फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपुरातील खेळाडू देशासाठी गौरव ठरतील : ना. नितीन गडकरी

नागपुरातील खेळाडू देशासाठी गौरव ठरतील : ना. नितीन गडकरी

Advertisements

पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेते खेळाडू सन्मानित

१२ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान खासदार क्रीडा महोत्सव

६१ खेळ, ७३ क्रीडांगण, २९०० चमू, ८० हजार खेळाडू, दीड कोटी पुरस्कार

नागपूर,ता.१ जानेवरी २०२५: नागपूर शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने खासदार क्रीडा महोत्सवाची सुरूवात करण्यात आलेली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी अधिक जोमाने आपल्या खेळात पारंगत होऊन यश संपादित करावे या हेतून त्यांच्या प्रोत्साहनासाठी विविध आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आमंत्रित करण्यात येतात. पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने देशाचा गौरव वाढविला आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुढील काळात नागपुरातील खेळाडू आपल्या कामगिरीमुळे देशाचा गौरव ठरतील, असा विश्वास खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा बुधवारी १ जानेवारी २०२५ रोजी रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहामध्ये महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते झाली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विशेष अतिथी म्हणून भारतीय पॅरा ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष पद्मश्री देवेंद्र झांझरिया, सत्कारमूर्ती भारतीय पॅरा ऑलिम्पिक संघाचे मुख्य प्रशिक्षक श्री. सत्यनारायण, पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेते खेळाडू नितेश कुमार, सुमित अंतिल, हरविंदर सिंग, धरमबीर नैन, प्रवीण कुमार, नवदीप सिंग आणि अवनी लेखारा उपस्थित होते. मंचावर आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी, भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष  जितेंद्र (बंटी) कुकडे, महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर यांची विशेष उपस्थिती होती.

१२ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. 

आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष श्री. जितेंद्र (बंटी) कुकडे, माजी आमदार सर्वश्री नागो गाणार, मल्लिकार्जुन रेड्डी, श्री. जयप्रकाश गुप्ता, माजी नगरसेवक सर्वश्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, दीपक चौधरी, माजी नगरसेविका श्रीमती श्रद्धा पाठक यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी विविध ६१ खेळांच्या क्रीडा संघटनांना महोत्सवाचे ध्वज प्रदान करण्यात आले.

 खासदार क्रीडा महोत्सवाच्या सातव्या पर्वाच्या तारखांची घोषणा समारंभामध्ये देशाचा अभिमान असलेले पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सन्मान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

भारतीय पॅरा ऑलिम्पिक संघाचे मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण, बॅडमिंटन पुरुष एकेरीत सुवर्ण पदक विजेता नितेश कुमार, ऍथलेटिक्स भाला फेक मध्ये सुवर्ण पदक विजेता सुमित अंतिल, तिरंदाजी वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक विजेता हरविंदर सिंग, ऍथलेटिक्स क्लब थ्रो मध्ये सुवर्ण पदक विजेता धरमबीर नैन, ऍथलेटिक्स उंच उडीमध्ये सुवर्ण पदक विजेता प्रवीण कुमार, ऍथलेटिक्स भाला फेक मध्ये सुवर्ण पदक विजेता नवदीप सिंग, महिला गटात १० मीटर एअर रायफल शुटिंगमध्ये सुवर्ण पदक विजेती अवनी लेखारा या खेळाडूंनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने जगात संपूर्ण देशाचे नावलौकिक केले आहे. या सर्व खेळाडूंचा खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे गौरव करून त्यांच्या कामगिरीप्रति सन्मान व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी म्हणाले, खासदार क्रीडा महोत्सवात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांसाठी देखील स्पर्धांचे आयोजन ही अत्यंत आनंदाची बाब आहे. खेळाच्या माध्यमातून खेळाडूंच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याचेही ना. गडकरी म्हणाले. शहरातील जास्तीत जास्त मुलांनी मैदानात येऊन खेळावे यासाठी मैदानांचा विकास करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. यासाठी राज्य शासनाने शंभर कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. बावनकुळे यांच्या मागणीवरून पुढील काळात तालुका स्तरावर देखील काही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची सूचना श्री. गडकरी यांनी आयोजन समितीला केली. क्रीडा संघटनांनी देखील खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी सर्वांनी एक होऊन कार्य करावे, खेळाडूंनी खेळाचे नियम, पंचांचा निर्णय याचा सन्मान करून खेळावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

