फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजविरोधकांनाही श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा वर्धापन सोहळ्याचे निमंत्रण!

विरोधकांनाही श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा वर्धापन सोहळ्याचे निमंत्रण!

Advertisements

सुबोध आचार्य यांचे आवाहन

बडकस चौकात सुप्रसिद्ध गायक कन्हैया मित्तल यांच्या भव्य संगीताचा कार्यक्रम

नागपूर,ता.२० जानेवारी २०२५: भारतीय जनता पक्षाचे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली आमदार सांस्कृतिक आयोजन समितीची स्थापना करण्यात आली असून येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा प्रथम वर्धापन सोहळा महाल येथील बडकस चौकात सायंकाळी ५ वा. आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक सुबोध आचार्य यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.या कार्यक्रमाचे निमंत्रण आम्ही शहरातील विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील देणार असल्याचे एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले.

कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक कन्हैया मित्तल यांचा सुश्राव्य भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर होणार असून याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे,शहराध्यक्ष बंटी कुकड,आमदार प्रवीण दटके,कृष्णा खोपडे,मोहन मते,माजी आमदार गिरीश व्यास,विकास कुंभारे तसेच शहरातील इतर प्रतिष्ठितांची उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा गेल्या वर्षी २२ जानेवारी रोजी झाली होती.या मंदिराला मुगल आक्रमणका-यांनी ध्वस्त केले होते.श्री रामजन्मभूमी मंदिर न्यास ट्रस्टने या मंदिराच्या मुक्ततेसाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला.६ डिसेंबर १९९२ रोजी या ठिकाणच्या वादग्रस्त बाबरी मजिदचा ढाचा पाडून अस्थाई मंदिराचे निर्माण करण्यात आले होते,असे सुबोध आचार्य यांनी सांगितले.

१५२८ रोजी श्रीरामजन्म भूमिवर मजिदीचे निर्माण करण्यात आले होते.रामायण तसेच हिंदूंच्या विविध धार्मिक ग्रंथानुसार याच ठिकाणी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता.१८५३ मध्ये हिंदू व मुस्लिम समुदायामध्ये पहिल्यांदा राम जन्मभूमीला घेऊन वाद निर्माण झाला.३० नोव्हेंबर १८५८ रोजी बाबा फकिर सिंग खालसा यांच्या नेतृत्वात २५ निहंग सिखांनी बाबरी ढाच्यावर कब्जा केला व अनेक दिवस या ठिकाणी राम नामाचा पाठ केला.यावर त्यांनी श्रीरामाचे नाव देखील कोरले.१८५९ मध्ये इंग्रजांनी दोन्ही समुदायातील वाद बघता मुस्लिमांना आतमधील तर हिंदूना बाहेरील भागात नमाज व पूजा अर्चना करण्याची परवानगी दिली.१९४९ साली आतील भागात भगवान श्रीरामाची मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.यानंतर वाढता वाद बघता तत्कालीन सरकारने मुख्य द्वारावर कुलूप लावले.

१९८९ मध्ये विश्‍व हिंदू परिषदने वादग्रस्त जमीनीच्या बाजूला राम मंदिराच्या निर्माणाचे कार्य सुरु केले.६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मजिद कारसेवकांद्वारे पाडण्यात आली.परिणामी,देशभरात उसळलेल्या दंगलीत किमान दोन हजार लोकांचा मृत्यू झाला.
१६ डिसेंबर १९९२ रोजी लिब्रहान आयोग गठीत करण्यात आले.आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती एम.एस.लिब्रहान हे आयोगाचे अध्यक्ष होते.लिब्रहान यांना १६ मार्च १९९३ रोजी म्हणजे तीन महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले,मात्र आयोगाने अहवाल देण्यासाठी तब्बल १७ वर्षे लावली! २००२ मध्ये रामजन्म भूमीच्या गैर विवादित जमीनीवर होणा-या मंदिराच्या बांधकामाविरोधात असलम भुरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.न्यायालयाने ५ सप्टेंबर २०१७ पासून या प्रकरणावर सुनावणी घेण्यास सुरवात केली.यानंतर सर्वोच्च न्यायालाने राम जन्मभूमी न्यासच्या बाजूने निकाल दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०१९ रोजी मंदिराचे भूमिपूजन झाले व २२ जानेवरी २०२४ रोजी भव्यदिव्य स्वरुपात भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली.हा आनंदोत्सव संपूर्ण देशाने साजरा केला.याच पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी २२ जानेवरी रोजी देखील पंडित बच्छराज व्यास विद्यालयाच्या प्रांगणात सुप्रसिद्ध गायक हंसराज रघूवंशी यांच्या गायनाचा कार्यक्रम घेतला असल्याची माहिती याप्रसंगी सुबोध आचार्य यांनी दिली.यंदाच्या कार्यक्रमात देखील रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात उपस्थिती दर्शवण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचा उद्देश्‍य हा श्रीराम जन्मभूमीचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा,हा असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिती,हिंदू रक्षा समिती,भारतीय जनता युवा मोर्चा,मध्य नागपूर,बडकस चौक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेला सुनील काबरा,संजय चिंचोले,राहुल आसरे,अक्षय ठवकर,अथर्व त्रिवेदी,रितेश पांडे,पप्पु पानसे,प्रसाद गाडे,सनी झेंडे,अनुप साळवे, अश्‍विन निमजे आदी उपस्थित होते.
(बातमी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official you tube चॅनलवर बघता येईल)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या