फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्र्याच्या शहरात या आहेत‘एकमेव’योग्य अधिकारी!

मुख्यमंत्र्याच्या शहरात या आहेत‘एकमेव’योग्य अधिकारी!

Advertisements
महिती आयोगात प्रतिनियुक्तीवर गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत!आणखी दोन वर्ष मुदतीसाठी पत्र!

राज्यपालांच्या आदेशानंतरही बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास टाळाटाळ
माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठात कार्यालयीन कामकाज सुचारुपणे चालण्यासाठी उपसचिव रोहिणी जाधव यांची नितांतआवश्‍यकता! माहिती आयुक्तांची वारंवार हीच सबब!
नागपूर खंडपीठाचे नवनियुक्त माहिती आयुक्त गजानन निमदेव यांचे देखील रोहिणी जाधवांच्या दोन वर्ष मुदतवाढीसाठी शिफारस पत्र!
नागपूर,ता.१ जुलै २०२५: राज्य माहिती आयोग नागपूर खंडपीठात गेल्या आठ वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर आलेल्या रोहिणी.प्र.जाधव या उपसचिव पदावर कार्यरत असून, त्यांच्या बदलीचे आदेश राज्यपालांनी दिले असून, त्यांना मंत्रालयातील विधी विभागात उप सचिव पदावर रुजू होणे आवश्‍यक असतानाही राज्यपालांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत,जाधव यांची नागपूर खंडपीठ कार्यालयातील कामकाज चालवण्याकरिता आवश्‍यकता असल्याचे पत्र नवनियुक्त माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी मंत्रालयाच्या अपर सचिव,सामान्य प्रशासन विभागाला तसेच मुख्य माहिती आयुक्त राहूल पांडे मुंबई,यांना पाठवले आहे. पूर्वाश्रमीच्या रोहिणी प्रभाकर जाधव( आता सौ.रोहिणी प्रदीप कौरते)या २५ मे २०१८ रोजी एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीवर नागपूर खंडपीठाच्या माहिती आयोगात रुजू झाल्या होत्या.त्या मूळ  उद्योग, उर्जा आणि कामगार विभागात अवर सचिव पदी कार्यरत होत्या.एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीवर माहिती आयोग नागपूर खंडपीठात उपसचिव पदावर रुजू झाल्या आहेत.मात्र,गेल्या आठ वर्षांपासून त्यांना वारंवार मुतदवाढ दिली जात आहे.परिणामी, मुख्यमंत्र्यांच्या गृहनगरात त्यांच्यापेक्षा योग्य व कामकाजात निष्णात सनदी अधिकारी राज्यात नाही का?अशी टिका आता केली जात आहे.
नियमानुसार पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सनदी अधिका-यांना एकाच पदावर एकाच ठिकाणी कार्यरत ठेवता येत नाही मात्र,रोहिणी जाधव यांना वारंवार मुदत वाढ देण्यात आली.दरवेळी नागपूर खंडपीठात पुढील कार्यालयीन कामकाज चालविण्यासाठी रोहिणी जाधव यांची आवश्‍यक्ता असल्याचे पत्र नागपूर खंडपीठातील माहिती आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला पाठवून त्यांची बदली थांबवली असल्याचे माहिती अधिकारातून ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते कमलेश शाह यांना मिळाली.

(छायाचित्र : शासन निर्णय,प्रतिनियुक्तीवरील सनदी अधिका-याला एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ राहता येत नाही)
दरवेळी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना दोन वर्षांची मुतदवाढ देण्यात आली. हा कालावधी संपल्यानंतर पुन्हा सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली.२०२४ मध्ये त्यांना पुन्हा एका वर्षाचा कालावधी वाढवून दिला.आता राज्यपालांनी  रोहिणी जाधव यांना मंत्रालयातील विधी व न्याय विभागात उपसचिव पदावर बदलीचे पत्र दिल्यानंतर देखील, पुन्हा दोन वर्षांच्या मुदतवाढीसाठीचे पत्र माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाला पाठवले आहे,त्यांची  शेवटची मुदतवाढ फेब्रुवरी २०२५ रोजी संपली.परिणामी, मुख्यमंत्र्यांच्याच शहरात माहिती आयोगासारख्या महत्वाच्या आयोगात एकमेव ‘योग्य’सनदी अधिकारी रोहिणी जाधव असल्याचे सिद्ध झाले तसेच राज्यात कुठेही त्या योग्यतेचे इतर सनदी अधिकारी नसल्यावर शिक्कामोर्तब झाले!
