आजच्या मुसळाधार पावसाने उत्तर नागपूरात दमदार कोसळून त्या भागातील नागरिकांची चांगलीच नाराजी ओढवून घेतली.या ही भागात सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांचे ‘नियोजनपूर्ण(शून्य)जाळे विणल्या गेल्याने नागरिकांची घरे दोन फूटांपर्यंत खाली गेली. याही भागात विकास संस्था,बुद्धीमान अभियंते आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे कंत्राटदारांनी सिमेंट काँक्रिटचे रस्ते निर्माण करताना पावसाळी वाहिन्या न बांधण्याची पुरेपूर काळजी घेतल्याने,अवघ्या अर्धा तासांचाही पाऊस या भागाला पाण्यात तुंबवण्यासाठी पुरेसा ठरला.या भागातील सिमेंट काँक्रिटचे रस्ते नेमके कोणी बांधले?आता पूर पिडीत नागरिक याचा शोध घेत आहेत.आज रेल्वे स्टेशनजवळील रस्त्याला तर ’समुद्रच’ म्हणायची वेळ आली होती!
नुकतेच ९ जुलैला शहरात मुसळाधार पावसाने संपूर्ण शहराचीच भीषण अवस्था करुन ठेवली.स्वत: गडकरी यांनी या संदर्भात चिंता व्यक्त करुन स्पॉटनुसार अभ्यास करण्याचे तसेच आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.गडकरी यांनी १२ जुलै रोजीच्या बैठकीत दिलेली मुदत संपली नसतानाच ,पावसाने आज उत्तर नागपूरात पाणी तुंबवून नेते व प्रशासनाला चांगलाच ‘इशारा’ दिला.उत्तर नागपूरात कमाल चौकाला नदीचे स्वरुप लाभले होते तसेच इंदोरा,कावरा पेठ,परदेसी मोहल्ला तसेच सदरच्या काही भागात पाणी तुंबले.आज देखील या भागातील सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरुन नागरिकांच्या घरातील सामानाचे,अन्न धान्याचे,मालमत्तेचे नुकसान झाले.दूचाकी व चारचाक्या देखील पाण्यात तरंगत असतानाचे दृष्य सर्वदूर होते.महत्वाचे म्हणजे गडकरी यांची नागपूर तुंबण्यावरील बैठक ही देखील सदर येथील नियोजन भवनात,शहरातील नियोजनशून्य राजकीय व प्रशासकीय कारभारावर होती!बैठकीत नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासह भाजपचे आमदार कृष्णा खोपडे,आ.प्रवीण दटके,आमदार चरणसिंग ठाकूर,जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी,नासुप्रचे सभापती संजय मीणा ,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,सार्वजनिक बांधकाम विभाग,महामेट्रो तसेच संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व मलवाहिन्यांची सफाई झाली हाेती,तर ही परिस्थिती का उद् भवली,वस्त्यांमध्ये पाणी शिरलेच कसे?असा संतप्त सवाल गडकरी यांनी अधिका-यांना केला.बेसा-बेलतरोडी,मनीष नगर भागात मोठ्या प्रमाणात उद् भवलेल्या परिस्थितीवर गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती,आजच्या पावसाने शहरातील या सर्व विकास संस्था तसेच त्यांच्या स्वत:च्या विभागासह सर्व अधिकारी कसे काम करतात याचे उत्तरच, उत्तर नागपूरने गडकरींना दिले.या बैठकीत अधिकारी वर्गाने अनाधिकृत बांधकामांवर लिलया खापर फोडले मात्र,नियोजनशून्य सिमेंट काँक्रीटचे रस्ते यावर सर्वांनी ’मौन’ राग आलापला.
अनेक भागात तर पावसाच्या पाण्यासेाबत तुंबलेल्या ड्रेनेज लाईनमधील पाणीही रस्त्यांवर वाहत होते!सखल भागातील घराघरात हेच पाणी लोकांच्या घरात शिरले.मनपाने केलेले पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेचे दावे हे पुन्हा एकदा नागपूरकर नागरिकांसाठी ‘बिरबल की खिचडी‘सिद्ध झाले.
शहरात २ हजार ४०६ किलोमीटर रस्ते हे मनपाच्या अख्त्यारित आहेत.नासुप्रचे ९६५ किमी तर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे १४८ किमी रस्ते आहे.गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ३० किमीचे रस्ते आहेत.मात्र,कोणत्याही संस्थेकडे किती रस्त्यांना पावसाळी वाहिन्या आहेत याची माहितीच उपलब्ध नाही!परिणामी,प्रत्येक पावसानंतर ७५ टक्के भागात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे पाणी तुंबण्याची भीषण समस्या निर्माण होते.
९ जुलै २०२५ रोजी बरसलेल्या पावसाने तर शहरातील सिव्हिल लाईन्स ते कळमना,नरेंद्रनगर ते सक्करदरा भागातील अनेक भागांना तलावांमध्ये परिवर्तित करण्याची किमया साधली होती!जुन्या डांबरी रस्त्यांमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होता त्यामुळे वारंवार नागपूर शहराची स्थिती ‘डूबतं नागपूर’होण्याची होत नसे,मात्र,चार टप्प्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांनी शहराचे जनजीवनच पार ‘जलमय’करुन टाकले!
