फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजगडकरींची मुलाखत आणि...विदर्भाची दैना!

गडकरींची मुलाखत आणि…विदर्भाची दैना!

Advertisements

(भाग-३)

नागपूर,ता.२४ जून २०२५: नुकतेच नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेशिम बाग येथील सुरेश भट सभागृहात एक प्रदीर्घ मुलाखत सुप्रसिद्ध पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांना दिली.या मुलाखतीत त्यांनी लाखो कोटींची विकासकामे याचा सविस्तर उहापोह केला.गडकरी यांच्या शब्दातील लाखो कोटींची आकडेमोड ही सर्वसामान्यांचे डोळे दिपवून टाकणारी आहे.खरंच नागपूर-विदर्भात त्यांनी लाखो कोटींची विकास कामे केली असतील, तर मग विदर्भाच्या आणि शेतक-यांच्या वाट्याला इतकी आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक आणि औद्योगिक उपेक्षा येऊन विदर्भाची अशी दैना का व्हावी,हा प्रश्‍न स्वाभाविकपणे वैदर्भियांना पडला.पंतप्रधान हे देशाचे असतात व त्यांच्याकडून देशाच्या सर्वांगिण व समतोल विकासाची अपेक्षा असते.हे त्यांचे संवैधानिक कर्तव्य असतं.तसेच गडकरी हे नागपूर शहराचे खासदार असले तरी ते सातत्याने संपूर्ण विदर्भाच्या व शेतक-यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान,प्रगती इत्यादीचा उहापोह आपल्या भाषणात करताना दिसून पडतात.या देखील मुलाखतीत त्यांनी संत्रा,कापूस,दुग्ध उत्पादक शेतक-यांच्या प्रगतीपासून तर अनेक विषयांवर ‘दिलखुलास’भाष्य केले व टाळ्या देखील मिळवल्या.

मात्र,वस्तुस्थिती फार वेगळी असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील विदर्भातील अनेक गावांना पिण्याचे पाणी,चांगले शिक्षण,आरोग्याच्या सुविधा नसून अनेक गावातपर्यंत चांगले रस्ते नसून एस.टी बस देखील पाहोचलेली नाही.गडचिरोलीसह अनेक भागात माता व बालमृत्यूचे प्रमाण हे धडकी भरवणारे आहेत.पासवाळ्यात तर आणखी संकटे गावक-यांच्या वाटेला येऊन चार महिने अनेक गावांचा संपर्क हा ‘आधुनिक’जगाशी तुटलेला असतो.विदर्भाच्या वाट्याला आलेल्या या समस्या,संकटे आणि प्रश्‍न यांची सोडवूणक करणे हे राज्य सरकारचे काम असले तरी खासदार व मंत्री या नात्याने वारंवार गडकरी हे ज्या विदर्भाच्या विकासाचा दावा करतात,त्या विदर्भाच्या वाट्याला येणारी दैना याचा खास ‘सत्ताधीश’ने घेतलेला आढावा.

गडचिरोली सर्वात जास्त उत्पन्न देणारा जिल्हा बनणार असल्याची ग्वाही गडकरी यांनी दिली मात्र,त्यांच्याच विभाग आलापल्ली ते सिरोंचा ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून पूर्ण करु शकले नाही!परिणामी,या रस्त्यावरील शेकडो गावातील नागरिकांचे हाल  बेहाल असून पावसाळ्यात तर अक्षरश: या महामार्गावरील चिखल तुडवत प्रवास करणे शक्य नसल्याने हा मार्गच त्यांच्यासाठी बंद होतो.गडकरी यांच्या विभागाच्या अर्धवट कामामुळे उन्हाळ्यात धूळ व पावसाळ्यात चिखलाचा सामना गावातील नागरिकांना करावा लागतो.काही दिवसांपूर्वी एक खासगी वाहन चिखलात रुतले व तीन जड वाहने उलटली.गुड्डीगुडजवळ खासगी बसचे ब्रेक निकामी झाले.उमानूरपलीकडे एका खासगी वाहनाचे चाक या चिखलात रुतल्याने बसमधील प्रवाशीच वाहनाला धक्का मारुन नेत असल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली.

