Advertisements

सिमेंट रस्त्यांमुळे नागपूरात पुन्हा एकदा त्राही-त्राही
रोज मरे त्याला कोण रडे: प्रशासनाचा मुजोरपणा
विधानसभा निवडणूकीनंतर नेते फिरकलेच नाही:भानखेडा रहीवाशांचा संताप
नागपूर,ता.९ जुलै २०२५: गेल्या काही वर्षात नागपूर शहरात अगदी गल्ली बोळ्यातही सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांचे निर्माणकार्य झाले .एकूण चार टप्प्यातील शेवटच्या टप्प्याचे देखील ३०० कोटी रुपये राज्य सरकारने सिमेंटच्या रस्त्यांसाठी मंजूर केले आहे,अर्थातच आधीच भिकेचा कटोरा हातात असणा-या कंगाल नागपूर महानगरपालिकेला त्यात शंभर कोटीचा आपला वाटा उचलावा लागतो,परिणामी,नागरिकांच्या पिण्याचे स्वच्छ पाणी,चांगले व खड्डेमुक्त रस्ते,वाहतूकीसाठी चांगल्या व धोकादायक नसणा-या सार्वजनिक बस सेवा आणि गडर लाईनच्या चोकेज न होण्यासारख्या सारख्या मूलभूत गरजांसाठीही मनपाकडे पैसा नाही.त्यात नागरिकांच्या सुविधेसाठी करण्यात येणा-या, प्रत्यक्षात नसणा-या व कागदांवर असणा-या अतिशय आकर्षक घोषणा आणि दिखाऊपणा यासाठी मनपाला अगदी राष्ट्रीयस्तरावर देखील पुरस्कृत करण्यात आले आहे,हे विशेष.यंदा देखील पावसाळ्या पूर्वी कोट्यावधीची पंपिग मशीनसह मनपा प्रशासन नागपूरकरांच्या सुरक्षेसाठी व सेवेसाठी कसे सुसज्ज आहे,याचा सुरस कथा प्रसार-प्रचार माध्यमात प्रसिद्ध झाल्या आहेतच.
मात्र,गेल्या तीन दिवसांच्या संततधार पावसाने मनपा प्रशासनाची पुन्हा एकदा संपूर्ण पोल खोलली.कहर तर तेव्हा झाला जेव्हा मंगळवारी झोनमध्ये मानकापूर भागात सिमेंट रस्ते दीड ते दोन फूट वर बांधल्याने नागरिकांच्या घरात थेट पाणी शिरत असल्याच्या व पिण्याच्या पाण्यातच सिवेजचे पाणी मिसळत असलेल्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या मात्र,नागरिकांच्या समस्या फक्त ‘वर्च्युली’सोडविण्यात देखील मनपा प्रशासनाला आज यश आले नाही!
आज बुधवार दिनांक ९ जुलै रोजी देखील काेराडी रोडवरील पूजा रेसिडन्सीमधील नागरिकांनी थेट पाणी सदनिकेत शिरल्याचे व सिवेजचे पाणी,पिण्याच्या पाण्यात मिसळले असल्याची तक्रार,मनपाने जारी केलेल्या क्रमांकावर केली.त्या सदनिकेत वीज मीटरच्या कक्षात देखील पाणी शिरल्याने नागरिकांना वीजेशिवाय राहण्याचा ‘योग जुळून आला’मात्र,आज मनपाच्या तक्रार क्रमांकावर तेथील नागरिकांनी फोन केला असता,फोन उचलणा-या महाभागाने,फोन करणा-याचे नाव,समस्या असलेल्या भागाचे नाव आणि कोणती समस्या आहे हे ऐकून न घेताच थेट ’आम्ही काही करु शकत नहाी,सगळीकडे पाणी भरले आहे’असे संतापजनक उत्तर दिले!

संपूर्ण नागपूरात अशीच अवस्था असून मनपा प्रशासनाने नागपूरकर नागरिकांना ऐन पावसाळ्यात पुन्हा एकदा ‘भगवान भरोसे’सोडण्याची किमया लिलया साधली.मध्य नागपूरात प्रभाग क्र.८ डोबी नगर वस्तीतील भानखेडा येथील विपिटक बुद्ध विहार समोरील संपूर्ण भागात नागरिकांची घरे पाण्यात बुडाली.गडर लाईन गेल्या अनेक वर्षांपासून चोक असून ती स्वच्छच करण्यात आली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.या भागातील सगळीच घरे घाणेरड्या पाण्यात तुंबली होती.विधान सभा निवडणूकीनंतर या भागात कोणही फिरकलेच नसल्याचे येथील नागरिक सांगतात.येथील नागरिकांनी माजी नगरसेवक रमेश पुणेकर व काँग्रेस कमेटी अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष वसीम खान यांच्यासह मनपा उपायुक्त राठोड यांना फोन लावला व चोक गडर लाईन्स तातडीने मोकळे करण्यास सांगितले.राठोठ व सुरेश खरे यांनी लवकरच या समस्येचे निराकरण करु,असे ‘सरकारी’उत्तर देऊन भानखेडा डोबी नगर येथील नागरिकांची बोळवण केली.

