फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशवो आसमान था  मगर....

वो आसमान था  मगर….

Advertisements
(रविवार विशेष)

नसीरुद्दीन शहाने दिवंगत पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना ‘जमाना कर ना सका उसकें कद का अंदाजा,वो आसमान था मगर सर झुका के चलता था’या शब्दात एक्सवर श्रद्धांजली वाहीली.याहून वेगळ्या शब्दात डॉ.मनमोहन सिंग यांचे व्यक्तित्व समाविष्ट होऊ शकत नाही ,हे खरे आहे.मनमाेहन सिंग यांनी २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकी पूर्वी शेवटची पत्रकार परिषद घेतली त्यात एकूण ६८ प्रश्‍नांशी उत्तरे त्यांनी अत्यंत धीराने  दिली. त्यात अनेक प्रश्‍न हे भ्रष्टाचारावर असून वर्मी लागणारे होते आणि हेच मनमाेहन सिंग व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांतील कारर्कीदीची तुलना करण्यासाठी पुरेसे आहे.
डॉ.सिंग हे अर्थतज्ज्ञ होते.फार गरीबीतून ते पुढे आले होते पंरतु त्यांनी कधीही आपल्या गरीबीचे जाहीर प्रदर्शन राजकीय लाभासाठी केले नाही.फाळणीची वेदना त्यांनी सहन केली होती.कंदीलच्या प्रकाशात ते अभ्यास करीत होते,त्यामुळेच त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होऊन त्यांना भिंगाचा चष्मा लागला.दूसरीकडे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात फक्त आपल्या विदेशी दौरे व प्रतिमा निर्मिती करणा-या जाहीरातींवर देशाचे ६६ अरब रुपये खर्च केल्याची आकडेवारी सर्वसामान्यांचे डोळे विस्फरणारी आहे.मनमोहन सिंग यांच्यात पराकोटीची नैतिकता होती. कधीही त्यांना जनतेचा पैसा स्वप्रतिमेसाठी उधळण्याची कुबुद्धी सुचली नाही.आज ते अनंतात विलीन झाले आहेत,भारतीय संस्कृतीत स्वर्गवासी झालेल्यांसाठी चांगले बोलले जाते.मनमोहन सिंग यांना ‘मौनी बाबा’ची उपरोधिक उपमा देणारे पंतप्रधान मोदी यांनी देखील ही संस्कृती जपत, त्यांना आदरांजली वाहीली. सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला,त्यांच्या अंत्यंसंस्काराला आपल्या संपूर्ण मंत्रीमंडळासोबत उपस्थित राहीले.
असे असले तरी मनमोहन सिंग व मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना ही होणारच आहे.मात्र,मोदी अंधभक्तांचे सोशल मिडीयावरील यावरील कमेंट्स बघितले तर त्यांच्या अंधबुद्धीची देखील कीव करावीशी वाटते.मनमोहन सिंग यांनी जेव्हा १९९०-९१ मध्ये अर्थमंत्री पद स्वीकारले तेव्हा भारताची अर्थव्यवस्था तिथे पोहोचली होती जिथे आज पाकिस्तानची आहे.फक्त तीन ते चार बिलियन भारताकडे शिल्लक होते ज्यावर आणखी दोन आठवडे देशाचा कारभार चालू शकत होता.जोखीम पत्करुन मनमोहन सिंग यांनी उदारीकरण आणि जागतिकीकरणाची नीती स्वीकारुन परकीय उद्योगांना भारताची दारे उघडून दिली.याचेच फळ आज सर्वच क्षेत्रात देशवासी चाखत आहेत.२०१४ मध्ये पंतप्रधान पदावरुन ते जेव्हा पायउतार झाले त्यावेळी ३०० बिलियनची गंगाजळी देशाकडे सोडून गेले होते.ते राजकारणी नव्हते पण दूरदृष्टि असणारे विलक्षण बुद्धीचे अर्थतज्ज्ञ होते,प्रामाणिक होते व प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार करणारे होते.त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही विरोधकांवर टिका केली नाही,त्यामुळे त्यांची व मोदी यांची तुलना होऊ शकत नाही.