पूर्वी नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असणा-या गडचिरोलीची ओळख आता भविष्यातील स्टील सिटी असल्याचे ते सांगतात.येथील कच्चा माल वाहून नेण्यासाठी दिवस-रात्र एक करुन नवीन दर्जेदार पर्यायी मार्ग बनविण्यात आले मात्र,आष्टी-आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून पूर्ण होऊ शकले नाही,ही फार मोठी शोकांतिका असल्याचे येथील नागरिक सांगतात.

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या बांधकामात प्रचंड अनियमितता झाली.महागाव ते यवतमाळदरम्यान अनेक ठिकाणी महामार्गावर तडे गेले आहेत!रस्ता बांधकामाचा कालावधी संपला तरीही या महामार्गांची कामे अद्याप अर्धवट स्थितीत आहेत.महत्वाचे म्हणजे या महामार्गावर गेलेले तडे हे जीवघेणे आहेत.२०१५ मध्ये या महामार्गाच्या बांधकामाला सुरवात झाली.पाच वर्षात हा महामार्ग पूर्ण होणे अपेक्षीत होते.महामार्गावर बांधण्यात आलेले थांबे हे देखील अतिशय निकृष्ट आहेत.प्रवाश्‍यांना बसण्यासाठी बसवलेले बेंच तुटून खाली पडलेले आहेत.रस्ता दूभाजकावरील फूलझाडांवर होणार खर्च हा देखील डोळे विस्फारणारा असून अनेक ठिकाणी बाभळीची झाडे,बोरीच्या पालव्या आणि रुचकीच्या पालव्या रस्ता सौंदर्यीकरणाची वाट लावतात आहेत.नैसर्गिकरित्या जगणारी मोठमोठी वृक्षे या रस्त्याच्या बांधकामासाठी भुईसपाट झाली आहेत,याकडे लक्ष देण्यासाठी व काही शे कोटी खर्च करण्याची तसदी गडकरी यांचा विभाग  गडकरींच्या ‘विकासाची’संकल्पना साधताना दिसून पडत नाही.

याच मुलाखतीत कापूस उत्पादक शेतक-यांसाठी यवतमाळच्या एमआयडीसीत ‘टेक्सटाईल पार्क’बनवण्याची घोषणा त्यांनी पुन्हा एकदा केली. गेल्या ७ वर्षांपासून ते सातत्याने आपल्या प्रत्येक निवडणूक भाषणात व ‘प्रायोजित’मुलाखतीत हे सांगत असतात.या पार्कच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात गुंतवणूक वाढून यवतमाळ ही उद्योगनगरी होईल,असा दावा ते करतात.९५ हेक्टर जागा टेक्सटाईल पार्कसाठी घेण्यात आली आहे मात्र,७ वर्ष उलटून गेले, टेक्सटाईल पार्कमध्ये कापसावर आधारित उद्योग आलेच नाही,परिणामी एमआयडीसी कार्यकारी अभियंताचे कार्यालय अमरावतीला हलविण्यात आले!सर्वात महत्वाचे कापूस उत्पादक या भागातच शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या!

