फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनअवनी प्रातिनिधीक..पत्रकारिता आणि प्रवृत्ती सत्य

अवनी प्रातिनिधीक..पत्रकारिता आणि प्रवृत्ती सत्य

Advertisements
‘स ला ते..स ला ना ते’मराठी चित्रपट डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे

डॉ.ममता खांडेकर

(Senior Journalist)

(रविवार विशेष)
नागपूर,ता.९ फेब्रुवरी २०२५: सिनेमा हा गंभीरपणे बघण्याची कला आहे मात्र,आपण डोके गहाण ठेऊन त्याचा आंनद घेत असतो,असे खडे बोल फिल्म गुरु समर नखाते यांनी नागपूरात २२ सा व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऐकवले होते.सिनेमा तयार करण्यासाठी दिग्दर्शक,कलावंत,तंत्रज्ञ यांनी कथानक,अभिनय,प्रसंगांचा दांडगा अभ्यास केला असतो.प्रचंड मेहनत,पैसा ओतून सिनेमा तयार झालेला असतो असे सांगत ,सिनेमाचा आदर करायला शिका,असे पोटतिडकीने सांगितले होते. संतोष कोल्हे दिग्दर्शित ‘स ला ते स ला ना ते’ हा नुकताच ७ फेब्रुवरी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला असल्ल मराठी चित्रपट असून,हा सिनेमा प्रत्येक मराठी माणसाने विशषेत: मराठी-अमराठी पत्रकारांनी आर्वजून पहावा असा आहे,इतके गांर्भीर्य या चित्रपटात सामावलेले आहे,हे विशेष.
या चित्रपटात दोन-तीन वेगवेगळे कथानक इतक्या सहजतेने गुंफले आहेत की संपूर्ण चित्रपटात ते वेगवेगळ्या दृष्टिकोणातून पाहताच येत नाही.संपूर्ण चित्रपट एका नवख्या पत्रकाराच्या भोवती गुंफल्या गेले आहे जो अतिशय महत्वाकांक्षी आहे.या मागे त्याने बघितलेली,भोगलेली गरिबी कारणीभूत असते.त्यामुळेच जिवनात उत्कर्षाची संधी मिळताच तो त्या संधीचे फक्त पैसा कमाविण्याचे ध्येयाने उपयोग करु पाहतो.आपले व भविष्यातील आपल्या कुटूंबियांचे भवितव्य सुखी,संपन्न करण्याच्या ध्येयाने झपाटलेला हा नायक वर्तमानाला विसरुन फक्त भविष्यासाठी जगत असतो.वयाच्या ३५ वर्षापर्यंत त्याला १३५ कोटी कमावून ठेवायचे असतात,यानंतर आपल्या पत्नी,होणारी दोन मुले व आईसोबत एक सुखी,समाधानी व आनंदी जिवन जगायचं असतं मात्र,भविष्य समाधानी करण्याच्या ध्येयात अचानक संपूर्ण वर्तमान त्याच्या हातातून ..कायमचं निसटून जातं आणि प्रेक्षक स्तब्ध होऊन चित्रपटगृहाबाहेर पडतो.
विदर्भातील चंद्रपूर या शहरातून आलेला हा पत्रकार खूपच हरहुन्नरी तरुण असतो.सतत नव्याच्या शोधात धडपडणारा असतो.मोबाईल मध्ये जे दुस-यांच्या खिजगणतीतही असत नाही ते शूट करण्याचा त्याचा ध्यास व परिकल्पना ही कौतूकास्पद असते.हाच चिवटपणा त्याला योगायोगाने एका मोठ्या मराठी वृत्तवाहीनीचा चंद्रपुरातील स्ट्रींगर बनवते.यानंतर त्याच्या जिवनात अनेक गोष्टी घडत जातात.मुंबईत पहील्याच भेटीत त्याचा ’लक’ठरलेली समिधा ही त्याची अर्धांगिनी होते.ती अडखळत बोलत असते त्यामुळेच ती बरीच अबोल असते.मुंबई सोडून संसारासाठी समीधा चंद्रपूरात येते मात्र,१३५ कोटींचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सतत धावणारा हा पत्रकार वैवाहिक जिवनातील सोनेरी क्षण ही ‘व्यवसायिक’ करत जातो.याचा समिधाला खूप त्रास होतो मात्र,तेजस तिलाच खुळी ठरवतो.तेजसला वाटतं तो हे सगळंं तिच्यासाठी व भविष्यात त्यांच्या होणा-या दोन बाळांसाठी करतोय.