स्वत: अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात मनमोहन सिंग यांना ‘गुरु’चा दर्जा दिला आहे.२००८ मध्ये जग आर्थिक मंदीमध्ये गंटागळ्या खात होते तेव्हा जी-२० संमेलनप्रसंगी बराक ओबामा यांनी मनमोहन सिंग यांना यातून मार्ग काढण्याचा सल्ला मागितला होता,यावरुन त्यांची विद्वता सिद्ध होते.मनमोहन सिंग कधीही स्वत:विषयी बोलत नव्हते.त्यांच्यात फक्त एकच कमतरता होती ती म्हणजे ते खूप प्रामाणिक होते.त्यांच्यासोबत अखेरच्या काही वर्षात जे घडले ते पंतप्रधान पदाची गरिमा घालवणारे होते.मोदी काळात त्यांच्या घरावर सीबीआयचा छापा देखील पडला. मोदी काळात त्यांच्या पासून सचिवांना देखील हिरावून घेण्यात आले होते.शेवटच्या क्षणी फक्त मुरली नावाचे एक सचिव व एक स्टेनो एवढाच स्टाफ त्यांच्याकडे ठेवण्यात आला होता. पंतप्रधान म्हणून त्यांच्या सगळ्या सुविधा देखील मोदी काळात काढून घेण्यात आल्या.हे माजी पंतप्रधान पदाची गरिमा कमी करणारेच कृत्य होते.
संसदेत तर मनमाेहन सिंग यांचा उपहास करीत मोदी यांनी ते ‘आंघोळ देखील छत्री डोक्यावर धरुन करतात’अश्‍या शब्दांचा प्रयोग केला होता.ते खूप गरीब कुटूंबातून आले होते, ते फार विद्वान होते हे सोयीस्करपणे विसरण्यात आले.आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत त्यांनी ’मी हे केले,मी ते केले’अशी वल्गना केली नाही,जे काही केले ते देश व देशवासियांसाठी केले,असाच भाव त्यांच्या कृतीत होता.आता पुन्हा एकदा या देशाला मनमाेहन सिंगसारखा राजकारणात राहूनही नैतिकता जपणारा पंतप्रधान मिळणार नाही.
२५ एप्रिल २०१९ रोजी एका वरिष्ठ पत्रकाराने त्यांना नरेंद्र मोदी यांच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे?असा प्रश्‍न केला होता.त्यांनी दोन वेळा तो प्रश्‍न टाळला मात्र,तिस-यांदा त्यांनी उत्तर दिले. ‘मोदी यांना जर संभव असेल तर त्यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांसाठी कमी तिरस्कारयुक्त भाषेचा प्रयोग केला पाहिजे’हा एकच सल्ला दिला जो आजपर्यंत मोदी यांनी मानला नाही.त्या मुलखतीत खूप वेदना होत्या,मोदी सरकार देशातील स्वायत्त संस्थांसाठी गेल्या ७० वर्षात सर्वाधिक विनाशकारी ठरली आहे.बेरोजगारीचा आलेख गेल्या ४५ वर्षात सर्वात जास्त आहे,ज्या स्वायत्त संस्थांचे लोकशाही देशात जे महत्व असतं त्यांनाच मोदी सरकारने पांगळे करुन ठेवले.यात निवडणूक आयोगासारखी सरळ जनतेशी जुळणारी संस्था देखील आली.