सनदी अधिका-यांच्या बदलीसंबंधी नियमांची कशी मोडतोड केली जाते,याचे आदर्श उदाहरण माहिती आयोग नागपूर खंडपीठातील हे सांगात येईल. माजी माहिती आयुक्त दिलीप धानोरकर,संभाजी सरकुंडे,राहूल पांडे,भुपेंद्र गुरव ते आताचे नवनियुक्त गजानन निमदेव या सर्वांच्या काळात रोहिणी जाधव या सनदी अधिकारी त्यांना कार्यालयीन कामकाज चालविण्यासाठी गरजेच्या ठरल्या,हे विशेष!गजानन निमदेव यांनी तर जाधव यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची शिफारश सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे.जाधव या माहिती आयुक्तांकडे मुदतवाढीचे शिफारस पत्र देतात. ते पत्र मुख्य माहिती आयुक्त व सामान्य प्रशासन विभागाकडे, माहिती आयोगाचे नागपूर खंडपीठाचे आयुक्त पाठवित असतात.निमदेव यांना जाधव यांनी पुन्हा दोन वर्ष मुदतवाढीचे असे शिफारस पत्र दिले नसल्याची माहिती शाह यांना रोहीणी जाधव यांनी त्यांच्या कक्षात अनौपचारिकरित्या सांगितले.मात्र, निमदेव यांनी जाधव यांच्या मुदतवाढीसाठी मुख्य माहिती आयुक्त तसेच सामान्य प्रशासन विभागाला पत्र का दिले?याचे कोणतेही उत्तर ते देत नाही,असे शाह सांगतात.विभागात कर्मचा-यांची कमतरता व रिक्त पदे ही सबब,हे एखाद्या सनदी अधिका-याला तब्बल आठ वर्षे एकाच पदावर एकाच विभागात कार्यरत राहण्याची कायदेशीर मुभा देत नाही.

(छायाचित्र : शाह यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेले रोहीणी जाधव यांच्या मुदतवाढीच्या निमदेव काळातील शिफारशीचे पत्र)
महत्वाचे म्हणजे,जाधव यांच्या कार्यकाळात ३५०० अपील तर १००० पेक्षा जास्त तक्रार अर्ज प्रलंबित आहेत!यावरुन या आयोगात त्यांच्या कार्यकुशल मार्गदर्शनाखाली काम करण्याची पद्धत किती ‘उत्कृष्ट’ आहे,हे सिद्ध होत असल्याची खोचक टिका शाह करतात.
माहिती अधिकार कार्यकर्ते कमलेश शाह यांनी भुपेंद्र गुरव यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करुन रोहिणी जाधव यांचे काम बरोबर नसल्याचे व त्या हेतुपुरस्सर अतिशय महत्वाच्या अपील अर्जावर सुनावणी प्रलंबित ठेवीत असल्याची तक्रार केली होती.दोन वेळा हीच तक्रार नागपूर खंडपीठातील माजी माहिती आयुक्त राहूल पांडे यांच्याकडेही केली होती मात्र,त्यांच्या तक्रार अर्जावर व अनेक अपीलांवर कोणतेही आदेश पारित झाले नाही! राहूल पांडे हे आता राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत.
कोणत्या कलमांतर्गत रोहिणी जाधव यांना वारंवार मुदतवाढ दिली जात आहे?प्रतिनियुक्तीवर असलेल्या एकाच सनदी अधिका-याची किती वेळा नियुक्ती, एकाच ठिकाणी वारंवार करता येते?अशी विचारणा गजानन निमदेव यांच्याकडे शाह यांनी अर्जाद्वारे केली. मागील आठ वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असणा-या रोहिणी जाधव यांना राज्यपालांच्या निर्देशानुसार मंत्रालयातच्या विधी विभागात पदभार स्वीकारण्यासाठी मुक्त करणार आहेत का?यावर निमदेव यांनी रोहिणी जाधव यांना पुन्हा मुदतवाढ देण्यासाठी पत्रव्यवहार केले असल्याचे सांगितले.निमदेव यांनी देखील नागपूर खंडपीठाचे कार्यलयीन कामकाज सुचारुपणे चालविण्यासाठी जाधव यांना पदमुक्त करु शकत नसल्याचे कारण मौखिकरित्या शाह यांना दिले!शाह यांनी निमदेव यांना रोहिणी जाधव यांच्याविषयीचे पत्र २७ मे २०२५ रोजी दिले होते.मूळात नागपूर खंडपीठाच्या माहिती आयुक्त पदी गजानन निमदेव यांना पदभार स्वीकारुन एक महिना ही झाला नाही मात्र,त्यांना रोहिणी जाधव या निष्णात अधिकारी आहे हे कसे कळले?असा सवाल कमलेश शाह करतात. १३ मे २०२५ रोजी शाह यांनी निमदेव यांना पत्र लिहले होते.