महत्वाचे म्हणजे, सिमेंटचे रस्ते बनवताना आधीच्या डांबरी रस्त्यांचा थर न काढता त्यावरच काँक्रीट टाकण्यात आले परिणामी, पाण्याचा निचरा होणा-या नाल्याही बुजल्या.रस्त्याच्या दुस-या बाजूला साचणारे पाणी पावसाळी वाहिनीकडे आणणारा पाईप, ही रचनाच नष्ट झाली परिणामी,नैसर्गिकरित्या नदी नाल्यांना मिळणारी पाण्याची यंत्रणाच पार विस्कळीत झाली.काँक्रीट रस्ते बनवले तेव्हा जुन्या सांडपाण्याच्या वाहिन्याच तोडून टाकण्यात आल्या. याशिवाय शहरात आता मोकळ्या जागाच उपलब्ध नाहीत,अर्निबंध,अनाधिकृत बांधकाम,ड्रेनेज लाईन्सवर आलेला मोठा ताण इत्यादी बाबी उपराजधानीला वारंवार ‘डूबतं नागपूर‘करण्यास हातभार लावित असतं,हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची(राजकाण्यांची) गरज भासत नाही.
९ जुलैच्या पावसाने उत्तर नागपूरला तेव्हा ही चांगलेच झोडपले होते.त्यावेळी देखील आलेल्या मुसळाधारने प्रभाग क्रमांक ६ मधील आदर्शनगर,खोब्रागडे नगर,पंचशील नगर,पंचकुंवा,देवीनगर,यादवनगर,गोसाईपुरा,बिनाकी,संजय गांधी नगर या सखल भागातील झोपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरले होते.त्यावेळी देखील अनेक नागरिकांच्या घरातील सामान पाण्यात वाहून गेले होते.धान्य वाहून गेले,याशिवाय फर्निचर,टी.व्ही,फ्रिज निकामी झाले होते.मनपा प्रशासनाने लहान लहान नाल्यांची स्वच्छता न केल्याने त्यांच्यावर हा कहर बरपल्याचा संताप त्यावेळी नागरिकांनी व्यक्त केला होता.त्यातून कोणताही बोध न घेता,अवघ्या आठ दिवसात पुन्हा अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने ,मनपाला कोणत्या उपाययोजना न केल्याचा ‘ पाण्यातला आरसा’ दाखवला.
अशीच परिस्थिती वर्धमाननगर अंडरपास,अजनी रेल्वेपूल.ऑटोमोटिव्ह चौकाची होती.९ जुलैच्या पावसाच्या दाणादाणने अवघे नागपूर जलमय केले होते.विधीमंडळ अधिवेशनात काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी यावरच हाच का तो लाखो कोटींचा विकास?असा प्रश्न उपस्थित केला होता.‘नेहमीच येतो पावसाळा‘उक्तीप्रमाणे मनपा आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी मनपा मुख्यालयातील सहाव्या माळ्यावरील अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर(सीओसी)मधून शहरातील ‘महा’पूरस्थितीची मोठमोठ्या स्क्रीनवर बघून माहिती घेत होते.अवघ्या ९ दिवस आधी ९ जुलै रोजी नाग नदी,पिवळी नदी व पोहरा नदी तुंडूब भरली होती.रेल्वे स्थानकावरील रुळ पाण्याखाली गेले होते.अग्निशमन विभागाकडे हजारो कॉल्स मदतीसाठी येत होते.नागपूरचे रस्ते मिनी तलाव बनले होेते.वर्धमान नगर अंडरपासखाली तर १५ फूट पाणी भरले.पारडीत तर बचाव पथकाला चार व्यक्तींना रेस्क्यू करावे लागले होते.त्याही वेळी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर शहरभर बोटी चालल्या.उद्याने,मंदिरे ही पाण्याशी ‘एकरुप’झाली होती.मेडीकल,मेयोच्या आत पाणी शिरुन नातेवाईकांना रुग्णांच्या बेडचाच आसरा घ्यावा लागला होता.रेल्वे,विमान,बससेवा प्रभावित झाली होती.
इतकं सर्व रामायण घडल्यानंतर गडकरी यांनी १२ जुलै रोजी आढावा बैठक घेतली मात्र,यात ही ‘रामाची सीता कोण?ही साठा उत्तराची सुफळ कहाणी संपूर्ण झाल्याने आज अर्धा तासात उत्तर नागपूरात पुन्हा पावसाने सर्वसामान्यांचा पैसा,अडका आणि सुरक्षित जगण्याचीच आहूती ‘विकास’नावाच्या यज्ञात दिली.तरी देखील राज्याचे मुख्यमंत्री व दक्षिण-पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वर्षी नागपूरातील एका कार्यक्रमात नागपूरकरांना ‘वचन’दिले आहे की ‘शहरातील एक ही रस्ता सिमेंट काँक्रीटशिवाय राहणार नाही!’
परिणामी,‘राेज मरे त्याला कोण रडे’या म्हणीप्रमाणे(ही म्हण दर वर्षी पावसाळ्यात जगणा-या नागपूरकरांसाठीच प्रचलित झाली असावी जणू)नागपूरकर नागरिकांनी आता या बरसणा-या,कोसळणा-या,शहरातील खासदार,आमदारांना सोडून सर्वसामान्य नागपूरकरांवर जराही दया-माया न दाखविणा-या पावसाच्या सूडाची ‘सवय’करणेच गरजेचे असून, नागपूरी दैना २३ सप्टेंबर २०२३,२० जुलै २०२४,९ जुलै २०२५ रोजी देखील जगाने बघितली होती,त्यामुळेच ’डूबत्या नागपूरचे’ सोशल मिडीयावर व्हायरल होणा-या व्हिडीयोज व छायाचित्रांचा नागपूरवर बसरणा-या ‘राजकारणी’पावसालाही आता कंटाळा आला आहे…..!
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
……………………….