११ सप्टेंबर २०१९ च्या आपल्या दुस-या मुलाखतीत सांगितले की जर ते देशाचे अर्थतज्ज्ञ असते तर देशाचा विकास दर दोन अंकी असता.मोदी यांनी आर्थिक सुधारणाची दिशाच उलटल्या बाजूने फिरवली,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.जीएसटी व नोटबंदीने देशाला बर्बाद केले!सर्वसामान्यांशी जुळलेली अशी एक ही वस्तू नाही ज्यावर अर्थतज्ज्ञ निर्मला सीतारमण यांनी १८ टक्के जीसएटी लावली नाही.औषधे,शेतक-यांची बि-बियाणे पासून तर भविष्याचा विचार करुन काटकसर करुन जाे विमा काढला जातो त्या विमाच्या लाभावर देखील मोदी सरकारने १८ टक्के जीएसटी लावला आहे!इंदिरा गांधी यांनी तर घोषित आणिबाणि लावली मात्र,मोदी यांनी संपूर्ण देशात अघोषित आणिबाणि लावल्याची टिका होते.मनमोहन सिंग हे शेवटपर्यंत आपल्या मारुती-८०० कारमध्येच प्रवास करीत राहीले.एवढी सादगी त्यांच्या वर्तनात होती.पंतप्रधान म्हणून त्यांनी उद्योगपती अदानी यांच्यासोबत नातं जोडलं नाही तर आपल्या पक्षातर्फे व्यवसायिक हिताची गोष्ट करीत होते.
मनमोहन सिंग यांनी तर भाजपच्या गोव्या येथील संमेलनात मोदी यांचे नाव पंतप्रधानासाठी घोषित होताच,सार्वजनिकरित्या व्हिडीयोच्या द्वारे सांगितले,की नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर हे भारतासाठी डिजास्टर होईल,निवडणूकीच्या चार महिन्यांपूर्वीच मनमोहन सिंग यांनी मोदींच्या कारर्कीदीबाबत ही भीती व्यक्त केली होती.त्यांची भीती शंभर टक्के सत्यात उतरली.संपूर्ण संसदीय व्यवस्थाच मोदी यांनी सोयीस्करपणे बदलून टाकली.व्यवस्थाच नव्हे तर मोदी यांनी देशाची ‘संसदच’बदलून टाकली.
जी-२० परिषदेत बराक ओबामा यांनी भरगच्च मंचावरुन मनमोहन सिंग यांचे नाव घेत,’जेव्हा मनमोहन सिंग बोलतात तेव्हा संपूर्ण जग ते ऐकत असतं’अश्‍या शब्दात त्यांचा गौरव केला होता मात्र,मोदी भक्तांनी तेच वाक्य उचलून ‘जेव्हा भारत बोलताे तेव्हा संपूर्ण जग ते ऐकत असतो,’अशी उक्ती जोडली.
मनमोहन सिंग यांच्या कारर्कीदीत रेल्वे मंत्री पवन कुमार बसंलच्या एका नातेवाईकाचे नाव भ्रष्ट व्यवहरात पुढे आले त्यावेळी त्यांनी बंसल यांना बोलावून राजीनामा मागितला.सुरेश कलमाडी संसदीय सचिव होते,त्यांच्यावर दिल्लीत कॉमनवेल्थ आयोजनाच्या वेळी भ्रष्टाचाराचे आरोप लागले मनमोहन सिंग यांनी सांगितले की तुम्हाला तुरुंगात जावेच लागेल.डीएमकेचे ए.राजा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपात देखील त्यांनी ए.राजा यांना कारागृहात पाठवले.आदर्शच्या घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना देखील पाठीशी घातले नाही मात्र,मोदी यांच्या कारर्कीदीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून देखील अदानी यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही,भाजपचे अनेक मंत्री ते संत्री देशाला लृटून भ्रष्टाचारातून अब्जोपती झाले,त्यांच्यावर मोदी यांचा कायम वरदहस्त राहीला.इतकंच नव्हे तर इतर राजकीय पक्षातूनही अनेक भ्रष्ट नेते भाजपने सहज आयात केले.भारतात एक ही सिमेंटचा प्रकल्प नाही जो अदानीने टेकओव्हर केला नाही.उद्योगपती बिर्ला यांना देखील आपले समभाग दबावातून अदानी यांना विकावे लागले असल्याचे बोलले जात आहे.एकाधिकारशाही झाल्याने आता अदानी ठरवेल तो सिमेंटचा दर सर्वसामान्यांना घर बांधण्यासाठी घ्यावा लागत आहे.याशिवाय वीज प्रकल्पांवर देखील अदानी पॉवरचीच एकाधिकारशाही आहे.महागडी वीज,यामुळे देशातील नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