अशातच यवतमाळची बहूचर्चित वाघिण अवनी हिचा संशयास्पद मृत्यू  या कथानकाला धक्कादायक कलाटणी देतो.नोव्हेंबर २०१८ मध्ये नरभक्षक ठरविण्यात आलेल्या अवनीला रात्री उशिरा राहेगांव तालुक्यातील बोराटी गावात ठार करण्यात आलं होतं.T1 किंवा अवनी या नावाने ओळखल्या जाणा-या या सहा वर्षाच्या वाघिणीने १४ जणांचा जीव घेतल्याचा आरोप होता.वाघिणीला मारणा-या चमूमध्ये तीन वनकर्मचारी,असगर नावाचा एक शार्पशूटर आणि एक वाहनचालकाचा समावेश होता.मात्र,वन विभागाने कट करुन अवनीला ठार केले या मागे वन जमिनीवर कोणाचा तरी डोळा होता असा आरोप प्राणीहक्क कार्यकर्त्यांनी केला होता.अवनीला गोळी मारण्या पूर्वी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही व तिला ठार करण्यासाठीच कट रचण्यात आला अशी जोरदार ओरड त्यावेळी समस्त प्रसार-प्रचार माध्यमात उमटली होती.
चमूमधील एक सदस्य शेख याने वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला,तो डार्ट झाडींमध्ये लपून बसलेल्या वाघिणीला लागलाच नाही,वाघिणीने मागे जात पुन्हा हल्ला केल्याने स्वरक्षणासाठी शार्पशूटर असगर यांनी ८ ते १० मीटरवरुन गोळ्या झाडल्या यात अवनी जागेवरच मरण पावली होती.सप्टेंबर २०१८ मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात निर्णय दिला होता की, या वाघिणीला शोधमोहिमेदरम्यान नाईलाज झाला तरच वाघिणीला ठार केलं जावं,त्यात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही,पण तिला जिवंत पकडण्याचाच प्रयत्न व्हावा,असंही कोर्टाने स्पष्ट केलं मात्र….कोर्टाचा हाच निर्णय सहा वर्षाच्या अवनीसाठी मृत्यूचा वॉरंट ठरला! सराईत खासगी शिका-याने अवनीला ठार मारले होते.यावर तत्कालीन वनमंत्री व चंद्रपूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देशभरातून टिकेची झोड उठली होती. मेनका गांधी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान करीत,मुख्यमंत्र्यांना समजायला हवं कोणाला वनमंत्री करायचं ते!अशा शब्दात टिकेची झोड उठवली होती तर अर्थ ब्रिगेडचे डॉ.पी.व्ही सुब्रमण्यम यांनी,न्यायालयाचा स्पष्ट आदेश होता की आधी वाघिणीला पकडण्यासाठी प्रयत्न व्हावेत पण तसे झाले नाही,हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असून सरकारमधील मंत्री व जबाबदार लोकांचच या कृत्याला पाठबळ असेल तर या पुढे जंगलांना काहीच भवितव्य नाही! दाक्ष्णात्य अभिनेते सिद्धार्थ याने अवनीच्या दोन लहाशा बछड्यांविषयी शोक व्यक्त करीत,ते इतके लहान आहेत की स्वत: शिकार करु शकत नसल्याने ते देखील लवकरच कोणाचे तरी शिकार होतील,अशी शंका व्यक्त केली.शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील राज्य सरकारच्या या कृतीवर टिका करीत, वन मंत्रालयाचे नाव आता शिकार मंत्रालय ठेवा,अशी टिका केली होती.

