोटीस न देता हकालपट्टी केल्याचे गजघाटे म्हणाले.
आम्ही दोन वर्षांपूर्वीच रवि मेंढे याच्यावर दीक्षाभूमी परिसरात येण्यास बंदी घातली होती.भन्तेजींनी एका पत्रावर रवि मेंढेला खासगी सचिव,व्यवस्थापक केले जे पत्र बोगस आहे,बेकायदेशीर आहे.आज पवित्र दीक्षाभूमीचा नावलौकिक व नामांकित महाविद्यालयाचे नाव जे लयाला जात आहे त्याला सर्वस्वी वार्धक्यामुळे काहीही वाचू,बोलू न शकणारे भन्ते हेच कारणीभूत असल्याचा जळजळीत आरोप गजघाटे यांनी केला.या पुढे भन्तेजींनी दीक्षाभूमीच्या विकासासाठी व त्याचे पावित्र्य राखण्यासाठी आंबेडकरी समाजाला व आम्हाला साथ दिली नाही तर नाईलाजाने अश्या अध्यक्षांना समितीच्या अध्यक्ष पदी ठेवायचे की नाही,यावर निश्चितच पाऊले उचलली जाणार असा इशारा त्यांनी दिला.आपल्याच कष्टकरी कर्मचा-यांच्या पोटापाण्यावर ते लाथ घालत आहेत.
पवित्र दीक्षाभूमीवर बाऊंसर ठेवण्याचे काम ते करीत आहेत.मागच्या
गेल्या वर्षी धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशीही वीस बाऊंसर ठेवण्यात आले होते.पवित्र दीक्षाभूमीवर पोलिस यंत्रणा असताना अनुयायांसाठी खासगी बाऊसंर ठेवण्याचे काय औचित्य होते?असा सवाल त्यांनी केला.आज देखील दुपारी १२ वाजता आम्ही दीक्षाभूमीत बैठक घेणार असल्याचे कळताच बाऊंसर बोलावण्यात आले ज्यांनी पत्रकारांना देखील आडकाठी केली.दीक्षाभूमीवर हे काय घडत आहे?असा सवाल त्यांनी केला.
समाजाचा रोष मात्र,आमच्यावर असतो कारण आम्ही समोर येतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली.आमच्याकडे भन्ते सुरई ससाई यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याशिवाय कोणताही पर्याय त्यांनी ठेवला नसल्याचे याप्रसंगी गजघाटे म्हणाले.
याप्रसंगी डॉ.प्रदीप आगलावे,पद्मश्री डॉ.चंद्रशेखर मेश्राम,प्रा.डी.जी दाभाडे,एर.आर .सुटे,कमलाताई गवई आदी समितीच्या आठ सदस्यांच्या सह्याचे पत्र त्यांनी माध्यमांना वितरीत केले.
(बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयोज Sattadheesh official यूट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………
Advertisements

Advertisements

Advertisements
