नाशिकमध्येच झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीमधून वायुगळती झाली आणि अग्नितांडव सुरु झाले.त्यात कोरोनाची गंभीर बाधा झालेल्या व जीवनरक्षक प्रणालीवर असलेल्या २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता! याचा देखील चौकशी अहवाल मंत्र्यालयातील एक नस्ती म्हणजेच फाईल बनून आरोग्य खात्यात पडून राहीली.
या घटनेनंतर नंतरच्या चारच दिवसात पालघर येथे वातानुकूलित यंत्रणेतल्या बिघाडामुळे १३ रुग्णांचा बळी गेला होता.या सर्व घटनांची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली व राज्यातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालये यांचे फायर ऑडिट तातडीने करण्याचे आदेश सरकारला देतानाच प्रतिबंधक उपाय न योजना-या रुग्णालयांना टाळे लावण्याची निर्देश दिले हाेते.न्यायालयाचे हे निर्देश सरकारने गांर्भीयाने न घेतल्यानेच अवघ्या सहा महिन्यातच नगर मधील दूर्घटना घडली व ‘राज्यातील रुग्णालये ही लाक्षागृहे बनली आहेत‘अशा तिखट शब्दांत मुख्य न्यायाधीशांनी सरकारला बोल लावून देखील सरकारने त्याकडे कानाडोळा केला.
यामागे खासगी रुग्णालये,त्यांना परवानगी देणारी मेडिकल कौन्सिल तसेच आरोग्य खात्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले निबर कातडीचे अधिकारी यांच्या साटेलोट्यात हे मृत्यू दडले आहेत!संपूर्ण देशातच हे घडतं.२०२० च्या नोव्हेंंबर महिन्यात राजकोटमधील उदय शिवानंद रुग्णालयाला लागलेल्या आगीत ८ जणांना मृत्यूने गाठले.एप्रिल २०२१ मध्ये रायपूर येथील राजधानी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील आगीत ५ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला.
१७ डिसेंबर २०२४ म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नागपूरात अमरावती महामार्गावरील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत रविवारी सकाळी शक्तीशाली स्फोटात ९ कामगा-यांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या.मृतांमध्ये ६ महिला होत्या.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनास्थळ गाठले,मृतकांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली.बाहेर नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता.या युनिटमध्ये सकाळी एकूण १२ कामगार ‘ट्रायनायट्रोटोल्यून‘स्फोटकाचे पॅकेजिंग करीत होते.यातील ३ कामगार घटनेच्या अवघ्या काही मिनिटा आधीच त्या यूनिटमधून बाहेर पडले हाते मात्र….!
२०१८ मध्ये ही याच कंपनीत स्फोट झाला होता ज्यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता!केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अनेक मंचावर नुवाल हे दिसून पडतात!गडकरी यांनी दिवंगत आत्म्यांना सद् गती मिळण्याची प्रार्थना माध्यमांकडे व्यक्त केली….!फडणवीस यांनी राज्य सरकार ठामपणे मृतकांच्या कुटूंबियांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.सरकार ५ लाख तर कंपनी २० लाख रुपये मदत देणार असल्याचे ते म्हणाले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घटना दूर्देवी असल्याचे सांगत जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या असल्याची प्रतिक्रिया घटनास्थळी दिली मात्र…९ कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असलेली यंत्रणा व माणसे यांना दोषी धरुन जबर शिक्षा करण्याचे आश्वासन मायबाप सरकार व नेत्यांनी टाहो फोडणा-या गरीब मृतक कामगारांच्या कुटूंबियांना दिलेच नाही…!
यातील चौघांचे पूर्णपणे भाजलेले मृतदेह आणि २० पाकिटांमधून अवयवांचे तुकडे डीएनए तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले गेले होते….!हातावर पोट असणारे हे कामगार सकाळी घरुन आपल्या कुटूंबात नेहमीप्रमाणे जिवंत परत येतील या आशेवर यूनिटमध्ये गेले होते पण….?कमी वेतनावर ठेवण्यात आलेले अकुशल कामगार आणि सुरक्षा नियमांची सर्रास पायमल्ली यावर मायबाप सरकार आणि नेतेगण काही बोललेच नाही…!