थोडक्यात,चित्रपटात अवनीच्या मृत्यूच्या प्रसंगाला अनेक कंगोरे आहेत. त्यात तेजस हा कोळसा खाण मालकाच्या हाताचे बाहूले बनत चुकीचे वार्तांकन करीत असल्याचे समीधाला कळत असतं,ती त्याला जंगल,पर्यावरण तसेच अवनीच्या जीवाचं महत्व पटवित असते मात्र,कोळसा खाणीचा मालक हसन(उपेंद्र लिमये)याच्या हातचं बाहूलं बनलेला तेजस हा खरी पत्रकारिता विसरुन अवनीच्या शिकारीचं सातत्याने ‘असत्य’ वार्तांकन करीत राहतो.याची फार मोठी किंमत देखील त्याला चुकवावी लागते.समीधा त्याच्या आयुष्यातून निघाल्यावर त्याला जाणीव होते.अवनीच्या हत्येमागील कट तो शोधून काढतो व त्याचा व्हिडीयो काढतो मात्र,त्याच जंगलात त्याचा ही घात होतो…!
या चित्रपटात अगदी पहील्या दृष्यात ,कोळसा खाणीचा मालक हसनच्या तोंडी एक संवाद आहे जो अगदी अंगावर येतो…‘आजपर्यंत तुझ्या चॅनलवर तुला माझी बाजू मांडणारे व्हीडीयो दाखवण्याचे पैसे मी तुला पुरवले,आता अवनी हत्याकांडाचे सत्य दाखविणारा व्हिडीयो न दाखविण्यासाठी तुला हवे तितके पैसे देतो!‘अर्थातच ही ऑफर तेजसमधील पत्रकार झुगारतो अन् …..!
हा चित्रपट भ्रष्ट पत्रकारितेवर प्रहार करतो,वन जमीनी व कोळसा खाणींसाठी चंद्रपुरातील बेसुमार वन संपदेवर डोळा असणा-यांना उघडे पाडतो,त्या सोबतच पुन्हा एकदा अवनीच्या धगधगत्या मृत्यूची विझलेली राख उकरुन काढण्यास यशस्वी होतो.
या चित्रपटात पत्रकार जेव्हा ‘सत्य’सांगायला जातो तेव्हा तो कायमचा अबोल होतो पण सदैव मौनात असलेली समिधा ही तो कायमचा मौनात गेल्यावर  धडाधड सत्य बोलून जाते.. याचाच अर्थ ‘सत्याला मरण नाही’सत्य कोणीली लपवू शकत नाही,सत्य संपवू शकत नाही,ना पत्रकार,ना भ्रष्ट प्रशासन,ना स्वार्थी  व लोभी राजकारणी ना  साक्षात ब्रम्हदेव…!अवनीचा मृत्यू हा चित्रपटात जरी प्रातिनिधीक असला तरी चित्रपटातील पत्रकारिता व प्रवृत्ती ही सत्य घटना ठरते.
सत्यासाठी बळी गेलेली पत्रकार गौरी लंकेश,कलबुर्गी,दाभोळकर यांचा सत्यासाठीच बळी गेला मात्र…सत्य कोणालाही संपवता आलं नाही. अनेक गौरी लंकेश,कलबुर्गी व दाभोळकर त्यानंतर ही जन्माला येत राहीले,येत राहतील.नुकतेच ११ जानेवरी २०२५ रोजी बीजापूरच्या मुकेश चंद्राकार या पत्रकाराची १२० कोटींच्या निकृष्ट रस्ते बांधकामाच्या वार्तांकनासाठी कंत्राटदार सुरेश चंद्राकारने हत्या करुन त्याचा मृतदेह सेफ्टी टँकमध्ये पुरवून ठेवल्याची घटना घडली.
संतोष कोल्हे यांच्या या मराठी चित्रपटातील ‘आज पर्यंत माझी बाजू मांडणारे व्हिडीयो दाखवण्यासाठी पैसे पुरवले आता अवनीच्या मृत्यूचे सत्य दाखवणारा व्हिडीयो न दाखवण्यासाठी हवे तितके पैसे देतो’या संवादाची आठवण मुकेशच्या मृत्यूची आठवण ताजी करुन जातो.मुकेश चंद्राकार हा सत्यासाठी बळी जाणारा शेवटचा पत्रकार नाही,सत्याला संपवू पाहणारे आपल्या भ्रष्ट व्यवस्थेत पदोपदी आहेत हा चित्रपट ठलकपणे हे अधोरेखित करतो.