टेनीसारख्या मंत्र्याच्या मुलाने आंदोलनकारी शेतक-यांच्या अंगावर गाडी चढवली मात्र, तरी देखील मोदी सरकारने शेवटपर्यंत टेनीचा राजीनामा घेतला नाही.भाजप,मोदी आणि नैतिकता यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही.मोदी यांचा स्वभाव हा कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणारा नाही,मी म्हणेल तीच पूर्व दिशा,त्यांना प्रश्‍न विचारलेले आवडत नाही.दहा वर्षात मोदी यांनी एकदा ही पत्रकार परिषद घेतली नाही.इतकंच नव्हे तर संसदेत पत्रकारांची दिर्घाही बंद केली!मनमोहन सिंग यांच्यात खोलवर लोकशाही मुल्ये रुजली होती.हे भारताचे सौभाग्य होते भारताला मनमोहन सिंग यांच्यासारखा दूरदर्शी व अर्थतज्ज्ञ पंतप्रधान लाभला.
हीच कृतज्ञता किवा कौतूक ते जिवंत असताना करण्यात आले नाही.माध्यमांनी देखील त्यांच्या कतृत्वाला पूर्णपणे वाळीत टाकले होते.ते रकानेच्या रकाने भरुन त्यांच्यासाठी आज लिहते झाले.अदानी व अंबानींच्या मालकीच्या वृत्तवाहीन्यांकडून जिवंतपणी त्यांना न्याय मिळालाच नाही.मोदींच्या कोट्यावधींच्या जाहिरातींच्या उपकाराखाली दबलेल्या प्रसार माध्यमांनी डॉ.मनमोहन सिंग जिवंत असताना त्यांची थोरवी,देशासाठी केलेले कार्य,विरोधकांच्याही अधिकारांचे संरक्षण करणारे मोठ्या मनाचे पंतप्रधान,यांची तुलना मोदींसोबत करुन कधीही प्रसिद्धी देण्याची हिंमत दाखवलीच नाही.आज ती वृत्तपत्रे डॉ.मनमोहन सिंग या आर्थिक सुधारणेच्या शिल्पकारावर पुरवण्या काढती झाली!
संपूर्ण प्रसार व प्रचार माध्यमांनी त्यांचे कवित्व त्यांच्या मृत्यूनंतरच ठलकपणे अधोरेखित केले.मोदी यांच्या केंद्रिय मंत्रिमंडळाने डॉ.मनमोहन सिंग यांनी देशाच्या राष्ट्रीय जीवनावर अमीट ठसा उमटवला असल्याचे सांगून श्रद्धांजली वाहिली.मनमोहन सिंग यांनी भारताच्या भवितव्याला एक आकार दिला,देशाच्या राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्व असून देशाचा चेहरामोहरा बदलण्याचे त्यांचे योगदान मान्य केले.
गेल्या साढे दहा वर्षात एकदा ही पत्रकारांच्या प्रश्‍नांना सामोरे न जाणारे पंतप्रधान मोदी,विरोधकांवर केंद्रिय तपाससंस्थांचा ससेमिरा लावणारे मोदी,अदानी व अंबानी या दोनच उद्योगपतींना देशातील सार्वजनिक प्रकल्पांची खैरात वाटणारे मोदी,हिंदूत्वाच्या अंहकारांनी भारलेले मोदी ,लोकशाही,विचार स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पदोपदी गळचेपी करणारे मोदी यांची पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्यासोबत तसूभरही तुलना होऊ शकत नाही.जनतेला विश्‍वासात न घेता रिर्झव बँकेच्या आपातकालीन राखीव गंगाजळीतून नियमबाह्यरित्या काढून घेतलेले धन ,एलआयसीमध्ये खासगी भागीदारांचा प्रवेश यासारखे निर्णय देशावर डॉ.मनमोहन सिंग यांनी कधीही लादले नसते.