(छायाचित्र : नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव यांना शाह यांनी दिलेले पत्र)

शाह यांनी अनेक प्रकरणांचा दाखला देत जाधव यांनी २०१८ पासून अनेक गंभीर प्रकरणे सुनावणीसाठी लावली नसल्याचे सांगून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची दिशाभूल करणारी माहिती देत ,शाह यांची अपील फेटाळण्याचा अहवाल तत्कालीन माहिती आयुक्त धानोरकर यांना दिला ! कक्ष अधिकारी नंदकुमार राऊत व उपसचिव रोहिणी जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून चुकीचा अहवाल नागपूर खंडपीठाचे तत्कालीन माहिती आयोगाचे आयुक्त दिलीप धानोरकर यांना दिला असल्याचे कमलेश शाह यांनी सांगितले.
एका प्रकरणात लाललुचपत प्रतिबंधक विभागाने कलम ६(१) अन्वये, स्टॅम्प तिकीट लागलेला माहितीचा अर्ज स्वीकारण्यास नाकारुन परत केला. माहिती अधिकार कायद्याच्या कलम १८ अन्वये माहिती अधिकाराचा अर्ज स्वीकारणे बंधनकारक होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कृती विरोधात शाह हे माहिती आयोगात अपीलमध्ये गेले मात्र, एका प्रकरणातील
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अन्वार्थ लाऊन, जाधव आणि कक्ष निरीक्षक नंदकुमार यांनी माहिती आयुक्तांकडे शाह यांचा अर्ज फेटाळण्याचा अहवाल दिला,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात कुठे लिहले आहे की माहिती अधिकारातंर्गत तक्रार आली तर स्वीकारु नये?असा सवाल शाह यांनी रोहिणी जाधव यांना केला ,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे आता त्या कायदेशीर अडचणीत आल्या आहेत. ते आदेश डाऊनलोड करण्यात आले होते,त्या वेळी मी कार्यालयीन कामात नवीन होते,हवे असल्यास परत ती अपील लावण्याचे आश्‍वासन शाह यांना रोहिणी जाधव यांनी दिले मात्र,शाह हे कायदेशीर कारवाई करण्याचा मानस व्यक्त करतात.नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त गजानन निमदेवकडे शाह यांनी शिस्तभंग कारवाई करण्याची मागणी केली.

(छायाचित्र : सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचा चुकीचा अर्थ लाऊन शाह यांची अपील फेटाळण्यात आली यावर शाह यांनी निमदेव यांच्याकडे शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत केलेला अर्ज)
माहिती आयोगासारख्या इतक्या महत्वपूर्ण ठिकाणी ज्यांना कायद्याचे ज्ञान नाही,कायद्याचे महत्व कळत नाही,जे माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक प्रयत्न व उद्देशांवरच पाणी फिरवण्याचे काम करतात, असे प्रतिनियुक्तीवरील सनदी अधिकारी फडणवीस यांच्या शहरात कार्यरत असणे नागपूरकरांच्या हिताचे नसल्याचे शाह यांचे म्हणने आहे.२०१३ साली स्वत: विरोधी पक्ष नेता असताना देवेंद्र फडणवीस यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन काँग्रेसच्या एका नेत्याने जयताळा येथील ‘जमीन कमाल धारणात’ असलेले तीन भूखंड लाटलेल्या व्यवहाराची माहिती तत्कालीन जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीच्या अधिकरात मागितली असता,फडणवीसांना ती देण्यात आली नाही.परिणामी,ते राज्य माहिती आयोगाकडे गेले व माहिती न देणा-या संबंधित अधिका-यावर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची मागणी त्यांनी केली. यावरुन फडणवीस यांना चांगला अनुभव आहे माहिती अधिकारी माहिती देत नाहीत,उलट भ्रष्टाचा-यांना वाचवण्याचे काम करतात,असे शाह सांगतात.त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन नागपूर खंडपीठाचा भोंगळ आणि भ्रष्ट कारभार सुधारावा,अशी मागणी त्यांनी केली. अधिकारी वर्ग सर्वसामान्यांना आवश्‍यक माहिती देत नाही,महत्वाची माहिती दडवून ठेवतात,त्यांच्याच नागपूर शहरात त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात माहिती दडवून ठेवणारे,अपील फेटाळणारे,नियमात नसताना अर्ज रिमांड बँक पाठविणारे अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांच्यापासून नागरिकांच्या मौलिक अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी शाह यांनी केली.
