निर्भयाच्या घटनेनंतर आणि गुन्हेगारांना फाशी दिल्यानंतर देखील वासनांध,मनोविकृत पुरुषांच्या मनात कुठलीही दहशत तसेच कायद्याचा धाक निर्माण झाला नाही..केवळ एक दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा गाजा-वाजा करुन महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटत नसतो.पुण्यातील स्वारगेटची घटना नेमकी काय सूचित करते?मुक्ताईनगरातील यात्रोत्सवात तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचीच छेड काढण्यासह तिच्या पोलिस सुरक्षारक्षकाला मारहाण करेपर्यंत टवाळखोरांची मजल गेली!जिथे मंत्र्यांची मुलगी सुरक्ष्त नाही तिथे सामान्यांचे काय?हा प्रश्न उपस्थित होणे क्रमप्राप्तच होता.
भुवनेश्वरमध्ये तर चक्क पोलिस ठाण्यात देशाची सुरक्षा करणा-या लष्करी अधिका-याच्या वागदत्त वधूवरच पाेलिस निरीक्षकाने लैंगिक अत्याचार केला!भुवनेशवर जवळील पथरागडीजवळ तीन मोटारीतून आलेल्या १२ जणांनी लष्करी अधिका-याचे वाहन अडवले.ही घटना गेल्या वर्षी १५ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री घडली.अधिका-याने प्रतिकाराचा प्रयत्न केला असता त्याला गाडीतून काढून मारहाण करण्यात आली.या गुंडांच्या तावडीतून पळून जाण्यात हे जोडपे यशस्वी झाले.यानंतर भरतपूर पोलिस ठाण्यात या जोडप्याने तक्रार नोंदवली मात्र,त्यांच्या तक्रारीवर कारवाई करण्या ऐवजी लष्करी अधिका-याच्या वागदत्त वधूला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्यावर अत्याचार केला.तिला विवस्त्र करुन कोठडीत लैंगिक अत्याचार करण्यात आला.पोलिसांना विरोध करताना संबंधित महिलेने एका महिला पोलिसाच्या हाताला जबर चावा घेतला.यामुळे पोलिसांनी महिलेला अटक करुन तुरुंगात डांबले.ओडीशा उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला.पोलिसांनी केलेल्या या कथित अत्याचारामुळे देशाच्या सद्सद् विवेकबुद्धीला हादरा बसला असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्यक्त केली होती!
गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या ५५ वर्षीय गोविंद नट नावाच्या मुख्याध्यपकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.तिने प्रतिकार करताच तिचा गळा घट्ट दाबला त्यामुळेच तिचा मृत्यू झाला!अवघ्या सहा वर्षाच्या या चिमुरडीचा मृतदेह शाळेच्या आवरात पोलिसांना १९ सप्टेंबर २०२४ रोजी सापडला होता.ही समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे,या घटनेमुळे मी व्यथित झालो,अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही पावले उचलू,अशी प्रतिक्रिया
गुजरातचे शिक्षणमंत्री कुबेर दिडोंर यांनी दिली.ही मुलगी दररोज या मुख्याध्यपकाच्या कारने शाळेत येत असे.घटनेच्या दिवशी नट हा सकाळी १० वाजून २० मिनिटांनी तिला घ्यायला आला.शाळेत जाताना कारमध्ये या ५५ वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.तिने आरडाओरड करताच तिचा गळा दाबून तिची हत्या केली.सायंकाळपर्यंत तिचा मृतदेह कारमध्येच होता.यानंतर या मुख्याध्यापकाने तिचा चिमुकला मृतदेह शाळेच्या इमारतीच्या मागे पुरला व तिचे दप्तर व बूट वर्गाबाहेर फेकून दिले…..!
महिला दिवस जगभरात साजरा होत असताना देखील तिसरी मुलगी जन्माला आल्याने पतीने पत्नीलाच जाळून मारल्याची घटना घडली…परभणी शहरात गंगाखेड नाका परिसरात मैना कुंडलिक काळे या महिलेला तिसरीही मुलगी झाल्याने कुंडलिकने रागाच्या भरात मैना हिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले…..!ही घटना २७ डिसेंबर २०२४ रोजी घडली.
त्यामुळेच प्रश्न पडतो ती कुठे सुरक्षीत आहे?घर,शाळा,महाविद्यालय,आश्रमशाळा,पोलिस ठाणे,खासगी,सरकारी आस्थापने..अगदी महाकुंभात देखील तिच्या आस्थेचे धिंधवडे सोशल मिडीयावर काढले गेले,पैसा कमावला गेला.शिराळा तालुक्यातील चिखली गावातील २० वर्षीय प्रांज राजेंद्र पाटील या युट्यूबरने प्रयागराजमध्ये स्नान करणा-या हजारो महिलांचे छूपे चित्रिकरण केले.ते सोशल मिडीयावर व्हायरल केले.आंबटशौकिनांसह विविध चॅनल्सलाही विकले. २१ फेब्रुवरी २०२५ रोजी तीन आरोपींना महाराष्ट्र पोलिसांनी अहमदाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले.