संसदेत तर अमित शहा यांनी या देशाला फक्त चार गुजराती महापुरुषांनी घडवले असल्याची वलग्ना केली होती.मोरारजी देसाई,महात्मा गांधी,सरदार वल्लभभाई पटेल व नरेंद्र मोदी!यावरुन भाजपच्या या दोन्ही शीर्षस्थ नेत्यांचा अहंकार किती गगनाला भिडला आहे,याची प्रचिती येते.
२००४ मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला १४५ जागा मिळाल्या व मित्र पक्षाच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन झाली व डॉ.मनमोहन सिंग हे पंतप्रधान बनले.२००५ साली ते जेएनयुमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असता डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.या घटनेची माहिती मिळताच तत्कालीन कुलगुरु बी.बी.भट्टाचार्य यांना संबंधित विद्यार्थ्यांशी सौम्यपणे वागण्याची सूचना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली होती.आज अशी परिस्थिती उदभवल्यास देशद्रोहाचा खटला भरुन तुरुंगात डांबल्या जातं.
भारताच्या इतिहासात डॉ.मनमोहन सिंग यांनी लोकशाही मुल्याची इतकी मोठी रेष ओढली आहे ,ती कमी करने किवा त्यापेक्षा मोठी रेष ओढणे विद्यमान किवा पुढील पंतप्रधानांना अशक्य आहे.करोनाचं जागतिक संकट,ते हाताळण्यात मोदी यांना आलेले अपयश,पूर्वसूचना न देता जाहीर केलेला लॉकडाऊन,लाखो मजुरांना करावी लागली शेकडो किलोमीटरची जीवघेणी पायपीट,ठोस उपाययाेजनांऐवजी हास्यास्पद प्रतिकात्मक उपक्रमांचा धडाका,कोव्हिडवरील लशी लोकांपर्यंत पोहोचविण्यातील अक्षम्य दिरंगाई,उद्योग व्यवसाय बंद पडणे,लहान व्यापारी उद्योजक बर्बाद झाले,छोट्या कंपन्या कोलमडल्या,विकासदर खालावला,क्रयशक्तीचा -हास,महागाईचा डोंगर,खूप मोठा वर्ग गरिबीत ढकलला गेला,करोनामृतकाच्या नातेवाईकांना मदत करण्यास चालढकल,सर्वोच्च न्यायालयाचे वेळोवेळी मोदी सरकारवर करोना मृतकांच्या कुटूंबियांना मदत निधी देण्यासाठी ओढलेले ताशेरे,यात एकच गोष्ट टिकून राहीली ती म्हणजे मोदी यांची लोकप्रियता!यात देशाच्या ६६ अब्ज रुपयांच्या जाहीरातींचा मोलाचा वाटा आहे.देशाला गंभीर आर्थिक संकटातून काढणारे मनमोहन सिंग हे करोना काळात पंतप्रधान पदी असते तर देश लवकर सावरला असता,मृत्यूचे थैमान कदाचित थांबले नसते,लाखो कुटूंबियांना आपले आप्त गमवावे लागले यापेक्षा मोदी सरकारच्या बेफिकरीचा संताप वाटतो.