डोंबिवलीत २३ मे २०२४ रोजी एमआयडीसीच्या फेज दाेनमधील केमिकल कंपनीत दुपारी १.३० वा.रिॲक्टरचे तीन भीषण स्फोट झाले व स्वत:चा बचाव करण्यासाठी अर्धवट जळालेले कामगार सैरावैरा पळत सुटलेले दृष्य अंगावर काटा आणणारे होते.घटनास्थळी ८ जणांचे पूर्णपणे जळालेले मृतदेह पडले होते.६४ जण गंभीर जखमी झाले होते.या कंपनीत मिथील इथिल केटोल पेरॉक्साईड,ऑरगॅनिक केमिकल्स यासारख्या रसायनांचे उत्पादन घेतले जात होते.दूपारी रिॲक्टरमध्ये वेगवेगळी केमिकल्स मिळसत असतानाच हे स्फोट झाले.पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर या स्फोटांमुळे दणाणून गेला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देत मृतकांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत जाहीर केली….!
ठाणे पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जून महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू झाला.या नवजात बालकांमध्ये काही मुलांचे वजन कमी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालयाने केला.याच रुग्णालयात १३ ऑगस्ट २०२३ रोजी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती.रुग्णालयाच्या कार्यक्षमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या रुग्णालयात अवघ्या ४८ तासात ८ नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.
अपघातांच्या या मालिकेत २ जुलै २०२४ रोजी हाथरस येथील सुटाबुटातील बाबांच्या प्रवचनात चेंगराचेंगरीत १०० च्या वर भाविकांचा मृत्यू झाला होता.भक्तांनी मला बोलावले असल्याचे हे बाबा सांगतात मात्र,त्यांच्या या कृत्यामुळे १०० च्या वर निष्पाप भाविकांना देवाने बोलावून घेतले त्याचे काय?महाराष्ट्रातील मांढरदेवी आणि राजस्थानमधील चामुंडा देवी मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या ही ५०० हून अधिक आहे!२५ जानेवरी २००५ रोजी महाराष्ट्रातील मांढरदेवी चेंगराचेंगरीच्या घटनेत ३४० भाविकांचा मृत्यू झाला होता!
३ ऑगस्ट २००८ रोजी हिमाचल प्रदेशात नैना देवी मंदिर येथे पादच-यांसाठी उभारलेले शेड कोसळल्याने झालेल्या पळापळीत १६२ भाविकांचा मृत्यू,१२ गंभीर जखमी,३० सप्टेंबर २००८ जोधपूर येथील मेहरागढच्या चामुंडा देवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत २०० पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू,४ मार्च २०१० उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ जिल्हातील रामजानकी मंदिराजवळ चेंगराचेंगरीत ६३ भाविकांचा मृत्यू,१४ जानेवरी २०११ केरळच्या इडुक्की जिल्ह्यात पुलमेदू येथे शबरीमाला मंदिराच्या दर्शनासाठी जमलेल्या भाविकांत चेंगराचेंगरी होऊन १०४ भाविकांचा मृत्यू,८ नोव्हेंबर २०११ रोजी हरिद्वार येथील हर की पौडी येथे चेंगरा चेंगरीत २० भाविकांचा मृत्यू,२५ सप्टेंबर २०१२ झारखंडच्या देवघर येथे ठाकूर अनुकूल चंद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात आश्रमाच्या परिसरात चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू,१९ नोव्हेंबर पाटण्यातील अदालत घाटावर छट पुजेच्या वेळी चेंगराचेंगरीत २० भाविकांचा मृत्यू, १० फेब्रुवरी २०१३ रोजी अलाहबाद येथे