फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणमारेक-यांमधील राजकीय आत्मविश्‍वासाचे आणखी किती बळी?

मारेक-यांमधील राजकीय आत्मविश्‍वासाचे आणखी किती बळी?

Advertisements
सरपंच संतोष देशमुख हूतात्मा दिन विशेष

नागपूर,ता.९ जानेवरी २०२५: राज्यभर गाजत असलेल्या मस्साजोग(ता.केज)गावातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन र्निघृण हत्या झाली ,संपूर्ण माणुसकीची मान शरमेने खाली घालणा-या त्या घटनेला आज एक महिना झाला.९ डिसेंबर रोजी दुपारी राजकीय पाठबळावर मस्तावलेल्या सहा गावगुंडांनी सरपंच संतोष देशमुख यांना घेरुन मारले ती हीच ९ तारीख होती.जिवितासाठी गयावया करणा-या आणि वेदनेने विव्हळणा-या संतोष देशमुखांना या सहाही ‘राजकीय‘गावगुंडांनी ज्या पद्धतीने संपविले,निपचित पडल्यानंतर त्यांच्या छातीवर पाय देऊन नाचले,त्याचे चलचित्रण केले,आपल्या ‘आका’ला दाखवले,ते सर्व राज्याचे गृहमंत्री पद सांभाळणा-या मुख्यमंत्र्यांचेच अपयश नाही का?असा सवाल अवघा महाराष्ट्र आता करतो आहे.
मस्साजोग गावाच्या पांदण रस्त्यावरुन आता ‘आका’चा वाद दिल्लीला पोहोचला आहे.संपूर्ण महाराष्ट्र हा उपमुख्यमंत्री अजित पवारचे खास असणारे धनंजय मुंडे यांचा अप्रत्यक्ष सहभाग या क्रोर्याच्या घटनेत उघड्या डोळ्याने बघत असताना,आरोप सिद्ध हाेत नाही तोपर्यंत मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याची वलग्ना महाराष्ट्रासारख्या ‘सुसंस्कृत‘म्हणवणा-या राज्याचे उपमुख्यमंत्रीच करीत असेल तर,आज पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेला घेऊन तेथील पोलिस आयुक्तांना कानपिचक्या देण्याचा त्यांना नैतिक अधिकार उरतो का?हा मोलाचा प्रश्‍न आहे,कारण पुणे आणि बिड हे दोन्ही महाराष्ट्राचेच भाग असून गुन्हेगारीत याचे वर्गीकरण होऊ शकत नाही.
दिल्लीला गृहमंत्री अमित शहा यांना सहकार,साखरेचे भाव वाढवणे,निर्यात धोरण इत्यादी बाबींसाठी भेटलो,अशी कितीही कारणे अजित पवार यांनी माध्यमांना दिली असली तरी ते धनंजय मुंडे यांचे मंत्री पद वाचवण्यासाठीच दिल्लीला गेले असल्याचा आरोप, समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात होत आहे.शरद पवार यांचा पक्ष फोडून वेगळे निघालेल्या अजित पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याची बक्षीसी या स्वरुपात धनंजय मुंडे यांना मिळत असल्याचे बोलले जात आहे.या ही पलीकडे मुंडे यांच्या अंतर्गत वर्तुळात व अंतरंगात वावरणारा खंडणीबाज गुंड, वाल्मीकी कराड याच्या शंभर कोटींपेक्षाही अधिक, गडगंज संपत्तीची यादी ज्याप्रमाणे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज वाचून दाखवली ते बघता, कराड यांच्या संपत्तीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी कोणत्या नेत्याचा किती वाटा आहे?ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र धनंजय मुंडे याचा राजीनामा मागत असतानाही त्यांना पाठीशी घालण्याचे काम होत आहे!असा प्रश्‍न निर्माण होतो.‘गिळता ही येत नाही,थूंकता ही येत नाही’,अशीच काहीशी अवस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेली आढळते.
ग्रामीण भागात ठेकेदार,शहरी भागात रिअल इस्टेट आणि बिल्डर राजकारण्यांच्या हातात हात घालून गडगंज माया कमावतात आहे.हल्ली विधान सभेची निवडणूक लढायची असल्यास एका मतदारसंघात किमान ५० कोटींपेक्षा जास्त खर्च पक्षाला करावा लागत असतो.वाल्मीकी कराडची मस्साजोगमधील ‘अवादा’कंपनीकडूनची दोन कोटींची वसुली ही याच हेतूने त्याचे आका धनंजय मुंडे यांच्यासाठी किवा त्याही पलीकडे ‘आका चे आका’यांच्यासाठी होती का?याचा शोध गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गठीत केलेली कोणती एसआयटी करेल?त्यामुळेच गेल्या एक महिन्यापासून सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांच्या डोळ्यातील न थांबणा-या अश्रूंच्या धारांना या सरकारकडून न्याय मिळेल,याची शाश्‍वती नाही. पाणी कुठं मुरतंय, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे,राजकारणाचे गुन्हेगारीकरण ही नित्याची बाब झाली असून ,त्या ही पुढे फक्त दोन कोटींसाठी राजकारणाचे क्रोर्यकरण झालेले ही घटना सिद्ध करते.

सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते त्या वेळी न्यायाची अपेक्षा वाढली होती मात्र,जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच,अशी मखलाशी करुन ते मस्साजोगमधून चालते झाले.गावगुंड ते थेट राजकारणी मंत्री…खरा दोषी कोण हे कोण सिद्ध करेल? गृहमंत्र्यांची पोलिस यंत्रणा?ज्यांनी ५ मई २०२४ रोजीच या गुंडगिरी व खंडणीसाठी अवादा कंपनीचे व्यवस्थापक यांचे अपहरण करुन दमदाटी दिली असल्याच्या तक्रारीवर काहीच केले नाही,६ डिसेंबर रोजी हाच सुदर्शन घुले व इतर आरोपी अवादा कंपनीच्या दलित सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत असताना संतोष देशमुख यांनी त्याच्यासाठी धाव घेतली.सुदर्शन घुले,विष्णु चाटे,सुधीर सांगळे,कृष्णा आंधळे,प्रतीक घुलेे,जयराम चाटे व महेश केदार सारख्या नराधमांशी पंगा घेतला.त्यांनी सरपंच संतोष यांना झापड मारल्यामुळे त्यांनीही या गुंडांच्या दोन थोबाडीत दिल्या.यानंतर ९ डिसेंबर रोजी सरपंचाला गॅसचा पाईप,त्यावर काळ्या करदोड्याने तयार केलेली मूठ,पाच क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप,लाकडी दांड्याला लोखंडी तारेचा दांडा,चार लोखंडी रॉड,लोखंडी फायटर,कत्ती तसेच तलवारसदृश शास्त्रांनी मारा करुन,शरीराचा प्रत्येक भाग सोलून काढून संतोष देशमुखांचा जीव घेण्यात आला!शवविच्छेदन करणा-या डॉक्टरांचाही आत्मा भयकंपित व्हावा,इतके क्रोर्य संतोष देशमुखांसोबत घडले.बेदम मारल्यानंतर आरोपींनी त्यांच्या छातीवर उड्या मारल्याची चित्रफित्र ही काय दर्शवते?विशेष तपास पथकाद्वारे आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगोळे यांना अटकेनंतर न्यायालयात हजर करताना त्यांच्या चेह-यावर भीतीचा लवलेश ही नव्हता,त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्‍चाताप ही नव्हता,त्यांचा हा बेखौफपणा,पोलिसी यंत्रणेचे व पर्यायाने गृहमंत्रालयाचे अपयश नाही का?