मनमोहन सिंग जिवनाच्या अखेरपर्यंत ज्या काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहीले त्या पक्षात ही त्यांची घुसमट त्यांनी कधीही देशासमोर येऊ दिली नाही.२७ सप्टेंबर २०१३ रोजी प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषद सुरु असताना राहूल गांधी यांनी अजय माकन यांना फोन करुन कळवले की ते मीडियाला संबोधित करतील.दोषी खासदार व आमदारांना निवडणूक लढवता येणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने १० जुलै रोजी दिला होता.या निकाला विरोधात मनमोहन सिंग यांनी काढलेल्या अध्यादेशाचे तुकडे भर पत्रकार परिषदेत राहूल गांधी यांनी भिरकावले.दोषी खासदारांना सरंक्षण देणारा हा अध्यादेश मूर्खपणा असल्याचे सांगून फाडून फेकून दयावा असे राहूल गांधी म्हणाले होते.हाच निर्णय पक्षस्तरावर देखील ते मांडू शकत होते मात्र,त्यांच्या या ड्रामेबाज कृतीतून मनमोहन सिंग यांचा घोर अपमान झाला होता,देश अद्याप त्या घटनेला विसरलेला नाही.
आज डॉ.मनमोहन सिंग अनंतात विलिन झाले मात्र,त्यांच्या मृत्यूनंतर देखील ते भाजप व काँग्रेसच्या राजकारणात ओढले गेले.स्मृतिस्थळा ऐवजी डॉ.सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या पूर्वी सर्व पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार राजघाटावर झाले आहे.त्यात ही अंत्यसंस्काराचे चित्रिकरण करण्याची परवानगी दूरदर्शन सोडून इतर कोणत्याही वाहिनीला नव्हती.दूरदर्शने चित्रिकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना केंद्रस्थानी ठेवले याशिवाय आपल्या निवेदनात डॉ.सिंग यांच्या कुटूंबाचा फारसा उल्लेख ही केला नसल्याचा आरोप काँग्रेसचे माध्यमविभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी एक्सवर केला.डॉ.सिंग यांच्या कुटूंबियांसाठी पहील्या रांगेत फक्त तीन खुर्च्या ठेवल्या होत्या.त्यांच्या कन्या व इतर जवळच्या नातेवाईकांसाठी जागा मिळावी यासाठी काँग्रेस नेत्यांना आग्रह करावा लागला.डॉ.सिंग यांच्या पत्नीकडे ध्वज देताना तसेच सलामी दिली जात असताना उभे राहण्याचा शिष्टाचार देखील पंतप्रधान व त्यांच्या मंत्र्यांनी पाळला नाही.डॉ.सिंग यांच्या नातवंडांना आजोबाच्या दर्शनासाठीही झगडावे लागले.अमित शहा यांच्या ताफ्यामुळे अंत्ययात्रा विस्कळीत झाली. डॉ.सिंग यांच्या नातेवाईकांची वाहनेच बाहेर अडकली होती.त्यांना शोधून आत आणण्यात आले.इतकंच नव्हे तर परदेशी पाहूणे यांना देखील अशा ठिकाणी बसवण्यात आले जेथून त्यांची उपस्थिती जाणवूनये!
दुसरीकडे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्येने त्यांच्या वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना मिळालेली वागणूक याकडे बोट दाखवले.काँग्रेसने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साधी कार्य समितीची बैठक देखील बोलावली नाही,अश्‍या शब्दात शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसला आरसा दाखवला.भाजपने डॉ.मनमोहन सिंग यांचे स्मारक योग्य स्थळ बघून उभारण्यात येईल असे एक्सवर पोस्ट केले मात्र,अटलजींचे अंत्यसंस्कार राजघाटा ऐवजी अन्यत्र झाले असते आणि त्यांचे स्मारक दुसरीकडे कुठे तरी उभारले गेले असते तर कसे वाटले असते?असा सवाल काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धुू ने केला.
‘इतिहास मला नक्कीच न्याय देईल’,त्यांचा हा आत्मविश्‍वास सार्थक झाला.देशवासियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारर्कीद अनुभवल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या सार्थ वाटचालीप्रति प्रत्येक देशवासी हा कृतज्ञ झाला.हीच देशाच्या त्या कर्ता सुधारकाला खरी श्रद्धांजली आहे.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या