खासदार क्रीडा महोत्सव नागपूर-विदर्भासाठी देण : चंद्रशेखर बावनकुळे 

नागपुरात आयोजित होणारा खासदार क्रीडा महोत्सव हे देशासाठी एक उदाहरण ठरले आहे. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी देशाला क्रीडा महोत्सव कसे असावे हे दाखवून दिले आहे. सात वर्षापूर्वी छोट्या स्वरूपात असलेले महोत्सव आज विशाल रूपात आयोजित होत आहे. खासदार क्रीडा महोत्सव हे नागपूर आणि देशासाठी मोठी देण आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यांनी ना. नितीन गडकरी यांनी मैदानाच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या मागणीवर राज्य सरकार साकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

संत्र्यांसाठी प्रसिद्ध नागपूर खेळाडूंसाठी प्रसिद्ध होईल : पद्मश्री देवेंद्र झांझरिया

खासदार क्रीडा महोत्सवामुळे खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. देशात संत्र्यांसाठी प्रसिद्ध नागपूर पुढील काळात खेळाडूंसाठी प्रसिद्ध होईल, असा विश्वास यावेळी तीन पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक विजेते भारतीय पॅरा ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष पद्मश्री देवेंद्र झांझरिया यांनी व्यक्त केला. पॅरिस पॅरा ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना पाठविण्याआधी पत्रकार परिषदेत आम्ही किमान २५ पदके जिंकू असे सांगितले तेव्हा त्यास थट्टेचा विषय करण्यात आला. पण खेळाडूंनी आपल्या कामगिरीने देशाला २९ पदक मिळवून दिले. पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताने ६० वर्षात ३० पदके जिंकली पण एकट्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये २९ पदके जिंकून पदकतालिकेत १८ वे स्थान प्राप्त केल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

जय पराजयाचा विचार करू नका खेळ ‘एन्जॉय’ करा : अवनी लेखारा 

स्थानिक स्तरावर अशा भव्य क्रीडा महोत्सवामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. खेळाडूंना पुढे जाण्यासाठी असे महोत्सव आवश्यक आहेत. खेळाडूंनी जय पराजयाचा विचार न करता आपल्या कामगिरीकडे लक्ष देऊन खेळ ‘एन्जॉय’ करावा, असा मंत्र पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये महिला गटात १० मीटर एअर रायफल शुटिंगमध्ये सुवर्ण पदक विजेती अवनी लेखारा यांनी खेळाडूंना दिला. खेळातील आपल्या कामगिरीने इतर खेळाडूंना प्रेरणा मिळणे अभिमानास्पद असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यंदाही खेळाडूंना विमा कवच : संदीप जोशी

खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी खेळाडूंना मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील दोन लाखांची विमा सुविधा मिळणार असल्याचे खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाबाबत सांगताना ते म्हणाले, यंदाचा क्रीडा महोत्सव १२ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ असा २० दिवस चालणार असून या २० दिवसांमध्ये शहरातील ७३ क्रीडांगणांवर ६१ खेळ खेळले जातील. यात विविध ६१ खेळांच्या तब्बल २९०० चमू, ६००० ऑफिसियल्स, ८० हजार खेळाडूंचा समावेश असेल. एकूण १३१०० स्पर्धा खेळविण्यात येणार असून यात खेळाडूंना १२३१७ मेडल्स आणि ७६२ ट्रॉफी देण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्यांना १ कोटी ५० लक्ष रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत, असेही श्री. संदीप जोशी यांनी सांगितले.

कार्यक्रमात खासदार क्रीडा महोत्सवाचे कोषाध्यक्ष  आशीष मुकीम,  सुधीर दिवे,  नागेश सहारे, डॉ. पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत किरपाने, डॉ. सौरभ मोहोड, रमेश भंडारी, प्रकाश चांद्रायण, नवनीतसिंग तुली आदी उपास्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन माय एफएम चे आरजे आमोद यांनी केले. डॉ. पीयूष आंबुलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी रिषभ जैन यांनी बहारदार गीतांद्वारे श्रोत्यांना रिझविले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या