नागपूर खंडपीठात अपील अधिकारीच येत नाही.कधी काळी आले ,तर ते ‘अपीलसाठी उपस्थित राहू शकत नाही’  रोहिणी जाधव यांच्या कक्षात पत्र सोडून जातात,मग,माहीती आयोग बनला कशासाठी ?असा खोचक सवाल शाह करतात.नागरिकांना माहितीच्या अधिकारात माहिती मिळाली पाहीजे,ती मिळून देण्याचा प्रयत्न अधिका-यांनी करायचा असतो.महत्वाचे म्हणजे ज्यांना लिहता येत नाही त्यांच्याकडूनही मौखिक माहिती घेऊन अर्ज सादर करने या कायद्यामध्ये बंधनकारक आहे.मात्र,नागपूर खंडपीठात ज्यांना माहिती अधिकाराच्या कायद्याची समज नाही ते पदावर असून सर्वसामान्य जनतेला त्यांचा कोणताही फायदा होत नसल्याचा आरोप शाह यांनी केला.महत्वाचे म्हणजे नियमानुसार सर्व सरकारी कार्यालयात सीसीटीव्ही अनिवार्य असताना नागपूर खंडपीठात सीसीटीव्ही का नाही?असा सवाल ते करतात. तत्कालीन माहिती आयुक्त राहूल पांडेना शाह यांनी पत्र देऊन ऑन कॅमरा सुनावणी घेण्याची विनंती केली होती जी धुडकावून लावण्यात आली.राहूल पांडे नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त असताना शाह यांच्या अनेक महत्वाच्या प्रकरणात आदेश पारित झाले नाहीत.आता ते राज्याचे मुख्य माहिती आयुक्त झाले आहेत.
राज्याचे मुख्य माहिती आयुक्तांनी तर माहिती मागणा-यांना ‘ब्लॅक मेलर ’संबोधले!
राहूल पांडे यांना माहिती अधिकाराचा उपयोग करुन माहिती मागणारे सगळेच ब्लॅक मेलर वाटतात का?असा सवाल ते करतात. माहिती अधिकारात किती ही वेळा माहितीसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो.केंद्र सरकारनेच १७  मुद्दांवर सबंधित प्राधिकरणांनी वेबसाईटवर माहिती देणे बंधानकारक केले आहे. या आदेशाचे पालन प्रामाणिकपणे झाले असते तर माहिती अधिकारातंर्गतचे अर्ज टाकण्याची वेळ व पैसे सर्वसामान्यांचे वाचले असते असे ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते कमलेश शाह सांगतात.
मुख्य माहिती आयुक्तांना देखील पुराव्याशिवाय बोलण्याचा अधिकार नाही असे सांगत,एक ही माहिती अधिकार कार्यकर्ता हा ब्लॅक मेलिंगच्या आरोपाखाली तुरुंगात गेला नाही,असे शाह सांगतात.पब्लिेक डोमेनची कागदपत्रे माहिती आयुक्त रोखू शकत नाही.कशासाठी मागताय ते देखील विचारु शकत नाही. भाजपचेच माजी आमदार किरीट सोमैया,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या देखील माहिती अधिकाराचा उपयोग करुन माहिती मिळवित असतात,त्यांना देखील राहूल पांडे ‘ब्लॅक मेलर’ संबोधतील का?असा सवाल शाह करतात.मुंबईतील बहूचर्चित ‘आदर्श घोटाळा’ माहिती अधिकारामुळेच उघड झाला,याची परिणीती काँग्रेसची सत्ता जाण्यास व भाजपची राज्यात सत्ता येण्यात झाला,असे शाह सांगतात.
