फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनतीर ऐसा चलाया मजा आ गया...

तीर ऐसा चलाया मजा आ गया…

Advertisements
सनम बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टवर नागपूरकर धुंद

नागपूरकरांमध्ये वेगळीच उर्जा: सनम पुरी यांचे कौतूगोद्गार
नागपूर,ता.२ फेब्रुवरी २०२५: खासदार क्रीडा महोत्सवात आज यशवंत स्टेडियममध्ये  सुप्रसिद्ध ‘सनम बँडच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट’चे समारोपीय कार्यक्रमाला आयोजन करण्यात आले होते.जुन्या गीतांना अनोख्या अंदाजात सादर करुन सनम पुरी यांनी नागपूरकर श्रोत्यांचे काळीज पुन्हा एकदा काबिज केले. या पूर्वी खासदार सांस्कृतिक महोत्सवात त्यांच्या सादरीकरणातून तरुणाई बेधुंद झाली होती.
 जुन्या गीतांना नव्या शैलीत अनोख्या पद्धतीने सादर करून तरूणाईच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या सनम पुरी यांच्या सनम बँडने नागपूरकरांना चांगलेच थिरकायला लावले. ‘पल पल दिल के पास तुम रहती हो…’, ‘ये रातें, ये मोसम..’, ‘हैं अपना दिल तो आवारा..’, ‘लग जा गले..’, ‘ये रात भीगी भीगी..’ ‘चला जाता हूं..’ ‘गुलाबी आँखे जो ‘तेरी देखी..’ ‘पहला नशा..’ अशा अनेक जुन्या गीतांसोबत नव्या गीतांच्या शृंखलेत ‘तुमसे ही दिन दिन होता हैं…’ अशा नव्या गाण्यांच्या सादरीकरणाने नागपूरकांना त्यांनी खिळवून ठेवले.
सनम पुरी यांच्या आवाजातील खरज आणि सुरांच्या मुरक्या अचंभित करणा-या होत्या.विशेष म्हणजे आजच्या करोकेच्या काळात घरोघरी टी.व्हीच्या स्क्रीनवर शब्द पाहून गायन सादर करणा-या हौशी व व्यवसायिक गायकांना सनम पुरी एक संदेश देण्यास यशस्वी झाले, इतकी गाणी त्यांना तोंडपाठ होती.त्यांनी सादर केलेल्या पाकिस्तानी गायिका रुना लैला यांचे ‘दमा दम मस्त कलंदर’ या गीताने पुन्हा एकदा प्रत्येकाला आपल्या तालावर थिरकवणारा जुना काळ आठवून गेला.
दूपारपासूनच रसिक तरुणाईने यशवंत स्टेडियममध्ये गर्दी करण्यास सुरवात केली होती.खचाखच भरलेल्या स्टेडियमने स्वरांची व तालांची जादू पुन्हा एकदा अनुभवली.कार्यक्रम ऐन रंगात आला असताना अचानक भव्य दिव्य मंचावरची प्रकाश व्यवस्था अल्प काळासाठी कोलमडून पडली.वायर जळाल्याने मंचावर अंधार झाला मात्र,मंचावरील एलईडी सुरु होता.त्याच्याच प्रकाशात सनम पुरी यांनी कार्यक्रम सुरु ठेवला.

(छायाचित्र: मोबाईल टॉर्चचा लखलखाट)