चित्रपटात एक ही गाणी नसली तरी पार्श्वसंगीत मनाचा ठाव घेणारे आहे.तेजसची भूमिका निभवणारा साईंकित कदम आणि समीधाची सशक्त भूमिका वठवणारी छाया कदम यांच्या सर्वोकृष्ट अभिनयातून फूललेला हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने व मराठी-अमराठी पत्रकाराने आर्वजून बघावे असा आहे.आधीच मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही त्यात ही मल्टीफ्लॅक्समध्ये अवघे ७ किवा ८ प्रेक्षक मिळत असतील तर चित्रपटगृहाचे मालक हे अवघ्या एका आठवड्यात चित्रपट काढून टाकतात त्यामुळेच संतोष कोल्हे दिग्दर्शित ‘स ला ते स ला ना ते’हा अगदी अंगावर येणारा चित्रपट एकदा तरी बघावा असा आहे.स्टूडिओ लॉलिकल थिंकर्स प्रस्तुत हा चित्रपटाची निर्मिती ही संतोष कोल्हे यांनी केली आहे.श्रीकांत बोजेवार,तेजस घाडगे,संतोष कोल्हे यांची पटकथा लेखन तर श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे.,विनायक जाधव यांनी छायांकन ,सचिन नाटेकर यांनी संकलन,एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शनह,रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत तसेच रोहित प्रधान यांनी ध्वनि आरेखन केलं आहे.
अभिनेता छाया कदम,उपेंद्र लिमये यांच्यासह साईंकित कामत,रिचा अग्निहोत्री,पद्मनाभ बिंड,मंगल केंकरे,वंदना वाकनीस,सुरेश म्हशीलकर,रमेश चांदणे,सिद्धीरुपा करमरकर यांच्या चित्रपटात सहायक भूमिका आहेत.चंद्रपूरातील घनदाट वनराई तसेच चिखलदरातील दृष्य या चित्रपटाला नेत्रसुखद करतात तर चित्रपटातील वैदर्भिय बोलीभाषेतील संवाद एक वेगळी उंची प्रदान करतात.
थोडक्यात फिल्मगुरु समर नखाते हे, ‘चित्रपट केवळ एक कथेपुरता मर्यादित नसतो’असे सांगतात.दिग्दर्शक संतोष कोल्हे यांचा ‘स ला ते स ला ना ते’हा चित्रपट देखील एकाच कथेत आयुष्यातील अनेक कंगारे गुंफण्यात यशस्वी झाले आहेत अर्थात तरी देखील या चित्रपटाचे नाव असे का आहे?हे उलगडण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांना चित्रपट बघावा लागेल त्याशिवाय या नावामागील गुढ उकलू शकणार नाहीत.प्रेक्षकांना या नावामागील तथ्य जेव्हा कळतं तेव्हा…या शीर्षकाशिवाय या चित्रपटाचे इतर कोणतेही नाव असूच शकत नव्हते,याची देखील खात्री पटते.
….
तळटीप:-
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अवनी वाघिणच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण देशातून टिकेची झोड उठत असतानाच ,त्यांच्या शासकीय वाहनात त्यांच्यासोबत नागपूरातील एक नव्हे तर तब्बल चार-चार संपादक हे जंगलात गेलेले काही पत्रकारांना दिसतात!अर्थात सोशल मिडीयाच्या या जगात कोणतेही ‘सत्य‘लपून राहत नसल्यानेच काही डिजिटल माध्यमकर्मींनी या संपादकांना आपल्या मोबाईल कॅम-यात शूट केले!
हे चार ही संपादक प्रतिष्ठित समजल्या जाणा-या मराठी दैनिकांचे संपादक होते.परिणामी यांची चमू आपल्या कार्यालयातील कक्ष सोडून वनमंत्र्यांच्या वातानुकुलीत वाहनात काय करीत होती?कोणत्या वृत्ताचे वार्तांकन करण्याची किंबहूना कोणते वृत्त दडपण्यासाठी सिद्ध झाली होती?असा सवाल त्यावेळी उमटला होता.यातील तीन संपादकांची गच्छंती झाली असून एक संपादक त्यांचे वृत्तपत्र विदेशी मालक असल्याने थोडक्यात बचावले!
दिग्दर्शक संतोष कोल्हे यांच्या या मराठी चित्रपटात जरी एका उदयोन्मुख पत्रकाराची पैशांची लालसा व पत्रकारितेच्या मुल्याशी केलेली प्रताडना ठलकपणे अधोरेखित झाली असली तरी संपादक व त्याही पुढे काही वृत्तपत्र मालकांच्या तत्वशून्य व्यवहारिकतेची देखील आठवण या निमित्ताने नागपूरच्या पत्रकारांना झाल्याशिवाय राहीली नाही!)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या