यवतमाळ जिल्हा औद्योगिकदृष्टया प्रगत व्हावा म्हणून दारव्हा मार्गावरील लोहारा येथे ४० वर्षांपूर्वी ६४५ हेक्टरवर औद्योगिक वसाहत उभारण्यात आली.सुरवातीच्या काळात कृत्रिम धागा बनविणारा ओरिएंट सिंथेट,हिंदूस्तान लिव्हर,रेमंडसारखे बडे उद्योग आले.देश-विदेशातील गुंतवणूकदारांना सोयीचे व्हावे यासाठी एमआयडीसीने विमानतळ बांधले.नंतर मात्र,या सर्व मोठ्या उद्योगांना आवश्‍यक सोयी न मिळाल्याने ओरिएंट सिंथेट बंद पडले.हिंदुस्तान लिव्हरचा उद्योग उत्तराखंडमध्ये गेला.रेमंड उद्योग समुहाचा विस्तार सोयी सुविधांअभावी रखडला.या एमआयडीसीत ९० लहान-मोठे उद्योग सुरु असून आतापर्यंत ९५ उद्योग पूर्णत:बंद पडले आहेत तर काही बंद पडण्याच्या स्थितीत आहे.कापसाच्या जिनिंग काहीच महिने सुरु असतात.अनेक उद्योजकांनी जागा घेतली मात्र,उद्योग सुरु केले नाही.काहींनी गोदाम बांधून भाड्याने दिले आहेत.हा औद्योगिक परिसर शहराचा भाग असल्याने अनेकांनी निवासस्थाने बांधली.हे उद्योग बंद पडण्या मागे सर्वात महत्वाचे विदर्भात सर्वात महागडे वीज दर हे कारण आहे.आज सर्वात स्वस्त मालवाहतूक रेल्वेची आहे.मात्र,यवतमाळ जिल्ह्यात रेल्वेचे जाळे नाही.यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे.त्यामुळेच विदर्भात गुंतवणूकदारांना सकारात्मक वातावरण नसल्याने विदर्भाचा औद्योगिक विकास हा फक्त नेत्यांच्या भाषणात आढळतो!
याशिवाय गडकरी यांच्या भाषणात व नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विदर्भातील संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची पुन्हा एकदा ‘उजळणी’झाली व जोरदार टाळ्या देखील प्राप्त झाल्या.राज्य सरकार १९५७ पासून विदर्भातील संत्रा उत्पादक शेतक-यांसांबत सापत्न वर्तवणूक करीत आली आहे.विदर्भात संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची घोषणा तब्बल ९ वेळा झाली आहे.एवढी वर्षे झाली आहे मात्र,एक ही संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला नाही!शेतक-यांना राज्य शासन तसेच बोलबच्चन नेत्यांवर विश्‍वासच राहीला नाही.पण,शेतक-यांना शासनावर अवलंबून राहण्याशिवाय दूसरा पर्यायही उपलब्ध नाही.दर वर्षी हिवाळी अधिवशेनात विदर्भातील संत्रा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला आश्‍वासनाची पाने पुसली जातात.
सत्तेवर कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतक-यांना न्याय मिळाला नाही.१९५७,१९६३,१९९२,१९९५,२०१३,२०१४,२०१७,२०१९,२०२१ या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विदर्भात संत्रा प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली.मात्र,संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी केल्या गेलेल्या घोषणा आणि तारखा प्रत्यक्षात कधी भूतळावर उतरल्याच नाहीत!नागपूर जिल्ह्यातील नरखेड,काटोल तालुका व अमरावती जिल्ह्यातील काही भाग हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखला जातो.आशिया खंडातील सर्वात जास्त पिकविला जाणा-या काटोल,नरखेड,मोर्शी,वरुड तालुलक्यातील संत्राने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नरखेड व काटोल तालुक्यात ३० हजार हेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आंबिया व मृग बहाराच्या संत्र्यांचे विक्रमी उत्पादन घेतले जाते.परंतु काटोल,नरखेड तालुक्यात कुठेच संत्र्यांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प नाही.कोल्डस्टोरेज व केअर हाऊसची सुविधा नाही.याचा परिणाम म्हणजे शेतक-यांना कवडीमोल भावाने आपला संत्रा विकावा लागत असतो.शासनाने अनेक आश्‍वासने दिली परंतु ती सगळी भाषणापुरती सिमित राहीली.कोकाकोला आणि जैन इरिगेशनचा संयुक्त प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हिरवखेड(ठाणाठुणी) येथे साकारण्यात आला.पण,नऊ वर्षांच्या कालावधीत जैन फार्म फ्रेश संत्रा उन्नती प्रकल्प शासनाच्या उदासीन धोरणामुळे पूर्णत्वास येऊ न शकल्यामुळे नागपूर व अमरावती जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादकांचा हिरमोड झाला.
मागील काही वर्षात तर नेते मंडळींनी सतत नरखेड व काटोल तालुक्यात संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याची घोषणा केली मात्र,त्या केवळ घोषणाच राहील्या.२०२१ मध्ये महाविकासआघाडी सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील काटोल व नरखेड तालुक्याला लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व वरुड तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची ‘दमदार’ घोषणा केली होती.मात्र,त्यालाही चार वर्षांचा कालावधी लोटला असून संत्रा उत्पादक शेतकरी गडकरी यांच्या घोषणांमधील व फडणवीस-शिंदे-पवार यांच्या सरकारकडून घोषित या प्रकल्पाची अद्यापही आस लाऊन बसला आहे!
(वाचा पुढील बातमीत भाग-४ मध्ये गडचिरोली होणार स्टील हब मात्र मेळघाटचा प्रवास काळोखातूनच!)
…………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या