नागपूरच्या रसत्यांवर आज पुन्हा एकदा वाहनांऐवजी बोटींची गरज भासली.नाग नदीसोबतच आज देखील पोहरा नदीच्या पुरामुळे कहर बरपवला.मनपाच्या अग्निशमन आणि आपातकालीन मदत विभागाकडून येथील १२ लोकांना बोटीतून रेस्क्यू करण्यात आले.यावेळी देखील पिवळी नदीने संपूर्ण वाहतूक ‘पाण्यातून’ करणे नागरिकांना भाग पाडले.
मनीषनगरचे दोन्ही भुयारी मार्ग पाण्यात समाधीस्थ झाल्याने ते यंदा ही वाहतूक विभागाने वाहतूकीसाठी बंद केले.हीच स्थिती सीताबर्डी,कॉटनमार्केट भुयारी मार्गांची देखील होती.पिपळा फाट्याचा नाला मागच्या वेळी देखील पूराच्या पाण्याने तुडूंब भरल्याने नागरिक हे स्वत: सजग होते!

धनगौरी नगर,पवारी,पूनापूर येथे अडकलेले चार जण,एक महिला,एक पुरुष आणि दोन मुले यांनाही रेस्क्यु करण्यात आले.पारडी भागातील नवीन नगर आणि नवकन्या नगर येथे देखील नागरिक चांगलेच संकटात सापडल्याने, प्रशासनाने या ही भागात रेस्क्यू ऑपरेशन चालवले.नवकन्या नगर,भरतवाडा येथील पिवळी नदीच्या काठावरील घरात फसलेल्या दोन कुटूंबातील १४ लोकांना अग्निशमन विभागाने सुखरुप बाहेर काढले.
पावनगावातील ११ जणांना रेस्क्यू करण्यात आले.अग्निशमन जवानांनी ५६ नागरिकांची सुरक्षीत सुटका केल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.
मूळात दर पावसाळ्यात नागपूरकर नागरिक संकटात का येतात?याचे कोणतेही उत्तर मनपा प्रशासनाकडे नाही.महत्वाचे म्हणजे नदी व नाले स्वच्छतेचे काम पावसाळ्यापूर्वी केल्याने अनेक भागातून पाण्याचा निचरा होण्यास मदत मिळाली असल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला!
गेल्या दोन दिवसात नागपूरात २४० मि.ली.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरातील अतिवृष्टिीच्या स्थितीची मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली.पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी अधिका-यांशी चर्चा करुन सजग राहण्याची सूचना केली.
मां उमिया सोसायटीतील काही घरात पाणी शिरल्याने कळमना अग्निशमन केंद्रातील जवानांनी त्यांनाही सुरक्ष्त ठिकाणी हलवले.दत्तात्रयनगरमधील काही घरात पाणी शिरले.नरसाळा भाग पूर्णत: पाण्याने वेढला गेला.नरेंद्रनगर परिसरात पाणी साचले.मंगलदीप सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना धडकी भरली व नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.यंदाही शेकडो कुटूंबियांंच्या दूचाकी,चारचाकी पाण्यात होते.पाणी साचणे व झाडे कोसळण्याचे चित्र सर्वदूर होते.
नरसाळा श्मशानभूमीजवळ काही नागरिक पाण्याच्या विळख्यात अडकली होती.एलेक्स हॉस्पीटल वनदेवीनगरातील नाल्याच्या काठावर असलेल्या घरात पाणी शिरले.मनपा प्रशासनाने आज २८ पुरुष,२६ महिला,२ मुले २ प्राणी असे ५८ लोकांना सुखरुप पाण्याच्या विळख्यातून बाहेर काढले.
अतिवृष्टिची माहिती व तक्रार करण्यासाठी मनपाने पुन्हा एकदा आपातकालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
सोशल मिडीयावर आज विदर्भातील अतिवृष्सटिसह नागपूर शहर कसे पुन्हा एकदा ‘टायटायनिक’झाले याचीच चर्चा रंगली होती.या शहराचे भाग्यविधाता स्वत:राज्याचे मुख्यमंत्री आहेत,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर गेल्या ११ वर्षात विकासाचा महापूरच नागपूर शहरात आणला.पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी देखील एक लाख कोटींच्या विकास कामांमुळेच नागपूर दर वेळी पाण्यात तुंबत असल्याची टिका आज अधिवेशनात केली.सत्ताधारी भाजपचे नागपूरातील तीन आमदार यांनी देखील महाराष्ट्राची उपराजधानी दर पावसाळ्यात नाग नदीच्या गटार गंगेत का तुंबते?सिमेंट रस्त्यांच्या खाली पावसाळी पाणी वाहून नेणा-या नाल्या का नाहीत?याबाबत अधिवेशनात, प्रशासनाला जाब विचारावा अशी अपेक्षा नागपूरकर करीत आहेत.
थोडक्यात,२३ सप्टेंबर २०२३ रोजी अंबाझरी ओव्हरफ्लोमुळे नागपूरात जी त्राही-त्राही माजली होती त्यातून मनपा प्रशासनाने कोणताही धडा न घेतल्याचे आजच्या जलमग्न नागपूरची अवस्था बघता सिद्ध झाले.
(बातमीशी संबंधित सगळे व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
……………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