मल्याळम सिनेसृष्टिला हादरवून सोडणा-या अभिनेत्रींच्या लैंगिक शोषनावर प्रकाश टाकणा-या न्यायमूर्ती हेमा समितीचा तपशील उघड झाल्यावर मल्याळी चित्रपटसृष्टितील अनेक दिग्गजांना राजीनामा द्यावा लागला.केरळ चित्र अकादमीचे अध्यक्ष रंजित आणि ‘अम्मा’चे सरचिटणीस टी.सिद्दीक यात अग्रेसर होते. टेस जोस ,अभिनेत्री दिव्या गोपीनाथ,सोनिया मल्हार आदींनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला होता.हेमा समितीच्या ३६५ पानांच्या अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला होता.मल्याळम सिनेसृष्टिवर केवळ १० ते १५ निर्माते आणि दिग्दर्शक संपूर्ण वर्चस्व ठेऊन असल्याचे सांगत वेगवेगळ्या पातळ्यांवर महिला कलाकारांचे कशारितीने सुनियोजित पद्धतीने लैंगिक शोषण होतो हे वास्तव त्या अहवालातून सामोरे आले.एका नाट्यअभिनेत्रीचा विनयभंग या विषयाभोवती फिरणा-या ‘अट्टम‘या मल्याळी चित्रपटास ‘राष्ट्रीय’पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर तीनच दिवसांत त्याच मल्याळी चित्रपटसृष्टितील कृष्णकृत्यांचा पाढा जगासमोर आला!२०१७ मध्ये एका मल्याळी अभिनेत्रीचे झालेले अपहरण व तिच्यावरील लैंगिक अत्याचार यामुळे मल्याही चित्रपटसृष्टि हादरली होती.त्यानंतर मल्याळी चित्रपटसृष्टितील अभिनेत्रींना मिळणा-या वागणुकीबाबतच्या तक्रारींना वाचा फुटली व याचा तपास करण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती के.हेमा यांच्यावर सोपवण्यात आली होती.राजकीय नेते व चित्रपटसृष्टी यांचे ही मधूर संबंध या निमित्ताने चव्हाठ्यावर आले.याच प्रकरणामध्ये मल्याळी अभिनेते व मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे कोल्लम मधील आमदार के.मुकेश आणि जयसूर्य यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले.कन्नड अभिनेता दर्शन याला देखील तुरुंगवास घडला.
न्या.हेमा समितीच्या या अहवालामुळे भारतीय सिनेसृष्टितील २०१७ मधील ‘Me Too’च्या चळवळीच्या आठवणी ताज्या झाल्या…!कितीतरी ‘महान’अभिनेत्यांचे,निर्माते,दिग्दर्शकांचे,लेखक,राजकीय नेते यांचे पाय किती खोलात होते हे वास्तव समोर आलं होतं.
देशाची राजधानी दिल्लीत‘ ईवाय‘या बहूराष्ट्रीय कंपनीतील कर्मचारी ॲना सबेस्टियन पेरायिल हिचा मृत्यू असुरक्षीत आणि कामाच्या ठिकाणी शोषणकारी वातावरणामुळे झाल्याचा आरोप झाला होता.‘ईवाय’ची सदस्य कंपनी एस.आर.बाटलीबोईमध्ये २६ वर्षाची ॲना अकांऊटंट म्हणून काम करीत होती.कामाच्या अति ताणामुळे तिचा मृत्यू झालाचा आरोप झाला होता.मात्र,देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या घटनेवर ’कामाचा ताण सहन करण्याची आंतरिक शक्ती नाेकरदाराकडे असायला हवी,अध्यात्मानेच ती प्राप्त होते’असे विधान केले होते.त्यावर टिका झाल्यावर सीतारमण यांना खुलासा करावा लागला होता. मूळात अवघ्या २६ सा व्या वर्षी आंतरिक शक्ती,अध्यात्म समजण्या इतपत ॲनाची मानसिक स्थिती सक्षम होती का…!
आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना तर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी केजरीवालचे खासगी सचिव विभवकुमार यांनी बेदम मारहाण केली.संसदेतील महिला खासदाराला एखाद्या मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी बेदम मारहाणीचे हे प्रकरण ‘महिला दीनाचे’औचित्य आणखी गडद करुन जाणारे ठरते.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी कोलकताच्या क्रोर्यानंतर ‘बस्स…आता पुरे!’असे स्पष्टपणे बजावले असताना देशाच्या राजधानीतच एक माथेफिरु नकार देणा-या अल्पवयीन तरुणीला गजबजलेल्या शाहबाद डेअरी परिसरात रात्रीच्या आठ वाजता हजारो लोकां समोर तब्बल ३४ वेळा चाकूने भोसकतो यानंतर ही त्याचे मन नाही भरत तर दगडाने तिचा चेहरा ठेचतो!आरोपी साहिल खानच्या नजरेनेच उपस्थितांची मने थरकापली.सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा दिल्यानंतरही दिल्लीवर आपले प्रशासकीय नियंत्रण राहावे,यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणा-या मोदी सरकारने दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर अधिक लक्ष देण्याची गरज ठलकपणे अधोरेखित झाली होती.हत्येच्या दुस-या दिवशी बुलंदशहरातून पोलिसांनी आरोपीला अटक केली.आरोपीचे संबंधित तरुणीवर प्रेम होते.ते दोघे दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.मात्र,तिने त्याच्याशी आपले मैत्रसंबंध तोडताच,ती आपल्याला मिळत नाही हे बघताच त्याने ३४ घाव घालून तिची जिवनयात्राच कायमची संपवली.
गर्झा महाराष्ट्र माझा…हे शौर्य गीत गाणा-या महाराष्ट्राच्या शेगाव एस.टी.डेपोतील वाहक महिलेला ड्यूटी न देता, सकाळ पासून दूपार पर्यंत ताटकळत बसवून ठेवणा-या मॅनेजरची ‘ईच्छा‘पूर्ण करण्याचा सल्ला या डेपोतील तीन कर्मचारी तिला देतात!योगेश वांदे,प्रदीप जुमडे आणि संतोष दिवनाले यांनी हा अनाहूत सल्ला त्या महिला वाहकाला दिला होता. डेपो मॅनेजर गोविंदा जवंजाळ याच्या विरोधात शेगाव पोलिस ठाण्यात अखेर या महिला वाहकाने फिर्याद नोंदवली!
जळगावात ‘लखपती दिदी‘संमेलानातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या अशी सूचना केली होती.महिलांवर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे.त्याला माफी नाही.दोषी कोणीही असो त्याला सोडू नका,सरकारे येतील व सरकारे जातील पण महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घालू नका,अशा सूचना केल्या.२५ ऑगस्ट २०२४ रोजी पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारला महिलांना साक्षी मानून ही सूचना केली होती मात्र,ऐन विधीमंडळ अधिवशेन नागपूरात सुरु असताना १८ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरातील एमआयडीसीतील एका पेट्रोल पंपाच्या संचालिकेला अतिशय क्षुल्लक कारणावरुन आठ ते दहा गुंडांनी पायावर लोटांगण घालायला व माफी मागायला लावल्याची लाजिरवाणी घटना घडली.एमआयडीसी पोलिस हद्दीत इलेक्ट्रॉनिक झोन चौकातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या संचालिका सुचित्रा आहे.१८ डिसेंबर रोजी संध्याकाळी दोघे जण पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत असताना त्यांच्या अंगावर कुत्रा भुंकला.त्यांनी कुत्र्याला चप्पल फेकून मारली.यामुळे सुचित्रा व त्या दोन जणांमध्ये वाद झाला.काळी वेळाने दोघेही राजेश मिश्रासह,विकास बोरकर,पंकज बारेवार,आकश बोरकर,प्रांजल मडामे,गणेश कलामे,विजय मेश्राम असे सहा जणांना घेऊन आले.रात्री साडे दहा वाजता या सर्व गुंडांनी पेट्रोल पंपावर गोंधळ घातला.त्यांनी सुचित्रा यांना शिवीगाळ केली.पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी दिली.सुचित्रा यांना प्रत्येकाच्या पायावर डोके ठेऊन माफी मागण्यास बाध्य केले व याचा व्हिडीयोही काढला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात त्या गुंडांचा मस्तवालपणा,त्या महिलेची अगतिकता अनेकांना अस्वस्थ करुन गेली होती. त्यामुळेच देशापासून तर शहरापर्यंत साजरा होणा-या महिला दिनानिमित्त महिलांचा केवळ एक दिवस सन्मान पुरेसा नसून ,तिची सुरक्षतितता,तिचे अस्तित्व,तिच्या आत्मसन्मानाचे रक्षण हे वर्षाच्या ३६५ दिवस ही तितकेच महत्वपूर्ण आहे,या सर्व घटना हेच सिद्ध करतात,यात दुमत नाही.
…………………………