कुंभ मेळ्यासाठी जमलेल्या भाविकांची रेल्वे स्थानकावर अचानक धावपळ उडाली व त्यात चेंगराचेंगरीत ३९ भाविकांचा मृत्यू,१३ ऑक्टोबर २०१३ रोजी नवरात्रीच्या काळात मध्य प्रदेशातील दातिया येथील रत्नगड मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन ११५ जणांचा मृत्यू,१५ ऑगस्ट २०२४ रोजी मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील चित्रकुट येथे कामतनाथ मंदिरात चेंगराचेंगरी होऊन १० भाविकांचा मृत्यू ६० जखमी,३ ऑक्टोबर २०१४ रोजी पाटण्यातील गांधी मैदान येथील दसरा उत्सवात चेंगराचेंगरी होऊन ३२ जणांचा मृत्यू,१४ जुलै २०१५ रोजी आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री येथे पुष्पकरम उत्सवदरम्यान गोदावरीच्या काठावर जमलेल्या भाविकांत चेंगराचेंगरी होऊन २७ जणांचा मृत्यू,२० जखमी,१ जानेवरी २०२२ रोजी जम्मू काश्मीरमधील माता वैष्णव देवी भवन येथे पहाटे अडीच वाजता झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू २० जखमी,३१ मार्च २०२३ रोजी इंदोर शहरात रामनवमीनिमित्त आयोजित होम हवनच्या कार्यक्रमात प्राचीन बावडीवरचा स्लॅब कोसळल्याने ३६ जणांना मृत्यू…..!या सर्व घटना व अपघातील मृत्यू प्रशासकीय अनास्था व राजकीय असंवेदनशीलतेचे बळी असले तरी भाविकांच्या भक्तीभावावर याचे सोयीस्कर खापर फोडून प्रशासन व नेते जबाबदारीमुक्त झालेले दिसून पडतात.
१५ नोव्हेंबर २०१७ रोजी झाशी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागाला आग लागून इन्क्युबेटरमध्ये असलेल्या दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.१६ बालके गंभीर भाजली होती.शॉटसर्कीटमुळे आग लागली होती.पंतप्रधान मोदी,मुख्यमंत्री योगी यांनी घटनेबद्दल संवेदना व्यक्त केली.या घटनेचे काही व्हिडीयोज काळजाचा थरकाप उडवणारे आहेत.आपल्या पिलांना वाचवण्यासाठी मातापित्यांची जीवघेणी धडपड आणि रुग्णालया प्रशासनावरील संताप शब्दबद्ध करण्या पलीकडे होते.भीषण आग आणि काळ्याशार धूरामुळे अतिदक्षता कक्षात कोणालाही जाता येत नव्हते.त्यावेळी अतिदक्षता कक्षात त्या काचेच्या पेटीत एकूण ५२ ते ५४ नवजात बालके उपचार घेत होती.हे रुग्णालय उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे!
या संपूर्ण घटनाक्रमातून देशाच्या किवा राज्यांच्या मायबाप सरकारने ज्या जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी ते निवडूण आल्याचा दावा करतात, त्याच जनतेच्या,कामगारांच्या आणि भाविकांच्या जिविताच्या सुरक्षेसाठी काहीही केले नसल्याचे सिद्ध होतं.त्यामुळेच राजकीय व प्रशासकीय अनास्थेचे हे दूर्देवी बळी असेच जात राहतील.मोठी धेंडे जगत राहतील,या सर्व दुघर्टना जणू हेच सिद्ध करतात,अपघातांच्या या देशातील संविधानात कितीही समानतेचे अधिकार असले तरी,गरिबांच्या वाटेला असेच अपघाती मृत्यू येणे हेच या देशाचे देखील प्राक्तन आहे,असेच आता म्हणावे लागेल.
…………………………………………
(तळटीप:-
आजच काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स बारूद कंपनीमध्ये स्फोट होऊन या दुर्दैवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झाले आहेत.
या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत….!)