नागपूर खंडपीठाच्या माहिती आयोगाच्या संपूर्ण कार्यशैलीचेच ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली.या आयोगात सगळेच प्रभारी तसेच कंत्राटी पद्धतीवर नियुक्त आहेत!टंकलेखन करणारे अप्रशिक्षित आहेत.कोणतीही माहिती मागितली असता पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याचे कारण सांगितले जाते.इतक्या महत्वाच्या आयोगावर राज्य सरकार ही,
अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती का करीत नाही?वीस वर्ष झाले माहिती अधिकाराचा कायद्या लागू होऊन मात्र,तेच ते अधिकारी वारंवार आयोगात रुजू होतात जे माहितीच देत नाहीत!
नागपूर खंडपीठाने माहिती अधिकार कलम १८ अन्वये (१)(२)(३)(४)यांचा उपयोगच केला नाही!या कलमांतर्गत त्यांना चौकशी करण्याचे,समन्स पाठवणे,तपास करण्याचे अधिकार प्राप्त आहेत.दिवाणी कायदा १९०८ कलम(५)नुसार देखील माहिती आयोगाला संपूर्ण अधिकार प्राप्त आहे.वीस वर्षात एका ही कलमाचा उपयोग नागपूर खंडपीठाने केला नाही,याचा अर्थ भ्रष्टाचारालाच संरक्षण देण्याची कृती नाही का?असा सवाल शाह करतात.फडणवीस यांनी नागपूर खंडपीठाच्या प्रशासकीय कारभारात पारदर्शिता आणण्यासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान शाह यांनी केले.
शाह यांचे २०१५,२०१६,२०१८,२०२०,२०२१ पासून अपील अर्ज नागपूर खंडपीठात प्रलंबित आहेत!यातील एक अर्ज राहूल पांडे यांच्या नियुक्तीशीच संबंधीत आहे! २०२३ मध्ये राहूल पांडे यांनी शाह यांच्या अपीलावर आदेश देणे अपेक्षीत असताना २०२५ उजाडले तरी अंतरिम आदेश अद्याप प्राप्त झाला नसल्याचे ते सांगतात.
कळमना येथील प्रवेश एंटरप्राईजेस दुर्घटनेत १८ मजुरांचा मृत्यू झाला होता.१५ मीटर पर्यंत गोडाऊन बांधण्याचा नकाशा मंजूर करुन त्या ठिकाणी २२ मीटरपर्यंत कोल्डस्टोरेज बांधण्यात आले होते.हे गंभीर प्रकरण देखील अद्याप माहिती आयोगासह विविध तपास संस्थांच्या फे-यात अडकून पडले असल्याचे ते सांगतात.
भूखंडांशी संबधित अनेक महत्वपूर्ण प्रकरणात राहूल पांडे यांनी मौखिक आदेश दिले,लिखित आदेश पारित केले नाही.माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्टया गोत्यात आणणारे ‘हरपूर’जमीन घोटाळ्याचा देखील समावेश आहे. अनाधिकृत जामठा क्रीकेट मैदान,सीताबर्डी येथील गाेयल-गंगाचा ग्लोकल मॉल प्रकल्प या सर्व प्रकरणात राहूल पांडे यांनी आदेश पारित केले नसल्याची माहिती कमलेश शाह देतात.
माहिती अधिकाराचे अर्ज न स्वीकारणे हा माहिती अधिकाराच्या कलम-१८ अन्वये गुन्हा आहे.अपील अधिकारी नियुक्त केल्यानंतर ३० दिवसांची मुदत असते.३ महिने झाले द्वितीय अपील दाखल करुन मात्र,जाधव यांनी इतक्या जवाबदार पदावर असतानाही योग्य कारवाईसाठी पुढाकार घेतला नाही.परिणामी,जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी,अशी मागणी शाह यांनी निमदेव यांना लिहलेल्या पत्रात केली आहे. माहिती आयुक्तांकडे वारंवार कौटूंबिक कारणामुळे नागपूर शहर सोडू शकत नसल्याचे कारण रोहिणी जाधव यांनी आपल्या शिफारस पत्रात दिले आहे.मूळात त्यांच्या कौटूंबिक अडचणींचा आणि माहिती आयोगातील नोकरीचा काय संबंध?असा सवाल शाह करतात.
अशी मिळाली मुदतवाढ-
२५ मे २०१८ रोजी रोजी माहिती आयोग नागपूर खंडपीठात उपसचिव पदावर दोन वर्षांकरिता प्रतिनियुक्ती,पूर्वी त्या अवर सचिव होत्या.