लाईव्ह कार्यक्रमात कधी कोणते विघ्न येईल हे सांगता येत नाही तसेच कार्यक्रम ऐन रंगात आला असताना तो पंधरा मिनिटांसाठी मध्येच थांबवणे योग्य नसून यामुळे कार्यक्रमाची रंगत जाते व मनाेरंजनात खंड पडतो.परिणामी सनम पुरी यांनी श्रोत्यांनाच साद घालत,अंधार असला तरी कार्यक्रम सुरु ठेवावा की थांबावे,अशी विचारणा केली.मायबाप श्रोत्यांनी अंधारातही गायन सुरु ठेवण्याची फरमाईश केली.नागपूरकरांची हीच उर्जा कायम आमच्या ह्दयात राहील,अशी साद सनम पुरी यांनी घातली.
कार्यक्रमात लीड गिटार,स्पॅनिश गिटार,ड्रम्स,की-बोर्ड यांची सुरेल जुगलबंदी श्रोत्यांना ऐकायला मिळाली.प्रेमाशिवाय या जगात दुसरे सत्य नाही,जगात असेपर्यंत फक्त प्रेम करा,प्रेम द्या आणि प्रेम घ्या,आयुष्यात कोणतीही खंत मागे न ठेवण्याचा मोलाचा सल्ला तरुणाईला सनम पुरी यांनी दिला.श्रोत्यांच्या खास फरमाईशवर सनम पुरी यांनी ‘गुलाबी आंखे’हे गीत सादर करुन रसिक श्रोत्यांची मने जिंकली.
याप्रसंगी कार्यक्रमात श्रोत्यांनाही सहभागी करीत,गॅलरीत बसलेले श्रोते व मध्ये मैदानात बसलेले श्रोते यांचे दोन गट करीत, आवाजाच्या पातळीची सनम पुरी यांनी चाचणी घेतली व यानंतर सगळेच विजयी झाल्याचे सांगत,नागपूरकर श्रोत्यामधील उर्जा ही अप्रतिम आहे,वेगळी आहे,खूपच उत्तम असल्याचे सांगत, ही उर्जा शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर त्यांनी ‘नीले नीले अंबर पर’,है अपना दिल तो आवारा’ही गाणी सादर केली.हे गाणे गाताना ते श्रोत्यांमध्ये समोर बसलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याजवळ जात ‘आप गाओगे क्या सर?’अशी विचारणा केली,गडकरी यांनी हसून त्यांची फरमाईश टाळली व हसूनच त्याच्या पाठीवरुन हात फिरवला.

यानंतर त्यांनी ‘ये चांद सा रोशन चेहरा’गीत सादर केले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तरुणाईला थिरकवणारे पंजाबी गीत ‘काल चष्मा’,कुढे नाल ईश्‍क‘,‘ईश्‍क तेरा तडपाये’ही गीते सादर करुन माहोल केला.मात्र,कार्यक्रमात जोश भरताना काही श्रोत्यांनी खुर्च्यावरील अभ्रे काढून  हवेत उडवणे सुरु केले,यावर नाराजी व्यक्त करीत कॉन्सर्ट सुरु ठेवायचा असेल तर श्रोत्यांनी अभ्रे हवेत भिरकावू नये अशी सूचना आयोजकांना करावी लागली.
पंजाबी गीतांवर थिरकणा-या तरुणाईला अचानक थांबवित सनम पुरी यांनी ‘तुझसे नाराज नही जिंदगी’हे गीत सादर करुन त्यांच्या ह्दयाच्या तारांना हळूवार स्पर्श केला.या कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे जुनी गीते ही आधुनिक तालवाद्यांवर सुरेल गुंफत सनम पुरी यांनी उत्कृष्टरित्या सादर केली व त्या गीतांचा गोडवा अधिक वाढवला.

नागपूरात दुस-यांदा आलो असून मायबाप रसिक श्रोत्यांचा हा प्रतिसाद बघून मी नागपूरच्या प्रेमात पडलो असल्याची ग्वाही सनम पुरी यांनी दिली.कार्यक्रमाच्या शेवटी समर पुरी,सनम पुरी,व्यंकटेश सुब्रम्हण्यम आणि केशव धनराज यांचा गडकरी यांच्या हस्ते स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्टेडियमच्या बाहेर पडणा-या तरुणाईच्या ओठांवर ’तीर ऐसा चलाया मजा आ गया’हे थिरकणारे गीत गुणगुणत होते.स्टेडियम हाऊस फूल्ल झाल्यामुळे स्टेडियमच्या बाहेरच मोठ्या स्क्रीनवर हजारो रसिकांनी कार्यक्रमांचा आनंद लृटला.
…………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या