वाल्मीकी कराडवर एकूण २२ गुन्हे दाखल असून त्यातील ८ गुन्ह्यात तो र्निदोष सुटतो, मात्र,खंडणी,अपहरणासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद असतानाही त्याला परळी तालुक्यातील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष बनवण्यात आले,यावरुन या महायुती सरकारची महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींनी किती कीव करावी?धस यांनी विधानसभेत गंभीर अरोप करताना,परळी,बिडमधील या गुंडांच्या टोळक्यांची हिंमत इतकी निर्ढावलेली असल्याचा आरोप केला आहे की,गावातील एखादी सुंदर मुलगी दिसताच,तिला भोगण्याच्या लालसेपासून या नराधमांना रोखण्याची हिंमत कोणामध्येही नव्हती.त्या मुलीचा भाऊ,चुलते,वडील,नातेवाईकांचे अपहरण करुन त्यांना फोडून काढण्याची हिंमत आली कुठून?मंत्री धनंजय मुंडे यांच्या आर्शिवादातून?
गृहमंत्र्यांचा पोलिस विभाग हा बिड जिल्ह्यात कशाप्रकारे काम करीत होता,हे सोशल मिडीयाने गेल्या एक महिन्यापासून त्याचे अतोनात किस्से चव्हाट्यावर आणले आहेत.६ डिसेंबरची वादाची घटना घडल्यावर तेथील पोलिस अधिकारीच आरोपीला स्वत:च्या दुचाकीवर घेऊन सरंपचाला शोधत फिरत होता! आरोपींसोबत तडजोड करण्यासाठी सरपंचाच्या भावाकडे निरोप पोलिसांनीच दिला होता.त्यांच्यावर विश्‍वास ठेऊन सरपंच हे आपापसातले भांडण मिटवण्यासाठी गेले होते मात्र,पोलिसांसमोर त्यांचे अपहरण झाले,तब्बल सहा तास ते आरोपींच्या तावडीत होते आणि सहा तास त्यांना अमानुष मारहाण होत राहीली!गृहमंत्र्यांनी सरपंचांच्या कुटूंबियांना आश्‍वस्त केले आहे ‘दोषींपैकी कोणालाही सोडणार नाही’.यात खरे राजकीय दोषी यांनाही शिक्षा होईल का?या प्रश्‍नाचे उत्तर गृहमंत्र्यांकडून संपूर्ण महाराष्ट्राला हवे आहे.
सत्याच्या बाजूने लढणा-यांसोबत महाराष्ट्रात एवढे र्निघृण क्रोर्य घडत असेल तर सत्यासाठी या पुढे कोणीही लढणार नाही.देशाच्या लोकसभेतच जर १९६ खासदारांवर जर थेट हत्या आणि अपहरणाचे गुन्हे दाखल असतील तर राज्यातील विधान सभेत काय चित्र असेल?
ठेकेदारी,खंडणी,नफेखोरी,माफियागिरी आणि राजकारणी यांच्या अनैतिक संबंधातून गेल्या दहा वर्षात पुरोगामी महाराष्ट्राची संपूर्ण वीण विस्कटली आहे.अगदी मस्साजोग ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीत अवादा सारख्या कंपनीला काही एकर जागा उपलब्ध करुन दिल्याने कंपनीला दोन कोटींची खंडणी मागणे,त्याचा सरपंच व गावकरी विरोध करीत असल्याने सरपंचाची र्निघृण हत्या करने,त्या हत्येची चित्रफित बनवणे हे त्या गुंडांमागे राजकीय पाठबळ किती मोठे आहे हे दर्शवते.
पुण्यातील ७५ कोटींच्या मालमत्तेत तर आरोपींसोबतच एका आराेपीच्या जाधव नावाच्या बहीणीचाही वाटा निघतो!पुण्यातील मालमत्तेत वाल्मीकी कराडच्या वाहनचालकांचे नाव पुढे येतं!
एका आरोपीचे घर पत्र्यांचे आहे मात्र तो गावात स्कॉर्पिओ मधून फिरतो!आमदार धस यांनी वाल्मीक कराडच्या एकूण संपतीचा पाढा वाचला असता अवघ्या महाराष्ट्राचे डोळे पांढरे झाले.

थोडक्यात,कायदा हा सर्वांसाठी समान असतो हे सिद्ध करण्यासाठी मुंडे यांना देखील दोषी धरुन

त्यांच्यावर वाल्मीकी कराडसारखे गावगुंड पोसण्याचा गुन्हा दाखल करण्याचे धाडस गृहमंत्री दाखवतील व त्यांना तुरुंगात डांबतील तोच दिवस दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांसाठी न्यायाचा दिवस असेल.मात्र,असे होणार नाही कारण मुंडे यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांचे बरेच आर्थिक ‘राज‘असे असतील ज्यामुळे अजित पवार मुंडे यांना हात लावण्याचे धाडस कधीही करणार नाही.त्यामुळेच अजित पवार यांच्या तोंडी,जे दोषी आहेत त्या दोषींना शिक्षा होईल आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तोंडी,कोणालाही सोडणार नाही,असे कितीही आश्‍वासक विधाने असली तरी दिवंगत संतोष देशमुख यांना किमान महायुतीच्या कार्यकाळात कधीही न्याय मिळणार नाही,हेच आज संपूर्ण महाराष्ट्र जाणतो आहे.
नियतीने नव्हे तर महाराष्ट्रातील सत्ताधारी राजकारण्यांनी दिवंगत संतोष देशमुख यांचे सत्यासाठीचे हौतातम्य आणि त्यांच्या कुटूंबियांची विवशता यांची क्रूर थट्टा कुठे तरी थांबवावी,संतोष देशमुखांच्या मासिक हौतातम्य दिनी इतकीच अपेक्षा राज्यातील जनतेची आहे.याच न्यायाने परभणीतील हिंसाचारात गृहमंत्र्यांच्या पोलिसी अत्याचारात बळी पडलेला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबियांना देखील न्याय मिळावा,हीच अपेक्षा आहे.
…………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या