-३१ मे २०२१ पर्यंत दोन वर्षांसाठी मुदतवाढ.
– पुन्हा एकदा कौटूंबिक कारणामुळे नागपूर येथे वास्तव्य करणे आवश्‍यक असल्याचे कारण रोहिणी जाधव यांनी पत्रात नमूद करुन सामान्य प्रशासन विभागाला पाठवले,परिणामी  २६ जानेवरी २०२२ पासून पुढील २ वर्षांसाठी पुन्हा मुतदवाढ.
– अपर मुख्य सचिव(सेवा)सामान्य प्रशासन विभागाने पुन्हा २८ फेब्रुवरी २०२३ पर्यंत जाधव यांना मुदतवाढ दिली.
– यानंतर २९ फेब्रुवरी २०२४ पर्यंत मुदतवाढ
-१ मार्च २०२४ पासून २८ फेब्रुवरी २०२५ पर्यंत परत मुदतवाढ
– २८ फेब्रुवरी २०२५ हा कालावधी संपल्यानंतर रोहिणी प्र.जाधव यांनी मंत्रालयातील उप सचिव पदावर रुजू होणे आवश्‍यक आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार.ही मुतदवाढ अंतिम असल्याचा शेरा देखील आदेशात नमूद आहे.
-आता नवनियुक्त माहिती आयुक्त नागपूर खंडपीठाचे गजानन निमदेव यांनी पुन्हा कार्यालयीन काम सुचारुपणे चालण्यासाठी रोहिण जाधव यांना आणखी  दोन वर्षांची मुदतवाढ मिळण्यासाठी शिफारिस पत्र दिले आहे.
याचा अर्थ तब्बल दहा वर्षांची सेवा रोहिणी जाधव एकाच विभागात देणार असून,त्यांच्या निवृत्तीपर्यंत याच विभागात त्यांना कार्यरत राहण्याचा ‘अध्यादेशच’फडणवीस सरकारने काढावा,असा खोचक टोला शाह हाणतात.
थोडक्यात,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगरात कामामध्ये एकमेव निष्णात अधिकारी या रोहिणी जाधव असून, राज्यातील इतर सनदी आधिका-यांमध्ये हे पद भूषविण्याची पात्रता नसल्याचे
सिद्ध होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना सेवानिवृत्त होण्याच्या तीन दिवस आधीच एक अध्यादेश संसदेच्या मंजुरीशिवाय पारित केले.यात तिस-यांदा मिश्रा यांचा कार्यकाल १७ नोव्हेंबर २०२१ रोजी एक वर्षासाठी वाढवण्यात आला.महत्वाचे म्हणजे अवघ्या बारा दिवसांनंतर २९ नोव्हेंबर रोजी संसदेचे अधिवेशन पार पडणार होते.मिश्रा यांना दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर एक वर्षाची मुदतवाढ पंतप्रधान मोदी यांनी दिली होती.मात्र,पुन्हा तिस-यांदा मिश्रा यांना मुदतवाढ देण्यासाठी मोदी यांनी अध्यादेश काढला ज्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मिश्रा यांना देण्यात आलेली मुदतवाढ अवैध ठरवली व वारंवार एखाद्या सनदी अधिका-याला मुदतवाढ देणे याचा अर्थ देशात त्या पात्रतेचा इतर कोणताही अधिकारी नाही,असा अर्थ ध्वनित होत असल्याची मौखिक नाराजी व्यक्त केली होती.मिश्रा यांनी ईडीचे संचालक असताना खासदार कार्ति चिदंबरम,कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार सहित विरोधी पक्षातील अनेक शीर्षस्थ नेत्यांना अटक करुन तुरुंगवास घडवला होता,हे विशेष!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगर नागपूरात देखील माहिती आयोगात प्रतिनियुक्तीवर असणा-या सनदी अधिकारी रोहिणी जाधव यांची वारंवार मुदतवाढ,माहिती अधिकाराची धार बोथट करणारी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे.मूळात माहिती आयुक्तांची बदली तीन वर्षात होते तर माहिती आयोगातील उपसचिव ‘कौटूंबिक’ कारणामुळे आठ-आठ वर्ष एकाच विभागात कसे राहू शकतात?असा प्रश्‍न निर्माण होतो.
……………………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या