Advertisements

३ हजार १५० मतदान केंद्र प्रस्तावित
निवडणुका पारदर्शक व निर्भय पार पडतील असे नियोजन करा:राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
• जिल्हा परिषद, महानगर पालिका निवडणुकांचा आढावा
• मनुष्यबळ, मतदानयंत्र व मतदान केंद्रनिहाय आढावा
• मतदानयंत्रांच्या उपलब्धतेसाठी समन्वय अधिकारी
• मतदान केंद्रांवर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन द्या
नागपूर, दि. २३ जुलै २०२५ : नागपूर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ च्या यादीनुसार २४ लाख ८४ हजार २५० मतदार संख्या असून यासाठी ३ हजार १५० मतदान केंद्र प्रस्तावित आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध राहावे यासाठी महानगर पालिकेतर्फे उपाययोजना करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पारपाडण्यासाठी मतदान यंत्राची उपलब्धता तसेच आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याला प्राधान्य असल्याचे महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना आपला मतदानाचा हक्क सूलभपणे बजावता यावा तसेच निवडणूक प्रकिया पारदर्शक व निर्भयपणे पारपाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिल्यात.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा वाघमारे यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, तसेच नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी तसेच निवडणुकी संदर्भातील सर्व यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा परिषद, ५५ नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या पूर्वतयारीचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र, एकूण मतदारांची संख्या त्यानुसार मतदान केंद्रांची रचना करतांना मतदारांना सूलभपणे मतदान करता यावे, यादृष्टीने मतदान यादी तयार करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना, वाघमारे यांनी यावेळी दिल्या.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार मतदार संख्येमध्ये झालेल्या वाढीनुसार मतदान केंद्रामध्ये वाढ करण्यात यावी तसेच मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा निर्माण करतांना दिव्यांग मतदारांना मतदान करतांना अडचण जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, तसेच आदर्श मतदान केंद्र, पिंक मतदार केंद्र तयार करावे. मतदारांना मतदान करतांना अडचण जाणार नाही यादृष्टीनेही आवश्यक तयारी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. मतदान यादीचे मतदान केंद्रनिहाय विभाजन करतांना १ जुलै २०२५ ची यादी ग्राहय धरण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मध्यप्रदेश राज्य निवडणूक आयोगासोबत करार करण्यात आला आहेृ, त्यानुसार मतदान यंत्र उपलब्ध होणार आहेत. तसेच ईसीआयकडून ५० हजार कंट्रोल युनिट तसेच १ लक्ष बॅलेट युनिटची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राची वाहतूक करावी. तसेच मतदान यंत्र ठेवण्यासाठी आवश्यक शासकीय गोदामाची व्यवस्था करावी, प्रत्यक्ष मतदानापूर्वी मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करावी तसेच प्रशिक्षण आयोजित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी नागपूर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेतांना मतदान केंद्रांची संख्या, इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांचे नियोजन तसेच मतदान यंत्रांची आवश्यकतेनुसार एकाच प्रकारचे यंत्र उपलब्ध होतील यादृष्टीने विभागीय स्तरावर समन्वय अधिकारीची नियुक्ती करावी तसेच मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता यावर विशेष लक्ष द्यावे यावेळी त्यांनी सांगितले.
विभागात ४ जिल्हा परिषदा, ५५ नगर परिषदा व नगर पंचायती यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने पूर्वतयारीचा आढावा सांगतांना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी म्हणाल्या की, जिल्हा परिषदेसाठी १ जुलै २०२५ च्या मतदार यादीनुसार ४० लाख २३ हजार ०२९ मतदार असून मतदानासाठी ६ हजार ४४१ मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहे. या मतदानासाठी ७ हजार २८० कंट्रोल युनिट व १६ हजार २८८ बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५५ नगर परिषद व नगर पंचायतीमध्ये १८ लाख १२ हजार १६७ मतदारांची संख्या आहे. यासाठी २ हजार ३७८ मतदान केंद्र राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे निवडणूक पूर्वतयारीला सुरूवात करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हानिहाय सादरीकरण करुन स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीसाठी करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचे सादरीकरण केले.
……………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
